पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ३

प्रिय सोना..
तुझ्या दवाखान्याचे गाव लांब होते तु त्या गावात थोड्याच अवधीत चांगले नाव कमवले होतेस तुझा प्रामाणिक स्वभाव..पैशाची हाव नसणे शिवाय अचूक निदान यामुळे लोकांचा तुझ्यावर विश्वास होता त्या काळात तू त्या गावात एकमेव डॉक्टर होतास
 तुझ्या शब्दाला गावात खूप मान होता
ऊस आणि दुधाच्या व्यवसायात अग्रगण्य असलेले हे गाव सधन होते 
तू मात्र कोणाकडून कधी एखादी भाजीची पेंडी सुद्धा फुकट आणत नव्हतास तुझ्या दवाखान्याच्या मालकांच्या म्हशी होत्या ते रात्री ताजे काढलेले सकस दूध मात्र तू घेऊन यायचा ते सुद्धा पैसे देऊन ..तुझी निरलस वृत्ती, सेवाभाव, गोड नम्र बोलणे यामुळे गावातील असंख्य माणसे तुझ्यावर खुश होती
 आजही त्या गावात तुझे नाव काढले तरी अनेक लोक प्रेमाने आणि अदबीने बोलतात त्या गावात पावसाळ्यात पूर येत असे कोल्हापूरचा त्यांचा संपर्क तुटत असेत्या काळात सुद्धा स्कूटर अलीकडे लावून गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन तू लोकांना सेवा दिली होतीस
आता टीव्ही वर पुराच्या बातम्या पाहताना ते नुसते  प्रसंग जरी आठवले तरी आपण हे कसे पार पाडले..याचे तुलाच आश्चर्य वाटत असे
अनेक वेळेस गावात धार्मिक कार्यक्रमात तुला आरती साठी बोलावत त्यासोबत मलाही मान मिळत असे 
तुझ्या दवाखान्याच्या घरमालकानी नवीन शेवया मशीन घेतले तेव्हा उद्घाटन माझ्या हस्ते केले होतेतुझ्यामुळे मला सगळीकडे मान मिळत होता त्या गावातले ते पहिले शेवया मशीन होते नंतर कित्येक वर्षे मी उद्घाटन केल्याने शेवयाच्या धंद्यात बरकत आली असे सगळे बोलून दाखवत तुझ्यामुळे मला चांगलाच भाव मिळाला होता
दर वर्षी आपण श्रावण महिन्यात गावच्या देवाला नारळ वाहून..देवीला साडी चोळी करीत असू.त्या वेळेस शहरातून डॉक्टर ची बायको आली म्हणून सगळे गाव मला भेटायला यायचे 
अक्षरशः पोत अर्ध पोत तांदुळ माझ्या ओटीत मिळायचे
 पस्तीस वर्षांनी जेव्हा तो दवाखाना बंद करून तू शहरात दवाखाना काढला त्यानंतर सुद्धा आपण दर वर्षी त्या गावात जात असू तेव्हा तुझे सगळे पेशंट तुला आवर्जून भेटून जायचे .. काहीकाही तर चक्क पाया सुद्धा पडायचे. माझ्यासाठी ही खूप "अभिमानाची" गोष्ट होती इतका चांगला नवरा मिळाला म्हणून मी देवाचे लाख लाख आभार मानत असे
तुझ्या गावाचे काही तुझे पेशंट आपल्याशी घरच्या सारखे संबंध ठेवून होते वेळोवेळी त्यांची घरी चक्कर असायची गप्पा असायच्या तिथला दवाखाना बंद झाला तरी ते सण असेल तेव्हा गोडधोड घेऊन आपल्या घरी येत घरचा गुळ, मका, ताजा खरवसआणि काही इतर गोष्टी आपल्यासाठी प्रेमाने आणत
त्या गावात गुऱ्हाळ घरे होती तिथले तुझे पेशंट तुझ्यासाठी अधून मधून ऊसाच्या रसाची किटली पाठवत तो ताजा रस माझ्या वडिलांना खूप आवडत असे 
तू दवाखान्यातून येताना त्यांना पाहिजे तेवढा रस देऊन येत असे त्यांना आले लिंबू घालून तो रस प्यायला आवडत असे 
त्यांच्या मृत्यू पर्यंत हा तुझा क्रम चालून राहिला
होता
आपल्याकडे गुळाची काकवी पण बाटल्या बाटल्या भरून येत असत
आपण त्यातील काही आपल्या मित्र मंडळींना वाटत असू
खुप दिवस राहिलेली काकवी औषध म्हणून काविळीत उपयोगी येत असे
ती सुद्धा आपल्या घरी असे
बरीच माणसे ती मागून घेऊन जात
नंतर मात्र हळूहळू ही गुऱ्हाळ घरे बंद होऊ लागली आणि आपल्या घरी रस , काकवी यायचेच बंद झाले
तुझे काही पेशंट अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुझ्या जवळचे होते त्यांचे आपले कायमच घरगुती संबंध राहिले होते
 तुझा एक गरीब पेशंट आपल्याकडे बागकाम करायला येत असे तो कामाला तुझ्या शब्दात "एक नंबर" होता त्याचे नाव कुंडलिक होते
 तो बसने रविवारी सकाळी आपल्या घरी येत असे तू त्याला बस स्टॉप वरून घरी घेऊन येत असे तो आला कि चहा नाश्ता घेऊन थेट कामाला भिडत असे दिवसभर बागेतल्या कामाचा फडशा पाडत असे
