मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५२ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५२

मला स्पेस हवी पर्व १ भाग 52
 
मागील भागात आपण बघितलं की नेहा आणि रमण शहा यांची भेट झालेली आहे. आता यानंतर पुढे काय घडतं आपण बघूया.
 
त्या दिवशीच्या भेटीनंतर रमण शहाच्या डोक्यात नेहाचेच विचार फिरत होते. रमण शहा हा अतिशय हुशार आणि क्रिएटिव्ह माईंडचा माणूस होता त्याचबरोबर अतिशय रुबाबदार, दिसायला छान आणि मधाळ आवाजात बोलून समोरच्या माणसावर छाप पडेल असं त्याचं बोलणं आणि ग्रेसफूल वागणूक असायची. त्यामुळे पटकन कोणावरही त्याचा प्रभाव पडायचा. रमण शहा हा अत्यंत सावधपणे वागणारा माणूस पण होता कारण त्याचं फिल्ड असंच होतं जिथे वेगवेगळ्या लोकांशी त्याचा संबंध येत असे.
 
त्या दिवशीच्या मिटींग नंतर नेहाला फोन करून रमण शहाने टूर्स प्लॅनिंग झालं का हे विचारलं. खरं म्हणजे रमण शहाला हेच फक्त विचारायचं नव्हतं तर त्याला नेहाशी गप्पा मारायच्या होत्या. पण आपला हेतू उघड होणार नाही याची काळजी घेत त्यानी नेहाला अत्यंत साधेपणाने आणि सावधपणे प्रश्न विचारला .
 
“मॅडम टूर्सचं प्लॅनिंग झालं का?”
 
यावर नेहाने उत्तर दिलं.
 
“ हो साहेब मी साउथ कडच्या एका टूरचं प्लॅनिंग केलेलं आहे. या टूरच्या बद्दल आपण तुमच्या दोन लेखकांकडून आणि आमच्या लेखिके कडून स्क्रिप्ट लिहून घेऊ. त्यांना लिहिण्यापूर्वीच आपण जाहिरातीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याबद्दल कल्पना देऊ आणि त्यानुसार त्यांना स्क्रिप्ट लिहायला सांगू. “
 
“ठीक आहे मॅडम.”
 
यानंतर रमण शहा आपल्या फिल्ड बद्दल बोलू लागला. जाहिरात कंपनीत काम कसं असतं आणि जाहिराती माणसावर कसा प्रभाव टाकतात वगैरे वगैरे. तो बोलायला लागल्यावर बऱ्याच वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी नेहाला कळल्या. समोरची व्यक्ती आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागली की रमण शहा समजून जात असे की समोरची व्यक्ती त्याच्या जाळ्यात फसली आहे. विशेषत: महिलांसंबंधी त्याची ही अटकळ खरी ठरत असे.
 
नेहा तशी साधी मुलगी असल्याने तिला रमण शहाने या सगळ्या गप्पा पहिल्याच भेटीनंतर का कराव्यात याबद्दल शंकेची पाल नेहाच्या मनात चुकचुकली नाही. रमणशहा जेवढ्या उत्सुकतेने तिला सगळ्या गोष्टी सांगत होता त्याच उत्सुकतेने ती सगळं ऐकत होती कारण तिला हे सगळं नवीन होतं आणि नेहा ऐकते आहे हे रमण शहासाठी पुरेसं होतं.
 
नेहा तशी खूपच कंफर्ट झोनमध्ये राहीलेली होती. जरी नेहा पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी करत होती तरी इतक्या वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या लोकांशी बोलण्याची तिला सवय नव्हती. त्यामुळे छक्के पंजे मनात ठेवून वागणारी माणसे तिच्या सहवासात आली नव्हती. रमणशहाचा उद्देश तिला कळला नाही.
 
रमण शहा तसा बदमाश किंवा गुंड प्रकारचा नव्हता. तसा तो डिसेंट माणूस होता पण कोणावर आपल्या विचारांचा प्रभाव कसा पाडायचा हे रमण शहा ओळखून होता. त्याचप्रमाणे त्याला ज्या व्यक्तीशी ओळख वाढवायची असेल त्याच्याशी वागताना तो पद्धतशीरपणे आपली पावलं उचलून ओळख वाढवत असे.
 
त्याला पहिल्या भेटीतच नेहाशी मैत्री करावीशी वाटली यामुळे रमण शहा तिला आपल्या बोलण्याच्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करत होता. टूरचं प्लॅनिंग हे कारण दाखवण्यासाठी होतं.
 
