चैत्रांगण
नुकताच चैत्र महिना सुरू झाला आहे
आपल्या मराठी वर्षाची सुरवात चैत्र महिन्या पासुन होते
चैत्र शुध्द तृतीयेपासुन अक्षय तृतीये पर्यंत रोज अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात
चैत्र महिना अत्यंत उत्साहाचा आणी आनंदाचा मानला जातो याचे एक कारण हिंदु नववर्ष इतकेच नसून चैत्रात सारी नव्याची नवलाई असते
झाडांना नवी पालवी फुटते अनेक झाडे इतक्या कडक उन्हात पण आपल्या अंगावर
सुंदर सुंदर देखण्या फुलांचे दागिने धारण करतात .या साऱ्या सौंदर्याने माणसाचे मन सुद्धा प्रफुल्लित होते.
याच महिन्यात आपले हिंदु दैवत श्री रामचंद्र यांचा जन्म झाला तसेच रामाचे पाडव्याला गुढी उभारून केले जाते म्हणुन आणखी महत्व आहे या महिन्याला !!
अशा या चैत्र महिन्यात गौरी आगमना पासुन रोज अंगणात चैत्रांगण काढले जाते ज्यामध्ये प्रथम असतात दोन गौरी ‘’
ज्यांचे पुजन करून या महिन्याची सुरवात होते गौरी या मांगल्य व सौभाग्याचे प्रतिक मानले जातात
यांचे घरातील आगमन हे
सुख समृद्धी धन धान्य मुले बाळे यांच्याशी कायम च जोडलेले असते ..
त्यामुळे यांचे आगमन शुभ मानले जाते !!!
गौरीच्या आजूबाजूला दोन द्वारपाल पण आहेत रक्षणासाठी !!
गौरीजवळ एक पाळणा आहे ज्यात मुलांना जोजावले जाते
करंडा, फणी, व मंगळसुत्र ही गौरीच्या सौभाग्याचे प्रतिक म्हणुन काढली जातात
या गौरीच्या दोन्ही बाजुना सूर्य आणी चंद्र काढले जातात चंद्र सूर्य आहेत म्हणुन ही पृथ्वी आहे कोणत्याही गोष्टीला कायमचे अस्तित्व द्यायचे असेल तर ती गोष्ट “यावत चंद्र दिवाकारौ..:” टिकू दे असे म्हणतात शिवाय चंद्र सूर्य म्हणजे रात्र आणी दिवस ज्यामध्ये उजेड आणी अंधाराचा समावेश होतो म्हणजेच सुख आणी दुक्ख आशा निराशा याचा खेळ याची सवय हवी ना माणसाला !
शिवाय आपले घर दिवसा सुर्याच्या प्रकाशाने उजळावे व आणी रात्री चंद्राच्या प्रकाशाने थंड रहावे ही पण सदिच्छा यात दडली आहे
यात मध्यभागी बसायला पाट आहे देवाने आसनस्थ व्हायची इच्छा आहे
बाजूला आराम करण्या साठी पंखे पण काढले आहेत
देवासमोर शांतपणे तेवणारी समई पण आहे
बसण्याच्या पाटा जवळ रांगोळीत शंख ,चक्र, गदा गोपद्म कमळ काढले आहे
शंख, चक्र, गदा ,ही तर देवाची आयुधे आहेत
काम, क्रोध, मत्सर, दमन करणारी त्रिशूळ व डमरू ही शंकरची आयुधे पण काढली जातात
सोबत नारळ म्हणजे श्रीफळ काढले जाते मांगल्याचे व श्री गणेशाचे प्रतिक त्याला समजले जाते
गोपद्म म्हणजे गाईचे पाय जे अत्यंत शुभ समजले जाता
कमळ हे देवाचे आवडते फुल
आणी कमळ लक्ष्मीचे पण प्रतिक आहे
कमळां प्रमाणेच आयुष्य प्रफुल्लित राहू दे अशीच त्यामागील भावना
यात एक विशेष म्हणजे दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले जाते मात्र गंमत अशी असते की उजवीकडे सुलटे आणी डावीकडे उलटे स्वस्तिक काढले जाते स्वस्तिक हे शुभ मानले जाते आणी उलटे स्वस्तिक अशुभ पण हे दोन्ही माणसाच्या आयुष्यात हवेत .शुभ अशुभ यांच्या सह्योगानेच माणसाचे आयुष्य बनत असते आणी शुभ अशुभ दोन्ही गोष्टीना तोंड द्यायला माणुस खंबीर हवा !!
