तोतया वारसदार
पात्र रचना
बबन सारंग वकिलांचा चपराशी.
सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र.
चंदू सुभाष चा एक फालतू मित्र.
भाग २९
भाग २८ वरून पुढे वाचा....
सुभाष धारमपेठ कॉफी हाऊस समोर उभा होता. निश्चितच कोणाची तरी वाट पाहत होता. आतापर्यन्त त्यांच्या चार सिगरेटी फुंकून झाल्या होत्या, पण चंदू काही आला नाही. तो खूप वैतागला होता. ठरलेली वेळ पाळत नाही म्हणजे काय? पण काम त्याचं होतं त्यामुळे चंदू वर चिडून काही उपयोग नव्हता. त्याच्या जवळ वाट पाहण्या व्यतिरिक्त काही उपाय नव्हता. सुभाष काही स्मोकर नव्हता, पण वेळ घालवण्या साठी तो सिगरेट प्यायला. पण सवय नसल्याने चार सिगरेटी मुळे त्याचं तोंड कडू कडू झालं होतं. सहा वाजताची वेळ ठरली होती आणि आत्ता सात वाजले होते, उशीर झाला होता. घरी पोचायला एक तास लागणार होता. या सर्व विचाराने तो जास्तच चिडचिडा झाला. पण सुभाषचं कामच असं होतं की चंदूला भेटल्याशिवाय भागलं नसतं. वाट पाहाण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. पण शेवटी चंदू येतांना दिसला आणि त्याचा जीव भांड्यात पडला..
“काय चंदू शेट इतका उशीर, मी तासभर तुमची वाट पाहतो आहे. कुठे अडकला होता तुम्ही?” – सुभाष.
“काय गोखले साहेब, एकदम शेट म्हणताय. तुमचं नेहमीचं चंद्या म्हणा की. तेच ठीक आहे.” – चंदू.
“असं कसं, चंद्या कसं म्हणणार? मोठा माणूस झाला आहेस बाबा तू. तास तास भर वाट पाहावी लागते आम्हाला. मंत्री मंडळात घेतलं की काय तुम्हाला?” – सुभाष.
“काय गोखले साहेब, मजाक करता गरीबाची. अहो, त्या रंगनाथाला पोलिस स्टेशन मधे बोलावलं होतं. एका चोरीच्या चौकशी साठी, त्याने माझं नाव घेतलं मग मला पण बोलावलं, म्हणून उशीर झाला.” चंदू.
“आता नवीन काय घोळ घालून ठेवला आहे तुम्ही लोकांनी?” – सुभाष
“मी नाही, तो रंगनाथ, एका चोरी बद्दल पोलिस त्याची चौकशी करत होते. त्याने पोलिसांना सांगीतलं की चोरी बद्दल त्याला काहीच माहिती नाही. चोरीच्या वेळेस तो माझ्याबरोबर होता, म्हणून पोलिसांनी मला बोलावून घेतलं होतं.” – चंदू.
“मग? काय झालं?” – सुभाष.
“मग काय, मी म्हंटलं की हो तो आणि मी दारू पित बसलो होतो म्हणून. मग थोडी अजून चौकशी करून पोलिसांनी आम्हाला जाऊ दिलं. रंगनाथ घरी गेला आणि मी इकडे आलो. आता तुम्हीच सांगा माझा काही इलाज होता का?” – चंदू.
“बरं पण आता जर सगळं निपटलं असेल, तर माझं एक काम होतं तुझ्याकडे.” -सुभाष
“बोला न साहेब. काय करू मी?” – चंदू.
“मला एक सर्टिफिकेट बनवायचं आहे. बनेल?” – सुभाष.
“खोटं सर्टिफिकेट?” – चंदू.
“खरं हवं असतं तर तुझ्याकडे कशाला आलो असतो?” – सुभाष.
“साहेब, तुम्ही पण?” – चंदू.
“हो रे, मी एका अडचणीत सापडलो आहे आणि जो कागद माझ्या जवळ आहे त्याने काम होत नाहीये म्हणून. तुला जमेल का हे? तुझ्या बऱ्याच ओळखी आहेत म्हणून विचारतो आहे.” -सुभाष.
“काम नक्की काय आहे हे कळल्या शिवाय कसं सांगू?” – चंदू.
