मला स्पेस हवी पर्व १ भाग ६४ अंतिम भाग
नेहाला बरं नाही हे कळल्यापासून सुधीर खूप अस्वस्थ झाला होता हे आपण मागील भागात बघीतलं. आता पुढे बघू
सुधीरने आज लंच टाईम मध्ये नेहाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिचा बंगलोरच्या ऑफिसचा फोन नंबर घेऊन तिच्या घरचा पत्ता घ्यायचं ठरवलं होतं पण सुधीरचं नशीब खूपच खडतर होतं. सहज कोणती गोष्ट त्याच्या आयुष्यात सध्या घडत नव्हती.
सुधीर लंचटाईमची वाट बघत होता आणि नेमकं लंच टाईमच्या आधी सुधीरला त्याच्या साहेबांनी बोलावलं. चरफडत सुधीर केबीनमध्ये गेला.
“ आता येऊ सर?”
“ हो या.”
साहेब फाईल मध्ये सह्या करत होते. बाजूला तुकाराम ऊभा होता. सुधीरला नेहाच्या ऑफिसमध्ये जायचं असल्याने त्याला एकेक मिनीटे उशीर होतोय असं वाटत होतं. साहेबांचं सह्या करणं काही थांबत नव्हतं.
सुधीरला खूपच अस्वस्थ वाटत होतं पण करणार काय सह्या करून संपल्यावर साहेबांनी त्याला अथर्व कंपनीचे स्टेटमेंट मागितलं.
“ सर उद्या देऊ का?”
असं त्यांनी विचारल्यावर साहेब म्हणाले,
“का? पर्सनल काम करायला हा वेळ नाहीये. ऑफिसचं काम आहे. मला स्टेटमेंट पूर्ण करून द्या”
साहेबांनी असं म्हटल्यावर चुपचाप सुधीर बाहेर आला. पण फार राग राग येत होता त्याला सासहेबांचा पण करणार काय ?
***
इकडे नेहा सुधीरचा फोन येऊन गेल्यापासून खूप अस्वस्थ होती. मला स्पेस हवी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा बंगलोरला तीन महिन्यापूर्वी आली.
या तीन महिन्याच्या काळात तिला बरच स्वतःचा मनासारखं जगता आलं. तिला हवी तशी स्पेस मिळू लागली होती. अचानकच हे रमण शाह प्रकरण समोर आलं आणि नेहा गडबडली. तिला कळेना मला स्पेस हवी या इच्छेमध्ये दुसऱ्या कुठल्या माणसाचा विचार नेहाने कधी केला नव्हता.
असं कोणीही तिच्या आयुष्यात नव्हतं ज्याच्या बरोबर जगण्याचा विचार तिच्या मनात होता म्हणून तिला स्पेस हवी होती. तसा विचार तिच्या मनात येऊ पण शकत नव्हता. तिच्या मनात पूर्वीपासून सुधीरच होता आणि आताही आहे तरी आपण सुधीरला का टाळतो? त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला का नकोसा होतो? याचं ऊत्तर तिला मिळत नव्हतं.
प्रियांकाच्या जाण्यानंतर सगळं गडबडलं. येणाऱ्या नातेवाईकांनी असं काही दान टाकलं की नेहा आणि सुधीरच्या संसाराचा पट ऊधळला गेला. त्यामुळे नेहा या संसाराच्या चौकटीमधून खूप झगडून बाहेर पडली आणि तिने बंगलोरला प्रमोशन घेतलं.
नेहाला आत्ता प्रकर्षाने ऋषीची आठवण यायला लागली. ऋषीला नऊ महिने पोटात वाढवलेलं असल्यानं सुधीरच्या आठवणीने नेहा जेवढी अस्वस्थ व्हायची नाही तेवढी ऋषीच्या आठवणीने कधी कधी अस्वस्थ व्हायची. नेहाला आजकाल सुधीरचा स्पर्शसुद्धा नकोसा व्हायला लागला होता.
एका अभिसारिकेपेक्षा मातृत्वाची भावना सरस ठरत होती.अगदी प्रत्येक वेळी. अभिसारिकेचं जगणं नको असलं तरी मातृत्वाच्या भावनेला कठोरपणे लांब ठेवावं लागेल हे कठोर सत्य नेहाच्या लक्षात आलं होतं.
हे सत्य पचवणं तिच्यासाठी कठीण होतं पण तिने ते पचवायचं ठरवलं आणि ऋषीला न घेता ती एकटीच बंगलोरला आली होती.
नेहाचं मन सगळ्यांची खातीरदारी करता करता थकलं होतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंद शोधण्या साठी तिच्याकडे वेळच नव्हता. त्यामुळे तिच्या मनातून सगळ्याच गोष्टी उतरल्या होत्या.
