पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )
भाग ११ (अंतिम)
भाग १० वरून पुढे वाचा ....
“बरोबर आहे त्यांचं” इंस्पेक्टर प्रसाद म्हणाले. त्यांनी किशोर ला दुर्गा कुमारच्या पत्रा बद्दल सांगितलं. हे ऐकून किशोरच्या पायाखालची जमीनच सरकली. माधवी तर भयंकर संतापली. म्हणाली “अहो असं कसं, जे लोकं बँकेत होते, त्यांनी सगळं पाहीलं आहे, हा कोण माणूस आहे असं विपरीत बोलतो आहे? तद्दन खोटं आहे हे”
“माधवी मॅडम शांत व्हा. खरं काय आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. या माणसाला शोधायला आमच्या टीम गेल्या आहेत. तो आल्यावरच कळेल की त्याचा असं पत्र लिहिण्या मागे काय उद्देश आहे तो. पण तुम्ही आणि किशोर साहेब निश्चिंत रहा. आम्ही बघून घेऊ.” – प्रसाद.
पोलिस दिलासा देऊन निघून गेले, पण किशोर, माधवी आणि विभावरी तिघंही चिंतेत पडले.
“आता काय होणार?” – विभावरी. “मी उत्तम काकांना फोन करू का?”
“उत्तम काका कोण?” – माधवी
“आमच्या ओळखीचे आहेत, पुण्याला ACP आहेत. त्यांना कदाचित माहिती असेल की अश्या परिस्थितीत काय होतं ते.” – विभावरी.
“लावा न फोन. माझ्या मते बरोबरच आहे.” – माधवी.
मग माधवीने फोन लावला. थोडा वेळ बोलल्यावर, कॉल संपला.
“काय म्हणताहेत काका?” – किशोर. तो ही वैतागला होता, केंव्हा एकदा पुण्याला जाईन असं झालं होतं त्याला.
“ते म्हणताहेत की घाबरण्याचं काही कारण नाही. पोलिस तपासात सर्व उघड होईल. पण कदाचित किशोर आणि बाकीच्या लोकांना मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट द्यावं लागेल. पण अर्थात ते मॅजिस्ट्रेट साहेब ठरवतील.” – विभावरी.
“म्हणजे आता या प्रश्नांची तड लागे पर्यन्त मुक्काम दरभंगा” – किशोर.
“सर तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत ना. तुम्हाला आणि विभा ताईंना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही.” – माधवी.
माधवीने दिलासा दिला, तरी पण किशोर आणि विभावरीच्या चेहऱ्यावरची निराशा काही कमी झाली नाही.
****
ज्या पेपर मधे पत्र छापून आलं होतं त्या पेपरच्या ऑफिस मधे गेलेले पोलिस संध्याकाळी इंस्पेक्टर प्रसादांना अपडेट देत होते.
“सर त्या दर्गा कुमार ने पेपरच्या ई मेल आयडी वर मेल केली होती. त्यामुळे त्यांना त्याच्या नाव गाव पत्त्यांची काहीच कल्पना नाहीये.” – शिपाई.
“त्यांनी मेल केली आहे म्हणजे त्याचा ई मेल आयडी तर आला असेलच न, तो आणला आहे का?” - इंस्पेक्टर प्रसाद.
“हो साहेब” असं बोलून शिपायाने एका कागदावर लिहून आणलेला ई मेल आयडी प्रसाद साहेबांसमोर ठेवला. प्रसाद साहेबांनी सायबर सेल ला फोन लावला. त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली. म्हणाले, “आम्हाला हा माणूस हवा आहे. त्याचा ई मेल आयडी मी तुम्हाला पाठवतो आहे`” सायबर सेल च्या अधिकाऱ्याने विषयातलं गांभीर्य समजून कामाला सुरवात केली. प्रथम ई मेल आयडी वरुन त्याचा IP अॅड्रेस शोधून काढला. त्यावरून त्याने ही मेल कोणच्या मशीन वरून केली आहे हे शोधून काढलं. म्हणजे डेस्क टॉप वरुन की लॅपटॉप वरुन की मोबाइल वरुन. त्यावरून कळलं की ही मेल मोबाइल वरून केली आहे. त्यावरून त्याने तो मोबाइल नंबर शोधून काढला. हा मोबाइल नंबर आणि तो ज्या नावाने रजिस्टर आहे ते नाव, कन्हय्या कुमार, दोन्ही त्याने इंस्पेक्टर प्रसादांना पाठवून दिला. यात एक दिवस गेला. इंस्पेक्टर अधीर झाले होते. त्यांना वरचे साहेब लोकं सारखे अपडेट विचारत होते. बँक रॉबरी चा प्रयत्न झाला होता, तीन मृत्यू झाले होते, एका महिला कर्मचार्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता, टीव्ही वाल्यांनी हा मुद्दा सतत लावून धरला होता. पोलिसांवर प्रचंड प्रेशर होतं. त्यामुळे जेंव्हा मोबाइल नंबर मिळाल्यावर लगेच इंस्पेक्टर साहेबांनी मोबईल कंपनी कडून त्यांची लोकेशन मागून घेतली.
