मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३६ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३६

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३६

मागील भागात आपण बघीतलं की नेहा घरच्यांना समुपदेशना बद्दल सांगते. घरचे सगळे तयार होतात.

लंचटाईम मध्ये नेहा रंजनाला सांगते.

"रंजना काल अचानक मी प्रियंकाजवळ समुपदेशनाचा विषय काढला.तिला समुपदेशन म्हणजे काय हे आधी समजावून सांगितलं नंतर समुपदेशनामुळे काय साध्या होतं हेही प्रियंकाला सांगितलं तर ती चटकन तयार झाली. मला टेन्शन आलं होतं ते दूर झालं."



"चला बरं झालं अचानक विषय निघाला आणि तू समजावून सांगितलं. कधी कधी खूप तयारी करूनही विषय समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकत नाही."

"खरय. मी तिला म्हटलं की तूच निरंजनला सांग. तुझी समुपदेशनासाठी तयारी आहे हे बघितल्यावर तोही चटकन तयार होईल.तर हो म्हणाली."

"चला हेपण बरं झालं."

"मी काल सुधीरलाही सांगीतलं की तू निरंजनशी बोल. आज बोलीन म्हणाला. तिकडून हो आलं की आपण विद्ध्वंस मॅडमशी बोलू शकतो."

"हो. तुला यात आणखी काही मदत लागली तर सांग."

" हो सांगेन. या समुपदेशनामुळे प्रियंकाचं मनोबल ऊंचावलं आणि तिचा आत्मविश्वास वाढावा असं वाटतं आहे.बाकी प्रियंका जाणून आहे की एक ना एक दिवस कॅंन्सर पेशंट दगावतोच."

"अगं तसं प्रत्येकालाच एक न् एक दिवस जायचयं. इथे कोण अमरपट्टा घेऊन आलय? पण प्रियंका एवढी धीट आहे याचं कौतुक वाटतं."

"हो नं. म्हणून तिच्या साठी जीव थोडा थोडा होतो."

रंजनाने नेहाच्या हातावर थोपटत म्हटलं,

"तू करतेस हे महत्वाचं आहे. बाकी आपल्या हातात काही नाही. आज जर सुधीर बोलला असेल तर काय करायचे हे ठरलं तर तुला विद्ध्वंस मॅडम कडे घेऊन जाईन. तुझी ओळख करून देईन. मग तू सांग."

"हो. चल लंच टाईम संपला."

दोघीही आपला डबा बंद करून उठल्या.

******

सुधीर लंचटाईम मध्ये निशांतला भेटला. आज नितीन टूरवर गेल्यामुळे ही दोघच लंच टाईम ला भेटले.

निशांतला नेहा काल काय म्हणाली ते सुधीरने सांगीतलं यावर निशांत म्हणाला,

"अरे हो. आत्ता माझ्या लक्षात आलं मी पण या समुपदेशनाबद्दल ऐकलंय. नुसतं ऐकलं नाही तर जवळच्या ओळखीच्या व्यक्तीची केस बघीतली आहे. या समुपदेशनामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास जागला. ते खूप उत्साहाने त्यांच्या साठी असलेला व्यायाम पण करत. हळुहळू का होईना आपली सगळी कामं करत असत. हे चांगलं सांगीतलं नेहाने. तुम्ही प्रियंकाचं समुपदेशन करून घ्या. आत्ता तिच्या मनात जे नैराश्य दाटून आलय ते नाहीसं होईल."

"नेहा तेच म्हणाली. तिच्या ऑफीसमधली तिची मैत्रीण आहे रंजना तिच्या घराशेजारी विद्ध्वंस म्हणून कोणी मॅडम राहतात. त्या कॅंन्सर पेशंटना समुपदेशनाचं काम करतात. मी आज निरंजनशी बोललो या समुपदेशना बद्दल तर तोही तयार आहे. म्हणाला काल प्रियंकाने मला हे सांगीतलं. प्रियंकाची इच्छा आहे. नेहावर प्रियंकाचा विश्वास आहे. आपण प्रियंकासाठी हे करून बघू."

"निरंजन पण तयार आहे हे बरंय. नेहा कधी घेतेय त्या मॅडमची वेळ?"

