माकर संक्रांत आणि तिळाचा हलवा Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माकर संक्रांत आणि तिळाचा हलवा

मकर संक्रान्त आणि तिळाचा काटेरी हलवा मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देतो .आपापसातील प्रेम जागृत राहावे कधी चुकून मतभेद झाले तरी ते विसरले जावे हा उद्देश त्यात असतो .आजकाल मात्र ही संक्रात बऱ्याच वेळेस ऑनलाईनच साजरी केली जाते .वाटस अप ,फेसबुक ,मेसेंजर, वोईस मेसेज  अशा अनेक माध्यमातून  हे तिळगुळ दिले जातात .एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देणे ,थोरांचे आशीर्वाद घेणें या गोष्टी अभावानेच आढळतात .एकमेकांचा स्नेह पण थोडे बेगडी रूप धारण करू लागला आहे .         संक्रांतीचे ते जुने दिवस खूप मनोहारी होते .😊एकमेकात अकृत्रिम स्नेह होता .💗दसऱ्याला सोने देणे आणि संक्रांतीला तिळगुळ देणे यामधून खऱ्या प्रेमाची आदराची जपणूक केली जात असे .असतीलच काही मतभेद अथवा भांडणे तर ती मिटवली जात .😊       असो शेवटी काय कालाय तस्मै नमः..हेच खरे !!!मला मात्र संक्रान्त आली की ते पूर्वीचेच दिवस आठवतात आणि माझ्या आईची मला प्रकर्षाने आठवण येते याच कारण आहे त्या वेळेस तीळआणि साखरेचा पाक वापरून केला जाणारा काटेरी हलवा.... हल्ली असा हलवा घरी फार केला जात नाही कारण हे काम खुप "नजाकतीचे" आणि "वेळखाऊ "आणि धीराचे आहे .इतका वेळ हल्ली असतो कोणाकडे ?विकतचा साखरफुटाणे टाईप हलवा आणायचा आणि तो वाटायचा .त्या काळात मात्र तिळाचा हलवा करणे हे अत्यंत कौशल्याचे काम अनेक घरात केले जात असे त्यासाठी मार्गदर्शन करायला काही घरात आजीची पिढी असे ...😊हा हलवा . तीळ,खसखस ,शेंगदाणे ,फुटाणे ,बडीशेप , चारोळे अशा अनेक गोष्टींचा केला जात असे .हिरवा अथवा केशरी  रंग घालून रंगीत हलवा पण केला जात असे गरोदर असताना डोहाळे जेवणासाठी या हलव्याचे अनेक दागिने बनवले जात जसे की . मंगळसूत्र ,बांगड्या ,नेकलेस ,कानातल ,कमरपट्टावाकी ,बिंदी ....असे अनेक प्रत्येकाच्या हौशी प्रमाणे !!शिवाय पतिराजा साठी गळ्यातला मोठा हार हातातला पुष्पगुच्छ सुद्धा असे !हे दागिने घालून स्टुडीओ मध्ये जाऊन वेगवेगळ्या पोझ मधले तीन चार फोटो काढणे हे कम्पलसरी असे .नंतर हे फोटो सर्वाना हौसेने दाखवणे अल्बम मध्ये लावणे एखादी कॉपी दिवाणखान्यात फ्रेम करून लावणे हे सुद्धा कित्येक घरात होत असे 😊या हौशीला मोल नसे ...!!हे दागिने हलवा ,कलाबतू ,पुठ्ठा , जीग, कागदी फुले,दोर्याच्या सहाय्याने बनवले जात आताही असे दागिने बनतात पण तो हलवा  काटेरी नसतो .     आई तिळाचा हा काटेरी हलवा खूप छान बनवत असे .तिच्याकडे ते कसब ,चिकाटी होती .