मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५७

मला स्पेस हवी पर्व १ भाग 57
 
मागील भागात आपण बघीतलं की रमण शहा नेहा त्याच्या कह्यात येत नाही म्हणून वैतागला होता. आता पुढे बघू.
 
नेहाने पहिली जाहिरात शूट झाल्यानंतर दुसऱ्या जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायला तीनही लेखकांना ऑफिसमध्ये बोलावलं. दुसरा टूर राजेशने प्लॅन केला होता. त्याची जाहिरात कशी हवी हे सविस्तर नेहाने तिघांना सांगितलं. नेहा म्हणाली,
 
“घरी जाऊन मी सांगितलेल्या मुद्यांवर विचार करा. काही पॉईंट्स काढा आणि इथे ऑफिसमध्ये येऊन डिस्कस करा.”
 
यावर क्षेमकल्याणी म्हणाले,
 
“मॅडम आम्ही घरूनही फोनवर बोलू शकतो. त्यासाठी इथे येण्याची काय आवश्यकता आहे?”
 
यावर नेहा म्हणाली,
 
“ सर असं आहे घरून तुम्ही बोलत असताना तुम्हाला फोन आले तर ते तुम्ही अटेंड करणार त्यात तुमचा वेळ जाणार. तुमच्याकडे कोणी आलं तर त्यांना अटेंड करणार त्यात तुमचा वेळ जाणार. आपल्याला हे काम ऑफिस टाईम मध्ये करायचं आहे. तिघांचे वेग वेगळे प्रश्न असतील.ते निस्तरत बसून वेळ घालवण्यापेक्षा इथे तुम्ही आलात की तुम्ही इथे समोरासमोर बसून विना अडथळा एकमेकांशी चर्चा करू शकाल आणि काहीतरी फायनल ठरवू शकाल .पटतंय का?”
 
नेहाने विचारलंं. तिघांनाही नेहाचं म्हणणं पटलं पण तरीही जाधव म्हणाले,
 
“ मॅडम आज इथे ऑफिसमध्ये आलोच आहे तर आत्ता इथेच बसून काम करू.”
 
“ हो चालेल मॅडम मलाही.”
पांडे मॅडम म्हणाल्या.
 
.
 
ते तिघही कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन जाहिरातीच्या स्क्रिप्ट बाबत चर्चा करू लागले. नेहाने इंटरकॉम वरून अपर्णाला सांगितलं,
 
 
“ अपर्णा ते तिघेही आता कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले आहेत. जेवणाच्या वेळी त्यांच्याकडे लंच पाठवशील. दुपारी कॉफी पाठवशील.”
 
“ हो मॅडम.”
 
अपर्णा म्हणाली. त्यानंतर नेहा आपल्या पुढल्या कामात व्यस्त झाली. नेहाने पुढच्या जाहिरातीमध्ये कोण,कुठले प्रवासी घ्यायचे याबाबतीत चर्चा करण्यासाठी राजेशला बोलावलं .
 
 
“मे आय कम इन मॅडम ?”
 
राजेशने विचारलं.
 
“ या बसा राजेश मी तुम्हाला का बोलवले याची थोडी कल्पना आली असेल ?”
 
“हो मॅडम. आता पुढची टूरची आपण जाहिरात करणार आहोत त्याबद्दलच बोलायला बोलावलं आहे.”
 
“ बरोबर. त्याबद्दलच बोलायचं आहे. मला असं म्हणायचंय की पुढच्या जाहिरातीचं शूट आपण प्रवाशांकडून करू. या जाहिरातीचं शूटिंग रमण शहा म्हणाले म्हणून त्या सेलिब्रेटिकडून करून घेतलं पण त्याच्यात इतका वेळ आणि पैसा गेला की ते मला पटलं नाही.”
 
 
“ ठीक आहे ना मॅडम. आपण प्रवाश्यांकडून जाहीरात शूट करू.”
 
राजेश म्हणाला.
 
 
“तुमच्याकडे लिस्ट असेल नं जे या बाजूच्या टूर्सला एक दोनदा तरी गेले आहेत किंवा जे रेगुलर आपले प्रवासी आहेत.”
 