"मला वाटतं आहे की आधी नेहा आणि मी निरंजनला घेऊन त्या मॅडम कडे जाऊ. निरंजन सगळं सविस्तर त्यांच्याशी बोलेल. मग कधी त्यांच्या क्लिनिक मध्ये घेऊन जायचं हे ठरवू. हे मला वाटतं आहे. मी नेहाशी बोलतो मग निरंजनला विचारतो त्या मॅडमची कधी वेळ घेऊ?"

"लवकरच वेळ घ्या फार‌वेळ लावू नका. कारण कॅंन्सर फार झपाट्याने पसरतो. तो आटोक्यात आहे तोवरच त्याला औषधं आणि प्रियंकामधील सकारात्मक ऊर्जा याने बांध घालायला हवा."

"तू म्हणतोस ते बरोबर आहे.आताही लास्ट स्टेजला आहे सांगितलं आहे पण सध्या तरी ती चालते फिरते आहे. "

"तिच्या केमोथेरपी कधी सुरू होणार आहे?"

"परवा पहिली केमोथेरपी आहे."

"मला वाटतं त्या दिवशी तिच्या बरोबर कोणीतरी लागेल."
निशांत म्हणाला.

"मी,नेहा आणि निरंजन राहूच.नंतरच्या दिवशी निरंजन सुट्टी घेणार आहे. काल मी आणि निरंजन दोघं डाॅक्टर आगाशे यांच्या कडे गेलो होतो.डाॅक्टर आगाशे यांनीच बोलावलं होतं."

"अच्छा."
निशांत म्हणाला.मग सुधीर त्या डाॅक्टरांशी झालेलं संभाषण निशांतला सांगतो.

"या "

डाॅक्टर आगाशे सुधीर आणि निरंजन ला बघून म्हणाले.
निरंजन आणि सुधीर डाॅक्टर आगाशे यांच्या केबीनमध्ये येऊन बसतात

"मिस्टर साठे आपण परवापासून तुमच्या मिसेसना केमोथेरपी देणार आहोत."


"डाॅक्टर केमोथेरपी म्हणजे काय? नाव माहीत आहे. ही एक ट्रिटमेंट आहे हेही माहीत आहे. पण ते कशाला म्हणतात हे माहीत नाही."

निरंजनने विचारलं.


"गुड. छान प्रश्न विचारला. किमोथेरपी म्हणजे कॅन्सरच्या विरोधात वापरली जाणारी औषधे. ही औषधे गोळ्यांच्या माध्यमातून किंवा आयव्ही लाइनद्वारे दिली जातात. आयव्ही औषधांची सहा ते आठ चक्रं द्यावी लागतात. "

"चक्र म्हणजे?"
निरंजनने गोंधळून विचारलंं.

"चक्र म्हणजे ही उपचार पद्धती सात ते आठ वेळा द्यावी लागते."
डाॅक्टरांनी स्पष्ट केलं.

"अच्छा."

"या चक्रांमध्ये तीन आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते. अनेकदा काही औषधे आठवड्यांतून एकदाच दिली जातात."


"डाॅक्टर या केमोथेरपीच्या औषधांमुळे काही दुष्परिणाम होतात का? म्हणजे माहिती असावं म्हणून विचारलं."


"बरोबर. तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. केमोथेरपीच्या औषधांबद्दल अनेक चुकीचे समज आहेत. मात्र काही पेशंटना या औषधांमुळे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य काळजी घेतल्यास केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळता येतात."

"डाॅक्टर आणखी एक प्रश्न मनात आहे कीपेशंटला केमोथेरपी मुळे त्रास झालाच तर कशाप्रकारे होऊ शकतो?"

"केमो घेतल्यानंतर काही पेशंटना मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा त्रास बराच आटोक्यात आला आहे. केमोथेरपीचा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे पांढऱ्या पेशी कमी होणे. पांढ-या पेशी आपल्या संरक्षक पेशी असतात. ज्या आपल्याला संसर्गापासून वाचवतात. थोडक्यात या पांढ-या पेशी आपल्या शरीरातील सैनिक असतात. मला वाटतं तुम्ही हे शाळेत शिकला असाल?"

"हो डाॅक्टर शिकलो आहे."
निरंजन म्हणाला.

"शरीरातील पांढ-या पेशी कमी झाल्यामुळे कॅंन्सर पेशंटना संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग होऊ नये यासाठी वैद्यकीय परिभाषेत ग्रोथ फॅक्टरचा वापर करण्यात येतो. थेरपी सुरू केल्यानंतर केस जातात, पण त्यामुळे एवढं घाबरून जायचं नाही कारण पाच ते सहा महिन्यांनंतर केस पुन्हा येतात."



