तोतया वारसदार
पात्र परिचय
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
जय - व्यंकटेशचा मुलगा
बबन - सारंग वकिलांचा चपराशी
सुभाष गोखले - बबनचा बार मधला मित्र.
भाग २१
भाग २० वरून पुढे वाचा....
सारंग वकिल फोन वरून प्रशांत सरांना ही बातमी देतांना, बबनने ऐकलं. त्याच्या पोटात गोळाच उठला. त्यानी याची कल्पनाच केली नव्हती. हे कधी ठरलं?, त्याला कळेचना. त्याची अशी समजूत होती की इंग्लंड शी संपर्क प्रस्थापित झालाच नाही, आणि असंच त्यानी सुभाषला सांगितलं होतं. आता ताबडतोब त्याला अपडेट दिलं पाहिजे असं वाटून तो ऑफिस च्या बाहेर पडला. PCO वर जाऊन त्यानी सुभाषला फोन केला.
त्याच दिवशी संध्याकाळी ती दोघं कॉफी हाऊस मधे भेटली. बबनने त्यांना अपडेट दिलं. सुभाष गोखले जरा विचारात पडले, म्हणाले, “आता काय करायचं? तु तर म्हणाला होता की इंग्लंड वरून काहीच खबर नाही म्हणून, मग असं अचानक कसं काय येताहेत ती मंडळी?”
“हो न, इंग्लंड वरून काहीच पत्र आली नाहीत, पत्र फाइल ला लावण्याचं माझच काम आहे, मला नक्कीच कळलं असतं” बबनने सफाई दिली.
“तुझ्या बद्दल काही संशय आला आहे का? कारण तुला अंधारात ठेवून हे झालं आहे.” – गोखले.
“नाही, संशय वगैरे काही नाही, त्यांच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आला असता माझ्या, पण माझ्या नजरेतून हे कसं सुटलं, हे मला बघावंच लागणार आहे.” बबन म्हणाला. थोडा वेळ कोणीच बोललं नाही.
मग गोखलेच बोलले. “ठीक आहे, जे झालं ते झालं, मात्र आता नीट लक्ष ठेव. आपण थोडं थांबून जाऊ, त्यांच्या काय योजना आहेत हे समजून घेऊ आणि मगच आपली पावलं उचलू.” त्याचं बोलणं बबनला पण पटलं. म्हणाला “असंच करू काही दिवस थांबून जाऊ.” आणि यावर एकमत झाल्यावर दोघांनीही घराचा रस्ता पकडला.
***
गुरवारी सकाळी १० वाजता, मुंबई वरून येणाऱ्या फ्लाइट वर सारंग आपल्या ड्रायव्हर सह विमानतळावर पोचला. हातात “वेल्कम जय आणि रोहन गोखले” असे फलक धरून दरवाजा पाशी उभे होते. रोहनला ते दिसले, तो जवळ येऊन म्हणाला “सारंग वकिलांनी पाठवले आहे काय?”
सारंग पुढे झाला “मीच सारंग” आणि त्यांनी हस्तांदोलन केले. “मी रोहन आणि हा जय” रोहननी ओळख करून दिली.
दोघां साठी प्राइड हॉटेल मधे रूम बूक केली होती. हॉटेलवर पोचल्यावर सारंग म्हणाला “रात्रीचा प्रवास करून आला आहात, तुम्ही आता थकला असाल, त्यामुळे दिवसभर आराम करा. मी संध्याकाळी ७ च्या सुमारास गाडी पाठवतो, तो तुम्हाला आमच्या ऑफिस मधे घेऊन येईल. त्या वेळेस बाकीचे दोन ट्रस्टी पण आलेले असतील. आम्ही ज्याच्यावर शोध कार्य सोपवलं आहे, तो पण असेल. चालेल ना?”
दोघांनाही तशी विश्रांतीची जरूर होतीच, त्यांनी “ओके” म्हंटलं मग सारंग तिथून निघाला. दुपारी कोर्टातूनच सारंगने प्रशांतला फोन केला आणि संध्याकाळी ७ वाजता जमायला सांगितलं. पण प्रशांतचं असं मत पडलं की “आज आपण त्यांना बाहेर कुठेतरी धाब्यावर जेवायला घेऊन जाऊ. जरा आपसात ओळख पाळख होईल, त्यांचे स्वभाव कळतील. त्यांचा दृष्टिकोन कळेल. जरा आपसात खेळीमेळीचं वातावरण निर्माण होईल. मग उद्या आरामात मीटिंग करू. मी आणि किरीट दोघेही उद्याचा दिवस मोकळा ठेवतो. तुला काय वाटतं?”
