सविता दामोदर परांजपे..
मराठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातदेखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता जॉन अब्राहम मराठी चित्रपटाकडे वळला आहे. जॉनने सविता दामोदर परांजपे ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. रहस्यपट आणि थरारपट ह्यांचा मोठा चाहतवर्ग असतो. त्यामुळे प्रेक्षक अश्या चित्रपटांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. प्रेक्षकांची हीच इच्छा ओळखून एक दमदार आणि जबरदस्त कथानकाचा सायकोलॉजीकल थ्रिलर असा सविता दामोदर परांजपे हा चित्रपट प्रेक्षकासाठी तयार झाला. विज्ञान आणि अमानवी शक्तीच्या घटनांचा उलगडा करणार कथानक पाहतांना काहीतरी वेगळ पहिल्याचा आंनद प्रेक्षकांना होणार आहे. हा चित्रपट एकेक पाकळी उलगडून टाकणारा, रोमांचित करणारा अनुभव देणार आहे त्यामुळे एखाद साध कथानक पुढे जात आहे असा विचार करूच नका! आणि मराठी सिनेमातला थरार अनुभवायला तयार व्हा.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला सविता दमोदर परांजपे हा चित्रपट.. अभिनेता सुबोध भावे, राकेश बापट आणि ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्ती तोरडमल यांची सिनेमात प्रमुख भुमिका आहे. सध्या सुबोध भावे एकापेक्षा एक अव्वल चित्रपट करतांना दिसत आहे. त्यातच सविता दामोदर परांजपे हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. एकंदरीतच ह्या चित्रपटाकडे सगळ्याच मराठी प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील आहे. सारख्या प्रेम कथा आणि त्याच त्याच धाटणीचे चित्रपट पाहून प्रेक्षक कंटाळतो. प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मराठी निर्माते-दिग्दर्शकही काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. मराठीत अलीकडच्या काळात रहस्यमय चित्रपट अभावानेच आले आहेत. हीच गोष्ट ओळखून सायकोलॉजीकल थ्रीलर असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आशयघन पटकथा, अर्थपूर्ण संवाद, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा शुक्रवारपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
एके काळी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. रंगभूमीवर गाजलेली कलाकृती सिनेमाच्या रूपाने परत अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्येही या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे. आजच्या पिढीतील प्रेक्षकांनाही या नाटकातील थ्रील अनुभवता यावं याकरीता दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य उचललं. सशक्त कथा आणि त्याला मिळालेली उत्तम दिग्दर्शनाची जोड काही वेगळाच थरार घेऊन येईल ह्यात काही शंका नाही आणि हा चित्रपटाचा थरार अनुभवायचा असेल तर सिनेमा गृहात जाऊन नक्की हा सिनेमा पहायाला हवा.
ह्या चित्रपटाची वैशिष्टे-या सिनेमाची बरीच वैशिष्ट्ये आहेत.
१. १९८५ मध्ये रंगभूमीवर आलेल्या सविता दामोदर परांजपे या नाटकावर हा सिनेमा बेतला आहे. ८०च्या दशकात सुपरहिट ठरलेल हे नाटक होत. ह्या नाटकात रीमा लागू ह्यांचा अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होत. आजच्या पिढीला हा अनुभव घेत यावा म्हणून सविता दामोदर परांजपे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा सिनेमा पाहण औत्सुक्याच ठरणार ह्यात काही शंका नाही.
२. या सिनेमाच्या निमित्ताने हिंदीतील आघाडीचा अभिनेता पावलं मराठीकडे वळली आहेत. जॉनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. जॉनने निर्मित केलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. जॉन अब्राहमने अव्वल चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि आता सविता दामोदर परांजपे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर काय जादू करतो हे पाहण्यासारख असेल. रंगभूमीवर गाजलेली कलाकृती सिनेमाच्या रूपाने परत अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्येही या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
३. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचा वारसा लाभलेली त्यांची मुलगी तृप्ती हिने या सिनेमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर वरून तिचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की पाहावा अस वाटेलाच.
४. दिग्गज कलाकारांचा अभिनय ही ह्या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर दिग्दर्शन ही सुद्धा पाहण्यासारख आहे.
५. सशक्त कथानकाला सुमधूर संगीताची सुरेल किनार जोडण्याचं काम संगीतकार अमितराज आणि निलेश मोहरीर यांनी केलं आहे. मंदार चोळकर आणि वैभव जोशी यांनी या सिनेमासाठी गीतलेखन केलं आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू-अरोरा आणि निशा उपाध्याय-कापडीया या गायकांच्या समुधूर आवाजातील ‘जादुगरी’, ‘स्वामी समर्थ’, ‘किती सावरावा’, ‘वेल्हाळा’ ही वेगवेगळ्या मूडमधील गीतं सिनेमाच्या कथेशी एकरूप होणारी आहेत.
