पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १३

प्रिय सोना ..

मी माझा राजीनामा तर पाठवून दिला एक महिना नोटीस पिरियड होता महिन्याभरात त्याची स्वीकृती होणार होती मी हळूहळू माझे काम आवरायला सुरुवात केली आपण ही खुर्ची सोडणेपूर्वी काम स्वच्छ असावे अशी माझी खटपट चालू होती पण नंतर पत्र आले वरिष्ठ ऑफिसकडूनपण राजीनामा स्वीकृत नाही झाला कारण काय तर म्हणे या शाखेत काम करायला कोणी तयारच नव्हते …परत मन नाराज झाले तू होतास मला सावरायला..जाऊदे आता इतके दिवस केलेस अजून थोडे दिवस कसेही जातील आता तर तुला कामाचा आवाका पण आलाय नंतर करू आपण मजा परत सुरू झाले कामात बुडून जाणे आता सुट्टी किंवा एक दोन दिवस रजा काढून आपल्या पुणे वाऱ्या सुरू झाल्या पिलू मोठे होत होते तीन महिन्याचे झाल्यावर तिचे बारसे झाले पुण्यात मोठा कार्यक्रम झाला तिच्या आई वडिलांनी त्यांच्या पसंतीचे नाव ठेवले आपल्या दृष्टीने ती अंबाबाई होती आपणही देवीचे एक नाव तिला ठेवले जे कोणाकडून कधी बोलावलेच गेले नाही हळुहळू ती आपल्याला ओळखू लागली चार पाच महिन्याची झाल्यावर तिला घेऊन तिचे आईवडील प्रथमच आपल्याकडे आले दोन तीन दिवस ती मला चिकटून होती माझ्याकडून दूध पाणी घेत होती तिच्या आईवडिलांना वाटत होते ती आपल्याकडे राहणार नाही पण ती मला सोडून तिच्या आईकडे सुद्धा जायला तयार नव्हती हे त्या दोघांसाठी एक आश्चर्य होते याच दिवसात अचानक ठरवून आपण तिचे बोरनहाण केले आपल्या घरच्या पंचविस तीस लोकांना बोलावले होते शिवाय सर्वांना संध्याकाळी मोठ्या हॉटेल मध्ये जेवण पण दिले पोरगी खुश होती हा कार्यक्रम कदाचित तिच्या आई वडिलांना आवडला नसावा..आपल्याला हे तेव्हा लक्षात नाही आले पण ती तर प्रथमच घरी आली होती शिवाय दिवस संक्रांत काळातले होतेआपल्या सगळ्या नातेवाईकांनी तिला घेतले, खेळवलेती पण छान खेळकर होती माणसे आवडत होती तिला पण इतक्या लोकांनी तिला हात लावावा हे त्या दोघांस फारसे रुचले नसावे तिचे बरेच फोटो मी काढलेहे ही आवडले नव्हते यानंतर ते तिघे पुण्याला निघून गेले पोरीचे फोटो, तिचे खेळणे तिचे व्हिडिओ यात आपल्याला आनंद होता पण ते सुद्धा फारसे आवडीने पाठवले जात नव्हते आपण जेव्हा जेव्हा पुण्यात जाऊ तेव्हा त्यांच्याकडे लक्ष न देता मी तिचे चिक्कार फोटो काढत असे ते माझे “सुखनिधान” होतेअखेर माझी रिटायर होण्याची वेळ जवळ आली शाखेत माझ्या दृष्टीने मी भरपूर काम केले होते पेंडिंग सगळे संपवून बरीचशी शैक्षणिक कर्जाची वसुली सुद्धा केली होती जी अनेक वर्षे पेंडिंग होती मला माझ्या कामाचे समाधान होते शेवटच्या काळात मॅनेजरच्या पॉवर काढून घेत असतात अशा प्रोटोकॉल मुळे तीन महिने शिल्लक असता माझी बदली शहरात झाली त्या मोठ्या शाखेत मी ऑफिसर असणार होते आत्तापर्यंत इतके काही काही घडले होते की मला आनंद झाला का नाही हेच समजले नाही बदली झाली तरी सुटका होत नव्हती कारण ज्याची बदली माझ्या शाखेत केली होती तो इकडे यायला उत्सुक नव्हता तिकडे त्याचे बदली कॅन्सल करायचे प्रयत्न चालले होते स्टाफ ऑफिसर पण त्याच्या बाजूने होते त्यामुळे तेही त्याला तिथून सोडायची ऑर्डर देत नव्हते एकेक गंमतच होती अखेर दोन तीन आठवड्यांनी तो दिवस आला मी तेथून निघून कोल्हापुरात हजर झाले आता शेवटचे दोन महिने राहिले फार काही जबाबदारीचे काम येथे नव्हते इथल्या मॅनेजरच्या दृष्टीनं मी almost रिटायर होते मग दर आठवड्याला वेगवेगळ्या शाखेत तिथल्या ऑफिसरच्या रजेच्या बदल्यात पाठवू लागले इथेही बऱ्याच नव्या मैत्रिणी झाल्या काम भरपूर असल्याने उशीर पर्यंत चालत असे इथेही तू मला सोडायला आणायला येत होतासकाही दिवसांनी बातमी आली माझ्या पूर्वीच्या शाळेतील NPA खातेदाराने चक्क सगळी रक्कम भरून खाते बंद केले अशी मोठ्या ऑफिसने तत्कालीन मॅनेजरचे कौतुक केलेप्रशस्तीपत्र दिले मला खूप आनंद वाटला खरेतर याची सर्व खटपट मी केली होती पण श्रेय या मॅनेजरला मिळालेया गोष्टीचे मला किंचित सुद्धा वाईट वाटले नाही मला श्रेय मिळण्यापेक्षा बँकेच्या इतक्या मोठ्या कर्जाची वसुली झाली ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार महत्वाची होती मधल्या काळात शाखाधिकारी पदामुळे फार परदेशवारी नाही घडली पण तू म्हणालास असू दे..