“कदाचित तू म्हणतो आहेस ते बरोबर दिसतंय, ठीक आहे, संध्याकाळी बरोबर सात वाजता प्राइड ला पोहोचा.” सारंग म्हणाला. ठरल्याप्रमाणे, सारंग संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर पडणार, तेवढ्यात बबन समोर आला, म्हणाला “साहेब, पाहुणे येणार असतील ना, मीटिंग असेल ना, काय काय तयारी करायची आहे ते सांगा.”
“अरे आज काही नाही, आज आम्ही त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहोत. मीटिंग उद्या सकाळी. त्यामुळे उद्या दिवसभर तुझी थोडी धावपळ होणार आहे. एक काम कर उद्या येतांनाच १० बिसलेरी च्या बाटल्या आणून फ्रीज मधे ठेऊन दे. मग काय हवं नको ते नंतर बघता येईल.” बबनला असं सांगून सारंग प्राइड हॉटेल वर जायला निघाला. तो पोचला तेंव्हा गाड्या पार्क करून, प्रशांत, किरीट आणि निशांत गेट वरच त्याची वाट पाहत उभे होते. रूम वर गेल्यावर, सारंगने सर्वांची ओळख करून दिली.
थोडं बोलणं झाल्यावर सारंगने जेवण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. जय आणि रोहननी थोडे आढे वेढे घेतले पण नंतर तयार झाले. सर्व जण मग हायवे ग्लोरी हॉटेल मधे गेले. तिथलं प्रसन्न वातावरण पाहून जय आणि रोहन दोघांच्याही चित्तवृत्ति प्रफुल्लित झाल्या. अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात जेवण झालं. भरपूर गप्पा झाल्या. मग सगळे जण जय आणि रोहनला सोडायला हॉटेल वर गेले. हॉटेल वर गेल्यावर रोहन म्हणाला की कॉफी घ्यायला वर चला. कॉफी घेता घेता, जय म्हणाला. “सारंग साहेब, जेवण तर फारच छान होतं. आमचा दिवसभर भरपूर आराम झाला आहे, आणि आम्हाला काही आत्ता झोप आली नाहीये, आणि आपण सर्वच इथे जमलो आहोत, तर थोडी चर्चा करायला काय हरकत आहे?”
किरीट म्हणाला, “हो, काय हरकत आहे सारंग, तू फाइल घेऊनच आला आहेस ना?” मग सारंगने खाली जाऊन गाडीत ठेवलेली फाइल आणली. आणि चर्चेला सुरवात झाली.
सारंग अगदी एकएक मुद्दा त्यांना समजेल अश्या रीतीने सांगत होता, आणि जय आणि रोहन लक्ष पूर्वक ऐकत होते. मधून मधून निशांत एखाद्या मुद्दयाचा थोडा अजून विस्तार करून सांगत होता. अविनाशची कथा सांगून झाल्यावर, जय म्हणाला,
”म्हणजे विनायकरावांच्या तिन्ही मुलांनी संपत्ती वर पाणी सोडलं आहे. आश्चर्य आहे न? जे सगळ्यात जास्त हक्कदार आहेत, तेच नको म्हणताहेत.”
“आहे खरं असं, तिघांचेही निर्णय अगदी सारखे आलेत. सख्खे भाऊ आहेत. आता आम्हाला मुळीच संशय नाही की अविनाश राव तुमचे काका आहेत म्हणून. पण जय साहेब, ही गोष्ट बाहेर फुटू द्यायची नाहीये, त्यांच्या जीवाला धोका संभवतो, हे कायम लक्षात ठेवा. आम्ही पण फंक्त तुम्हालाच ही गोष्ट सांगितली आहे.” सारंग म्हणाला.