"डाॅक्टर या काळात आम्ही पेशंटच्या नातेवाईकांनी कोणती विशेष काळजी घ्यायला हवी?"

"हो काळजी तर घ्यायलाच हवी. कारण पेशंटची प्रतिकार शक्ती खूपच कमी झालेली असते. केमोथेरपी सुरू असताना पाणी उकळून प्यायला हवं. पाणी ऊकळल्यामुळे त्यातील जंतूंचा नाश होतो हे तुम्हाला माहीत असेल?"

"हो. डाॅक्टर आम्ही पाणी उकळून देऊ."

" त्याचं बरोबर कच्चे पदार्थ खाणं टाळायला हवं, गर्दीमध्ये जाऊ नये, जनसंपर्क टाळावा , नाकावर मास्क लावावा, फळे साली काढून खावीत.ज्या ज्या गोष्टींमुळे कॅंन्सर पेशंटना त्रास होण्याची शक्यता असते ते आपण सगळं टाळायला हवं. मला माहिती आहे हे सगळं करणं कॅंन्सर पेशंटच्या आजुबाजुला असणा-या व्यक्तींची खूप धावपळ होते पण हे पेशंट साठी करायलाच हवं."

"डाॅक्टर धावपळ झाली तरी चालेल पण आपला पेशंट बरा झाला तर ते समाधान सगळा थकवा नाहीसा करतो."

"बरोबर बोललात. आमची जी टार्गेटेड थेरपी असते त्या टार्गेटेड थेरपीची औषधे ही केवळ कॅन्सरच्या पेशींवर वार करतात. त्यामुळे सर्वसामान्य पेशींना त्याचा त्रास होत नाही. या औषधांचा दुष्परिणाम खूप कमी होतो. अनेक कॅन्सरच्या प्रकारांमध्ये ही थेरपी उपलब्ध आहे"

"डाॅक्टर केमोथेरपी तुम्ही देणार?"
निरंजनने विचारलं.


"नाही .किमोथेरपी प्रशिक्षित ऑन्कोलॉजिस्ट देतात. अन्य क्षेत्रातील डॉक्टरांनी ही थेरपी दिल्यास पेशंटचे नुकसान होऊ शकतं. तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो ही औषधे देण्यासाठी आता काही वैद्यकीय मदत देणाऱ्या सामाजिक संस्था पुढाकार घेऊ लागल्या आहेत. त्या संस्थांची यादी तुम्हाला आमच्या दवाखान्याच्या ऑफीसमध्ये मिळेल.यांची तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला कॅंन्सरची उपचार पद्धती करणे सोयीचे जाईल. खर्चाच्या दृष्टीने तुम्ही ही मदत घ्यावी असं मला वाटतं."


"धन्यवाद डाॅक्टर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली. त्यामुळे आमचं टेन्शन खूप कमी झालं. वैद्यकीय मदत करणा-या संस्थांची यादी ऑफीसमध्ये आम्हाला कोण देईल?"

"ऑफीसमध्ये कदम म्हणून आहेत त्यांना विचारा ते देतील."

"ठीक आहे. परवा किती वाजता येऊ केमोथेरपी साठी?"

"तुमचा नंबर आमच्या ऑफिसमध्ये सेव असेल. त्यावर ते वेळ कळवतील. तुम्हाला खूप शुभेच्छा."
डाॅक्टरांनी सुहास्य वदनाने निरंजनला शुभेच्छा दिल्या."

"धन्यवाद डाॅक्टर."


सुधीर आणि निरंजन दवाखान्याच्या बाहेर पडले.

."निशांत निरंजनचा चेहरा खूप थकलेला आणि उदास वाटत होता."

"असणारच केवढा मोठा आजार झालाय प्रियंकाला. वर्ष तर होतंय त्यांच्या लग्नाला."

"हो नं त्याचच वाईट वाटतं."

"तू आणि नेहा सतत प्रियंका आणि निरंजन बरोबर रहा. जास्तीची काही मदत लागली तर मला आणि नित्याला सांग. प्रियंका आम्हा दोघांची बहीण आहे."

"हो."

"चल लंच टाईम संपून बराच वेळ झाला आहे."

"चल"
सुधीर म्हणाला.

दोघंही आपापला डबा घेऊन कॅंटीनबाहेर पडले.

__________________________________