आज तिला फोनवर सुधीरच्या आवाजातील काळजी जाणवली. सुधीर आपल्यासाठी खूप धडपडतो. हे तिला माहिती होतं. जेव्हा आपण नातेवाईकांच्या गराड्यात घुसमटत होतो तेव्हा त्याला आपल्या बद्दल काळजी का वाटली नाही? हा प्रश्न नेहाला सतत सतावत होता.
सगळी नाती तोडून नेहा बंगलोरला आली आणि या आजाराने पुन्हा दोन नव्या नात्यात आपण अडकलो. हे बंध कसे जपायचे या विचाराने आपण गोंधळलो होतो तेव्हाच रमण शहा नावाचा एक नवा बंध आपल्या समोर आला.
देवा मला आता कोणताही बंध नकोय. त्यात खूप खोलवर अडकण्याची इच्छा नाही. अपर्णा आणि अनुराधा हे बंध ब-यापैकी आपण सांभाळून घेऊ पण रमण शहा नावाचा बंध ! त्यांचं काय करू?
हा बंध मला झेपणार नाही. माझं कुटुंब आहे.
नेहा विचारात असताना तिला तिच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला. त्याने विचारलं,
“ नेहा सुधीरचा बंध तुला नकोसा झाला होता नं ! मग रमण शहांचा नवा बंध का नको?”
“ सतत मी कोणत्या ना कोणत्या बंधाने स्वतःला करकचून का बांधून घेऊ?”
नेहाने आपल्या अंतरात्म्याला ऊत्तर दिलं.
“ तुला तुझी स्पेस हवी होती नं मग त्या स्पेसच्या हवा तो नवीन बंध जोडायला काय हरकत आहे?”
अंतरात्मा तिला डिवचत म्हणाला.
“ मला हे एकच आयुष्य मिळालं आहे. यात मी सतत कोणाच्या बंधनात अडकून त्याचा वळ सहन करणार नाही. “
नेहाचा आवाज चिडला होता. ती पुढे म्हणाली,
“ मी कसं वागावं, कसं बोलावं, कोणासाठी आपलं आयुष्य खर्ची घालावं यात आता मला इतरांचं नाही माझं मत मी विचारात घ्यायचय.”
नेहा आता अगदी आर या पार या निर्णयापर्यंत पोचली होती. किती तरी वेळ नयना लग्न झाल्यापासूनच्या दिवसांचा गुंता सोडवण्यात गढली. काही वेळ शांततेत गेला. मनात मघापासून चालणा-या विचारांचे फेर जरा थांबले होते पण डोळ्यावाटे विचारांची सुनामी अश्रूंच्या रूपाने वहात आलेली होती.
नेहाच्या डोळ्यातून गालावर विनाअडथळा पाणी वहात होतं. नेहाला कसलंच भान उरलं नव्हतं.
मध्येच अनुराधा नेहाच्या खोलीत डोकावली होती तेव्हा तिला नेहा रडताना दिसली. तिला उठवून विचारावं असं तिच्या मनात एकदा आलं पण लगेच तिला असंही वाटलं की आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप डोकावतो आहे असं नेहाला वाटू नये.
नेहाला कसलंच दु:ख छळतय हे जाणून घ्यायची खरंतर अनुराधाला खूप उत्सुकता होती. पण ती उत्सुकता तिने मनातच दाबून टाकली.
अनुराधा एक चांगली वाचक होती. खूप मोठ्या चांगल्या लेखकांची पुस्तकं ती वाचत असे त्यामुळे तिच्या वर चांगले वैचारिक संस्कार झालेले होते. म्हणूनच नेहाच्या आयुष्यात नेहा स्वतःहून काही सांगेपर्यंत लुडबुड करणं योग्य नाही हे तिला कळत होतं. शेवटी माणसाच्या जडणघडणीत उत्तम संस्काराला खूप महत्त्व असतं.
काही वेळ अनुराधा दारातच उभी राहून नेहाकडे बघत होती नंतर हळूच दार लोटून पाऊल न वाजवता समोरच्या खोलीत गेली.
नेहा जरी डोळे मिटून होती तरी त्याही परिस्थितीत अनुराधेचा पायरव तिच्या कानावर पडला होता. तो ऐकून सुद्धा नेहाने डोळे उघडण्याचे कष्ट घेतले नाही कारण अनुराधाला ऊत्तर देण्याचीही तिला इच्छा नव्हती. हळूहळू अनुराधेचा पायरव लांब गेल्याचं नेहाच्या लक्षात आलं.
नेहाला एक जबरदस्त हुंदका फुटला. तो कसाबसा नेहाने अडवला पण त्याचा अस्फुट हुंकार तिलाही न जुमानता तिच्या ओठांमधून बाहेर पडलाच.
आधीच नेहाला बरं नव्हतं. थकव्यामुळे तिचा मेंदूही दमला होता त्यात वेडेवाकडे विचार करणं तिचं मन थांबवत नव्हतं.
“ आता एवढी का हवालदिल होतेस? जेव्हा वेळ हातात होता तेव्हा तू स्पेसच्या मागे धावलीस आता रडून उपयोग नाही.”
अचानक तिच्या दुसऱ्या मनाने तिला ढुशी मारली. ते सहन न होऊन नेहा कळवळली.
“ मी काय करायला हवं होतं तेव्हा? माझ्या मनाला जो विचार पटला ते केलं.”
“ केलंस नं स्वतःच्या मनासारखं? मग आता का विचारांच्या सुनामीत अडकली आहेस?”
“ मला माझ्या आयुष्यात हा रमण येईल असं वाटलं नव्हतं. त्याच्या अचानक येण्याने मी भांबावून गेले आहे.”
“ भांबावून का गेलीस? कोणी तुझ्यात इतकं गुंतलं आहे हे कळल्यावर तर तू खूष व्हायला हवंय.”
“ मी नवथर तरूणी नाही. मी त्या रमणसाठी सुधीर पासून लांब आलेले नाही.”
“ माहिती आहे मला पण काय हरकत आहे नवा गडी नवा डाव मांडायला? तुला ज्या रोमान्सचा कंटाळा आलेला आहे तो रोमान्स कदाचित रमणच्या सहवासात आणखी सुंदर होईल.”
“ काय वेड्यासारखे सल्ले मला देतोय! मला लहान मुलगा आहे.”
“ मग काय झालं? त्या रमणलाही दोन मुलं आहेत तरी तो गुंतलाच नं तुझ्यात? मनाचा खेळ कोणला कधी कळलाय का?”
या वाक्यावर दुसरं मन खळखळून हसलं. पहिलं मन मात्र त्या हसण्याने उद्विग्न झालं.
“ बघ विचार कर. सगळ्यांना एकाच आयुष्यात दोनदा वेगवेगळ्या पद्धतींचा रोमान्स करण्याची संधी मिळत नाही “
“ शी! काय विचार आहेत हे ! रोमान्स वेगवेगळ्या पद्धतीने करायला मिळेल म्हणून मी रमण शहाला होकार देऊ. मी त्या वाटेने चालणारी मुलगी नाही.”
हे बोलताना नेहाला हुंदका फुटला पण त्यात जबरदस्त राग भरलेला होता. तिला कळेना आपलंच दुसरं मन असा वेडावाकडा विचार कसं करू शकतं?
माझ्यावर असे संस्कार नाही झाले. आयुष्यात चैन करायची तेही अशी ! शी!
किती तरी वेळ नेहा सैरभैर होती.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. रमण शहा मघापासून तिला फोन करत होता. त्याचा फोन आलेला आत्तापर्यंत तिला कळलंच नव्हतं. आता आलेला फोन तिने चटकन उचलला. न जाणो हा माणूस पुन्हा इथे यायचा.
“ हॅलो”
“ नेहा मॅडम कशा आहात? मी खुपदा फोन केले.”
नेहाच्या चेहऱ्यावर त्याचा आवाज ऐकून आठी आली.
“ मी झोपले होते.”
“ अजून थकवा गेला नाही का?”
“ नाही.”
बराच वेळ रमणला काय बोलावं सुचलं नाही. नेहा फोन हातात धरून कंटाळली.
“ मी फोन ठेवते.”
“ मॅडम तुम्हाला माझ्या फोनने त्रास झाला असेल तर साॅरी. पण तुमचा आवाज ऐकल्यावर मला बरं वाटलं. लवकर ब-या व्हा. तुम्ही ऑफिसला यायला लागल्या की भेटू. फोन ठेवतो.”
रमण शहाने फोन ठेवला.
***
इकडे ऑफिसमध्ये काम करताना सुधीर मनातल्या मनात चरफडत होता. निशांतचं सुधीरकडे लक्ष गेल्यावर त्याच्या मनात प्रश्न आला की हा अजून गेला कसा नाही? जेवायला म्हणून निशांत सुधीरजवळ आला.
“ अरे ! तू लंच टाईम मध्ये नेहाच्या ऑफिसमध्ये जाणार होतास नं?”
“ हो जाणार होतो पण हे अर्जंट काम साहेबांनी माझ्यावर थोपवलं. त्यांना कर्णपिशाच्च वश आहे की काय माहित नाही!”
सुधीरच्या आवाजात राग आणि निराशा दोन्हींचा मिश्रण होतं.
“ ठीक आहे.एवढा निराश नको होतेस. ऊद्या जा.”