“सारंग साहेब, तुम्ही निश्चिंत असा. अहो आमच्या काकांचा जीव आम्हीच कसा धोक्यात घालू. काका सापडलेच नाहीत. आम्हाला हेच माहीत आहे.” – रोहन
चर्चा पुढे मग बराच वेळ चालली. निशांतने संपूर्ण वंशावळी विस्ताराने समजावून सांगितली. सारंगने कॉपी आणल्या होत्या, त्या त्यांना दिल्या. सगळं समजून घेतल्यावर, जय म्हणाला, “या वंशावळी मधे, गोकर्णाचा ओझरता उल्लेख आहे फंक्त. तेवढ्यांवरून निशांत तू तिथल्या गोखल्यांशी संपर्क साधलास हे खरंच कौतुकास्पद आहे. पण सांगलीच्या लोकांचा माग तू कसा काढणार आहेस? काही योजना आहे का तुझ्या डोक्यात? आणि नर्मदा आणि गोदावरीच्या शोधा बद्दल काय योजना आहेत तुझ्या डोक्यात?”
“नाही अजून काहीच कल्पना नाहीये, सांगलीला गेल्यावरच काही प्रयत्न केल्यावर कदाचित कळू शकेल. अर्थात हा एक अंदाजच आहे. आणि पुण्याबद्दल बोलायचं झालं तर, ८० वर्षांपूर्वी काय घडलं या बद्दल काहीच माहिती नाहीये. सांगली आणि पुणे दोन्ही ठिकाणी बराच वेळ लागू शकतो. शोध लागो अथवा न लागो, शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, हे कोर्टाला मान्य होईल एवढा पुरावा असणं जरुरीचं आहे.” – निशांत
“हूं, मी काय म्हणतो, म्हणजे आत्ताच माझ्या मनात हा विचार आला,, की जर रोहन निशांतच्या बरोबर गोकर्णला गेला, तर ते खरेच आपल्यापैकी आहेत का याची ताबडतोब शहानिशा होऊ शकेल. रोहन तुला काय वाटतं?” जय म्हणाला.
रोहन थोडा विचारात पडला म्हणाला, “कल्पना वाईट नाहीये, ठीक आहे, मी थांबतो, तू लंडनला जा. म्हणजे तिथल्या कामाची पण खोटी होणार नाही.” त्यानंतर बरीच साधक बाधक चर्चा झाली. सर्वानुमते एका प्लॅन ची रूप रेषा ठरवण्यात आली. गाडीच्या तिकीटा साठी थांबत बसले तर रोहन उगाच अडकून बसेल, म्हणून दुसऱ्याच दिवशी विमानाने निशांत आणि रोहनने मुंबईला निघायचं आणि तेथून एक टॅक्सी भाड्याने घेऊन, गोकर्णला जायचं असं ठरलं. गोकर्णचं काम आटोपल्यावर मग तिथूनच सांगलीला जायचं. या योजनेवर सगळ्यांचं एक मत झाल्यावर, सगळे घरी जायला निघाले. ते निघाले तेंव्हा सकाळचे पांच वाजले होते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, निशांत, रोहन आणि जय मुंबईच्या विमानात बसले.
त्या दिवशी सकाळी, बबनने सारंग सरांना विचारले, “साहेब, पाहुण्यांची काय व्यवस्था करायची आहे, या बद्दल सांगा म्हणजे मी सगळी तयारी करून ठेवतो.”
“अरे, काहीच करायचं नाहीये, ते लोकं येणार नाहीत, त्यांना फक्त आम्हाला भेटायचं होतं. आमच्याशी काल बोलणं झालं, आणि त्यांचं समाधान झालं आता आजच ते मुंबईला जाणार आहेत आणि तिथून आज रात्रीच लंडन.” बबनच्या काही ते पचनी पडत नव्हतं. इंग्लंडच्या लोकांचा विचार नेमका कळल्याशिवाय, त्यांची योजना पुढे सरकत नव्हती. संध्याकाळी, सारंग गेल्यावर बबननी त्यांच्या नोटिंगची फाइल काढली. त्यात सारंगने लिहिल होतं की व्यंकटेश आणि सौमित्र दोघांनाही संपत्तीत स्वारस्य नाहीये, जय आज रात्रीच लंडनला वापस जाणार आहे आणि निशांत बरोबर रोहन सुद्धा गोकर्णाला पडताळणी करायला गेला आहे. अविनाश बद्दल काहीच उल्लेख नव्हता. यांचा बबन ने असा अर्थ लावला की अविनाश बद्दल काही विशेष बोलणं झालं नाही. तो बेपत्ता आहे आणि त्याचा शोध लागला नाही हे त्या लोकांनी मान्य केलं असणार.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com