प्रिय सोना..
येथे माझ्या लेखनाच्या निस्सीम चाहत्या असणाऱ्या दोन मैत्रिणी इथे मला भेटल्या त्यांनी मला खूप जीव लावला एकदा माझा वाढदिवस त्यांनी बाहेरच कोल्ड्रिंक हौस मध्ये केक आणून आपल्याला बोलावून साजरा केला एक मैत्रीण दूरच्या गावात रहायला होती तिने आपल्याला एकदा जेवायला बोलावले घरची माणसे साधी सज्जन होती मी येणार म्हणून तिने चक्क घरापासून रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या होत्या खुप प्रेमाने आतिथ्य केले तिचा माझा संपर्क खूप टिकला तिच्या लग्नाचे केळवण आपण तिथे नुकत्याच निघालेल्या मोठ्या हॉटेलात केले होते ती पुण्यात राहायला गेली तिला मुलगी झाल्यावर तिने मला मुलीवर कविता लिहायला सांगितली होती ती तिला पाठवली तेव्हा खूप खुश झाली ट्रेनिंगला गेले असता तिच्या पुण्याच्या घरी सुद्धा मी दोन दिवस राहून आले कालांतराने हे संबंध संपुष्टात आले..अशीच दुसरी मैत्रीण सांगोल्यात रहायची तिला माझे फार कौतुक दर दोन दिवसांनी मला भेटून जायची घरच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून बोलवायची जेवायला, खायला बोलवायची एका वर्षी माझ्या वाढदिवसाला तिकडून केक घेऊन कोल्हापूरला सुद्धा आली होती पण हे सुद्धा संबंध आता संपले असो प्रत्येकाचा आपल्या जीवनात जितका शेर असतो तितके दिवसच आपण एकत्र असतो इथे सगळी लोक आपल्या मुलगा आणि सून यांच्या विषयी विचारायची मुलगा सुन इकडे का येत नाही असेही विचारायची.. आपण निरुत्तर असायचोआपण आपल्या मुलाला दोन दिवस इकडे येऊन भेटून जा म्हणले पण त्यांना कशाचेच काही नव्हते ना आईचा अभिमान ना ती काम करते त्या भागात जाऊन पाहून यायची उत्सुकता दोन वर्षाच्या तिथल्या वास्तव्यात ते कधीही आले नाहीत दिवस छान चालले होते तरीही आपल्याला आपल्या गावाची आठवण येत होतीच मी बदलीसुद्धा तिकडे मागितली होती आणखी एक नवल घडले म्हणजे कर्मचाऱ्यांनी five days वीक मागितला होता पण बँकेने सेकंड Saturday मंजूर केला आता दुसऱ्या चौथ्या रविवारी सुट्टी असणार होती आपले कोल्हापूरला सुट्टीत जायचे काम आणखीन सोपे झाले दिवस खरोखर खूपच छान चालले होते पण आपल्याला आपल्या घराकडे कधी परतू अशी आस होतीच इथेच आपल्या दोन परदेश प्रवास ट्रिप पार पडल्या होत्या रोज तुझे मामांच्या दुकानात येणे जाणे असेच त्यांना या ट्रिपच्या गोष्टी ऐकायला खुप आवडत आपण दोघे प्रत्येक गोष्ट कशी एन्जॉय करतो याचे त्यांना आणि त्यांच्या घरच्या लोकांस कौतुक होतेच त्यांच्या घरचा कोणताही कार्यक्रम आपल्या शिवाय पुराच होत नसे असे कित्येक लोक आपण इथे जोडले जे आपल्याला अगदी स्वतःच्या घरचे समजत घरच्या सारखे वागवत काही वेळेस कोल्हापूरला गेल्यावर तुला तिकडेच काही काम निघत असे तेव्हा तू सांगोल्यात येऊ शकत नसे पण तुला माझ्या काळजीचे कारण नसे तू नसताना सगळे माझी काळजी तर घेतच शिवाय कशाला एकट्या साठी काय करता असे म्हणून त्या दोन चार दिवसात स्वयंपाक सुद्धा करू देत नसत आज इकडे उद्या आणि कुणाकडे असे माझे जेवण वार लागलेले असत या शेवटच्या काही महिन्यात आपल्या घरमालकांच्या काही घरगुती अडचणी मुळे ती जागा आपल्याला सोडावी लागली एक घर सोडायला लागले की लोक आपल्या पुढे अनेक पर्याय ठेवून आपल्याला सहकार्य करत अशीच नवीन जागा मिळाली जो तिसऱ्या मजल्यावर एक तीन खोल्यांचा फ्लॅट होता आत्तापर्यंत आपण टीव्ही किंवा डायनिंग टेबल घेतले नव्हते कारण आपल्या पूर्वीच्या जागेत सगळे सेट होते आणि आपण पण आपले सामान लिमिटेड ठेवले होते या नव्या फ्लॅट मध्ये काहीच सोय नव्हती कोणी आपल्या घरी आले तर बसायची सोय नव्हती त्यामुळे एक छोटे डायनिंग टेबल चार खुर्च्या एक टीव्ही आपण विकत घेतलापरत नवीन ओळखी, नवीन लोक आपण जोडले..