मला स्पेस हवी पर्व १ भाग ४४
मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाची तब्येत सिरीयस होते.तिला दवाखान्यात ॲडमीट करतात.पुढे काय होतं बघू.
प्रियंकाला ॲडमीट केल्यानंतर निरंजन सगळ्यांची वाट बघत अस्वस्थपणे आय.सी.यू. समोर येरझाऱ्या घालत होता. मधुन मधुन त्याचं लक्ष वरच्या पहिल्या मजल्यावरील मोठ्या खिडकीतून खाली दवाखान्याच्या पाय-यांकडे जात होतं. त्याचे आईबाबा, सुधीर,त्याचे आईवडील,नेहा यापैकी कोणीच येताना दिसत नव्हतं क्षणोक्षणी निरंजनचा धीर खचत चालला होता. तो हताश होऊन आणि येरझाऱ्या घालून थकल्यामुळे खुर्चीवर बसला.
आपल्या ओंजळीत चेहरा लपवून अश्रू गाळू लागला. त्याचं वेळी त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने दचकून वर बघीतलं. सुधीर आला होता त्याला बघताच निरंजनच्या मनाचा बांध फुटला.
“सुधीर काय होईल रे?”
रडतच निरंजन बोलला. सुधीर त्याच्या बाजूला बसला आणि त्याच्या पाठीवर थोपटत त्याला जवळ घेतलं.
“निरंजन धीर धर. डाॅक्टर प्रयत्न करतात आहे.”
“खूप कमी वेळ उरला आहे प्रियंकाजवळ असं त्या दिवशी डाॅक्टर म्हणाले. आज तर मघाशी ती काहीच बोलली नाही. डोळेपण उघडले नाही. बोलेल न रे ती माझ्याशी?”
सुधीरला यावर काय ऊत्तर द्यावं कळलं नाही.तो शांतच बसला.
निरंजनचे आईबाबा आले तसा सुधीर उठून उभा राहिला. आय.सी.यू.कडे बोट दाखवून बाबांनी खुणेनेच काय आहे विचारलं. सुधीरने ही मानेनेच माहिती नाही असं सांगितलं.
निरंजनचे आईबाबा खुर्चीवर बसले. दोघांचेही चेहरे ओढलेले दिसत होते. आज दोन वर्ष ते प्रियंकाच्या तब्येतीतील चढउतार बघत होते. प्रियंकाचं दुखणं कुठपर्यंत जाऊन पोचणार आहे याची निरंजन सोडून सगळ्यांना कल्पना कधीच आलेली होती. तशी कल्पना निरंजनला पण आली होती पण तो प्रियंकामध्ये इतका गुंतला होता की त्याला तिचा काय शेवट होणार आहे हे माहीत असूनही तो मान्य करायला तयार नव्हता. इतरांनी ते मान्य केलं होतं. अगदी जन्मदात्र्या आईने सुद्धा मान्य केलं होतं.
नऊ महिने जिला आपल्या पोटात वाढवलं तिचा इतक्या अकाली येणारा मृत्यू मान्य करणं आईसाठी सोपं नसतं. प्रियंकाच्या आईला सुद्धा ते सोपं नव्हतं पण आपल्या मुलीनं खूप यातना सहन करत जगावं असं त्यांना वाटत नव्हतं. आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर दिसावी म्हणून तिला यातना सहन करायला लावण्यापेक्षा तिला आपल्या हृदयात जपून ठेवणं त्यांना महत्वाचं वाटलं.
मनाच्या चित्र विचित्र आंदोलनामध्ये सुधीरचे आईबाबा दवाखान्यात येऊन पोचले. रिक्षातून उतरताना सुधीरच्या आईचा किंचीत तोल गेला. ती खाली पडणार तेवढ्यात स्कुटी पार्किंग लाॅट मध्ये ठेवून घाईने दवाखान्याच्या पाय-यां चढणा-या नेहाचं लक्ष गेलं आणि तिने धावतच येऊन सासूला वरचेवर पकडलं.
“आई काय झालं? चक्कर आली का?”