“तुला माहीत नाहीये, पण आम्ही माझ्या वयाच्या ९ वर्षांपर्यंत बांगला देशात होतो. तिथल्या शाळेत मी जात होतो. तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती म्हणून आम्ही हिंदुस्थानात आलो. त्यावेळेस तिथल्या शाळेने माझं जे लिविंग सर्टिफिकेट दिलं होतं, त्यावर माझं नाव “सुभाष आश्विन गोखले” असं लिहिलं आहे. ते चुकीचं आहे. ते “सुभाष अविनाश गोखले” असं पाहिजे. आता मी बांगला देशात जाऊन हे बदलून घेणं केवळ अशक्य आहे. तू मला अगदी हुबेहूब असं सर्टिफिकेट बनवून देऊ शकतो का, हेच विचारायला तुला इथे बोलावलं.” – सुभाष.
“माझा एक मित्र आहे तो अशी कामं करतो. म्हणजे तो स्वत: करत नाही, कोणाकडून तरी करवून घेतो. पण तो मुंबईला असतो आणि त्याला भेटायचं असेल तर मुंबईला जावं लागेल.” – चंदू.
त्याचा काही कॉनटॅक्ट नंबर नाहीये का?” – सुभाष.
“आहे, पण मला माहीत नाही. कधी जरूरच पडली नाही.” – चंदू.
“मग? माझं काम तर अर्जंट आहे. पुढची कामं या चुकीच्या सर्टिफिकेट मुळे खोळंबली आहेत.” -सुभाष.
“मला मुंबईला जावं लागेल. तुम्ही ते सर्टिफिकेट द्या, काय ठेवायचं आणि काय बदलायचं ते नीट सांगा. मी मुंबईला जाऊन ते काम करून येतो.” – चंदू.
“साधारण किती खर्च येईल?” – सुभाष.
“नक्की सांगता यायचं, पण माझा अंदाज ५००० चा आहे.” – चंदू.
“इतके? हे तर खूपच होतात. साधं सर्टिफिकेट तर बनवायचं आहे.” – सुभाष.
“गोखले साहेब, अश्या कामांमधे खर्च होतोच. बघा, माझा मुंबईला जाण्या येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, त्या माझ्या मित्राला द्यावे लागणार. हुबेहूब डिझाइनचं सर्टिफिकेट बनवावं लागणार, सर्टिफिकेट वरची भाषा बंगाली आहे. बंगाली मधलं हस्ताक्षर हुबेहूब काढणारा पैसे घेईल, कदाचित जास्त पण लागू शकतील, पण तुम्ही मला आत्ता ५ द्या बाकी हिशोब मी आल्या नंतर करू.” – चंदू.
“ठीक आहे. पण काम १०० टक्के झालं पाहिजे आणि ते सुद्धा ओरिजिनल सर्टिफिकेट वाटलं पाहिजे.” – सुभाष.
“त्यांची चिंता करू नका. हम कच्चा काम नहीं करते. आणि साहेब हे तुम्हालाही माहीत आहे.” – चंदूने तेवढ्यात आपली प्रौढी दाखवली.
“ठीक आहे. ऊद्या संध्याकाळी साडे सहा वाजता भेट, मी माझं सर्टिफिकेट घेऊन येतो. पण तू वेळेवर ये. मला वाट बघत थांबायला लावू नकोस.” – सुभाष.
“बिलकुल वेळेवर येतो. साहेब पैसे आणायला विसरू नका.” – चंदू
“नाही विसरणार. पण मी जे देणार आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते गहाळ होणार नाही यांची काळजी घे.” – सुभाष
“चिंता करू नका. मी सगळं व्यवस्थित करतो.” – चंदू.
दुसऱ्या दिवशी सुभाषने चंदूला पैसे आणि सर्टिफिकेट दिलं.
“किती दिवस लागतील?” – सुभाष.
“माझ्या अंदाजा प्रमाणे १५ दिवस तरी लागतील.” – चंदू
“ओके.” – सुभाष.
हे संभाषण होऊन १५ दिवस उलटून गेले. सुभाष चंदूच्या निरोपांची वाट पाहत होता. अजून दोन तीन दिवस गेल्यावर तो जरा अस्वस्थ झाला. कदाचित एक दोन दिवस जास्त लागले असतील असा विचार करून त्याने आपल्याच मनाला समजावलं. या दरम्यान बबनचे चार फोन येऊन गेले पण त्याने फोन उचललाच नाही. एक दोनदा आपल्या सहकाऱ्याला सांगून खूप बिझी असल्याचं सांगीतलं. शेवटी एक दिवस त्याला त्याला चंदूचा फोन आला. संध्याकाळी ती दोघं कॉफी हाऊसला भेटले.
