मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४९ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४९

मागील भागात आपण बघीतलं की नेहा सांत्वनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वागणुकीने कंटाळली आहे. आता सहा महिन्यांनंतर काय घडतंय. नेहा कशी आहे .

सुधीर , नितीन आणि निशांत कॅंटीनमध्ये जेवायला बसले होते. सुधीर जरा गप्प गप्पच होता.

“सुधीर काय झालं?”

“काही नाही. सगळं विस्कटत चाललंय.”

“विस्कटत चाललंय म्हणजे काय?”
नितीनने गोंधळून विचारलं.

“प्रियंका गेल्यानंतर या येणाऱ्या पाहुण्यांमुळे वैताग आला होता.”

“ते तर तू सांगीतलं मागेच.आता काय झालं?”
नितीन म्हणाला.

“तेव्हा नेहाचं जे बिनसलं होतं ते अजूनही बिनसलच आहे.”

“म्हणजे नेमकं काय बिनसलं? आम्हाला समजेल अशा भाषेत सांगशील का?”

निशांतने बराच वेळाने सुधीरला विचारलं.

“प्रियंकाच्या आजारपणातही नेहा आपल्या विचारांवर ठाम होती. आईबाबांना आपणच सावरायचं आहे यावर ती इतकी ठाम होती की प्रियंकाकडे धावपळ करत जाणंयेणं करायची. आईबाबांच्या मनाविरूद्ध जराही काही होणार नाही याची काळजी घ्यायची, त्यात लहान ऋषीचं सगळं करणं म्हणजे तारेवरची कसरत असायची. कितीदातरी नेहाला ऋषीला तिच्या माहेरीच ठेवावं लागायचं. ऋषी घरी आला की नेहाला अजीबात सोडायचा नाही. या सगळ्यामुळे नेहा थकायची पण कधीही तिने तोंडातून ब्र काढला नाही.’

“नेहा खूप धीट आहे यात वादच नाही.”

नितीन म्हणाला.

“खरय नितीन. नेहाला हॅट्स ऑफ.”

निशांत म्हणाला. जरा थांबून निशांतने विचारलं,

“आत्ता नेमकं काय घडलंय की ज्यामुळे तू इतका ताणात आहेस?”

“अरे सहा महिने होत येतील आता पाहुणे यायचे थांबलेत पण नेहाचा जो मूड गेलाय तो काही मूळ पदावर येत नाही. रागाने, गाल फुगवून ती वावरत नाही. पण तिचा उत्साह दिसत नाही. पूर्वी ऋषीशी जी मस्ती करायची. बोलायची ते आता दिसत नाही. तेच मला टोचतय.”

“एकदा तिला समोर बसवून विचार नेमकं तिच्या मनाला काय टोचतय? कसली ऊणीव भासतेय का?”

नितीनने सुधीरला सल्ला दिला.

“मला असं वाटतं सुधीर प्रियंका आणि नेहा या दोघांचा चांगला रॅपो झाला होता. कदाचित प्रियंकाचं जाणं तिच्या मनाला चांगलंच जखमी करून गेलं असावं. प्रियंकाच्या आजारपणात तिने खूप धावपळ केली पण आता तिला प्रियंकाची उणीव चांगलीच टोचत असेल.”

निशांतच्या या बोलण्यावर नितीन म्हणाला,

“सुधीर नेहाला घेऊन चार दिवस बाहेर जाऊन ये. ती थोडी मोकळी होईल.”

“यसं. करेक्ट बोलतोयस तू नितीन. सुधीर तू असंच कर. प्रियकांचं आजारपण कळल्यापासून ती सतत या घरातच आहे. जरा बाहेर गेली तर तिला छान वाटेल.”

“बघतो. नेहाला विचारून.”

“सुधीर एवढं टेन्शन घेऊ नकोस. कधीकधी मन दुखावलं गेलं की त्यांची बोच काळ त्रास देते. तसं काहीसं नेहाच्या बाबतीत होत असेल.”

सुधीरच्या खांद्यावर हात ठेवत निशांत म्हणाला.

“तू म्हणतोस तसं असेलही पण तिचा चेहरा आणि तिचं घरातला वावर इतका निर्विकार असतो की मला आता भिती वाटायला लागली आहे.”

“भीती का वाटायची त्यात? तिच्या भवतीच वातावरण बदल. चार पाच दिवस घरापासून निसर्ग सानिध्यात तिला घेऊन जा. तिथे अजीबात कोणाचेही फोन घेऊ नका. फक्त दोघांचे आईवडील सोडून. दोघच एकमेकांना वेळ द्या. नेहाला रिलॅक्स होऊ दे.”

निशांत प्रत्येक शब्दावर जोर देत बोलला. निशांत असं बोलला की नितीन आणि सुधीर समजायचे की तो जे म्हणतोय तसंच झालं पाहिजे.‌ असं निशांतला म्हणायचंय. आता इतक्या वर्षांनंतर दोघांनाही कळायला लागलं आहे.

“सुधीर ऋषी मामाकडे छान राहतो नं?”

