मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५४ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५४

मला स्पेस हवी पर्व १ भाग 54
 
मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला नेहाने त्या तीन लेखकांना बोलावलेलं होतं ती त्यांना जाहिरात कशी हवी हे सांगत असतानाच कोणीतरी “मे आय कमइन मॅडम” असं विचारलं. समोर लक्ष जाताच नेहा दचकली कोण आलं होतं? नेहा का दचकली? बघू आता या भागात
 
दारात रमण शहा उभा होता. त्याला बघताच नेहाच्या कपाळावर आठी आली पण तिनं लगेच स्वतःला सावरलं. त्याच वेळेला अपर्णांनी उठून रमणशहाला म्हटलं,
 
“यानं सर. आम्ही जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत आहोत.”
 
रमण शहा यावर काही न बोलता हसत नेहाच्या केबिनमध्ये शिरला. अपर्णाने उठून आपली खुर्ची रमण शहाला दिली. रमण शहा खुर्चीवर बसला. रमण शहाच्या विभागातले दोघाही लेखकांनी रमण शहाला गुड मॉर्निंग केलं.
 
“नेहा मॅडम तुमचं काम चालू द्या तुमच्याकडे खूप छान क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही काम कसं करता हे बघण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून तुमची परवानगी न घेता मी इथे आलो. तुमची काही हरकत नाही ना?”
 
यावर नेहा म्हणाली,
 
“ नाही सर. माझी का हरकत असणार आहे?”
 
मनात मात्र म्हणाली,
 
‘‘तुम्हाला असंच यायचं होतं म्हणून तुम्ही माझी परवानगी न घेता आलात. हे मला कळतंय.’’
 
नेहा पुढे म्हणाली,
 
“ सर मी आता काम सुरू करू का?”
 
“यस ऑफकोर्स.”
 
रमण शहा म्हणाला. त्यानंतर अपर्णा उभीच आहे हे बघून नेहा म्हणाली ,
 
“अपर्णा तुझ्यासाठी खुर्ची घेऊन ये.”
 
“हो मॅडम.”
 
अपर्णा चपराश्याला खुर्ची सांगायला बाहेर गेली. नेहा ने आपलं काम सुरू केलं. नेहा तीनही लेखकांना आपल्याला जाहिरातीमध्ये आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काय आणता येईल याबद्दल सांगत होती आणि विचारतही होती. हे सगळं करताना ती आपल्या कामात इतकी बुडून गेली की बाजूलाच आपल्या केबिनमध्ये रमणशहा बसलेला आहे हे सुद्धा ती विसरली.
 
रमण शहा मात्र नेहाचं निरीक्षण करत होता. नेहाची बॉडी लँग्वेज त्याला फारच आवडली. तिच्यातील क्रिएटिव्हिटी, तिच्यातील बुद्धिमत्ता, तिच्यातीलं आपलं म्हणणं एक्सप्रेस करण्याचं कौशल्य सगळं तिच्या बॉडी लँग्वेज मध्ये जाणवत होतं. ते बघण्यात रमण शहा बुडून गेला.
 
 
रमण शहा सातत्याने फक्त नेहाचं निरीक्षण करत आहे हे अपर्णाच्या लक्षात आलं. कारण अपर्णा या सगळ्यांच्या जरा मागच्या बाजूला आणि तिरक्या बाजूने बसली होती. त्यामुळे तिला रमणशहा कुठे बघतोय हे कळत होतं. अपर्णा मनातच म्हणाली ‘ मॅडम ना सावध करायला हवं.’ कारण रमणशहाची कीर्ती अपर्णाला माहिती होती.
 
रमण शहा राजरोस बायकांबरोबर फ्लर्टिंग करत फिरत नसे. त्याचं सगळं काम अत्यंत डिसेंट असे. जे अपर्णाला इतक्या वर्षात माहिती झालं होतं. जोपर्यंत नेहा येथे नव्हती तोपर्यंत तिच्या जागेवर जो माणूस होता, त्याला सातत्याने रमणशहाला भेटायचा कंटाळा येत असे. तो जितकं काम असिस्टंटवर सोपवता येईल तेवढे सोपवून तो मोकळा व्हायचा. त्यामुळे प्रत्येक वेळेला अपर्णालाच रमण शहाबरोबर मीटिंग करावी लागत असे.
 