सुभाष अधीर झाला होता. काय झालं मुंबईला? एवढा वेळ लागला. काम झालं की नाही?” – सुभाष.
“सांगतो सर्व सांगतो.” चंदू म्हणाला. “साहेब, तुमचं काम झालंय, पण अजून एक
आठवडा लागेल. सर्टिफिकेट कलकत्त्या ला गेलं आहे.” – चंदू.
“का? अरे तू तर म्हणाला होतास की मुंबईलाच होऊन जाईल म्हणून. मग आता मध्येच कलकत्ता कुठून आलं?” – सुभाष.
“सर्टिफिकेटचा कागद आणि टाइप सेटिंग मुंबईला मिळालं नाही. २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आजकाल सर्व टेबल टॉप ऑफसेट प्रिंटिंग होतं. हा कागद इकडे कोणीच वापरत नाही, आणि हा २० वर्षांपूर्वीचा बंगाली टाइप आहे, म्हणून कलकत्ता.” – चंदू.
“अरे बापरे, आणि तिथेही मिळालं नाही तर? माझं ओरिजिनल सुद्धा तू पाठवून दिल? आता जर काही झालं नाही तर मी माझं ओरिजनल पण गमाऊन बसलो. हे भगवान!- आता काय करायचं?” – सुभाष
गोखले साहेब, काळजी करू नका. मी आहे ना. तुम्हाला आठ दिवसांत नवीन सर्टिफिकेट मिळेल बघा.” – चंदू.
“अरे पण माझं पुढचं प्लॅनिंग गडबडलं ना, त्याचं काय? आता आठ दिवस स्वस्थ बसण्या खेरीज माझ्या जवळ दूसरा काही उपाय नाही.” – सुभाष.
“कशाचं प्लॅनिंग? काही मोठा हात मारण्याचा विचार आहे का? मला घ्या मदतीला, माझ्या सारखा माणूस अडचणीच्या वेळेला उपयोगी असतो.” – चंदू.
“काय बोलतो आहेस चंदू तू? अरे बाबा मी त्यातला नाही हे तुलाही चांगलं माहीत आहे. यावेळेस माझी खरंच अडचण झाली म्हणून तुला सांगीतलं. बांग्लादेश चा सवाल होता म्हणून, नाही त्तर मी त्या शाळे मधे स्वत: गेलो असतो.” सुभाष म्हणाला. त्याच वेळी त्याने मनाशी खूणगाठ बांधली की, काय वाटेल ते झालं तरी चंदूची पुन्हा मदत घ्यायची नाही.
चंदू आठ दिवस म्हणाला होता तरी १० – १२ दिवस उलटून गेले होते तरी सुभाषचं सर्टिफिकेट काही आलं नाही. वरतून बबनचे फोन वर फोन येत होते. शेवटी त्याने फोन घेतला आणि खूप बिझी असल्याचं सांगून आपण परवा भेटू म्हणून सांगीतलं.
दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी एक रजिस्टरर्ड पत्र आलं. त्यांच्या बायकोने ते घेतलं. संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर त्याने तो लिफाफा उघडला आणि सुभाषचा मूड एकदम बदलला. त्यात त्याचं सर्टिफिकेट होतं.
दूसऱ्या दिवशी चंदूचा फोन आला. “सर्टिफिकेट मिळालं का? बरोबर आहे का?”
“हो मिळालं, आणि एकदम परफेक्ट आहे.” – सुभाष.
“साहेब, २००० जास्त लागले, मधे कलकत्ता आलं ना म्हणून. तेवढे आज देता का? मला पाठवायचे आहेत. उद्या एक जण मुंबईला जातो आहे त्याच्या बरोबर पाठवणं
जरुरीचं आहे.” – चंदू.
“अरे आत्ता नाहीयेत माझ्या जवळ. उद्या ऑफिस मधे ये तुला देतो.” – सुभाष
“ठीक आहे उद्या १२ वाजे पर्यन्त येतो.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com