तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
सुधा - विश्रामची बायको.
दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं.
मालती - अनिलची बायको.
विनय - अनिलचा मुलगा
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी
पिढी. सुरतला स्थायिक.
भाग २७
भाग २६ वरून पुढे वाचा....
“खरं म्हणजे ह्या संपत्ती वर जय आणि रोहनचाच अधिकार आहे. त्यांना डावलून, आम्हाला तुम्ही विचारता आहात हेच मुळात चूक आहे.” अनिल बोलला.
“काका असं नाहीये, जेंव्हा आम्हाला हे काम करायला सांगितल्या गेलं, तेंव्हा कोणी भेटतील अशी सुतराम शक्यता दिसत नव्हती. फक्त विनायकरावांची शेवटची इच्छा होती, आणि त्या इच्छेला मान द्यायचा म्हणून हा सगळा कार्यक्रम राबवल्या गेला. सारंग वकिल, डॉक्टर प्रशांत आणि किरीट सर विनायकरावांना वडीलांच्या स्थानी मानत होते. त्यामुळेच आम्हाला सारंग सरांनी सांगीतलं की पैसा कितीही खर्च होऊ द्या पण कसून प्रयत्न करा. या प्रयत्नांना नशीबानेच फळ तर मिळालं, पण तुम्हा लोकांच्या निर्णयामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
“अनिल काका, विश्राम काका, आता मी तुम्हाला सर्व संगतवार सांगतो, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका कुशंका फिटतील.” निशांतने बोलायला सुरवात केली. असं बघा, विनायकरावांनी त्यांच्या हयातीत सर्व नातेवाईकांना शोधायचा प्रयत्न केला अगदी त्यांच्या मुलांना सुद्धा. पण त्यांना यश आलं नाही. बिचारे गेले तेंव्हा एकटेच सर्वांच्या आठवणी काढत गेले. म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात ही अट घालून ठेवली आणि त्याची जबाबदारी, सारंग वकिलांवर सोपवली. आमची कंपनी शोध कार्यात प्रवीण असल्याने आमच्यावर ती जबाबदारी आली. मी खूप कष्ट घेऊन एकएकांचा पत्ता लावण्यात यशस्वी झालो, पण सर्वच गोखले इतके स्वाभिमानी असतील याची कल्पना नव्हती. पहिले अविनाशराव, यांनी तर ओळखच नाकारली. अर्थात त्यामागे कारण होतं. ती हकीकत मी सविस्तर पणे तुम्हाला सांगितलीच आहे. नंतर व्यंकटेशराव आणि सौमित्रराव, म्हणजे जय आणि रोहनचे वडील, मग लक्ष्मणराव, आणि आता तुम्ही दोघे, कोणीही एकमेकांना याच्या अगोदर पाहीलं सुद्धा नव्हतं, तरी वागण्यात इतकी एकवाक्यता कशी? सर्वच कसे एकाच माळेचे मणी निघाले. बाकीचं सोडा, ९-१० कोटींची अनायासे मिळणारी संपत्ती, सहजरित्या नाकारणारं अख्ख गोखले कुटुंब पाहिल्यावर मलाच अचंबित व्हायला झालंय. माझं तर डोकच चालत नाहीये, माझे सर्व कष्ट फुकटच गेले म्हणायचे.” निशांतनी एक लांब लचक भाषणच ठोकलं
विश्राम हसला. म्हणाला, “खरंय तुझं म्हणण निशांत, सगळेच गोखले सारखे कसे? याचाच अर्थ आम्ही सर्व एकाच वंशाचे म्हणजे महादेवरावांच्या वंशाचे आहोत हे सिद्ध होतं. आम्ही सगळे भाऊ आहोत. आता एकच गोष्ट करायला पाहिजे आणि ती ही लवकरच. एक आपल्या सर्वांचा मेळावा होऊन जाऊ द्या. रोहन तुझ्या बाबांना आजच फोन कर., लक्ष्मण आणि आम्ही इथेच आहोत, आम्ही सर्व व्यवस्था करू.”
“हो काका, मी आजच हॉटेल वर गेल्यावर फोन लावतो. मला पण आवडली ही कल्पना. अगदी गेल्या गेल्याच लावतो फोन” – रोहन
“हॉटेलवर? म्हणजे तुम्ही हॉटेलवर उतरला आहात? आपलं घर असतांना? लक्ष्मण राव हे काय चाललंय? हे काही पटलं नाही बुवा आपल्याला.” विश्रामने निषेध नोंदविला.