 
या मीटिंगमधून तिलाही बरेच कळत नकळत सुचवल्या गेलं होतं पण अपर्णांनी त्याला भीक घातली नाही. नेहाचं आत्ताच वागणं बघून अपर्णाला हे लक्षात आलं की वेळीच आपण नेहाला सावध करायला हवं कारण रमणशहाची जादू जर चालली तर समोरची स्त्री ही रमणशहाच्या कब्जात जाते हे अपर्णाने आतापर्यंतच्या अनुभवांनं बघितलं होतं.
 
अपर्णा या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहणारी स्त्री असल्याने ती रमणशहाच्या झाश्यात येऊ शकली नाही. नेहा येईल की नाही याचा अंदाज अपर्णाला नव्हता.
 
पूर्णवेळ रमण शहा फक्त नेहा काय बोलते? कशी बोलते? बोलताना तिचे हात वारे कसे असतात? तिचे मानेला कसे झटके असतात? तिचे डोळे कसे चमकतात? याचकडे फक्त लक्ष होतं. म्हणजेच फक्त नेहा आणि नेहा त्याच्या दृष्टीने केबिनमध्ये होती.
 
रमणशहाच्या याच गोष्टीची अपर्णाला खूप चिड येते. त्यामुळे नेहा काय बोलते याकडे अपर्णाचं लक्षच नव्हतं. बऱ्याच वेळानंतर नेहाने अपर्णाकडे बघत विचारलं,
 
“अपर्णा आत्ता मी जे बोलले ते तुला पटलंय का?”
 
नेहाच्या प्रश्नाने अपर्णा गांगरली आणि तिला काय बोलावं ते सुचलं नाही कारण तिचं लक्षच नव्हतं.
 
अपर्णा काही बोलत नाही हे बघून नेहाने तिला विचारलं
 
“अपर्णा काही प्रॉब्लेम आहे का? तू मला अशी अस्वस्थ का दिसते आहेस?”
 
“ नाही मॅडम मी अस्वस्थ नाही.”
 
अपर्णा म्हणाली .
 
“मग तुझं लक्ष कुठे आहे?”
 
शेवटी सारवासारव करण्यासाठी अपर्णा म्हणाली,
 
“ मॅडम थोडं माझं लक्ष डायव्हर्ट झालं. घरी माझा मुलगा आज एकटाच असल्यामुळे माझं जरा लक्ष तिकडेच लागलं होतं.”
 
 
यावर नेहा लगेच म्हणाली,
 
“ अरे आधी बोलायचं?”
 
अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम मला ऑफिस सोडून तर जाता येणार नाही ना? म्हणून मी फक्त मधून मधून त्याला फोन करून विचारते.”
 
ताबडतोब नेहा तिला म्हणाली,
 
“अपर्णा आधी त्याला फोन कर. त्याची काळजी घे. त्याण्याशी बोल आणि मग ये.”
 
 
नेहाचा काळजी घेण्याचा स्वभाव अपर्णाला अवडला. अपर्णा हे कारण समजून आपल्या जागेवर निघून गेली.
 
अपर्णाशी बोलून झाल्यावर नेहाचं रमण शाहाकडे लक्ष जातं आणि ती मनात चपापते.
 
‘अरे हा माणूस इचथे तेव्हाचा बसलाय आणि काय आपल्याकडे बघतोय की काय !’ हा मनात विचार येऊन ती जरा अवघडली पण शेवटी ती काही करू शकत नव्हती त्यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं.
 
नेहाने आपलं बोलणं पुढे सुरू करण्यापूर्वी औपचारिकता म्हणून रमण शहाला म्हणाली,
 
“ सर साॅरी माझं तुमच्याकडे लक्षं नव्हतं. मी कामात गुंतली की माझं लक्षं नसतं.बोअर झालात का?”
 