“काहीच कळत नाही सध्या.”
आई म्हणाली.
त्यांची मनःस्थिती नेहाच्या लक्षात आली. सध्या ते सगळेच या सैरभैर मनस्थितीत होते.
“बाबा पैसे द्यायचे आहेत का?”
नेहाने विचारलंं.
“हो. आहे माझ्याकडे.तू हिला घेऊन जा.”
“नको. मी थांबते. तुम्ही रिक्षाला पैसे द्या मग जाऊ “
“ठीक.”
बाबा म्हणाले.
सुधीरचे बाबा ब-याचं वेळ खिशात पैसे शोधत होते त्यांना सापडत नव्हते. त्यांना काही न विचारता नेहाने चटकन पर्समधून दोनशे रूपयाची नोट काढली आणि रिक्षेवाल्यासमोर धरली.
“मॅडम माझ्या कडे चिल्लर नाही.”
“किती झाले?”
“दिडशे रूपये.”
रिक्षेवाला ऊत्तरला.
“तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवू का?”
नेहाने विचारलंं.
“खिशात सुटे पैसे हवेत.”
नेहाने पर्समध्ये बघीतलं.
“हं ही घ्या पन्नासची नोट आणि शंभर रुपये मी ऑनलाईन पाठवते.चालेल?”
“हो चालेल.”
रिक्षेवाला म्हणाला.
नेहाने पन्नास रुपयांची नोट देऊन शंभर रूपये ऑनलाईन पाठवले. नंतर दोघांना घेऊन नेहा दवाखान्याच्या पाय-या चढू लागली.
नेहा सुधीरच्या आईबाबांना घेऊन लिफ्टने पहिल्या मजल्यावर आली. निरंजन, त्यांचे आईबाबा आणि सुधीर तिथे बसले होते.
सुधीरची आई निरंजनच्या आईजवळ येऊन बसली. दोघीजणी शब्देविणू संवाद साधत होत्या. डोळ्यातून एकमेकींना आधार देत होत्या. एकीची लेक जीवन मरणाच्या दारात लढत होती तर दुसरीचा लेक तिच्या लेकीसाठी तीळ तीळ झुरत होता. दोघींच्याही ओटीत दु:खच पडणार होतं.
बराच वेळ सगळेच गप्प होते.कोणाचकडे शब्द नव्हते एकमेकांच्या सांत्वनासाठी. सगळ्यांच्या डोळ्यात पुढे काय होऊ शकतं याची भीती दाटलेली दिसत होती.
अचानक आय.सी.यू.मध्ये गडबड सुरू झालेली दिसली. कोणत्या पेशंटसाठी होती ते कळायला मार्ग नव्हता. सगळेजण ती गडबड प्रियंकासाठी तर नाही या भीतीनं आयसीयू कडे बघत होते.
एक डाॅक्टर घाईने बाहेर आले. त्यांना विचारण्यासाठी सुधीर दोन पावलं समोर आला पण डाॅक्टर त्याच्या समोरून घाईने निघून गेले. पाठोपाठ एक नर्स बाहेर आली ती पण डाॅक्टर गेले त्यांच्या मागे गेली.
“सुधीर कोणासाठी ही गडबड चालू आहे?”
सुधीरच्या बाबांनी सुधीरला विचारलंं.
“माहिती नाही. पण विचारायचं कोणाला तेही कळत नाही.”
“जरा जाऊन बघतोस काय?”
“हो बघतो.”
सुधीर म्हणाला पण बराच वेळ त्याची पावलं काही उचलत नव्हती. वाईट गोष्ट ऐकायला मिळाली तर काय करायचं? हा भीतीचा धसका त्याच्या मनात होता.
काहीवेळ शांततेत गेला. आयसीयूत पण शांतता होती. हे सगळे बाहेर विमनस्क अवस्थेत उभे होते.बाकी पेशंटचे ही नातेवाईक तिथे होते. सगळे ताणात होते पण त्यांना त्यांच्या पेशंटची सद्य स्थिती माहिती असल्याने ते बसले होते.