“काका राग मानू नका, आम्ही प्रथमच तुमच्या कडे येतो आहे, संकोच तर थोडा फार वाटणारच ना? आणि परत आम्हाला सांगलीला पण जायचं आहे, म्हणून हॉटेलवर उतरलो आहोत.” लक्ष्मणने स्पष्टीकरण दिलं.
‘सांगलीला कशाला? शोधकार्यच की काय?” अनिल ने विचारले.
“हो,” निशांतने उत्तर दिलं. “तुम्ही आता डायरीत वाचलं ना की सखाराम पंताना दोन मुली होत्या. एक अकाली वारली पण दुसरी रेवती, त्यांचं चिपळूणच्या हरीपंत सान्यांशी लग्न झालं. त्यानंतर हरीपंतांना सांगलीला एका पेढीवर नोकरी मिळाली म्हणून ते सांगलीला गेले आणि तिथे बिऱ्हाड केल. आता, त्यांच्या बद्दल या पलीकडे काहीच माहीत नाहीये. डायरीत एवढंच लिहिलं आहे. ही गोष्ट सुद्धा दीडशे वर्षांपूर्वीची आहे.”
“सांगलीची तुम्हा लोकांना काय माहिती आहे?” – विश्राम
“मी नागपूरचा, रोहन लंडनचा आम्हा दोघांना काही माहिती असण्याची शक्यताच नाही, कदाचित लक्ष्मण रावांना माहीत असेल.” – निशांत.
“नाही, नाही मीही कधीच सांगलीला गेलो नाही.”- लक्ष्मण.
“तुम्हाला कोणालाच जर सांगलीची माहिती नाही, तर मग सांगलीला जाऊन तुम्ही शोध कसा घेणार?” – विश्राम.
“आम्ही असा विचार केला की बाजारपेठेत जाऊन कोणी साने भेटतात का ते बघावं आणि जे कोणी भेटतील त्यांच्यापासून चौकशीला सुरवात करावी. आठ एक दिवसांत काही हाती लागलं तर ठीक नाहीतर रोहन लंडनला वापस जाईल आणि मी सांगलीला थांबून चौकशी पुढे सुरू ठेवीन. आपली माहिती दीडशे वर्षांपूर्वीची असल्याने याला कदाचित काही महीने सुद्धा लागू शकतील. आणि तरीही पदरात काही पडेल याची खात्री नाही.” – निशांत.
“असं असेल तर यात मी नक्कीच काही मदत करू शकतो.” - विश्राम
काका, तुम्ही याच परिसरात राहता, तुमची मदत तर नक्कीच मोलाची असणार आहे. सांगा आम्ही काय करायचं ते.” – निशांत.
“ठीक आहे. आता मी काय सांगतो ते ऐका. आमचे सांगलीमद्धे बरेच व्यावसायिक संबंध आहेत. उद्या मी काही लोकांशी बोलून काही दुवा मिळतो का ते बघतो मग आपण सांगलीला जाऊ. मी किंवा आमच्यापैकी कोणीतरी येईल तुमच्या बरोबर. पटते का?” - विश्राम
निशांत आणि रोहनला यात न पटण्यासारखे काहीच नव्हते, म्हणून ते हो म्हणाले. लक्ष्मण म्हणाला “हे तर फारच छान झालं, म्हणजे आम्ही आता गोकर्णला जायला मोकळे. हॉटेल वर जाऊन थोडी झोप काढू, आणि पहाटे निघू म्हणजे दुपार पर्यन्त आमच्या गावी पोचायला हरकत नाही.”
“अगदीच वाईट कल्पना. आता आल्यासारखी दोन दिवस आमचा पाहुणचार घ्या. मग आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल, त्या निमित्ताने तो घर पण बघून घेईल, म्हणजे पुढच्या वेळेस आम्हाला तुमच्या कडे यायला सोपं पडेल. आम्ही आलेलं चालेल ना गुरुजी?” -विश्राम.
“अरे, काय काका तुम्ही पण ना! दांडीच उडवली की माझी. असं बोलून लाजवू नका हो! तुमचंच घर आहे केंव्हाही या स्वागतच आहे.” लक्ष्मण म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सामान घेऊन येण्याचं कबूल करून पाहुणे हॉटेल वर परतले.
दुसऱ्या दिवशी विश्रामकाकांनी सांगलीच्या काही व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना काय माहिती हवी आहे ते सांगितलं. मॅटर अर्जंट आहे असंही सांगितलं. मग म्हणाले, “इथून कोल्हापूर जवळच आहे, तुम्ही दर्शन करून या. तो पर्यन्त जर काही माहिती हातात आली तर त्या प्रमाणे कार्यक्रम ठरवू.”