नेहाने विचारलंं.
 
“अजिबात नाही. मी तुमची काम करण्याची पद्धत बघतोय. इंटरेस्टिंग आहे. तुमचं काम चालू द्या.”
 
रमण शहाच्या या बोलण्यावर नेहाने मान डोलावून कामाला सुरुवात केली.
 
त्या तिघांना तिने त्यांच्या कल्पना विचारल्या. तेव्हा प्रसाद क्षेमकल्याणी म्हणाले,
 
“मॅडम मला वाटतं या जाहिरातीत आपण तुम्हाला अपेक्षित आहे तसं अंतर्भूत करू शकतो.”
 
यावर नेहानी विचारलं,
 
“कसं करू शकतो? जरा विस्ताराने सांगा.”
 
क्षेमकल्याणी म्हणाले,
 
“मॅडम आपण सेलिब्रिटी ऐवजी सामान्य प्रवासी घ्यायचं ठरवलं आहे तर त्यात सामान्य लोक नेहमीचे संवाद जसे बोलतील त्या पद्धतीने जर आपण संवाद लिहीले तर ते पटकन लोकांना रिलेट होतील.”
 
 
नेहाला हे एकदम पटलं ती म्हणाली ,
 
“बरोबर बोललात. हा तुमचा मुद्दा मला पटला. म्हणजे पहिला मुद्दा आपण हे लिहू की यातील संवाद हे घरगुती पद्धतीचे किंवा नातेवाईकांमधलं संभाषण किंवा मित्रांमधील संभाषण अशा पद्धतीचे असायला पाहिजे.”
 
“हो मॅडम.”
 
क्षेमकल्याणी यावर उत्तरले. त्यानंतर नेहाने विचारलं,
 
“दीपक जाधव तुम्हाला आणि पांडे मॅडम तुम्हाला काय वाटतं?”
 
त्यावर जाधव म्हणाले,
 
“मॅडम संभाषण जर रोजच्या जीवनातलं ठेवायचं असेल तर आपल्याला क्लिष्ट शब्दरचना किंवा वाक्यरचना करून चालणार नाही.”
 
“बरोबर आहे जाधव. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. नेमकं मला सांगा.”
 
“मॅडम आता समजा मी आणि क्षेमकल्याणी दोघे मित्र आहोत आणि मी त्याला सांगतो आहे की तू स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलवर बरोबर काश्मीरला जा तर मी कसं सांगेन?”
 
“सांगा कसं सांगाल तुम्ही?”
 
नेहाने म्हटलं.
 
“एक मिनिट मॅडम मी प्रात्यक्षिक करून दाखवू का?”
 
त्यावर नेहा ने परवानगी दिली जाधव क्षेमकल्याणींना म्हणाले,
 
“क्षेमकल्याणी तुम्ही आणि मी मित्र आहोत असं समजून आपण संभाषण सुरू. मी तुम्हाला सध्या एकेरी नावाने हाक मारली तर चालेल नं?”
 
 
“ हो अवश्य. आपण संभाषण करू.”
 
“अरे प्रसाद माझं ऐकशील का?”
 
“ बोल रे दीपक काय म्हणतोय?”
 
“प्रसाद तुला स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाव माहिती आहे का?”
 
“हो रे माहिती आहे.पेपर मध्ये त्यांच्या जाहिराती मी वाचतो.”
 
“अरे मग त्यांच्या जाहिरातीत कश्मीरच्या टूर्स बद्दल वाचलाय का तू?”
 
“हो वाचलंय ना. त्याचं काय?”
 
“ अरे तूच म्हणत होतास ना ! उन्हाळ्यात काश्मीरटूर करायची बायकोची इच्छा आहे?”
 
 
“हो रे बायको मला म्हणाली आपण कश्मीरला जाऊया या उन्हाळ्यात.”
 
“अरे मग कसली वाट बघतोस? स्वस्तिक टूर्स पॅकेज मध्ये सहारात्र आणि सात दिवसांचं पॅकेज आहे.”
 