प्रियंकाला सकाळ पर्यंत इतका त्रास होत नव्हता की सगळें इतके घाबरावेत. पण ही परीस्थिती लवकरच येऊ शकते याचा अंदाज सगळ्यांनीच बांधला होता. अंदाज बांधणं आणि प्रत्यक्षात तसं घडणं यात फार फरक आहे. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर सगळ्यांचाच मेंदू काम करेनासं होतो हे सत्य आहे.
“परमेश्वरा माझ्या मुलीला बरं करता येत नसेल तर खूप वेदना न देता मुक्त कर.”
प्रियंकाची आई रडतच मनात म्हणाल्या. इकडे निरंजनच्या आईच्या मनातही असेच काहीसे विचार येत होते.
“प्रियंकाच्या वेदना बघवत नाहीत हो”
कसंबसं निरंजनची आई म्हणाल्या.
“मला सुद्धा बघवत नाही. आई असून मला वाटतं आहे की परमेश्वराने हा वेदनेचा खेळ थांबवावा. नको इतका त्रास प्रियंकाला देऊ आणि आम्हाला ही.”
निरंजनची आई विस्फारलेल्या नजरेने प्रियंकाच्या आईकडे बघत होत्या. खरतर हीच भावना त्यांच्याही मनात आली होती.
त्या पण आई होत्या. कोणत्याही आईला आपल्या पोटच्या गोळ्याला मरणयातना संहन कराव्या लागतात आहे हे बघवत नाही. प्रियंकाच्या आईने ते बोलून दाखवलं कारण आता त्यांच्या सहनशक्ती पलीकडे सगळं गेलं होतं.
सुधीरच्या बाबांचीपण अस्वस्थ चुळबूळ चालू होती. मध्येच ते आपल्या बायकोकडे बघत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेलं दुःख त्यांना कळत होतं. हे दु:ख शब्दातीत होतं. या दु:खाचा कुठेतरी अंत व्हावा असं त्यांनाही वाटत होतं. तेही हे दु:ख सहन करण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
सुधीरच्या बाबांनी त्यांच्याही नकळत सुधीरचा हात घट्ट धरुन ठेवला. त्यांचा हात थरथरत होता. सुधीरच्या हे लक्षात आलं. त्याने आपल्या बाबांचा हात हळूच थोपटून त्यांना नजरेनेच धीर दिला.
निरंजन तर दु:खाच्या कड्यावर बसलेला होता जेव्हा प्रियंका नाही हे कळेल त्या क्षणी तो दरीत कोसळेल हे स्पष्ट कळत होतं. सुधीर निरंजन जवळ जाऊन बसला.
“निरंजन हे पाणी घे. जरा बरं वाटेल.”
सुधीर निरंजन समोर पाण्याची बाटली धरत म्हणाला.
“मला काही नको. मला माझी प्रियंका बरी व्हायला हवी आहे.”
सुधीर काही न बोलता निरंजनला थोपटत बसला.
पुन्हा आयसीयू मध्ये गडबड दिसली. सुधीर लगेच आयसीयू जवळ गेला. त्याने दाराच्या काचेतून बघीतलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डाॅक्टरांची धावपळ प्रियंकाच्या बेडजवळच चालली होती. सुधीरच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. त्याच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या मानेला कोणाचा तरी गरम श्वास जाणवला म्हणून त्याने मागे वळून बघितलं तर सगळेच मागे येऊन उभे होते.
डाॅक्टरांच्या चेह-यावरचे भाव बघून निरंजन मटकन खालीच बसला. त्याच्या तश्या बसण्याचे त्याचे बाबा जे निरंजनच्या मागे उभे होते मागे ढकलल्या गेले आणि तोल न सांभाळल्या गेल्याने खाली पडले.
