Hadga books and stories free download online pdf in Marathi

हादगा

हादगा ..

ऐलोमा पैलोमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा ..

टीवी मालिकेतील हे गाणे ऐकताना हादग्याच्या आठवणीनी मन जणु झुल्यावर झुलू लागलं

मुलगी सात आठ वर्षाची झाली की हादगा घालावा अशी घरी चर्चा सुरु व्हायची .

मुलीना तर हादगा घालायची कधीचीच गडबड झालेली

कारण सोबत च्या मैत्रिणींच्या घरी हादगा खेळायला त्या जात असत

त्यामुळे ती गंमत आपल्या घरी कधी होणार ह्याची आतुरता खुप असायची .

हादगा म्हणजे पाटावर मागच्या कोऱ्या बाजूवर एक हत्ती काढायचा .

आता त्या हत्ती ची पूजा करून

त्याच्या भोवती सर्व मुलीनी मिळून गोल गोल रिंगण घालत

वेगवेगळी गाणी गायची .

या गाण्यातून सर्वात आधी गणेश देवतेला आवाहन करायचे .

आणी आपल्या संसाराचा खेळ व्यवस्थित मांडला जावा अशी प्रार्थना करायची

मग वेगवेगळी भारतीय संस्कृती , इतिहास , पुराण यांच्या कथा सांगितल्या जायच्या .

काही काही वेळा या गाण्यातून काही नर्मविनोदी कथा पण असायच्या .

हस्त नक्षत्र लागल्या दिवशी हादगा सुरु होतो तो दसऱ्याला संपतो .

एकंदर सोळा दिवस हा चालत असे . .

सोळाव्या दिवशी याचे उद्यापन केले जायचे .

याची गाणी आज एक उद्या दोन परवा तीन अशा क्रमाने वाढत म्हणायची असत.

सोळाव्या दिवशी हौसेने सोळा गाणी म्हणली जायची .

गाणी गाऊन झाली की खिरापत वाटप असे .

खिरापत म्हणजे वेगवेगळे पदार्थ ..पण ही खिरापत ओळखायची असे

काही काही घरात आजी किंवा आई इतक्या हौशी असत की

त्या खिरापती पण गाण्या प्रमाणे वाढवत .

म्हणजे पहिल्या दिवशी एक खिरापत दुसऱ्या दिवशी दोन अशा खिरापती करीत .

या क्रमाने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती म्हणुन जवळ जवळ जेवण व्हायचे .

 जी मुलगी ही खिरापत ओळखेल तीचे कौतुक होऊन तिला खिरापतीचा जास्त वाटा मिळत असे .

एकीच्या घरचा हादगा झाला की दुसरीच्या घरी जायचे हादगा खेळायला .

असे रोज सात आठ घरी तरी हमखास हादगा असेच ..!!

शाळा सुटून घरी आले की हातपाय धुवून हादगा खेळायला जायची गडबड सुरु व्हायची .

या दिवसात अभ्यास झाला का ?..आता कुठे निघालीस ?कधी येशील ?

अशा प्रकारचे आईचे प्रश्न पुर्ण बंद असत .

एरवी आम्हा मुलीना सात वाजण्याच्या आत घरी आलेच पाहिजे असा दंडक असे .

पण या दिवसात ही वेळेची मर्यादा पुर्ण शिथिल असे .!!

मस्त हुंदडायला मिळायचे मला त्या दिवसात .

शिवाय वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल खायला मिळायची ते वेगळेच ..

माझ्या तर इतक्या मैत्रिणी होत्या की दोन तीन तास रोज माझे हादगा खेळण्यात जायचे .

पहिले आठ दहा दिवस संपले की आमचा गाण्यांचा साठा संपत असे

मग आम्ही तेवढीच गाणी इतर दिवशी पण गात असु .

पण आमच्या घरमालक एक आजी होत्या ज्याना आम्ही काकी म्हणत असु .

त्याना सोळा पेक्षा ही जास्त गाणी येत असत .

त्यांच्या दोन नाती होत्या त्यांचा हादगा त्या घालत असत

त्या आम्हाला वेगवेगळी गाणी सांगत आणी आम्ही म्हणत असु .

त्यांच्या घरच्या हाद्ग्याला त्यांच्या गाण्यांच्या वैविध्या मुळे खुप मुली येत असे

शिवाय त्या इतक्या प्रकारच्या खिरापती करीत

की त्या ओळखायला पण मजा येत असे .

या व्यतिरिक्त आमची मुलींची शाळा असल्याने शाळेत पण हादगा असे .

रोज शेवटचे दोन तास ऑफ असत तेव्हा प्रत्येक वर्गाचा वेगळा हादगा खेळला जात असे

तेव्हा प्रत्येक इयत्तेच्या दोनच तुकड्या असत त्यामुळे शाळेच्या ग्राउंड वर हा कार्यक्रम चाले.

वर्गात पस्तीस ते चाळीस मुली असत .

रोज दोघी तिघी खिरापत आणत त्यामुळे दिवस भर तासा कडे आमचे लक्षच नसे

कधी एकदा हादगा खेळतो असे होत असे .!

शाळेत एकदा माझ्या मैत्रिणीने कोणाला पटकन ओळखू नये अशी खिरापत हवी म्हणुन

छोटे छोटे टोम्याटो आणले होते .आपली खिरापत कोणीच ओळखणार नाही याची तीला खात्री होती .

हादगा खेळायला म्हणुन जेव्हा दुसऱ्या मजल्या वरून सर्वजणी पळत पळत निघाल्या

तेव्हा अचानक मुलींचा धक्का लागुन तीच्या हातातील डबा पडला

आणी सर्व टोम्याटोनी जिन्या वरून खाली उड्या घेतल्या

मग काय मुलींच्या पायाखाली तुडवले गेल्याने त्यांची नासाडी झाली .

मैत्रिणीला इतके वाईट वाटले .खुप रडली बिचारी .

तसेच एकदा खिरापत म्हणुन माझ्या आईने बटाटा घालून पुऱ्या दिल्या होत्या .

ही खिरापत ओळखली जाणार नाही असे मलाही वाटत होते .

मस्त लसुण मिरची कोथिंबीर घातलेल्या त्या पुर्यांचा खमंग वास सुटला होता .

वर्ग सुरु झाल्यावर काही वेळात हा वास वर्ग भर पसरला .

सर्व मुली अस्वस्थ झाल्या होत्या ...

आणी मग माझे काही न ऐकता त्यांनी दुपारच्या सुट्टीत पुऱ्या वर ताव मारला .

माझी खिरापत ओळखण्या आधीच पोटात गुडूप झाली .

अशा आठवणी हादग्याच्या ..

आता महा हादगा घालतात खुप बायका जमतात .गाणी पण गायली जातात .

पण माझ्या लहानपणीची मजा आता नाही !!! !!!!!

.

हदगा आकाशकंदील बाहुलीच लग्न शिक्षक दिन डबा वक्तृत्व पत्रमैत्री सिनेमा आईस्क्रीम दिवालीसुट्टी खेळ

असायची

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED