प्रिय सोना..
त्या काळात आपल्या आयुष्यात दोन तीन लक्षात राहण्या सारख्या गोष्टी घडल्या होत्या तुझ्या मावस भावाची पत्नी आजारी होती त्यांच कुलदैवत जोतिबा होतजोतिबाचे दर्शन घेण्याकरीता त्यांच्या दोन मुली आणि तुझा भाऊ अशी त्यांची फॅमिली घेऊन कोल्हापूरला आल्या त्यांच्यासोबत दत्तू अण्णा म्हणून त्यांचे गुरु आले होते त्यांचे वय ८५ होते अत्यंत तेजस्वी, पण सरळ साधे व्यक्तिमत्व असणारे दत्तू अण्णा केवळ भाऊजींच्या आग्रहामुळे आपल्या घरी आले होते अन्यथा ते आपली कुटी सोडून कोठे जात नसत अगदी भाऊजीकडे सुद्धा ते कधी राहिले नव्हते ते आपल्याकडे राहायला तयार झाले होते आपण त्यांची चांगली व्यवस्था ठेवली होती चवदार साधे बिन मसाल्याचे जेवण मी त्यांच्या साठी रांधले होते मी संध्याकाळी केलेली मूग डाळ खिचडी, पापड, कढी, घरचे लिंबू लोणचे हा बेत त्यांना खूप पसंत पडला त्याची भरपूर तारीफ करून त्यांनी आणखी एकदा मागून घेऊन खाल्ला वहिनी म्हणाल्या दत्तू आण्णा परान्न घेत नाहीत तरी ते तुमच्याकडे जेवले जेवणाची प्रशंसा करून परत मागून घेतलेखुप” नशिबवान” आहात तुम्ही त्यांना जाताना आपण नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले फार अभिमानाचा प्रसंग होता तो नंतर आपण नेहेमीच दत्तू अण्णांचे नाव काढत होतो दुसरा प्रसंग तर फारच वैशिष्ट पूर्ण होता आपल्या शेजाऱ्यांची लांब राहणारी मुलगी बाळंतपण साठी कोल्हापूरला आली होती तिच्या प्रसूतीला अजून महिना होता अचानक एका रात्री तिच्या पोटात दुखू लागले तिला दवाखान्यात नेले एक डॉक्टर आणि शेजारी अशा दोन्ही नात्यातून आपण पण आपली गाडी घेऊन त्यांच्या मागोमाग दवाखान्यात पोचलो मुदत पूर्व प्रसूतीमुळे बाळाची अवस्था गंभीर होती त्याला ताबडतोब इन्क्यूबेटर मधे ठेवायला लागणार होते ती सोय या दवाखान्यात नव्हती दुसरा दवाखाना दूर होता मुलाचे वडील लांब परगावी होते आजी,आजोबा घाबरून गेले होते दुसरे पुरुष माणूस कोण जवळ नव्हते बाळाची आई या प्रसंगात हीस्टेरिक झाली होती कोणी त्या बाळाला हात लावायला तयार नव्हते परिस्थिती कठीण होती कसे कोण जाणे मी म्हणले.. द्या ते बाळ माझ्याकडे आम्ही घेऊन जातो त्यालातू स्वतः डॉक्टर असल्याने डॉक्टर ते बाळ आपल्याकडे द्यायला तयार झाले डॉक्टरनी गुंडाळून दिलेले ते बाळ मी छातीशी घट्ट धरले त्याच्या हृदयाचे ठोके मला जाणवत होते बाहेर धो धो पाऊस होता आपण त्याला आपल्या गाडीतून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेलो दवाखाना तिसऱ्या मजल्यावर होता बाळाला हातात घेऊन भर पावसात मी तीन मजले चढून वर गेले डॉक्टरांच्या ताब्यात देऊन जेव्हा त्याला इन्क्यूबेटर मधे ठेवले गेले तेव्हा आपल्याला हुश्य झाले लगेच त्याचे रक्त तपासायला लागणार होते तेथील डॉक्टरांनी त्याचे रक्त काढून आपल्याकडे दिले ते घेऊन परत आपण भर पावसात लॅबोरेटरी मधे गेलो तिथला रिपोर्ट घेऊन परत आधीच्या दवाखान्यात गेलो त्या डॉक्टरांना तो रिपोर्ट सुपूर्द करून परत मुलीची प्रसुती झाली तिकडे आलो तू डॉक्टर असल्याने सगळीकडे पटापट कामे होत होती परत येताना परगावी असलेल्या तिच्या नवऱ्याला ही सर्व घडामोड सांगितली तो पण ताबडतोब इकडे यायला निघाला इकडे ती मुलगी हिस्टरिक झाली होती तिला नवऱ्याशी बोलायचे होते त्या काळात फारसे फोन कोणाकडे नव्हते आपल्या कॉलेज मध्ये शिकत असलेल्या मुलाला आपण नुकताच त्याच्या मागणी वरून स्मार्ट