या सगळ्या गोष्टी करता करता अजून एक दिवस गेला. कन्हय्या कुमारची लोकेशन बेगुसराय दाखवत होती. इंस्पेक्टर प्रसाद आणि त्यांची टीम बेगूसरायला पोचली आणि
त्यांनी कन्हय्या कुमारला पकडलं. दरभंग्याला पोलिस ठाण्यात आल्यावर, प्रसाद म्हणाले की “आधी कन्हय्या कुमारला थोडं फार तोडा. काही विचारून नका काही सांगू नका.”
“साहेब मार खाऊन सुद्धा तो म्हणतो आहे की ही मेल त्याने केली नाही. त्याला माहितीच नाही या बद्दल.” – पोलिस
मग प्रसाद साहेबांनी सूत्र आपल्या हातात घेतली.
बरेच आडवे तिडवे सवाल जबाब झाल्यावर इंस्पेक्टर साहेबांची खात्री पटली की हा माणूस साधा आहे. मग त्यांनी मेल च्या वेळी तो कुठे होता, त्याच्या बरोबर कोण कोण होते यांची चौकशी करायला सुरवात केली. थोडा मेंदूला ताण दिल्यावर त्याला आठवलं की त्या वेळी तो आपल्या दोघा मित्रांबरोबर होता म्हणून. त्या मित्रांचे पत्ते घेऊन पोलिस तिकडे गेले. एक जण सापडला, त्याला पकडून ठाण्यावर आणलं. दुसऱ्याच्या घरावर पाळत ठेऊन, दोघं तिथेच थांबले. रात्री तो घरी आल्यावर त्याला पकडून दरभंगा ठाण्यात घेऊन आले. मधल्या काळात जो संध्याकाळी सापडला होता, त्यांची चौकशी केल्यावर लक्षात आलं की त्याचा पण काही हात नाहीये म्हणून.
दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्याला रात्री आणलं होतं, त्याची चौकशी इंस्पेक्टर साहेबांनी सुरू केली. सुरवातच इंस्पेक्टर साहेबांनी इतक्या जरबेने केली, की तो दुर्गा कुमार लट लट कापायलाच लागला. तो काही निर्ढावलेला बदमाश नव्हता. त्याच्या एका चुकी मुळे तो या बदमाशांच्या जाळ्यात अडकला होता. त्याला जसं सांगण्यात आलं होतं त्या प्रमाणे त्याने पेपर मधे पत्र दिलं होतं. या पलीकडे त्याला काहीच माहीत नव्हतं. त्याला आलेल्या फोन कॉल्स वरुन दोघा फरार बदमाशांची आताची लोकेशन मिळाली. दोघेही रसुलपूर मधेच एका घरात लपून बसले होते. त्या दोघांनाही पहाटे झडप घालून पकडलं. प्रथम त्यांची व्यवस्थित खातिरदारी करण्यात आली. मग ते पोपटा सारखे बोलायला लागले. सर्व गुन्हे त्यांनी कबूल केले. दर्गा कुमारने स्टेटमेंट दिलं की त्याला ते पत्र लिहिण्यास भाग पाडण्यात आलं होतं. सर्वांवर वेग वेगळी कलमं लाऊन चार्ज शीट फाइल करण्यात आली.
एक महिन्या नंतर किशोरने ड्यूटि जॉइन केली. नंतर एक महिन्यानंतर किशोरची विनंती ग्राह्य धरून त्याची पुण्यालाच प्रमोशन वर बदली करण्यात आली. बँकेने किशोरचा गौरव केला आणि त्याला प्रशस्ति पत्र दिलं.
विभावरीने नोकरीचा राजीनामा देऊ केला, पण संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या कंपनीने राजीनामा नाकारला आणि पुण्याच्याच ऑफिस मधे जॉइन व्हायला सांगितलं.
आता किशोर आणि विभावरीच्या आयुष्यावर आलेलं सर्व मळभ निघून गेलं होतं. लवकरच त्यांच्या संसार वेलीवर एक गोंडस फूल उगवलं. मग काय सगळा आनंदी आनंदच झाला.
समाप्त.
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.
धन्यवाद.