“ हो मॅडम आहे.”
 
“ यातील काही प्रवाशांची लिस्ट करा त्यात मग आपण बघू कोण किती ऍक्टिव्ह आहे. जाहीरातीत काम करायला किती उत्सूक आहेत. या लिस्टमधील प्रवाशांची बाकी माहिती आहे का?”
 
 
“ बाकी माहिती म्हणजे फक्त ते कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे तेवढं कळतं. आपण ते भरून घेतो म्हणून आणि पत्ता मिळतो कारण फाॅर्म मध्ये लिहावा लागतो म्हणून. बाकी फार खाजगी माहिती मिळत नाही.”
 
राजेश म्हणाला.
 
“ राजेश सर आपल्याला प्रवाशांची खूप खासगी माहिती नकोच आहे. ते कोणत्या भागात रहातात एवढं कळलं तरी पुरेसं आहे कारण जर आपण जाहीरात प्रवाश्यांच्या घरी शूट करायचं ठरवलं तर आपल्याला ते कुठे राहतात हे माहीत असावं म्हणून.”
 
“ ठीक आहे.मी प्रवाश्यांची यादी,त्यांचे पत्ते, फोन नंबर करून तुम्हाला दाखवतो.”
 
 
“ ठीक आहे. त्यानंतर आपण त्यांना फोन करून जाहिरातीत काम करण्यासंबंधी विचारू.”
 
“ हो मॅडम.मी निघू?”
 
“ हो” नेहा म्हणाली.
 
राजेश नेहाच्या केबीनमधून बाहेर पडला.
 
 
****
 
 
 
 
नेहा काही नोट्स घेऊन ताम्हणे साहेबांच्या केबिनमध्ये गेली.
 
“आत येऊ का?”
 
“या या मॅडम .”
 
ताम्हाणेन सर म्हणाले. नेहा ताम्हणे सरांच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि आपल्यासमोर काढलेल्या नोट्स ठेवून ती म्हणाली,
 
“ साहेब आत्ताच्या जाहिरातीचं शूटिंग आपण सेलिब्रिटींना घेऊन केलं. पण हे करताना वेळ आणि पैसा बराच वाया गेलेला मला दिसतो आहे. जर मी इथे काम करते आहे तर माझं पहिलं काम हे आहे की आपल्या कंपनीला कमीत कमी खर्चात चांगल्या गोष्टी कशा मिळतील हे बघणं. त्यात हे काम मला योग्य वाटत नाही. “
 
यावर साहेब खुश झाले. ते म्हणाले,
 
“ तुमचे विचार बरोबर आहेत .”
 
“म्हणून म्हणते मी सेलिब्रिटींवर पैसा खर्च करू नये.”
 
“ प्रवासी एवढी जाहिरात फुकट आपल्याला करून देतील का?”
 
हा साहेबांचा प्रश्न होता. यावर नेहा म्हणाली ,
 
“ आपण फुकटात नाही करून घ्यायचं. जेथे कुठे शूटिंग असेल तिथे येण्या जाण्याचे पैसे आपण त्यांना देऊ आणि काही थोडसं मानधन देऊन. जाहीरात जर त्या त्यांच्या घरी शूट केली तर त्यांना मानधन देऊ मग जाण्या येण्यासाठी पैसे देण्याचा प्रश्न नाही.
 
यावर ताम्हाणे म्हणाले,
 
“यासाठी कुठले प्रवासी निवडले आहेत?”
 
“ सध्या त्यांची लिस्ट करायला सांगितली आहे. मी त्या लिस्ट मधून काही प्रवासी निवडेन. त्या प्रमाणे त्या निवडलेल्या लोकांना आपण फोन करू. त्यांच्याशी फोनवर जाहीरातीत काम करण्याबद्दल विचारू. जर ते तयार असतील तर आपल्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला बोलवू. त्यांना जाहिरातीचं काय नेमकं स्वरूप आहे हे सांगून ते कळलं तर मला वाटतं ते तयार होतील. जर नाही तयार झाले दुस-या प्रवाशांना विचारू.”
 