ज्या गोष्टीचा तिळगुळ करायचा त्यावर काटा चढण्यासाठी हा हलवा पहाटे केला जात असे ज्यावेळी थंडी असे थंडीतच चांगला काटा चढत असे व हलवा नाजूक बनत असे .ही पाककृती चांगलीच कीचकट असे    प्रथम अर्धा कप साखरेत पाव कप पाणी,३-४ छोटे चमचे दूध घालून साखर,पाणी आणि दूध एकत्र करून पाक करून घ्यायचा हा मात्र घट्ट पाक करावा लागत असे . पाकात दूध घातल्याने  नासून जाते म्हणून पाक झाल्यावर तो एका मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा लागत असे .या दुधाचा जो गाळ निघतो त्याला "मळी" म्हणत असत ही मळी टाकायची नाही ,हा गोड असल्याने पोळीसोबत खाल्ली जात असे  .,😋यानंतर चहाचा छोटा चमचा तीळ,खसखस किंवा जितके मोठे तिळगुळ हवेत तितके मोठे दाणे असलेला पदार्थ घ्यायचा तयार केलेला पाक कोमट झाला की एका पसरट जाड बुडाच्या पितळी परातीत तीळ घेऊन भांडे मंद आचेवर ठेऊन अगदी चमचा चमचा पाक तिळाच्या दाण्यांवर घालून हलक्या हाताने हलवायचा हा पाक व्यवस्थित सगळ्या तिळाला लागला की पाकाचा पहिला थर तयार होतो .याला पाक चढवणे म्हणले जात असे.मग तो साधारण अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवायचा आपल्याला हवे आहेत तितक्या मोठ्या आकाराचे तिळगुळ होईपर्यंत परत असाच पाक घालून हाताने हलवत राहणे .याची आच जरी मंद असली तरी हाताला थोडा चटका जाणवत असे .तासभर असे केले की एक मोठे भांडे हलवा तयार होत असे .आईला जरी हे काम चांगले जमत असले तरी ती शाळेत शिक्षिका असल्याने तिचे घरकाम ,शाळा यामुळे तितका वेळ उपलब्ध होत नसे .संक्रांती आधी चार पाच दिवस ती पहाटे उठून हे काम करीत असे .शिवाय या हलव्याचा पांढरा रंग शाबूत राहावा म्हणून  हे काम अत्यंत स्वच्छ हाताने करायला लागत असे .जवळ जवळ सोवळ्यात करायला लागे म्हणा ना 😃आई स्वतः पहाटे उठून आधी स्वच्छ आंघोळ करून पांढरी साडी नेसून देवाला नमस्कार करून मग स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात सगळे साहित्य .... म्हणजे हात पुसायला दोन पांढरी फडकी ,पाक गाळायला एक वेगळे फडके हे सगळे हाताशी घेऊन बसायचे आणि काम पूर्ण झाल्यावर दोन तासांनी उठायचे अशी तिची कामाची पध्दत असे .त्या काळी गॅस नव्हता .एक सात वातीचा स्टोव्ह घरात होता त्यावर मंद आच करून आई हलवा करीत असे .या कामाला कोणाची" नजर "लागली तर हा काटा बिघडतो अशी तिची धारणा असे .😊त्यामुळे पहाटेची शांत वेळ ,थंडी ,कोणाचे येणे जाणे नाही या गोष्टी तिला सोयीस्कर वाटत देवाचा नेवेद्य आणि शेजारी पाजारी नातेवाईक यांच्याकडे संक्रांती दिवशी वाटायला असा अत्यंत  सुबक दोन मोठी पाणी प्यायची फुलपात्री भरून हा तिळाचा हलवा तयार करीत असे .