फोन घेऊन दिला होता त्यामुळे त्याचा जुना फोन त्याने मला वापरायला दिला होता तो फोन त्या मुलीच्या ताब्यात दिलाती त्या फोन वरून नवऱ्यासोबत बोलली मगच शांत झाली तो आठवडाभर तो फोन तिलाच देऊन टाकला होता त्या वेळी सर्वांनी.. बरे झाले तुम्ही बाळ घेऊन गेलात म्हणून ते वाचले असे म्हणून आपले कौतुक केले पण त्यातला धोका कोणाच्या लक्षात आला नव्हता आपण स्वतःहून जबाबदारीने ते बाळ नेले आई अंबाबाईच्या कृपेनें ते वाचले पण जर यात चुकून काही विपरीत घडले असते तर ही जबाबदारी आपल्यावर आली असती आणि कदाचित आळ आपल्या माथी आला असता पण आईच्या कृपेने सर्व ठीक झाले आईनेच ते बाळ वाचवण्यासाठी मला घेऊन जाण्याची बुद्धी दिली आठ पंधरा दिवसांनी बाळ बाळंतीण सुखरूप घरी आले नवल म्हणजे आता तो मुलगा पंधरा वर्षाचा आहे आत्तापर्यंत फार कमी वेळा त्या मुलाच्या आई वडिलांनी अथवा आजी आजोबांनी हे उपकार स्मरले किरकोळ त्याचा उल्लेख इतकेच ..मी असे म्हणत नाही की हे माझ्यामुळे झाले पण माझ्या अपेक्षा प्रमाणे त्या लोकांनी याची जाण नाही ठेवली ना त्या मुलाला आतापर्यंत ही गोष्ट सांगितली मी कधी चुकून असे बोलून दाखवले की तू म्हणायचानाही स्मरले उपकार तर जाऊ देत आपले काम आपण केले तुझी वृत्ती निरलस होती आपण दोघेही खुप “देवभोळे” नव्हतो किंवा पोथ्या पुराणे वाचणारे नव्हतो पण आपला देवावर आपल्या चांगल्या कर्मा वर विश्वास होता एकदा आपण आपल्या पुतण्याच्या लग्ना साठी पंढरपूर येथे गेलो होतो गेल्या गेल्या संध्याकाळी सीमांत पूजनापूर्वी आपले सगळे नातेवाईक पांडुरंग दर्शनासाठी बाहेर पडले आपल्याला पण आग्रह केला पण गर्दी प्रचंड होती आणि आपल्याला गर्दीत देवदर्शन कधी आवडत नव्हते आपण नंतर येतो असे त्यांना सांगितले आणि नंतर इकडे तिकडे फिरत बसलो गोल चक्कर मारून परत देवळापाशी आलो तेव्हा गर्दी होतीच आपण देवळाजवळ पोचलो आणि पावसाची जोरदार सर आली त्यावेळी लाईनीत उभी माणसं देवळापासून दूर आडोसा शोधायला पांगली आपण मात्र या गडबडीत आडोसा म्हणून देवळात शिरलो त्या वेळी देवळात कोणीच नव्हते आपण पांडुरंगापाशी गेलो तेव्हा आपण दोघे आणि पुजारी इतकीच माणसे देवळात होती आपण निवांत पांडुरंग दर्शन घेतले ही पावसाची अवस्था सात ते आठ मिनिटे टिकली तेवढ्या काळात देवाचा आपला छान संवाद झाला होता पुजारी म्हणाले तुम्ही नशिबवान आहात..इतके निवांत दर्शन कोणालाच मिळत नाही खरेच असे अनुभव नंतर सुद्धा आपल्याला अनेक आले ज्यामुळे आपल्याला समजले की आपण देवाचे खरोखर आवडते आहोत हा प्रसंग जेव्हा आपण कार्यालयात जाऊन नातेवाईकांना सांगितले तेंव्हा त्यांनीही नवल वाटले आम्ही तासनतास लाईनीत उभे होतो आणि तुम्हाला इतके सहज दर्शन मिळाले असेही सगळे म्हणले हा प्रसंग आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिला होता एक लेखक या भूमिकेतून मी त्यावर लेख पण लिहिला जो तेव्हा पेपर मध्ये छापून आला होता आणि वाचक वर्गाला आवडला होता आपल्याला नेहेमीच्या आयुष्यात सुद्धा असे अनुभव आले होते आपण रोज खूप कर्म कांड करणारे नव्हतो आपली मानसपूजा असे देवळाजवळ गेलो की आपण लांबूनच देवाला नमस्कार करीत असू आणि आपल्या चांगल्या कर्मात आपली देवपूजा करीत असू पण कधीतरी आपल्याला देवळात आत जायची इच्छा होत असे आणि खरोखर तो दिवस कोणताही असो वार कोणताही असो वेळ कोणतीही असो देवळात गर्दी अगदी कमी असे आपले दर्शन अगदी निवांत होत असे