सध्या “महाराष्ट्र माझा “करून घेऊ..असेच मधे मधे सुट्टी असेल तेव्हा आपण महाराष्ट्रात छोटी छोटी गावे फिरून घेतली मॅनेजर पदामुळे व रजा न मिळाल्याने बरीच रजा शिल्लक होती ती वाया जाणार होती त्याला काही इलाज नव्हता अखेर माझा सेंड ऑफ दिवस जवळ येऊ लागला तू माझ्यासाठी प्रेझेंट म्हणून एक सुंदर पैठणी घेतलीस माझे provided fund, gratuity चे पेपर आधीच वरच्या ऑफिसला गेले होते ते पैसे हळूहळू जमा झाले.पेन्शन किती मिळणार हे निश्चित झाले मागल्या शाखेत ऑफिसर असुन शाखाधिकारी म्हणून काम केले त्यामुळे पेन्शन वाढून मिळणार होती तू म्हणालास..बघ तिकडे जे कष्ट घेतलेस त्याचे फळ तुला मिळाले खरेतर तुझ्यामुळेच हे प्रमोशन मला सोपे गेले होते सदैव तुझा पाठिंबा ही माझी मोठी दौलत होती खरंच देवाची कृपा होती माझ्यावर चार दिवस आधी आपण एक छान जेवण एका उत्तम हॉटेल मध्ये ठरवले होते मुलाला आधीच कल्पना दिली होती तुला साठ पुरी झाल्यावर तुझी एकसष्ठी करावी असे माझ्या मनात होते पण हा कार्यक्रम मुलांनी करायचा असा रीवाज होता त्यावेळी मुलाने काहीच इंटरेस्ट या गोष्टीत घेतला नव्हता आता निदान माझ्या सेंडऑफ जेवणासाठी त्या सर्वांनी यावे असे मला वाटत होते पण ते नाही आले एक ड्रेस गिफ्ट पाठवला त्या कार्यक्रमात सर्वांनी मुलाची चौकशी केली ते दोघे का आले नाहीत याविषयी खोटेनाटे सांगायची पाळी आली असो छान झाला कार्यक्रम आणि चार दिवसांनी मी बँकेतून निवृत्त झाले अडतीस वर्षाची बँकेची नोकरी संपन्न झाली बँक म्हणजे आईच होती माझी एक आई धरती माता एक आई जीने जन्म दिला आणि ही एक आई जीने आयुष्यात स्थैर्य दिले, प्रतिष्ठा दिली डोक्यावर छप्पर, दारात गाडी आणि समाजात मान दिला..बँक सोडताना डोळ्यात पाणी दाटून आले बँकेत पण सेंड ऑफ झाला, भेटी दिल्या गेल्या जुन्या शाखेतील काहीजण आवर्जून उपस्थित राहिली पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा मिळाल्या खऱ्या अर्थाने आता पूर्ण स्वातंत्र्य मिळाले रोजची गडबड धावपळ..संपलीमाझ्यामुळे तुझे आयुष्य सुद्धा धावपळीचे गेले होते नोकरी मी करीत होते.माझी काळजी तू वहात होतास..माझ्या यशस्वी पूर्ण झालेल्या नोकरीचे बहुतांश श्रेय तुझेच होते आता निवांत एकमेका सोबत मस्त वेळ घालवायचा भरपूर फिरायचे असे आपले मनसुबे सुरू झाले तू आता निवांत रहा आराम कर मी सगळ स्वयंपाक पाणी बघेन..मला तर हसूच आले मी म्हणाले अरे तू तर किती केले आहेस माझ्या साठी आणि या नोकरी साठी माझ्या पैशाचा पेन्शनचा खरा हक्कदार तू आहेस आत्तापर्यंत आयुष्यभर तर तू माझीच काळजी घेतलीस आणि काळजी केलीस सुद्धा .आताही ही तुझ्या मनात माझेच आणि माझ्या सुखाचेच विचार होते खरेच माझा “कोहिनूर” हिरा होतास तू जो फक्त माझ्याकडेच होता पूर्वजन्मीची पुण्याई म्हणुनच तुझ्या सारखा जोडीदार मिळाला होता ईश्वराचे किती आभार मानावे तेवढे थोडेच आता लगेच परदेश फिरायचे तुझे प्लान सुरू झाले वेगवेगळ्या कंपन्यांचे टूर प्लान आणून तुझा अभ्यास सुरू झाला तू इतका परफेक्ट होतास की प्रत्येक गोष्टीचा पूर्ण अभ्यास करूनच त्यात उतरत होतास आत्तापर्यंत आपल्या चार गाड्या बदलून झाल्या होत्या नवीन मॉडेलची तुला हौस होती जुनी देऊन नवीन घेणे तुला आणि मलाही आवडायचे याचाही तू पूर्ण अभ्यास तू करून मगच गाडीचा व्यवहार करीत होतास हीच गोष्ट आपण टिव्ही आणि मोबाईल बाबत पण ठेवली होती दर तीन चार वर्षांनी जुने देऊन नवीन घेत होतो असे केले नाही तर आपल्याला येणारी नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरायला मिळेल असे तुझे विचार असत..