यातील थोडा हलवा संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी बाजुला ठेवायचा शिवाय रथसप्तमी पर्यंत सुध्दा पुरवठा पडायला हवा . हे सगळे ती हिशोबात ठेवत असे.सोबत ती दोन ताटे तिळाच्या वड्याची पण थापत असे.आमच्याकडे दोन मोठ्या आकारातील चांदीची ठेवणीतील फुलपात्रे होती ."खास "या वेळेस ती बाहेर काढली जात .हलवा तयार झाला की आधी त्या फुलपात्रात भरला जात असे ही दोन फुलपात्रे भरली की संक्रांती दिवशी  देवाला नेवेद्य दाखवून मग डब्यात भरायचा असा तिचा शिरस्ता असे .😊हे काम पुरे होईस्तोवर ही फुलपात्रे स्वच्छ पांढऱ्या फडक्याने झाकून त्यावर एक पातेले पालथे ठेवले जायचे .जमिनी लगत असलेल्या या स्वयंपाक कट्ट्यावर एका कोपऱ्यात ठेवलेल्या हलव्याकडे मुलांना फिरकायला मनाई असे .सकाळी उठल्यावर जेव्हा तो पांढरा शुभ्र नाजूक हलवा करणारी आमची आई दिसत असे तेव्हा खूपच भारी वाटत असे .,😊😊आईला हलवा रंगीत करायला मात्र अजिबात आवडत नसे .माझ्या आजीला सुद्धा तिच्यासारखा हलवा जमत नसे त्यामुळे हा हलवा बघून तिच्या सासूकडून तिचे विशेष कौतुक होत असे .😊😊         तिच्या या हलव्याची कीर्ती तशी सगळीकडेच होती .💗एके वर्षी दिवाळीनंतर आमच्या ओळखीच्या दुकानदाराकडून तिला हलवा करून विकत द्याल का ?..अशी विचारणा झाली .त्या काळी असा हलवा विकत करून देणे अशी कल्पना सुद्धा डोक्यात येणे अशक्य होते .एकदम असा प्रस्ताव आल्याने विचार करून सांगते असे तिने दुकानदाराला सांगितले .हा विचार करायला फक्त दोनच दिवस त्याने दिले होते आईने नकार दिला तर त्याला दुसरीकडे विचारायला लागणार होते.आई स्वतःच थोडी विचारात पडली होती कारण ही चक्क दहा किलो हलव्याची ऑर्डर होती .यात दागिन्या साठी म्हणुन काही हलवा रंगीत बनवायला लागणार होता, तर काही शेंगदाणे, फुटाणे, भोपळ्याच्या बिया यावर बनवायचा होता.आणि म्हणूनच लागणारा वेळ गृहीत धरून दोन महिने आधी हा प्रस्ताव दुकानदाराने दिला होता .ही मागणी दुकानदाराकडे मुंबईतून आली होती.लागणारे सर्व साहित्य त्या दुकानदाराचे असेल आणि करणावळ म्हणून आईला शंभर रुपये मिळणार होते .त्या काळी शंभर रुपयाला फार किंमत होती .शंभर रुपयाच्या किराणा मालात चार माणसांचा अख्खा महिना आरामात निघत असे .आईने वडीलांशी सल्ला मसलत केली .ते म्हणाले,”मला खात्री आहे काम जरी कठीण असले तरी तू हे काम करू शकतेस आणि ते  तू करावेस .खरेतर या कामात तर मी तुला काहीच मदत करू शकणार नाही पण हे काम पुरे होईपर्यंत जितकी शक्य असेल तितकी मी तुला घरकामात मदत नक्की करेन तुला विश्रांती द्यायचा प्रयत्न करेन .”वडीलांचे प्रोत्साहन आणि सहकार्य बघून आईने हे काम स्वीकारले .दुसऱ्या दिवशीपासून हलव्याचे काम रोज दोन तास पहाटे उठून आईने सुरु केले .नोकरी ,घर ,आला गेला ,इतर अडचणी सगळे सांभाळून हे काम एक "दिव्य "होते .