 त्याचा कामाचा उरक दांडगा होता
 खेड्यातला असल्याने अंगात रग होतीचार माणसांचे काम तो तीन चार तासात एका फटक्यात पार पाडत असे 
तुला त्याच्या मागे उभे राहून काम करवून घ्यायला लागत असे पण तुला त्याचे काम खूप आवडत असे
 दुपारी आपल्याकडेच तो आपल्या सोबत जेवत असे शरीराने बारीक असला तरी त्याचा आहार भक्कम असे तो कामाला येणार असेल तेव्हा मी जरा जास्तीचा स्वयंपाक करीत असे
 मी केलेला स्वयंपाक त्याला फार आवडत असे अगदी मन लावून ओरपून तो जेवत असे "वहिनी हे लई ब्येस झालेय" अशी प्रत्येक पदार्थाची तारीफ सुद्धा करीत असे..त्याचे लग्न झालेले नव्हते
 घरी लग्न झालेल्या भावांच्या बायका त्याला नीट वागवत नसत जेवायला वेळच्या वेळी देत नसत त्यामुळे आपल्या घरचे पदार्थ , माझे त्याच्याशी आपुलकीने वागणे त्याला खूप आवडत असे
 मी त्याच्याशी अगदी प्रेमाने वागत असे
 आपल्या घरी त्याला सकाळी दुपारी चहा सोबत
खारी ,बिस्किटे ,टोस्ट ,चिवडा असे देत असे तो अतिशय खुश होत असे 
दुपारी कामानंतर  जेवण झाले कि तो मी घातलेल्या सतरंजीवर  गरगरीत झोप घेत असे
 दिवसभर तू गप्पा करीत त्याच्याशी भरपूर मस्करी करीत असे तो स्वभावाने भोळा असल्याने त्याला तुझी चेष्टा समजत नसे आपण दोघे खूप हसत असू 
मग मीच तुला दटावत असे आता चेष्टा पुरे म्हणून 
संध्याकाळी तू त्याला बस स्टॉप वर पोचवून येत असे त्याचे आपले लागेबांधे अनेक वर्षे होते
 त्याचा माझ्यावर फार जीव होता 
मला घरचे ,मनातले ,असे सगळे तो जेवताना ,चहा घेताना सांगत असे त्यामुळे "कुंडल्या तुझा खास दोस्त आहे असे "तू गमतीने मला चिडवत असे
  त्याने त्याच्या कामातून चाळीस हजार रुपये साठवले आहेत असे तो मला सांगत असे ते मी बँकेत ठेवले आहेत ,ते सगळे पैसे वहिनी  मी तुमच्या नावावर  करणार आहे असे तो म्हणायचा
 "अरे तुझ्या वाहिनीला काय कमी आहे बँकेत तिला चिक्कार पगार आहे" 😀असे तू म्हणाला तरी तो म्हणायचा असू दे मी पैसे त्यांच्याच नावे करणार 
एक निरागस निष्पाप भोळा जीव माझ्यावर इतका "जीव" लावत असे काही वर्षांनी त्याचे निधन झाले तेव्हा आपण दोघे खूप दुःखी झालो होतो
 मला तर किती तरी दिवस स्वयंपाक करताना त्याची आठवण येत असे त्यानंतर बागेतली कामे करायला तसा माणूस मिळालाच नाही बागेत स्वतः काम करताना तुझ्या तोंडात कायम त्याचे नाव यायचे 
तुझा स्वभाव "अजातशत्रू "होता पस्तीस वर्ष त्या गावात काम करून सुद्धा तू कधीच कोणत्या राजकारणात पडला नाहीस त्यामुळे काही वेळा काही भांडणे मिटवण्यासाठी तुझा सल्ला घेत असत
 गावात बरेच लोकांनी तुला घर घेण्याचा आग्रह केला होता पण ज्या गावी व्यवसाय करायचा तिथे घर घ्यायचे नाही हे तुझे पक्के होते कदाचित त्यामुळेच तुला लोक आदराने वागवत
 गावातल्या दोन तीन कामगार बायका दर वर्षी तुला राखी बांधत तू पण त्यांना ओवाळणी घालत असे
 तुझा तिथला दवाखाना बंद झाल्यावर तुझे घरमालक खूप आजारी पडले तेव्हा ते काहीच खायला प्यायला तयार नव्हते मग तिकडून फोन आला तू भेटून जा म्हणून आपण दोघेही गेलो होतो तू त्यांना भेटून , पांडू मामा असे करायचे नाही खायला पाहिजे “असे सांगितल्यावर लगेच तुम्ही म्हणता म्हणून मी खाईन असे म्हणून त्यांचा चार पाच दिवसाचा उपास त्यांनी तुझ्या हातून दही भात खाऊन सोडला आपल्या घरचें सुतारकाम ,गवंडी काम ,इलेक्ट्रिक काम , असो वा इतर कोणत्याही कामासाठी तुझे पेशंट येत आपल्याकडे येत असत काम करून आपला शहरी पाहुणचार घेऊन जात आणि कधीही तिकडे गेले कि आपल्याला नावाजत 
तिकडला दवाखाना बंद केला तरीही कित्येक पेशंट औषधासाठी आपल्या घरी यायचे त्यांना तुझ्या उपचाराशिवाय बरे वाटायचे नाही कित्येकांना नुसते तुझ्याशी बोलले तरी बरे वाटायचे जिथे बोलून बरे वाटते तिथे औषध द्यायचे नाही जिथे गोळीने बरे वाटते तिथे हाय डोस द्यायचा नाही असे तुझे तत्व होते इंजेक्शन तर तू फार क्वचित द्यायचा