प्रिय सोना
बारावीचा निकाल लागल्यावर..आपल्या मुलाच्या बोर्ड मेरिट मुळे त्याला पुण्यात त्याच्या आवडीच्या कॉलेज मध्ये स्कॉलरशिप सहित ऍडमिशन मिळाली
ती प्रोसेस थोडी किचकट असल्यांने आपण दोघेही गाडी आणि त्याचे सामान घेऊन आठ दहा दिवस पुण्यात राहिलो होतो
त्याला व्यवस्थित रूम पाहून देऊन मगच आपण परत आलो होतो
आता आपण दोघे आणि आपले काम असे रूटीन सुरू झाले
घरात जिमी होताच आपल्या सोबत ..
मुलगा पुण्यातून सुट्टीला अधून मधुन घरी आला की जिमी फार आनंदी होत असे
त्याचा आपल्या मुलावर खूप जीव होता
त्यानंतर पुण्यात शिकत असताना चार वर्षे मुलाचा दर रविवारी संध्याकाळी आठवणीने तुला फोन येत असे
आठवडा भर जे जे घडले ते तुला तो सांगत असे
त्या काळात काहीही झाले तरी दोघांचा सात वाजताचा फोन चुकवला नव्हता
माझ्या स्वयंपाकातील पदार्थांची मुलाला खूप गोडी होती आजपर्यंत त्याने माझ्या आईच्या आणि माझ्या शिवाय कोणाच्या हातचे खाल्ले नव्हते
अगदी बारावीच्या काळात सुद्धा तो बाहेर कधी खायचा नाही
त्याच्या डब्यासाठी मी अनेक पदार्थ घरी करून ठेवत असे
तो खाण्यात खूप चोखंदळ होता
मी सुद्धा एखाद्या पदार्थात एखादी गोष्ट कमी जास्त घातली तर त्याच्या लक्षात येत असे
यामुळे त्याला पुण्यात गेल्यावर जी मेस लावली होती ते मेस चे खाणे आवडत नसे
दर दोन तीन महिन्यात तो मेस बदलत असे
शिवाय जेव्हा सहा महिन्यातून सेमीस्टर परीक्षा असे…
तेव्हा तो दोन वेळ एकदा अभ्यासा साठी आणि आणि परीक्षा झाली की सुट्टी साठी तीन आठवडे घरी येत असे
अशा वेळी घरी आल्यावर तो पूर्ण कॅलेंडर वर प्रत्येक दिवशी काय मेन्यू करायचा हे लिहून ठेवत असे.
आणि मी तसे तसे पदार्थ करीत असे
त्याच्या लग्नानंतर मात्र याच माझ्या पदार्थांची त्याला तितकीशी चव राहिली नव्हती.. याचे कारण मला कधीच नाही समजले
मुलाने कॉलेज मध्ये सुद्धा टॉप पोझिशन ठेवली होती
त्यामुळे तिथेही त्याला वर्षाला २५००० स्कॉलरशिप मिळत होती
चार वर्षात मुलाची डिग्री पूर्ण झाली
डिस्टिंक्शन मध्ये तो पास झाला
बंगलोर मधे रिसर्च क्षेत्रात
चांगला जॉब पण मिळाला
त्याने स्वतःचे लग्न पण कॉलेजच्या दुसऱ्या वर्षीच ठरवले होते
त्याच्या वर्गातील मुलगी असल्याने शिक्षण झाले की काही काळ नोकरी करून दोन वर्षानंतर लग्न करायचे असे ठरले होते
आपण खऱ्या अर्थाने आता जबाबदारीतून मुक्त झालो होतो
दोन वर्षांनी त्याचे लग्न पण आपण करून दिले
त्याच्या लग्नानंतर काही दिवसांनी का कोण जाणे त्याचे फोन हळूहळू कमी झाले
तो स्वतः थोडा फटकून वागू लागला
तू मात्र जितके शक्य तितके पडते घेऊन त्याची चौकशी करीत होतास
त्याला फोन करीत होतास
आता त्याचा नवा संसार आहे ..
