मृत्यूची तारीख माहित असेल तर? Pralhad K Dudhal द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मृत्यूची तारीख माहित असेल तर?

माझ्या अंताची तारीख मला माहीत असती तर... 


मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतीम सत्य आहे.इथे जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला एक न एक दिवस या सत्याचा सामना करावा लागणार आहे तसाच माझाही एक दिवस अंत निश्चित होणार आहे परंतु तो कधी कसा कुठे हे  एक गुपित आहे.त्या मला माहित नसलेल्या क्षणापर्यंत निदान मी अमर आहे अशाच थाटात मी जगणार आहे.   समजा, जशी एखाद्या वस्तूवर त्या वस्तूच्या उत्पादनाच्या तारखेबरोबरच त्याच्या एक्सपायरीची  तारीख लिहिलेली असते तशी मला माझ्या मृत्यूची तारीख वेळ आणि कारण ही गुपिते आधीच माहीत असती तर?तर माझ्या जीवनात काय काय फरक पडला असता?या गोष्टीवर मनात विचारांची वादळे घोंघावू लागली लागली...किती फरक पडला असता आयुष्यात?निश्चितच माझ्या आयुष्यात खूप फरक पडला असता!आपली जाण्याची वेळ माहीत असल्याने अर्थातच आपल्या जीवनात नक्की किती वर्षे किती महिने आणि किती दिवस वा तास शिल्लक आहेत याचे गणित तयार झाले असते.उपलब्ध असलेल्या आयुष्यावर मी माझ्या जीवनाची धेय्य ठरवली असती.आपण दीर्घायू आहोत की अल्पायुषी त्यावर माझी टू डू लिस्ट अर्थात बकेट लिस्ट तयार झाली असती. उपलब्ध असलेल्या कालावधीनुसार काम काळ आणि वेग याचा आराखडा तयार केला असता आणि त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर दिला गेला असता.उपलब्ध वेळेनुसार स्वप्ने पाहिली गेली असती अर्थातच उगीच नको ती स्वप्ने, नको ती उद्दिष्टे ठरवण्याचा त्रास ती पूर्ण करण्यासाठी चालू असलेला आणि भविष्यातील होणारी ससेहोलपट टाळता आली असती.आपला शेवट कधी आणि कसा होणार हे माहीत असल्याने जीवनातली उगीच केली जाणारी काळजी कटकट वटवट आणि उगाच होणारी फरफट नक्कीच थांबली असती. विविध नातेसंबंधात असलेल्या अटॅचमेंट या भावनेपेक्षा व्यावहारिक पातळीवर आल्या असत्या.आयुष्याचे नियोजन जसे काय शिकायचे, नक्की करियर कोणते निवडायचे, हातात असलेल्या कालावधी प्रमाणे जोडीदाराची निवड, अपत्ये, मृत्यूच्या ठरलेल्या कारणाप्रमाणे पूर्वनियोजन, आर्थिक नियोजन  अशा सगळ्या गोष्टी अगदी सूत्रबद्ध पद्धतीने करता आले असते.माझ्या अंताबद्दल मला आधीच माहीत असते तर या काही सकारात्मक गोष्टी नक्कीच घडल्या असत्या;पण........

   पण....वैयक्तिक व्यावहारिक आणि अध्यातमिक बाबतीत मात्र आयुष्यात खूपच लोच्या झाला असता....  आता बघा ना, मला माझ्या मृत्यूचे कारण आणि दिवस माहीत असल्याने.........जर कळाले ते आयुष्य कमी असेल तर शिकायचे कशाला,कमवायचे कशाला असा विचार करून निष्क्रियता वाढली असती, जे वाट्याला आले ते रटाळ आयुष्य जगावे लागले असते!....जर मला माझ्या मृत्यूची तारीख आधीच माहीत असती तर मला मृत्यूचीच काय पण; कशाचीच भीती उरली नसती! मी कसाही वागलो, कुणालाही नडलो तरी माझे त्या ठरलेल्या तारखेपर्यंत कुणी माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, त्या तारखेपर्यंत माझ्या जीवनाचे काहीही वाईट होऊ शकणार नाही ....याचा उन्माद बोलण्यात वागण्यात येईल.भीतीच नाही म्हटल्यावर निती अनितीची चाड उडणार नाही.पाप आणि पुण्य या कल्पना आणि या कल्पनांच्या पोटी जगण्याला असलेली शिस्त बिलकुल उरणार नाही .थोडक्यात भावनिक, व्यावहारिक, व अध्यात्मिक आयुष्यावर खूप वाईट प्रभाव पडेल आणि पर्यायाने माझी मानसिक अधोगती होईल.कशाचेच सोयरसुतक उरणार नाही....   मला माझ्या मृत्यूचे कारण आणि काळ माहीत असल्याने आयुष्यात श्रद्धा आणि अंधश्रध्देच्या कल्पनांचे स्थान डळमळीत होऊन जाईल. आजारपण मृत्यू  यांच्या अनामिक भीतीपोटी माणूस परमेश्वराची भक्ती करतो,आपल्याला सुख समृध्दी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावे म्हणून श्रध्देने मनन चिंतन ध्यानधारणा उपासना करत असतो.ध्यानातला आनंद उपभोगून मानसिकदृष्ट्या एका उच्च आनंदी समाधानी स्तरावर पोहोचत असतो. मला सगळेच आधी माहीत असेल तर अर्थातच माझ्या आयुष्यातल्या या गोष्टींचे महत्व संपून जाईल....भावनिकदृष्ट्या  माझे आयुष्य रुक्ष होऊन जाईल.जगण्यात मजा रहाणार नाही.आयुष्य निराशाग्रस्त होऊन जाईल...जगणे म्हणजे दिवस रेटणे ....असे होऊन जाईल...  काही काही गोष्टींबाबत अज्ञानात असणे फायदेशीर असते त्यातलेच एक म्हणजे माणसाचे भविष्य.उज्वल भविष्याच्या आशेवर माणसाचा वर्तमानकाळ सुसह्य होत असतो. माणसाच्या आयुष्यात तो कसा जगणार आहे किती जगणार आहे त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे या सगळ्या गोष्टी त्याला आधी माहीत नसतात हे ईश्वराने त्याला दिलेले वरदान आहे असेच मी मानतो त्यामुळे बंद पाकिटात लिहून कुणी ही गुपिते लिहून दिली तरी मी ते पाकीट मुळीच उघडणार नाही....कारण...अज्ञानात अपार सुख असते...काही गोष्टी अपूर्णच असाव्यात ....स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा,गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा..

..©प्रल्हाद दुधाळ. पुणे.

    9423012020