“ दीपक परवा वाचलं मी पण विसरलो.”
 
“हे बघ प्रसाद तू स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये फोन करून डिटेल्स विचार. जाहिराती मध्ये खाली स्वस्तिक ट्रॅव्हल्स टूर्सचा नंबर पण दिलेला आहे. तुला माहितीये का इथे या टूर्समध्ये आपल्याला पर्सनल टच असतो.”
 
“पर्सनल टच? दीपक म्हणजे काय रे?”
 
प्रसाद ने विचारलं .
 
‘अरे पर्सनल टच म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या प्रश्नाकडे त्यांचा टूर लीडर लक्ष देतो. मागच्या वेळेला मी यांच्या कश्मीर टूरला गेलो होतो तेव्हा मला हा अनुभव आला. जो मी तुला आता म्हणतोय ना तो पर्सनल टच मला तेव्हा दिसला.”
 
“अरे मग हे तर खूपच चांगला आहे.”
 
“तुला कळतंय का प्रसाद? तू पर्सनल टच बघ. त्यांच्या पॅकेजच्या किमती किती ते बघू नको कारण त्या किमती पेक्षाही जास्त ते आपल्याला फॅमिली म्हणून ट्रीट करतात.”
 
हे झाल्यावर दीपक जाधव नेहाला म्हणाला,
 
“मॅडम हे संभाषण तुम्हाला कसं वाटलं?”
 
नेहा खूप खुश झाली ती म्हणाली ,
 
“दीपक जाधव मला जे हवंय ते हेच. मला सेलिब्रिटींच्या संभाषणाची, संवादांची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही जे आत्ता दोन मित्रांमधील संभाषण बोललात ते मला हवय. त्यासाठीच मी तुम्हाला आज तिघांना इथे बोलावलं. कारण पुष्कळदा आपल्याला पत्रातून, ई-मेलमधून समोरच्याला जे बोलायचंय त्यातला पूर्ण अर्थ कळत नाही. मी तुम्हाला भेटल्यावर मला काय हवय सांगितलं ते ऐकून तुम्ही किती सुंदर संभाषण तयार केलं. बस अशाच पद्धतीची संभाषणं मला हवी. फक्त त्याच्यात पात्र किती घ्यायची आणि आणखीन काही त्याच्यात मुद्दे घालायचेत का हे बघा. जाहिरात आपल्याला काही सेकंदांचीच शूट करायला लागते. त्यामुळे संभाषणामध्ये किती भाग आणायचा आणि बॅकग्राऊंडला माहितीतून किती भाग द्यायचा हे आपल्याला डिसाईड करावे लागेल. कळलं?”
 
“हो मॅडम” तिघही म्हणाले.
 
“ मग आता तुम्ही तिघं काॅन्फरन्स रूममध्ये बसून या जाहिरातीचं स्क्रिप्ट आणखीन कसं वेगळ्या शब्दात, वेगळ्या वाक्यरचनेत, आणि हटके लिहिता येईल याचा विचार करा. तिघांच्या विचारानुसार हे स्क्रिप्ट लिहिलं तरी चालेल. प्रत्येकाने वेगळं लिहिण्याची गरज नाही. तिघं आपली क्रिएटिव्हिटी एका जाहिरातीत टाका.तुम्हा तिघांची एक टीम आहे.कळलं?”
 
तिघांना नेहा म्हणाली. त्याबरोबर ते तिघेही तयार झाले तेवढ्यात तिथे अपर्णा आली अपर्णाला नेहाने विचारलं,
 
 
“अपर्णा मुलाशी बोलणं झालं का? “
 
“हो मॅडम.”
 
“कसा आहे तो ?”
 
“ठीक आहे मॅडम.
 
“हे बघ या तिघांना आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे कॉन्फरन्स रूम मध्ये बसव. आज त्यांचा लंच आणि टी ब्रेक आपल्या इथेच असेल.”
 
‘ ओके मॅडम.”
 