“हो.”

“मग ऋषीला मामाकडे ठेऊन तुम्ही दोघच जा.तरच मी जे म्हणतोय तसं होईल. नाहीतर तिथेही ऋषीमध्येच नेहाचा वेळ जाईल. “

“हो रे सुधीर. निशांतचा मुद्दा बरोबर आहे. तूच त्या दिवशी म्हणाला होतास नं कित्येक महिने तुम्ही एकमेकांना निवांत भेटला नाही.”

“होनं. प्रियंकाचं आजारपण, त्यानंतर तिचं जाणं, त्यामुळे आईबाबा किती दिवस सैरभैर होते. तिकडे निरंजन एकटाच असल्याने त्याला सावरावं लागलं. त्यांचे चुलत, मामेभाऊ होते पण आम्ही सतत भेटायचो त्यामुळे आमच्या दोघांमध्ये एक छान बाॅंडींग तयार झालं होतं. पण यानंतर जे नातेवाईकांची रांग लागली त्यामुळे आम्ही जास्त हैराण झालो.”

“काही काही नातेवाईक फार रंडकुंडीला आणतात.”

“तू असंच कर सुधीर. आजच घरी गेल्यावर बघ नेहाशी बोलून. तिला तुझी कल्पना आवडली तर जाऊन या.”

“हं तसंच करतो.”

सुधीर म्हणाला.

“आता झालास का शांत? जाऊया कामाला?”

“हो.”

तिघही आपला लंचबाॅक्स घेऊन कॅंटीनच्या बाहेर पडले.

****
“नेहा नुसतं अन्न चिडवत बसलीय? जेव नं. आज भाजी आवडली नाही का?”

रंजनाने असं विचारताच नेहाने तिला उत्तर देण्याऐवजी समोरचा डबा बंद केला. तिची ही कृती बघून रंजनाने चटकन तिचा हात धरून विचारलं,

“हे काय आहे? नेहा काय झालंय? खूप डिस्टर्ब दिसतेय.”

रंजनाने बघीतलं की नेहाचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले होते.

“अगं रडायला काय झालं?”

“रंजना मला आता सहन होत नाही ‌”

“काय सहन होत नाही.”

“खूप घुसमट होतेय”

“का घुसमट होतेय.”

रंजनाने विचारलं.

“स्पष्ट सांगता येत नाही.पण आता सगळी बंधनं तोडून सुसाट पळावसं वाटतंय.”
नेहा रडतच म्हणाली.

“बापरे! एवढं झालय.आधी बोलली नाहीस.”

“काय बोलणार? प्रियंकाच्या जाण्यानंतर या नातेवाईकांनी इतका उच्छाद मांडला होता की या संसारातूनच मन उडाल्या सारखं वाटतं आहे.”

“अगोबाई हे काय नवीन !”

रंजना उठून नेहाजवळ येऊन बसली. नेहाचा हात हातात घेऊन थोपटला आणि जरा वेळानं विचारलं,

“नेहा मनात सगळ्या गोष्टी दाबून ठेऊ नकोस. त्याने मनावर ताण येईल. काय आहे तुझ्या मनात बोल. तुला एवढी अस्वस्थ मी कधीच बघीतलं नाही.”

कितीतरी वेळ नेहा काहीच बोलली नाही. रंजना तिच्याकडे बघत होती. नेहाचा चेहरा विचारांनी अस्वस्थ झाला होता. रंजनाच्या मनात कालवाकालव झाली. तिने आपल्या या गोड, सहनशील मैत्रिणीला इतकं अस्वस्थ आणि बेचैन झालेलं कधी बघीतलं नव्हतं.

“नेहा”

रंजनाने एकदा हाक मारली.

“काय सांगू तुला रंजना.मला जगण्यात खूप इंटरेस्ट होता. मला एकेक क्षण खूप आनंदात जगायला आवडतो. सुधीर मला असं जगण्यात खूप मनापासून साथ द्यायचा. आता मलाच ते क्षण वेचण्याची हिंमत होत नाही. कारण पूर्वी हे क्षण वेचल्यावर माझ्या मनावर कितीतरी काळ एक मस्त धुंदी असायची. ती धुंदी मला आवडायची म्हणून पुनः पुन्हा मी ते क्षण वेचण्यासाठी धडपडायचे.”

एवढं बोलून नेहा थांबली.

“नेहा आता असं काय झालं की तुला हे क्षण वेचण्याची हिंमत होत नाही.”

“हे नातेवाईक. त्यांच्या येण्याने , विचित्र वागण्याने, मला हळुहळू या सगळ्यांच्या दांभीकपणाचा राग यायला लागला. किती मानभावीपणा ! ओठांवर सांत्वनाचे शब्द आणायचे आणि मनात मात्र पाहुणचाराची इच्छा ठेवायची. शी! इतका राग आला होता मला तेव्हा. येणारा प्रत्येक नातेवाईक असाच वागला. सगळेच असे का वागले असतील?”

“अगं मनुष्य स्वभाव आहे हा.”