काकांची ही सूचना सगळ्यांनाच पसंत पडली. आणि सगळे कोल्हापूरला जायला निघाले. देवळात नेहमी असते तेवढीच गर्दी होती. अंबाबाईचं दर्शन छान झालं. सर्व आटोपून
कोल्हापूर वरून यायला मंडळीला दुपारचे ४ वाजले. मग जेवणी खाणी, मग निवांत डुलकी, त्यानंतर सगळे चहा प्यायला हॉल मधे जमले. सांगली हून अजून काही संदेश आला नव्हता.
“सांगली हून तर काका, काहीच निरोप आला नाही आता काय करायचं?” - निशांत.
“थोडा वेळ अजून वाट बघू, नाहीच आला तर मी पुन्हा फोन करेन.” विश्राम काका म्हणाले.
चहा घेता घेताच, फोन वाजला. विश्राम काकांनी फोन घेतला थोडं बोलणं झालं मग जवळच ठेवलेल्या वहीत त्यांनी एक फोन नंबर उतरवून घेतला. म्हणाले “जयंतीलाल चा फोन होता. त्यांनी एक नंबर दिला आहे, तो कुणी साने म्हणून कपडा व्यापारी आहेत त्यांचा आहे. त्यांना फोन करून त्याच्याजवळ काही माहिती आहे का हे विचारा म्हणाले.”
“मग लावता का आत्ता त्यांना फोन?” रोहनने विचारले.
“हो लावणारच आहे, पण आधी निशांत, तुझी डायरी आणि वंशावळी चा कागद दे, म्हणजे त्यांनी जर काही तपशील विचारले तर सांगता आलं पाहिजे.” – विश्राम काका.
निशांतने तत्परतेने फोल्डर विश्रामकाकांच्या हातात दिलं. म्हणाला, “फोल्डर वाचण्या पेक्षा मला विचारा. मला सर्व तोंड पाठ आहे.”
“ठीक आहे. तसंच करतो.” – विश्राम
“हॅलो, साने बोलता आहात का?” – विश्राम काका.
“हो मीच साने, आपण कोण, काय काम आहे?”
“मी विश्राम गोखले, सातारा. मला तुमच्या सांगलीचे जयंतीलाल जव्हेरी यांनी तुमचा नंबर दिला. माझ तुमच्याकडे थोडं काम होतं.” – विश्रामकाका.
“बोला.” – साने.
मग विश्रामकाकांनी हरीपंत साने आणि रेवती यांच्याबद्दल सांगितलं. म्हणाले “दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, पण आम्हाला आत्ता इतक्यातच कळलं. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित व्हावा म्हणून हा प्रपंच.” – विश्राम काका.
साने थोडा वेळ विचार करत होते. म्हणाले “काय नाव म्हणाले तुम्ही? हरीपंत आणि रेवती. चिपळूणहून सांगलीला आले म्हणता, साधारण दीडशे वर्षा पूर्वी, बरोबर ना?” – साने.
“हो, माहिती आहे का तुम्हाला?” विश्राम काका.
“नाही, पण आमच्याकडे साने कुलवृत्तांत आहे, त्यात बघतो आणि काही मिळालं तर सांगतो. तुमचा फोन नंबर द्या” – साने.
विश्राम काकांनी त्यांचा फोन नंबर दिला. आता सान्यांचा फोन येई पर्यन्त काहीच करता येण्या सारखं नव्हतं. मग थोडा वेळ गप्पा टप्पा झाल्या, मग निशांतला आणि संध्याला, बरोबर घेऊन प्रांजल जरा फेरफटका मारायला गेली. दुकान बंद झाल्यावर अनिल, विनय आणि अनिलची बायको पण आले. जेवण आटोपल्यावर सगळे हॉल मधे येऊन बसले. साध्या गप्पा सुरू होत्या, तेंव्हा सान्यांचा फोन आला.
“विश्रामपंत शोध लागला हो. कुलवृत्तांतात स्पष्ट उल्लेख आहे. त्यांच्या पुढच्या वंशाचा पण उल्लेख आहे. आता जे हयात आहेत त्यांचं नाव अक्षय साने आहे. आता तो कुठे आहे हे माहीत नाही. मी तुम्हाला कुलवृत्तांतच्या ऑफिस चा पत्ता पाठवतो आहे, सध्या ते कार्यालय पुण्याला आहे. तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की हे अक्षय साने सध्या कुठे आहे म्हणून.” – साने म्हणाले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com