मधोमध तुळशी वृंदावन पण आहे
रोज तुळशीला पाणी घालून आपला दिवस सुरु होतो .तुळस ही शुभ आहे आणी तुळशीच्या सहवासात राहिल्याने आरोग्य वाढते
यामुळे तुळशीला महत्व आहे
नाग व साप हे पर्यावरणाला पुरक आहेत
शिवाय कासव गरुड हत्ती यांचाही यात समावेश आहे प्राण्यांचे माणसाचा आयुष्यातील स्थान अतिशय महत्वपूर्ण आहे हे यातून दाखवले जाते
गाय आणी वासरू आहेत जे ममतेचे प्रतिक आहे आणी ते पण गाय वासराला चाटते आहे आणी प्रेमाने पान्हा देते आहे अशी रांगोळी माता बालक नात्याचे अगदी समर्पक रूप आहे ना !
गाय वासरू हे मातृत्वाचे प्रतिक तर आहेच
पण गायीच्या पोटात तेहेतीस कोटी देव असतात असे हिंदु धर्मात मानतात
त्यामुळे हे प्रतिक आणखी महत्वाचे ठरते !!!
अशा रीतीन्र ही संस्कारक्षम आणी माणसाच्या संपूर्ण आयुष्याची निसर्गाशी सांगड असणारी रांगोळी संपूर्ण चैत्र महिना भर दारात काढली जाते
माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत सर्व दारात ही रांगोळी दिसे आणी त्यात पण कोणाची चांगली आली आहे याची रोज बायकांत चर्चा असे या रांगोळीत
असणारे अनेक घटक अगदी आठवणीत ठेवुन काढणे महत्वाचे त्यात पण ज्याची त्याची जागा ठरलेली आहे तिथेच ते हवे... इतकी मोठी रांगोळी म्हणजे साहजिकच
रांगोळीची रेघ ही बारीक हवी..त्यात सुबक पणा हवा
आणी हेच तर कौशल्य असते या रांगोळीचे !!
मी प्रथम हे चैत्रांगण माझ्या आजी कडून शिकले पण मला त्यासाठी खुप वर्षे द्यायला लागली कारण आजी अगदी माझा हात धरून माझी रेघ बारीक व सुबक कशी येईल हे पाहत असे . मी खरेच छान चैत्रांगण काढू लागले तेव्हा आजीला खुप कौतुक वाटले अगदी तिच्या मुली पेक्षा म्हणजे माझ्या आई पेक्षा मी ते सुबक काढते असे ती बोलून दाखवत असे ...
आता आजी नाही आई पण नाही ज्या गल्लीत या रांगोळ्या आम्ही काढत असु
ती गल्ली पण आता नाविन्यपूर्ण झाली आहे
या गल्लीत वाड्या ऐवजी आता फ्ल्याट संस्कृती ने शिरकाव केला आहे त्यामुळे
अंगण तर नाहीच ..
दरवाजे ही लहान झाले आहेत
ज्यांना हौस आहे त्यांना इतकी मोठी रांगोळी काढायला सवड कुठे आहे
मग ती हौस छापाची रांगोळी काढुन भागवली जाते
ते मात्र खुप छान आणी सुबक दिसते ..
असो दिवस बदलले की जग ही बदलतेच
तरी पण चैत्रांगण काढायची हौस अजून आहे हेही नसे थोडके ..!!
------------