चित्रपटाची थोडक्यात कथा-
सविता दामोदर परांजपे या नाटकाला आज अनेक वर्षं झाले असले तरी हे नाटक आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सविता दामोदर परांजपे हा चित्रपट याच नाटकावर बेतलेला असल्याने या चित्रपटाकडून रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. माध्यमांतर करताना मूळ कथेत काही बदल करण्यात आले असले तरी हा चित्रपट आपली नक्कीच निराशा करत नाही.
या सिनेमाची कथा शरद आणि कुसुम अभ्यंकर या दाम्पत्याभोवती गुंफण्यात आली आहे. एका सुखी कुटुंबात अचानक काही विचित्र घटना घडू लागतात. शरद अभ्यंकर (सुबोध भावे) आणि कुसूम () यांचे सुखी जोडपे असते. पण कुसूम सतत आजारी पडत असते. अनेक उपचार करून देखील तिची तब्येत बरी होत नसते. त्यामुळे शरद काहीतरी मार्ग मिळावा म्हणून अशोक (राकेश बापट) ला घरी बोलावतो. कुसूमला पाहाताच क्षणी तिला कोणीतरी झपाटले असल्याचे अशोकच्या लक्षात येते. तिचा हात बघत असताना तू कोण आहेस असे तो तिला विचारतो, यावर मी सविता दामोदर परांजपे असल्याचे ती सांगते. कुसूमच्या शरीरात सविताचा वास अनेक वर्षांपासून असतो. पण याची कल्पना कोणालाच नसते. पण अशोक घरात आल्यानंतर कुसूमच्या अंगात असलेली सविता सगळ्यांना सतवायला सुरू करते. तिच्या मागण्या अशोक पुढे ठेवते. ही एक सूड कथा असून ती सूड कशाप्रकारे घेते हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ही सविता दामोदर परांजपे कोण आहे? तिचा कुसूम आणि अविनाशच्या आयुष्याशी काय संबंध आहे? ती त्यांच्या आयुष्यातून दूर जाते का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा चित्रपट पाहायला लागेल.
सविता दामोदर पराजंपे या चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासूनच चित्रपटाची कथा चांगलीच पकड घेतो. चित्रपटात आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहाते. चित्रपटाचे बँकराऊंड स्कोर, सिनेमेटोग्राफी मस्त जमून आली आहे. चित्रपट पाहाताना कथेतील भयाणपणा आपल्याल नक्कीच जाणवतो. सुबोध भावे, राकेश बापट यांनी चित्रपटात खूप चांगले काम केले आहे. तृप्तीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी तिने कुसूम आणि सविता या दोन्ही व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने उभ्या केल्या आहेत. मध्यांतरापर्यंत कथेतील उत्सुकता शिगेला पोहोचते. मानवाच्या आकलनापलिकडच्या या घटनांचा वेध विज्ञानाच्या आधारे घेतला जातो आणि अमानवी शक्तींसोबतच्या या लढ्याचा उलगडा होत जातो. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं आणि अनपेक्षित घटनांच्या आधारे रोमांच निर्माण करणारं कथानक ही या सिनेमाची सशक्त बाजू आहे. सुबोध भावे, , राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांनी तितक्याच ताकदीने अभिनय करत या सिनेमाचा भार उचलला आहे. पण मध्यांतरानंतर चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटाच्या शेवटी उगाचच मेलोड्रामा टाकण्यात आला असल्यासारखे जाणवते. तसेच शेवट मनाला पटणारही नाही पण एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करतो. मराठी सिनेमा प्रगल्भ होतो आहे आणि त्याचा अनुभव सविता दामोदर परांजपे पाहून नक्कीच येतो!!
जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या सिनेमाची कथा शेखर ताम्हाणे यांनी लिहिली असून, शिरीष लाटकर यांनी संवादलेखन केलं आहे. छायांकन प्रसाद भेंडे यांनी केलं असून, क्षितिजा खंडागळे यांनी संकलन केलं आहे. योगेंद्र मोगरे, सहनिर्माते आहेत. संतोष फुटाणे यांचं कलादिग्दर्शन, प्रणाम पानसरे यांचं ध्वनी संयोजन, मालविका बजाज यांची वेशभूषा आणि विनोद सरोदे यांच्या रंगभूषेने हा सिनेमा आणखी दर्जेदार बनवण्यात सहाय्य केलं आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओ डिस्ट्रीब्युशन एल.एल.पी’ ने ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचे वितरण केले असून आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सशक्त कथानकाला उत्तम दिग्दर्शन आणि अभिनयाची साथ लाभल्याने ‘सविता दामोदर परांजपे’ च्या रूपात एक जबरदस्त थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांना येईल यात शंका नाही. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी होतो का हे पाहण ओत्सुक्याच ठरणार आहे. आणि वेगळाच थरार अनुभवायचा असेल तर सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहण्यास काहीच हरकत नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनुजा कुलकर्णी.