 
त्या दिवशी आपला हेतू ब-यापैकी साध्य झाला आहे हे रमण शहाच्या लक्षात आलं . रमण शहा फार लांबण न लावता नेहाला म्हणाला,
 
“ मॅडम टूरचं प्लॅनिंग कसं केलं आहे ते मला मेल करा मग मी ते आमच्या लेखकांना देतो. त्याचबरोबर जाहीराती मध्ये काय हवंय तेही तुम्ही पाठवा. ते मुद्दे लेखकांना देऊन त्याप्रमाणे जाहिरात लिहून घेतो आणि तुम्हाला पाठवतो.”
 
“ ठीक आहे सर. तुमचा मेल आयडी सांगा.”
 
नेहा रमण शहाला म्हणाली. रमण शहाने त्याचा मेल आयडी सांगून फोन ठेवला.
 
फोन ठेवल्यावर एक विजयी हास्य रमण शहाच्या चेहे-यावर झळकलं. हसतच रमण शहा आपल्या इतर कामांकडे वळला.
 
***
 
 
जाहिरातीचं स्क्रिप्ट रायटिंग तिन्ही लेखकांकडून मिळाल्यानंतर नेहा आणि अपर्णा दोघींनी त्या स्क्रिप्ट वाचायला घेतल्या. स्क्रिप्ट वाचताना बऱ्याच ठिकाणी नेहा आणि अपर्णा एकमेकांशी चर्चा करत होत्या. त्यात त्यांना जे जे वाटलं त्या त्या ठिकाणी काय काय दुरुस्ती हवी आहे ते त्यांनी लिहून ठेवलं. या दोघी चर्चा करत असतानाच राजेश तिथे आला.
 
राजेशकडे टूर प्लॅनिंग डिपार्टमेंट होतं. नेहाने राजेश बरोबरच चर्चा करून साऊथ टूर ठरवलेला होता. साऊथच्या टूर्सच्या जाहिरातींचं स्क्रिप्ट रायटिंग अपर्णा आणि नेहा बघत आहेत याची कल्पना राजेशला होती म्हणूनच तो ते बघण्यासाठी नेहाच्या केबिनमध्ये आला.
 
“ मे आय कम इन मॅडम?”
 
राजेशने विचारलं.
 
“ हो हो ये राजेश.”
 
नेहा म्हणाली. राजेशला नेहा ने बसायला सांगितले
 
“मॅडम कश्या आहेत स्क्रिप्ट? तुम्हाला पटतंय का?”
 
“या तिन्ही स्क्रिप्ट पैकी मला एकच स्क्रिप्ट फायनल करता येईल असं वाटत नाही. कारण प्रत्येक स्क्रिप्ट मधून काही गोष्टी आवडतात तर काही गोष्टी आवडत नाहीत.”
 
“म्हणजे काय मॅडम?”
 
राजेशने काही न कळून विचारलं. तेव्हा अपर्णा म्हणाली,
 
“असं आहे राजेश सर हे तिन्ही स्क्रीप्ट एकत्र करून आपण एखादी जाहिरात आपल्याला हवी तशी तयार करू शकतो असं मॅडमला वाटतंय.”
 
 
यावर राजेश म्हणाला,
 
“ असं कसं करता येईल मॅडम . ते तिघांचं स्वतंत्र स्क्रिप्ट आहे ना?”
 
“हो पण तिघांनीही त्यांच्या जाहिरातीमध्ये जे मला हवंय सांगीतलं होतं ते काही लिहिलेलं नाही. तिघांनी थोडं थोडंचं मी सांगितलं त्याप्रमाणे लिहीलं आहे. सगळे मुद्दे एका जाहीराती मध्ये नाहीतच. त्यामुळे प्रत्येक स्क्रिप्ट मधून हवं ते घेऊन आपल्याला हवी तशी जाहिरात तयार करू शकतो. “
 
“हे असं केलेलं त्या लेखकांना चालेल का?”
 
अपर्णांनी प्रश्न केला तेव्हा नेहा म्हणाली,
 
“आपण या संबंधात या तीनही लेखकांशी बोलू शकतो. त्याआधी रमण शहा यांना विचारून त्यांच्या दोन्ही लेखकांना आणि आपल्या लेखिकेला इथे मीटिंगला बोलावू आणि त्या तिघांशी चर्चा करून ते स्क्रिप्ट पुन्हा त्यांना लिहायला सांगू. ते जर आपल्या मनासारखं झालं तर उत्तम. ते आपण फायनल करू.”
 
 
“पण मॅडम या सगळ्यांमध्ये बराच वेळ जाईल.”
 