आईच्या शाळेत जेव्हा हे समजले तेव्हा मुख्याध्यापक बाईंनी कौतुकाने आईला शाळेतून पंधरा दिवस रजा दिली.त्यामुळे आईला दिवसातला दुपारचा वेळ हाताशी सापडला.शिवाय या हलव्यात काही मोठा हलवा म्हणजे शेंगदाणे फुटाणे यावरचा करायचा होता जो दागिन्यांसाठी लागणार होता..यात थोडा वेळ वाचणार होताकारण बारीक पदार्थांपेक्षा मोठ्यावर पाक लवकर चढतो .आईने जिद्दीने आणि निगुतीने ते काम दोन महिन्याला आठवडा कमी असताना पुरे केले .पाच किलोचे दोन मोठे डबे भरून तिळाचा हलवा तयार झाला होता . मी तेव्हा शाळेत जाणारी मुलगी होतेहे सगळे माझ्यासमोर घडत होतेत्यामुळे या अवधीत मला जाणवत होते कीआई पहाटेनंतर माझी मिठी सोडून अंथरुणातून बाहेर पडत होती .आणि सतत या कामात गर्क होती.आणि दोन मोठे डबे हळूहळू हलव्याने भरत होते .😊नेहेमी दोन्ही वेळेस भात,पोळी,आमटी,भाजी, चटणी ,कोशिंबिरी सकट साग्रसंगीत जेवण हवे यासाठी आग्रही असणाऱ्या वडीलांनी या दिवसात कधी नुसती पोळी भाजी ,कधी भात आमटी तर कधी दुध पाव यावर भागवले होते अगदी विनातक्रार ...त्यांनी बोलल्या प्रमाणे सहकार्य करून दाखवले .        अखेर एक दिवस काम पूर्ण झाले. आणि ते दोन डबे घेऊन आई वडील दुकानात पोचवायला गेले .दुकानदार तर चकीतच झाले कारण ही ऑर्डर जवळजवळ एक आठवडा आधीच पुरी झाली होती.त्यांच्या अपेक्षे पेक्षाही लवकर!!तसे ते दर आठवड्याला माणूस पाठवून कामाची चौकशी करीत होतेच ..आज मात्र त्यांनी खुश होऊन स्वतः दहा रुपये आईला जास्तच दिले आई वडील दोघेही खुश झाले .आईच्या श्रमाचे चीज झाले होते .घरी येऊन आईने आधी ते एकशे दहा रुपये देवापुढे ठेवले .वडील म्हणाले," या कामासाठी तु खूप कष्ट घेतले आहेस .हे पैसे तू तुझ्या मनाप्रमाणे खर्च कर .त्यावेळेस बायकांचा मनासारखा खर्च म्हणजे स्वयंपाक घरातील वस्तु ..इतकाच सीमित होता 🙂आईला प्यायचे पाणी ठेवायला एक पितळी मध्यम आकाराचे नळाची तोटी असलेले पिप हवे होते .त्याची किंमत एकशेवीस रुपये होती .जास्तीचे आईला दहा रुपये बक्षीस म्हणुन खुशीने वडीलांनी दिले व ते पिप घरी आले .खूप वर्ष आईने निगुतीने ते पिप वापरले .आणि वडीलांनी पिपाची सुरस कथा आल्या गेल्याला कौतुकाने सांगितली💗 😊😊आईच्या मृत्युनंतर ते पिप वाहिनीच्या संसारात होते .ते बघितले कीआईची आठवण येत असे 😴नंतर मात्र काळाच्या ओघात त्याला कल्हई करायला माणूस मिळत नाही ..आता ते खूप जुने दिसते आहे .. ते फारच जड आहे...अशा कारणानी ते पिप मोडीत घातले गेले .आणि आईची आठवण लुप्त पावली 😥हेच कारणआहे संक्रांतीला आईची प्रकर्षाने आठवण यायचे आणि डोळे पाण्याने भरून यायचे 😥😥गेला तो जुना सुवर्ण काळ...!💗आणि ती सोन्यासारखी माणसे 💗💗