आपल्या वागण्याने त्यांच्याही आपण घरचेच होऊन बसलो इथे रोज सकाळी फिरायला गावाबाहेर जात होतो तिथे आपल्याला एक छान टुमदार घर दिसायचे रोज ठराविक वेळी आपण फिरत असल्याने त्या घरातले लोक त्यांची त्या वेळची दिनचर्याही मी बघत होते एक लेखिका म्हणून मी त्यावर “ते घर” हा लेख लिहिला होता कोणीतरी ते ओळखले आणि त्या घरमालकांस जाऊन सांगितले स्वतःच्या घरावर लेख लिहिला म्हणून त्यांना खुप आनंद झाला जुना पेपर मागवून त्यांनी तो वाचला त्यांना खूप आवडला त्यांनी मुद्दाम आपल्या मुख्य घरात आपल्या दोघांना जेवायचे आमंत्रण दिले आपल्या कुलदैवताचे दर्शन घडवले त्यांच्या घरी सुद्धा माझ्या लेखनाचे आणि आपले खूप कौतुक झाले ती या गावातील एक खूप मोठी आसामी होती पण या प्रसंगाने ते सुद्धा आपल्याला घरचे समजू लागले असेच आपण कोल्हापूर सांगोला रस्त्याने जाताना वाटेत मिरजेत वेश्यांची वस्ती लागत असे वेगवेगळ्या वेळेस आपण तिथून गेल्याने त्यांचा दिनक्रम सुद्धा मी बघितला होता त्यावर मी “ती वस्ती” लेख लिहिला होता तो लेख पण सर्वांना खूप आवडला एकदा गावात दंगल झाली होती तेही मी शब्दात मांडले होते तसेच एकदा “श्रद्धा आणि अंधश्रद्धा”या विषयावर लिहिलेला लेख एका व्यक्तींनी जी अत्यंत तुसडी आहे असे लोकांचे मत होते…त्यांनी मला समोर येऊन माझे खास कौतुक केले होते वर्तमान पत्र कॉलम साठी लिहायच म्हणून साहित्य तयार ठेवायला लागायचे या कारणाने अनेक विषयावर अनेक प्रकारचे लेखन माझ्या हातून घडले या सगळ्याचे तुला प्रचंड कौतुक होते अगदी माझ्या घेतलेल्या मुलाखती पासून माझा प्रत्येक छापून आलेला लेख, कविता याची कात्रणे कापून तू त्याची एक फाईल बनवली होतीस ज्या घरात माझी बँक होती त्यांच्या घर मालकांच्या मुलीचा माझ्यावर फार जीव होता कधी माझा डबा घेऊन मी वर जेवायला जायचे तर कधी आमच्या शिपाया कडून ती मला चहाला आमंत्रण करायची ती पुण्यात शिकलेली आणि इंग्रजी साहित्य वाचणारी फॅशनेबल आणि डीसेंट वागणारी मुलगी होती त्या छोट्या गावात तिच्यासारखी मुलगी नव्हती त्यामुळे ती आपल्या विश्वात रहायची माझ्या रूपाने तिला एक सुशिक्षित मैत्रीण मिळाली माझ्या हातचे पदार्थ तिला खुप आवडत तिला नवे नवे पदार्थ करायची आवड होती कधी कधी ती मला बोलावून माझी मदत घ्यायची मग तिच्या घरचे आणि आपण दोघे त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचोकाही दिवसांनी माझ्या साहेबांची प्रमोशन वर बदली होऊन त्यांनी सांगोला सोडले प्रसंग आनंदाचा होता पण इतक्या मन मीळावू व्यक्तीची साथ संपली म्हणून वाईट मात्र वाटले नवीन आलेले साहेब तरुण होते तशात माझ्या बँकेतले दोन तरुण क्लार्क प्रमोशन मिळून निघून गेले नवीन स्टाफ लवकर मिळेना मला ऑफिसर आणि कॅशियर अशी दोन्ही काम पार पाडावी लागत होती नवीन साहेबांशी तितके जुळत नव्हते किंबहुना त्यांना जुळवून घ्यायची इच्छा नव्हती तुझ्या धीर देण्याने तरी मी आनंदाने हे सर्व पार पाडत होते अखेर एक दिवस माझी कोल्हापूर बदलीची ऑर्डर आली माझा सांगोला ऋणानुबंध संपला ऑर्डर आली तरी मला कोल्हापूरला सोडायला नवीन साहेबांची तयारी नव्हती तेव्हाही माझी खूप चीड चिड व्हायची पण तू शांत होतासआता ऑर्डर तर आली आहे हत्ती गेलाय शेपूट राहिले आहे हे ही दिवस जातील असे म्हणून मला शांत करायचा अनेक परिचित लोकांकडून निरोप समारंभ, भेटी, जेवणे सुरू होती लोकांना आणि आपल्यालाही वाईट वाटत होते माझ्या मैत्रिणींच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते माझाही अश्रूंचा बांध थोपवून कसे तरी त्यांना मी शांत करीत होते तिथल्या तुझ्या काही पेशंटनी सांगितले की आम्ही आता कोल्हापूरला औषधाला येणार..तिकडे बदली माझी झाली होती पण तू मात्र सर्वांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होतेस नवीन घेतलेले सगळे सामान सुमान इकडे तिकडे देऊन टाकून सोबत लोकांचे प्रेम आणि असंख्य आठवणी घेऊन आपण कोल्हापूरकडे मार्गस्थ झालो