अपर्णा म्हणाली. त्यानंतर अपर्णा तिघांनाही घेऊन कॉन्फरन्स रूम मध्ये गेली. रमण शहा त्यानंतर नेहाला म्हणाला,
 
“नेहा मॅडम तुमची क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे. तुम्हाला जाहिरातीमध्ये नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात पूर्ण क्लॅरिटी आहे. त्यानुसार तुम्ही आर्टिस्ट लोकांना छान समजून सांगता आणि तुम्हाला हवं तसं स्क्रिप्ट लिहून घेता. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.”
 
यावर हसत नेहा म्हणाली,
 
“सर मी खूप सांगेन पण समोरचा आर्टिस्ट तेवढा क्रिएटिव्ह असावा लागतो. त्याचप्रमाणे त्याची विचार क्षमताही खूप सशक्त असावी लागते. ती तशी या तिघांमध्ये असल्याने आपल्याला जाहिरात तयार करायला अडचण जाणार नाही. तुमच्याकडचे क्षेमकल्याणी आणि जाधव दोघही लेखक खूप छान आहे. जबरदस्त प्रतिभा आहे त्यांच्यात.”
 
 
यावर रमणशहा हसला. त्याचबरोबर राजेश नेहाला म्हणाला,
 
“ मॅडम मी आता पुढच्या कामाला लागू का म्हणजे आपले दुसरे टूर अरेंज करण्याच्या कामाला लागू का असं मला विचारायचं होतं?”
 
यावर नेहा म्हणाली,
 
“हो काहीच हरकत नाही. या टूरची जाहिरात जवळपास झालीच आहे असं समजा. तुम्ही पुढचे टूर्स फायनल करा आणि मग ती या लोकांना सोपवा म्हणजे ते जाहिरात तयार करतील. या प्रमाणे काम करत आपल्याला एक आठवड्याभरात निदान चार टूर्सची जाहिरात तयार करावी लागेल. जशी जाहिरात फायनल होईल ती अपर्णा मॅडम ताबडतोब शहा सरांकडे पाठवून देतील .म्हणजे ते शूटिंग सुरू करतील. बरोबर ना शहा सर?”
 
नेहाने शेवटला प्रश्न शहा सरांना विचारला.
 
“ हो बरोबर बोललात तुम्ही .”
 
शहा म्हणाला .नेहा जरा विचारत पडली की आपल्या समोरचा हा माणूस कधी जाईल? कारण आता तिला अवघडल्यासारखं व्हायला लागलं होतं. नेहाची ही अवस्था राजेश सरांनी ओळखली. राजेश रमण शहाला चांगलाच ओळखून होता. तो रमण शहाला म्हणाला,
 
“सर चला ना आपण कॅन्टीन मध्ये जाऊया चहा प्यायला.”
 
“ ओके”
 
असं म्हणत रमण शहा ऊठला. रमण शहांना राजेशने नेले त्याच्यामुळे नेहाला सुटकेचा विश्वास सोडता आला.
 
नेहाच्या केबिन मधून बाहेर पडताना रमण शहाला ही भेट खूपच चुटपुट ती झाली असं वाटलं. नेहा आपल्या तावडीत लवकर येणार नाही याची खूण गाठ रमण शहाने आपल्या मनाशी बांधली. तिला आपल्या कह्यात घेण्यासाठी काय करायचे याचा तो विचार करू लागला. त्याच्या बरोबर चालताना राजेश काहीतरी बोलत होता पण त्याकडे रमण शहाचं लक्ष नव्हतं आणि हे राजेशच्या लक्षात आलं. राजेश स्वतःशीच हसला.
 
राजेश आणि अपर्णाला नेहा इथे आल्यापासून तिच्या बद्दल आदर होता म्हणूनच नेहाची अवघडलेली परीस्थिती ओळखून राजेश ने रमण शहाला कॅंटीनच्या निमित्ताने नेहाच्या केबीनबाहेर काढलं.
_________________________________
रमण शहा नेहाला आपल्या कह्यात आणण्यासाठी आता कोणती खेळी खेळेल? नेहा त्याच्या कह्यात जाईल का? बघू पुढे काय होईल.