“काका”
नेहाच्या ओरडण्याने सगळ्यांनी मागे बघीतलं तर निरंजनचे बाबा खाली पडले होते आणि नेहा त्यांना ऊठवत होती. सुधीरचं आता निरंजन कडे लक्ष गेलं तो कशातच नव्हता अशी त्याची तंद्री लागली होती. सुधीरने लगेच निरंजनला उठवलं आणि हळूहळू खुर्च्या ठेवल्या होत्या तिकडे नेलं. त्याला हळूच खुर्चीवर बसवलं.
“काका तुम्हाला चक्कर आली का?”
सुधीरने निरंजनच्या बाबांना विचारलंं.
“नाही. “
“अरे निरंजन खाली बसला त्यामुळे त्याचा धक्का काकांना लागला.असा धक्का लागेल अशी कल्पना नसल्याने ते खाली पडले.”
नेहाने सुधीरला सांगितलं.
“नक्की.तू बघीतलं?”
“हो माझं निरंजन कडे आणि काकांकडे दोघांकडेही लक्ष होतं कारण मी मागे उभी होते.”
सुधीरने काकांना पाणी दिलं. तेवढ्यात त्याचं लक्ष आयसीयू मधून बाहेर आलेल्या डाॅक्टरांकडे गेलं.तो घाईने तिकडे गेला.
“डाॅक्टर प्रियंका कशी आहे?”
“साॅरी त्या आता नाहीत. सकाळपासूनच त्यांची परिस्थिती खालावत गेली हे नर्सच्या लक्षात आल्यामुळेच मी लगेच घेऊन या म्हटलं. कारण घरी सगळे उपचार करता येत नाहीत. तुम्हीच सगळ्यांना सावरून घ्या.”
डाॅक्टरांनी सुधीरच्या खांद्यावर हाताने थोपटत म्हटलं.
सगळे सुन्न झाले. प्रियंका आता आपल्या बरोबर नाही हे सत्य स्विकारणौ सगळ्यांसाठीच कठीण होतं.
सुधीरचे बाबा लटपटत्या पावलाने खुर्चीवर येऊन बसले. आईच्या डोळ्याला पाण्याची संततधार लागली.त्यांना आणि निरंजनच्या आईला नेहाने सावरून खुर्चीवर बसवलं.
नेहाचे डोळे आयसीयुच्या काचेतून प्रियंकाच्या बेडकडे बघत होती. तिचा उघडा असलेला चेहरा तिच्यातील प्राण जाताच दुसऱ्या क्षणाला पांढ-या चादरीने झाकून टाकला. प्रियंकाच्या बेडभवती सगळीकडून पडदे लागले कारण आयसीयू मध्ये इतरही पेशंट होते. त्यात काही सिरीयस पण होते.आयसीयु मधील नर्स आणि वाॅर्ड बाॅय जणूकाही घडलच नाही अशा चेहे-याने आयसीयूतील इतर पेशंटची सेवा करू लागले.
नेहाने जवळचा स्कार्फ तोंडात कोंबून आपलं रडणं दाबलं. निरंजनच्या डोळ्यातील चमक क्षणात नाहीशी झाली आणि तो बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध झालेला दिसताच सुधीरने नर्सला सांगीतलं. ताबडतोब निरंजनला इमर्जन्सी वाॅर्ड मध्ये नेण्यात आलं. त्यांच्या पाठोपाठ सुधीरही इमर्जन्सी वाॅर्ड कडे गेला.
निरंजनचे आईबाबा आणि सुधीरचे आईबाबा यांच्या कडे लक्ष देत नेहा तिथेच थांबली.
“परमेश्वरा हीच मुलगी पुढच्या जन्मात ही माझ्या पोटी दे.पुढच्या जन्मी मात्र तिला असा अकाली नेऊ नकोस.”
प्रियंकाची आई हे बोलून हसमाहसमशी रडू लागल्या.
निरंजनच्या आईची अवस्था पण वाईट होती.
“वर्षभरात प्रियंकाने इतका जीव लावला की आता मला कोण लेकीच्या मायेने विचारपूस करणारा?”
प्रियंकाच्या आईचा हात हातात घेत म्हणाल्या.
सगळेच फक्त अश्रूंनी बोलत होते.
________________________________
पुढील भागात बघू काय होईल?