“अगं संवेदनशीलता हा मनुष्याचाच गूण आहे नं? आणि सदसद्विवेकबुद्धी मनुष्यालाच वापरता येते नं. मग या गोष्टी या सगळ्या नातेवाईकांमध्ये नव्हत्या का?”

“अगदी सगळे नातेवाईक तसे वागले का?”
रंजनाने नेहाला विचारलं.

“ विलास काका आणि बाबी मावशी तशा नव्हत्या आणि बाबांचे काका तात्या आजोबा पण तसे नव्हते.”

“अगं मग ते बोलले असतील त्यांना जे फर्माईशी करायचे त्यांना.”

यावर नेहा हसली.

“अगं हसतेय काय !”

“विलास काका,बाबी मावशी आणि तात्या आजोबा खूप साधी सरळ माणसं आहेत. ती खरच आईबाबांच्या सांत्वनासाठी आली होती. बाकीचे नातेवाईक ते कसले ऐकतात यांचं. तिघांनाही गुंडाळून ठेवलं होतं या बाकीच्या नातेवाईकांनी. तात्या आजोबा म्हातारे म्हणून त्यांना तर गप्पच बसवायचे.”

“कठीण आहे सगळं.”

“याच वातावरणाने माझी चांगले क्षण वेचण्याची शक्ती हरवून गेली. आत्ता पर्यंत मी कितीही थकले, संकटात अडकले तरी या आनंदामुळे पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उठून उभी राह्यचे.”

“नेहा अजूनही तू उभी राहशील.”

“हं.मला नाही वाटत. “

“नेहा मनुष्याच्या आयुष्यात कधी कधी असा काळ येतो. जिथे आपण सगळी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक शक्ती सुद्धा गमाऊन बसतो. पण काही काळानंतर आपला मूळ स्वभाव परत येतो. तुला थोडं थांबाव लागेल वाट बघावी लागेल.”

“कोणत्याच प्रश्नांना,डेड एन्ड नसतो हे लक्षात ठेव.”

“ठीक आहे.बघते वाट.”

“आता ठीक आहेस नं? चल लंच टाईम संपला. पण नेहा आज तू जेवली नाहीस.”

“भूकच नसते हल्ली. मला म्हणतेस पण तूही जेवली नाहीस.”

“माझी मैत्रीण टेन्शन मध्ये असताना माझ्या घशाखाली घास ऊतरेल का? ऑफिस संपल्यावर पोटात भुकेने खूप कावळे ओरडायला लागले तर काहीतरी खाऊन मग घरी जाऊ.”

“हो.”

दोघीही डबा घेऊन कॅंटीनबाहेर पडल्या.

****

आजही नेहा घरी आली तर थकलेल्या मनानेच आली. घरी यायची तिला इच्छा नसायची. पण जाणार कुठे? तिची अस्वस्थता दूर होईल अशी जागा कुठे आहे का? कशीबशी ती घरात शिरायची. अगदी रोजच. घरातील भींतीसुद्धा तिला ऊदासलेल्या आणि कंटाळवाण्या वाटायच्या. या सगळ्यात ऋषीचं बोलणं आणि हसणं हे नेहाला ओयासीस वाटायचं.

आत्ताही आईला बघताच आई असं ओरडतच ऋषी नेहाला बिलगला. त्याचा निरागस आणि गोड चेहरा बघून नेहाच्या मनावर आत्ता पर्यंत ज्या ऊदासीनता घेरलं होतं ते दूर झालं.

ऋषीच्या दोन्ही गालांना छान खळी पडते असे. ती खळी बघण्यासाठी नेहा ऋषीला गुदगुल्या करून हसवत असे. हसताना त्याच्या गालाला खळी पडली की त्या खळीतच नेहाचा जीव रमायचा.

“आई तू ततली या?(आई तू थकली का?”

“होरे बाळा. मी खूप थकले आहे.”

“मद मदा ताली ऊतव( मग मला खाली ऊतरव)”

“कारे? “

“तू ततली नं . मी आता मोथा झालो.”

“हो खरंच मी विसरले. तू आता मोठा झाला. एक छान पापी दे मग ऊतर.”

ऋषीने नेहाला पापी दिली. नेहाने त्याला खाली ऊतरवलं.

ऋषीला खाली ऊतरवल्या बरोबर नेहा पुन्हा उदास झाली. ती पटकन आपल्या खोलीत गेली.

नेहा ऑफीस मधून आल्यावर आपल्याशी एकही शब्द बोलली नाही याचं सुधीरच्या आईला आश्चर्य वाटलं. कारण असं आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. प्रियंकाच्या आजारपणात आणि नातेवाईकांच्या गराड्यात असताना सुद्धा नेहा अशी कधी लागली नाही.आपल्याकडे दुर्लक्ष करून कधी गेली नाही. त्यांनी नेहाला काही विचारलं नाही. पण सुधीरला विचारायचं मात्र त्यांनी ठरवलं.

_________________________________
बघू पुढे काय होईल?