 
साहेबांना नेहाचं हे बोलणं एकदम पटलं. कारण फार प्रॅक्टिकल विचार होता हा. पैशाची बचत आणि जाहीरातीतलं वेगळेपण जपल्या जाणार होतं. ताम्हाणे साहेबांनी नेहाच्या विचारांना ग्रीन सिग्नल दिला. यानंतर नेहा आपल्या जागेवर परत आली.
 
राजेश ने दिलेल्या लिस्ट प्रमाणे काही लोकांना निवडून नेहाने ती लिस्ट अपर्णा कडे पाठवली.
 
 
 
“ अपर्णा तुला राजेशने केलेली लिस्ट पाठवतेय. त्यात ज्या लोकांसमोर खूण केली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बोल. तू कोण आहेस आणि कशाविषयी बोलते आहे हे पूर्ण सविस्तर सांगून त्यांना जर यात इंटरेस्ट असेल तर ऑफिसमध्ये बोलव.”
 
“ हो मॅडम .आजच करू नं फोन?”
 
“ आत्ताच करता आला तर कर. ऑफिस संपेपर्यंत जेवढ्या लोकांना फोन करता येईल कर. नंतर ऊद्या कर. शक्यतोवर हे काम लवकर करू. आपलं हे काम होईपर्यंत जाहिरातीचं स्क्रीप्ट लिहून तयार होईल. मग आपण या लोकांना भेटून पुढे बघू काय होईल? माझी तर इच्छा आहे हे व्हावं.”
 
नेहा म्हणाली.
 
“ नक्की होणार मॅडम.तुम्ही काळजी करू नका.”
 
अपर्णा हसत म्हणाली.यावर नेहाही ही हसली. ऑफिस संपेपर्यंत इतर कामं आटोपून नेहा घरी जायला निघाली.
 
 
****
 
 
 
 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली आणि तिला अचानकच थंडी भरून आल्यासारखं वाटलं. डोक्यावरून पांघरूण घेऊन ती झोपली आणि किती वेळ तिला झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही.
 
जेव्हा मोबाईल सारखा वाजायला लागला तेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने बघितल,
 
“अरे बापरे अकरा वाजत आले. मी एवढी कशी झोपली !”
 
पलीकडून अपर्णाचा हॅलो हॅलो आवाज येत होता.ते लक्षात आल्यावर नेहाने फोन कानाला लावला.
 
“मॅडम आज ऑफिसला येणार नाही का? तुम्ही तसं काही बोलला नाहीत .”
 
नेहा तिला म्हणाली,
 
 
“अगं मी ऑफिसला जायला म्हणून सकाळी उठले पण मला थंडी वाजायला लागली म्हणून मी जरा दहा मिनिटं पडू मग आवरुया असं म्हणून मी झोपले तर मला खूपच गाढ झोप लागली. आता तुझ्या फोनने जाग आली.अंगात माझ्या अंगात ताप भरलाय. मी आत्ताच टेंपरेचर घेतलं.”
 
हे बोलताना नेहाचा आवाज इतका क्षीण झालेला होता. ते ऐकून अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन जाते. थोडावेळ तुम्ही झोपा मी येते.”
 
त्यानंतर अपर्णाने फोन ठेवला आणि साहेबांना सांगायला ती केबिनमध्ये गेली.
 
“ साहेब आज नेहा मॅडम येणार नाहीत. त्यांना बरं नाही.”
 
साहेबांना आश्चर्य वाटलं हे ऐकून.
 
“कालच तर माझ्याशी येऊन चर्चा करून गेल्या. सध्या हवामान किती खराब आहे त्याचाही हा परिणाम असेल. अपर्णा मॅडम तुम्ही नेहा मॅडमना दवाखान्यात घेऊन जा. कारण इथे बंगलोरला त्या एकट्याच असतात. आज काम जरा राहू द्या. लगेच निघा. डाॅक्टर काय म्हणाले ते मला कळवा.”
 
“ हो. मी लगेच निघते.”
 