अपर्णांनी नेहाच्या लक्षात आणून दिला. नेहा म्हणाली,
 
“वेळ जाईल पण हे काम आपण आत्ताच केलेलं बरं. आज लगेच आपण तीन स्क्रिप्ट बघितल्या म्हणून आपल्याला हे लक्षात आलं. कुठे कुठे काय बदल करण्याची गरज आहे हे आपण लिहून ठेवलं आहे त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्यांवर त्या तीन लेखकांशी आपण चर्चा करून त्यांना सांगू आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला एक जाहिरात तयार करायला सांगू. यावर अपर्णा आणि राजेश तुम्हाला काय वाटतं ?”
 
असं नेहाने विचारताच अपर्णा म्हणाली ,
 
“मॅडम आपल्याला हवं तसं स्क्रिप्ट आपण तीन जाहिराती एकत्र करून करू शकतो. तुम्ही म्हणता तशी सगळी कल्पना देऊनही जर यावर तिघांनी ऑब्जेक्शन घेतलं तर ? त्यापेक्षा आपण असं केलं तर आपण आत्ता त्यांच्या स्क्रीप्ट वरून रफ आयडिया घेतली की या तिघांना कशी काय कल्पनाशक्ती आहे याची आणि हे तिघं कशी काय जाहिरात करू शकतात याची. मग आपणच जर जाहीरात तयार केली तर?”
 
 
यावर नेहाने विचार करून विचारलं,
 
“कोण करणार जाहिरात तयार?”
 
तेव्हा अपर्णा म्हणाली,
 
“ मॅडम आपल्याच विभागामध्ये एकजण आहे. त्याचं डोकं असं वेगळंच चालतं.”
 
“कोण आहे मॅडम?”
 
राजेशने विचारलं .
 
“ सर तो अतुल नाही का आमच्या विभागातील. फार डोकेबाज मुलगा आहे . तो करू शकतो मॅडम अशी हटके जाहिरात. तुम्हाला हवी तशी.”
 
तेव्हा नेहा म्हणाली,
 
“एकदा त्याला आपण याची एक लाईन देऊन बघू. त्याच्यावर तो कशी जाहिरात तयार करतो ते बघू. अपर्णा त्याला माहिती आहे का आपण या तिघांना जाहिराती तयार करायला दिली आहे ते?”
 
 
“ हो मॅडम. थोडीफार कल्पना आहे.”
 
“ठीक आहे तू असं कर त्याला हे मुद्दे दे आणि त्याच्यावर जाहिरात तयार करून द्यायला सांग त्याची जाहिरात जर आपल्याला पटली तर मग या तिघांना बाजूला ठेवूया.”
 
“ ठीक आहे मॅडम.” अपर्णा म्हणाली.
 
यानंतर तिघांची मीटिंग संपली
 
*****
 
ऑफिस संपवून नेहा घरी निघाली. नेहा आता नवीन घरात राहायला आली होती जेव्हा ती इथे जॉईन झाली तेव्हा तिची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती. त्यानंतर चार-पाच दिवसातच तिच्यासाठी एक चांगला फ्लॅट बघण्यात आला आणि ती तिकडे राह्यला गेली.
 
 
नेहा घरी आली आणि फ्रेश झाल्यावर चहा करून चहा घेत जराशी आरामात बसली होती. त्यावेळेला तिच्या डोक्यात पुन्हा रमण शहाचे विचार फिरायला लागले. आज त्यांनी जाहिरात विभागाबद्दल जी काही माहिती सांगितली ती नेहाला आठवली. हा माणूस खूपच इंटरेस्टिंग आणि हुशार आहे पण आपल्या मनात याच्याबद्दलच विचार का बर येतात आहे? हे काही नेहाला कळत नव्हतं .
 
कदाचित नवीन ओळख आहे आणि त्यांनी जे काय जाहिराती क्षेत्राबद्दल सांगितलं तेही आपल्याला नवीन असल्यामुळे कदाचित आपल्याला त्याचे बोलणं आवडलं असेल. हे विचार तिच्या मनात येत असतानाच तिचा फोन वाजला. फोनवर सुधीरचं नाव झळकलं. नेहाला सुधीरचा फोन घ्यायचा कंटाळा आला. का कंटाळा आला हे तिला कळत नव्हतं पण तिला फोन घ्यावा असं वाटत नव्हतं हे मात्र खरं .
 
तरी तिने तो उचलला. पलिकडे जर ऋषी असेल तर फक्त ऋषी साठी.
 
“ हॅलो”
 
“ मी सुधीर बोलतोय.”
 
“ बोल ना.”
 
नेहाच्या आवाजात जराही एक्साईटमेंट नव्हती. तिचा असा आवाज ऐकून सुधीरच्या मनात आलं की हीच ती नेहा आहे का जिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. सुधीर विचारात इतका हरवला की तो बोलायचं विसरला.
 