असे म्हणून तू त्याला समजून घेत होतास
त्याचे लग्न ठरताच बँकेतून जास्त कर्ज घेऊन आपण आपल्या घरी त्या जोडीसाठी वरचा अद्ययावत मजला तयार केला होता
तरीही त्याचे इकडे येणे वर्षातून फक्त दोन वेळ असे
आपल्याला त्याची आपला मुलगा म्हणून ओढ होतीच
मग त्याला भेटणे यासाठी अधून मधून आपले पुणे येथे येणे जाणे सुरू झाले
मधल्या काळात वाईट घटना म्हणजे आपल्या जिमीचा मृत्यू झाला
तसा मृत्यू म्हणता येणार नाही कारण
तो आपल्या डोळ्यासमोर मृत पावला नाही
फक्त एका दिवशी तू त्याला फिरायला घेऊन जात असता तो साखळी सोडून पळून गेला
तो थोडा हुड होता
अक्षरशः काही मिनिटाच्या अवधीत तो नाहीसा झाला
किती हुडकल पण सापडला नाही
तो सतरा वर्षाचा असल्याने त्याच्या डोळ्यात दोष होता
पाच सहा दिवस शोधून सुद्धा तो सापडला नाही याचा अर्थ तो कुठेतरी मृत झाला असावा असा अंदाज होता
असे ऐकिवात आले की जातिवंत कुत्रे, वाघ, सिंह मरण आले की लांब जाऊन मरतात म्हणे
जिमी “जातिवंत” होताच खरा
जीमीचा मला फार लळा होता
तो जिवंत असताना मला वाटायचे याला कधी मरण आले तर आपण नाही सहन करू शकणार
मी परमेश्वरा कडे प्रार्थना करत असे की देवा याचे मरण तेवढे मला दाखवू नकोस
माझी इच्छा देवाने पुरी केली होती
जिमीचे प्रत्यक्ष मरण आपल्याला दिसले नाही
जिमी गेल्यावर आपल्याला फार दुःख झाले होते
घरात लॅपटॉप वर त्याचे असंख्य फोटो व्हिडिओ होते
तू त्याच्या फोटोची फ्रेम करून
देवघरात आपल्या दोघांच्या आई वडिलांच्या फोटो सोबत ठेवलीस
तुला त्याची फार सवय असल्याने तू बराच काळ अस्वस्थ होतास
आपण जीमीच्या नावे दर वर्षी पांजरपोळ येथे देणगी देणे सुरू केले
मधल्या काळात तू परत एक क्लिनिक आयुर्वेदिक उपचारा साठी घेतले होतेस
ते छान चालले होते
आणि अचानक माझ्या आयुष्यातले एक नवीन पर्व सुरू झाले
मी प्रमोशन परीक्षा द्यावी असा आमच्या आमच्या नवीन आलेल्या साहेबांचा आग्रह झाला
माझा नकार होता पण तू म्हणालास तुझी हुशारी असून माझ्या व्यवसायामुळे तुला प्रगती करता आली नाही
आता घे तू ही संधी
मी आहे तुझ्या पाठीशी...
तसेही तू कायमच माझ्या पाठीशी होतास
माझ्या नोकरीतील अनेक प्रॉब्लेम मध्ये तू कायमच मला सहाय्य करीत होतास
मग मी परीक्षेची तयारी सुरू केली
बँकेत रजा मिळत नव्हती
जास्तीचे काम करून घरी आल्यावर संध्याकाळी एका मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघींनी अभ्यास सुरू केला
महिना दीड महिना आम्ही दोघींनी खूप कष्ट घेतले
मी ही परीक्षा दिली आणि उत्तम. मार्क मिळून पास झाले
इंटरव्ह्यू उत्तम होऊन माझी ऑफिसर म्हणून निवड झाली
तुला अतिशय आनंद झाला होता
बक्षीस म्हणून तु तातडीने मला पाच हजार रुपये दिलेस
आणि ताबडतोब मला दुकानात घेऊन जाऊन आवडीचा ड्रेस घेऊन दिलास
देवाला जाऊन पेढे ठेवून आल्यावर
तू चार दिवस तुझे आवडते ठिकाण महाबळेश्वर येथे हॉटेल बुक केलेस
ताबडतोब तू आणि मी चार दिवस तिकडे जाऊन एन्जॉय केले
पण मला पोस्टिंग मात्र सोलापूर जिल्ह्यात मिळाले
मी म्हटले.. नको रे बाबा
काही गरज नाही इतक्या लांब जायची
आता राहिली किती सर्विस
मी नाकारते हे प्रमोशन
पण तू म्हणाला
नाही इतक्या परिश्रमाने मिळालेलं प्रमोशन नाकारायचं अजिबात नाही
सोलापूर जिल्ह्यात तुला कुठेही पोस्टिंग मिळू दे मी येईन तुझ्या सोबत
आपण तिथे बिऱ्हाड करू
इथला दवाखाना मी बंद करीन
माझ्या करिअरसाठी तू स्वतःचा दवाखाना बंद करायला तयार होतास
माझे पोस्टिंग सांगोला येथील जवळच्या खेड्यात झाले
ट्रेनिंग नंतर तिकडे हजर व्हायचे होते
मी पंधरा दिवस ट्रेनिंग साठी पुण्यात निघून गेले
या कालावधीत मला बोलल्या प्रमाणे तू लगेच तुझा कोल्हापुरातला चांगला चालता दवाखाना बंद करायला घेतलास..