एवढं बोलून अपर्णा आपल्या जागेवर आली. भराभरा तिने आपलं टेबल आवरलं आणि कॅब बुक केली.
 
 
 
अपर्णाने रेण्टल कॅबन बुक केली होती. नेहाच्या घरी गेल्यावर त्याच कॅबने ती नेहाला दवाखान्यात नेणार होती. अपर्णा नेहाच्या घरी पोचली. बराच वेळ बेल वाजवल्या वर नेहाने दार उघडलं.
 
नेहाचा चेहरा सुकून गेलेला होता. अपर्णांनी बघितलं तर नेहाला बराच ताप होता. अपर्णांनी लगेचच नेहाच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली आणि डॉक्टरांकडे नंबर लावला.
 
 
अपर्णा नेहाला म्हणाली,
 
“मॅडम आता आपण डॉक्टरांकडे जाऊया. काय असेल त्याच्यावर ते औषध देतील .”
 
“ नको ग ठीक होईल “
 
नेहा थकलेल्या आवाजात म्हणाली.
 
“मला साहेबांची ऑर्डर आहे तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं. त्याच्यामुळे मी जाणार तुम्हाला दवाखान्यात घेऊन.”
 
 
अपर्णा नेहाला दवाखान्यात घेऊन जाते नेहाला तिथे पंधरा मिनिटे सुद्धा बसवत नाही इतकी ती थकून गेलेली असते.जेव्हा तिचा नंबर येतो तेव्हा नेहा उठली आणि एकदम चक्कर येऊन खाली खुर्चीवर आपटल्यासारखी बसते. नेहाला पडताना बघून अपर्णा तिला पकडते. नंतर डॉक्टरने तपासल्यावर डॉक्टर सांगतात,
 
 
“यांना व्हायरल झालं आहे. मी औषधं लिहून देतो ती घ्या. चार दिवस सक्तीची विश्रांती घ्या. तुमच्या घरी कोण असतं?”
 
डाॅक्टरांनी विचारलं.
 
“ या एकट्याच असतात. मॅडम पुण्याहून बदलून इथे आल्यात.”
 
“ हो का ! मग कोणा नातेवाईकांना बोलावून घ्या.”
 
“ इथे कोणी नातेवाईक नाहीत त्यांचे.”
 
“ ते बघा कसं करायचं. यांना चार दिवस तरी सक्तीची विश्रांती हवी आहे.”
 
“ हो बघते.”
 
अपर्णा नेहाला घेऊन दवाखान्यातून नेहाच्या घरी गेली. जाताना औषधं आणि काही फळं घेऊन गेली. गाडीत बसून गेली तरी अंगात ताप असल्यामुळे नेहा थकली. घर येताच अपर्णाने नेहाला गाडीतून हळूच उतरवून घरात घेऊन गेली.
 
 
“ मॅडम तुम्ही आता झोपा. तुम्हाला थकवा आला आहे. तुमच्यासाठी जेवायला काय करून देऊ? “
 
“ नको ग. जेवायची इच्छा होत नाही.”
 
“ जेवणानंतर औषधं घ्यायची आहेत त्यामुळे जेवावं लागेल. काय करून देऊ?”
 
“ खिचडी कर.”
 
नेहा म्हणाली.
 
“ ठीक आहे.खिचडी करते आणि साहेबांना फोन करते.”
अपर्णा तुला डाळं तांदूळ सापडणार नाहीत मी सांगायला येते.”
 
“ नको झोपा तुम्ही. मीपण घरी स्वयंपाक करते. कोणत्याही स्त्रीला कोणाच्याही स्वयंपाक घरात थोडंसं शोधलं की सगळं सापडतं. मी डाळ, तांदूळ शोधून खिचडी लावीन. तुम्ही नका काळजी करू.”
 
अपर्णा हसत म्हणाली आणि नेहाच्या स्वयंपाक घरात शिरली.
 
 
अपर्णाने शोधाशोध करून डाळ, तांदूळ सापडवले आणि नेहासाठी खिचडी लावली. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तिने ताम्हाणे साहेबांना फोन लावला.
 