“हो रे जाईन ऊद्या पण नेहा तिकडे आजारी आहे. एकेक दिवस उशीर होईल. तिला मी पुन्हा परत आणू शकलो तर आत्ताच आणू शकेन. मग माहिती नाही ती येईल की नाही?”
“ सकारात्मक विचार कर.”
निशांत म्हणाला पण त्याला हेही माहीत होतं की परदु:ख नेहमीच शीतल असतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून सुधीरच्या मागे तो फार लागला नाही.
“ जेवायला चलतोस नं?”
“ हे काम झालं तर जेवायचं.”
“ का? साहेबांना म्हणायचास लंच टाईम आहे.जेवून काम करतो.ऑफीस काही लगेच बंद होणार नाही!”
“ नाही सुचलं असं म्हणायला. जाऊ दे.”
निशांत तिथेच बसला. त्याला बघून सुधीर म्हणाला,
“ अरे तू कशाला उपाशी राहतोस?”
“ कधी जेवणार?”
“ बघतो.”
“ हे बघ काम पूर्ण झालं की साहेबांना स्पष्ट सांग मी लंच टाईम मध्ये काम केलंय आता मी जेवीन मग उरलेलं काम करीन. कळलं. त्यांनाही कळलं पाहिजे.”
“ हं”
सुधीर एवढंच बोलला. निशांतलाही जेवायला जायची इच्छा झाली नाही. तो त्याच्या जागेवर जाऊन कामाला लागला.
*****
नेहा अजूनही अस्वस्थ होती. सुधीरच्या हळव्या आणि अस्वस्थ मन:स्थितीची नेहाला कल्पना नव्हती.
विचार करता करता नेहा दमली. हळूहळू पलंगावर उठून बसली. तिचा चेहरा कोमेजला होता. कुठेतरी शुन्यात तिची नजर गुंतली होती . मन आणि डोकं यांनी असहकार पुकारला होता. डोळे मात्र वाहणं थांबवत नव्हते.
काही वेळानंतर अचानक नेहाला चक्कर आली आणि ती पलंगावर बसल्या बसल्या मागे गलंडली.तिला एक झटका बसला पण तिला कळलंच नाही. ती जवळजवळ बेशुद्ध झाल्यासारखी पडली. बेशुद्ध नव्हती त्यामुळे तिला आपण पलंगावर पडलो आहे हे कळलं पण उठण्याची तिच्यात ताकद नव्हती.
…..
काय होणार आता नेहाच्या आयुष्यात? सुधीर की रमण कोण येईल तिच्या स्पेस मध्ये?
तिने स्वतःला हवी ती स्पेस निवडली पण काय झालं? तिला हवं तसं घडलं का? स्वत:ची इच्छा तिने व्यक्त केली ही तिची चूक झाली का? पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्त्रीने आपली इच्छा व्यक्त करणं गुन्हा आहे हे पुन्हा सिद्ध झालं.
या ‘टु बी ऑर नॉट टू बी ‘ च्या रस्सीखेच मधून नेहा पुढे बाहेर पडेल का? का अशीच डोंबा-यासारखी तारेवरची कसरत करत तिचं आयुष्य जगणार आहे.
सुधीर पासून ती लांब झाली तर रमण आला तिच्या मनाच्या फांदीवर आपलं स्थान निश्चित करायला?
हे कितपत योग्य आहे असं वाटतंय तुम्हाला? आजच्या काळात कसं जगायचं स्त्रीने ? नेहा बरोबर मलाही हा प्रश्न ही मालिका लिहिताना सतावत होता.
एक स्त्री लेखिका म्हणून हे म्हणत नाही तर वेदकाळात
गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा आदर वेदकाळात होतं असे.
वेद काळानंतर स्त्रीला उंबरठ्याच्या आत अडकवलं गेलं. नेहा सारख्या काही जणी धडपडतात.पण !
नेहा सारख्या सदसद् सद् विवेक बुद्धीने चालणा-या मुलीच्या इच्छा दडपवल्या जातात. काही जणी येन केन प्रकारेण आपली स्पेस मिळवतात. आपल्याला नेहाच्या बाजूने विचार करायचा आहे.
ही कथामालिका जरी इथे संपत असली तरी मूळ विषय अजून तसाच आहे. त्यातून नेहा कशी मार्ग काढेल? तिला आपला समाज साथ देईल का? यावर आणखी एक कथामालिका होऊ शकते.
_________________________________
‘ मला स्पेस हवी ‘ याचं पहिलं पर्व इथे संपलं.
मला स्पेस हवी पर्व २ ची लिंक खाली देत आहे.नक्की वाचा.
https://pratilipi.page.link/fLp9a78XuVT8FKLU7