“ हॅलो सुधीर”
 
नेहा म्हणाली.
 
“तुला मी फोन यासाठी केला आहे कारण ऋषीला तुझ्याशी बोलायचं आहे.तुला वेळ आहे का?”
 
“हो.”
 
“ आई तू आफीतमदून आली ता?”
 
ऋषीने गोड आवाजात आणि बोबड्या बोलात विचारलं.
 
“ हो.मी आत्ताच ऑफिसमधून आले.”
 
“ तू आता ताय तततए?”( तू काय करतेय?)
 
“ मी ऋषीशी बोलतेय.”
 
“ तू छा तेला ता? तू बिततिटीत खाल्लं ता?”( तू चहा केला का? तू बिस्कीटं खाल्ली का?”
 
“ नाही.आता चहा करीन.”
 
“ आई तू उपाची नतो दाऊ”( आई तू उपाशी नको राहू)
 
“ नाही.”
 
हे बोलताना नेहाने आवंढा गिळला. ऋषीला आपली इतकी काळजी आहे हे बघून तिच्या डोळ्यातून तिच्याही नकळत पाणी वाहू लागले. तिकडे सुधीरचीही हीच अवस्था झाली होती. अचानक ऋषीचं त्याच्याकडे लक्ष गेलं.
 
“ बाबा तुमी ता दडता?”( बाबा तुम्ही रडता?)
 
ऋषीचं हे बोलणं नेहाला फोनवर ऐकू गेलं. सुधीरने नाही असं मानेनीच म्हटलं.
 
“आई बाबा दडताता आहे. तू लवतद ये.”(आई बाबा रडतात आहे.तू लवकर ये.)
 
“ हो. ठेवते फोन. मी चहा करते.”
 
“ हो.बाय”
 
म्हणत ऋषीने फोन ठेवला. नेहाला आणखी जरा वेळ ऋषीशी बोलणं शक्य नव्हतं. नेहासाठी ऋषी ओयासीस होता. त्याचा आपल्या प्रति इतका काळजीने भरलेला आवाज ऐकून ती स्वतःला थोपवू शकली नाही.
 
ऋषीचा फोन येऊन गेला की तिची आतून तळमळ व्हायची. पण तिने निग्रहाने ऋषीला आपल्या बरोबर आणलं नाही. ऋषीच्या कारणाने सुधीर बंगलोरला आलेला तिला नको होता. तिला सुधीरचा सहवास पुण्यात नकोसा झाला होता तोच पुन्हा इथे नको होता.
 
नेहाला पतीपत्नीमधील नातंच आता नकोसं झालं होतं. कदाचित ही तात्पुरती फेज असेल जशी रंजना म्हणाली तशी. पण सध्या ती फेज तात्पुरती आहे की नाही हेही बघण्याची तिची इच्छा नव्हती म्हणून ती सगळे बंध तोडून बंगलोरला प्रमोशन घेऊन आली.
 
ऋषीची हयगय अजीबात होणार नाही याची तिला खात्री होती. ऋषी सुधीरच्या आईबाबांच्या गळ्यातला ताईत होता. ते स्वतःपेक्षाही ऋषीची देखभाल जास्त काळजीने करतील यावर तिचा विश्वास आहे. आई म्हणून तिला हा विश्वास नसता तर तिने हे धाडस केलं नसतं. पुढेही मन मारून जगली असती.
 
आजीने कितीही केलं तरी आई ती आईच असते हे तत्त्व रंजनाला पटणारं असलं तरी तिला आजी ऋषीची आई होईल याची खात्री असल्याने तिने हा निर्णय घेतला.
 
 
ऋषीच्या आवाजाने ती काही काळ अस्वस्थ होते, पुढेही होईल पण सुधीरकडे परत जाण्याचा विचार तिच्या मनाला शिवत नाही. कधी सुधीरकडे परत जावसं वाटेल हेही ती आत्ता सांगू शकत नाही.
 
नेहा सैरभैर अवस्थेत स्वयंपाक घरात गेली आणि तिने चहा करून घेतला.चहाचा कप घेऊन ती बाहेरच्या खोलीत यायला निघाली आणि अचानक थबकली. तिला ऋषीचं बोलणं आठवलं. ती चटकन बिस्किटाच्या डब्याजवळ गेली आणि डब्यातून चार बिस्कीटं काढली.
 
“ ऋषी बाळा मी चहाबरोबर बिस्कीटं पण घेतली हं”
 
नेहा मनातच म्हणाली आणि तिच्या चुकार डोळ्यांनी अश्रूंचा एक थेंब तिच्याही नकळत गालावर सांडवला.
__________________________________
बघू पुढे काय होईल ते.