“ हॅलो बोला अपर्णा मॅडम “
 
“ नेहा मॅडमना व्हायरल झालं आहे. डाॅक्टरांनी चार दिवस सक्तीची विश्रांती सांगीतली आहे.”
 
“ तुम्हाला त्यांच्या घरी थांबता येईल का?”
 
“ मी आधी घरी कळवते. माझं लॅपटॉप नेहा मॅडम च्या घरी अनुराधा मॅडम बरोबर पाठवता का? अनुराधा मॅडम जर नेहा मॅडमच्या घरी थोडा वेळ थांबल्या तर मी माझ्या घरी जाऊन येईन माझा मुलगा आठ वर्षांचा आहे आणि सासूबाई आहेत दोघांना फोनवर सांगून लक्षात येणार नाही. मी घरी जाऊन स्वयंपाक करून येते . तोपर्यंत माझे मिस्टर घरी येतील मग मला काळजी नाही. “
 
“ हो चालेल.मी पाठवतो अनुराधा मॅडमना.”
 
“ त्यांना इथे एखादा तास थांबावं लागेल याची कल्पना द्या.”
 
“ हो देतो. त्यांना मी अर्धा तास आधीच ऑफिस मधून सोडतो. “
 
अपर्णाने फोन ठेवला. कुकरही ऊघडला होता. एका प्लेटमध्ये अपर्णा खिचडी घेते मघाशी तिने शोधल्यावर तिला लिंबाचं लोणची सापडलं ते लोणचं प्लेटमध्ये वाढून अपर्णा बरोबर पाण्याची बाॅटल आणि ग्लास घेऊन नेहाच्या खोलीत येते.
 
 
“मॅडम उठता नं? गरम खिचडी आणि लिंबाचं लोणचं आणलय.”
 
गरम खिचडी आणि लिंबाच्या लोणच्याचा वास येताच नेहाच्या चेहे-यावर हसू आलं.ती उठायला लागली तशी तिचा तोल जायला लागला.अपर्णाने तिला धरून उठवलं आणि बसतं केलं.
 
पहीला घास चमच्याने घेण्याचा प्रयत्न नेहाने केला पण जमला नाही कारण तिला खुपच थकवा आलेला होता. अपर्णाने पटकन नेहाच्या हातातील चमचा घेऊन नेहाच्या तोंडापाशी नेला. हे बघताच नेहाला रडायला आलं.
 
“ मॅडम रडताय कशाला? खूप त्रास होतोय का?”
 
अपर्णाच्या बोलण्यावर नेहा रडत म्हणाली,
 
“नाही त्रास नाही होतं. पण आज तू जवळच्या मैत्रिणीच्या नात्याने मला दवाखान्यात घेऊन गेली आता जेवायला भरवतेय हे बघून रडायला आलं.आपली आत्ता तर ओळख झाली. थॅंक्यू अपर्णा.”
 
“ थॅंक्यू काय म्हणता? एकाच ऑफिसमध्ये आहोत आणि एकाच डिपार्टमेंट मध्ये आहोत. मॅडम मैत्रीचं नातं जुळायला काही क्षण पुरतात. आपली ओळख होऊन तर आता महिना झाला. खूप दिवस झाले. तुम्ही संकोच करू नका. तुम्हाला मी तुमच्या जवळच्या मैत्रिणीसारखी वाटली यातच सगळं आलं. सावकाश जेवा.”
 
अपर्णा नेहाला आनंदाने गप्पा करत जेवायला भरवत होती. नेहाला पण खूप बरं वाटतं होतं.अचानक नेहाला अपर्णाच्या जेवणाची लक्षात आलं.
 
“ अपर्णा तू जेवायला काहीं तरी करून घे नाहीतर मागवून घे.”
 
नेहा अपर्णाला म्हणाली.
 
“ मॅडम मी डबा आणला आहे.तो जेवीन.”
 
नेहाला आपल्या बद्दल इतकी काळजी बघून अपर्णाचा जीव सुखावला.
 
________________________________
नेहाचा ताप कधी ऊतरेल बघू.