Pravas varnan books and stories free download online pdf in Marathi

जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती

हा प्रवास आहे एका दाम्पत्याचा. म्हणजे आमचा.

चार धाम यात्रा ही सहसा भक्तिभावाने केली जाते. आमच्या मनातही ईशवराबद्दल नितांत आदर आहे. परंतु या यात्रेत हिमालयातील सर्वांगसुंदर निसर्ग अनुभवणं हे आमच्यासाठी महत्वाचं ध्येय होतं अस म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि ध्यानीमनी नसताना भेटलेली माणसं आम्हाला हा प्रवास अविसमरणीय ठरायला मदतच करून गेली....

हरिद्वारापासून छोट्या जीपने सुरु झालेला आमचा प्रवास वळणावळणाचा आणि निसर्गाची रूपे दाखवीत जाणारा होता. या प्रवासात आमच्या नकळत आम्ही अनुभवली माणसं. यात्रेच्या काळात व्यवहार आणि अर्थार्जन शोधणारी पण कष्टकरी आणि जीवाला जीव देणारी. तिथल्या निसर्गासारखी लोभसवणी.

तिथला निसर्ग हा मनमौजी पण आहे याचा प्रत्यय पदोपदी येतो. आज या वर्णनात मुख्य भर आहे तो ठिकाणाचा आणि तिथे भेटलेल्या माणसांचा. या माणसांसाठी तिथे जावं. आता आम्हाला भेटलेली माणसंच तिथे तुम्हाला भेटतील असं नक्की नाही, पण तरीही तिथल्या जीवनशैलीमुळे माणसांचा घडलेला स्वभाव तुम्हाला आनंदाची अनुभूती नक्की देईल.

गोविंदघाट ते घागरिया आम्ही पायी प्रवास करणार होतो. त्यामुळे लक्ष्मण गंगेच्या कुशीतल्या गोविंदघाटला मुक्काम केला. हॉटेल तसं नवं होतं. रहायला आम्ही दोघेच. सुरुवातीला मी धास्तावले. पण भांडारी आडनावाचे मालक खूपच सज्जन आणि त्यांचे मदतनीसही काळजी घेणारे. तिथल्या वास्तव्यात माहेरी आल्यासारखं वाटलं मला. खोलीच्या एका बाजूला संपूर्ण काचेची भिंत लावून खळाळत्या लक्ष्मणगंगेची भेट सतत घडत राहील यायची काळजी घेतली गेली होती. तीच वाट पुढे पुष्पदरी आणि हेमकुंडला जाते. आम्हीही याच वाटेने जाणार आहोत या कल्पनेनेच सुखावले होतो.

सर्वांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासात इथेच मुक्काम करू असा निरोप ठेवून निघालो. हेमकुंडसाहेब या शिखांच्या पवित्र धर्मस्थळाला भेट देणारे शीख यात्रेकरू जागोजागी भेटत होते. तान्ह्या बाळाला सोबत घेऊन किंवा वयस्कर आजोबांना घेऊन कुटुंबाच्या कुटुंब निघाली होती.

२१ किलोमीटरचे हे खडे अंतर पायी जाणे सोपे नव्हतेच. दिवसभर शरीराला श्रमवून आम्ही चालत होतो. लक्ष्मण गंगा होतीच सोबतीला.शेवटच्या टप्प्यात आता चालणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर मी फतकल मारून बसले आणि कुणीतरी न्या उचलून आता .... पण सोबत असलेल्या अनोळखी शीख महिलांनी माझे मनोबल वाढवीत मला घागरियात पोचविलेच. किती आत्मविश्वास दिला त्या अनोळखी महिलांनी. स्वतः थकलेल्या असूनही मलाही बळ दिलं....

हेमकुंडला पहाटे निघालो.शीख धर्मियांचं हे पवित्र स्थान. ९ किलोमीटरची खडी चढण. प्राणवायू विरळ होतो. कापूर हुंगत आम्ही चढत होतो. आदल्या दिवशी पुष्पदरीच्या रमणीय प्रदेशात फुलात लोळलो होतो पण आता मात्र पायांनी असहकार पुकारला होता. निश्चयाने ; कुडकुडत का होईना लोकपाल सरोवरापाशी पोहोचलो. गोठलेली हिमनदीच ती. पायातले ट्रेकिंगचे बूट काढावेत असं वाटत नव्हतं. दोन काका आले आणि आम्हाला त्यांनी उबदार कांबळ्यात लपेटलं. बूट काढायला मदत केली. गरमागरम चहा आणून दिला. इतक्या बोच-या गारठ्यात ही माणसं सेवाभावाने उत्साहात काम करत होती. जरा अंगात उब आल्यावर आम्ही गर्भगृहात गेलो. गुरु ग्रंथसाहिब चं प्रसन्न पठण सुरु होतं. समोर आकाशाशी स्पर्धा करणारे उंच पर्वत सुळके दर्शन देत होते. या सर्वापुढे आपण किती खुजे आहोत !!! नतमस्तकच झालो.

पुढचा टप्प्यात जोशीमठ ला आलो. इथे एक भक्त अन्य लोकांनी दर्शनाला जात असताना अस्ताव्यस्त टाकलेली पादत्राणे ओळीने लावून ठेवीत होते. माझा विष्णू इथेच भेटतो असं आम्हाला म्हणाले !!! मला गाण्याची आवड आहे आणि त्यामुळे मी संधी शोधत असते. भिकारीच वाटावेत असे साधू ; सुंदर खड्या आवाजात वाद्य घेऊन गात होते. कपड्याने फाटके, अस्ताव्यत केस, केसांच्या जटा असा अवतार ! पण गळ्यात साक्षात शारदा वीणावादन करीत होती. मी त्यांना विचारल्यावर लगेच स्वागत केलं आणि मी त्यांच्यात बसून एक हिंदी भजन म्हटलं. त्यांनी मला आपल्या गटात घ्यावं आणि मला भजनाला साथ करावी हा अनुभव मला आयुष्यभरायची शिदोरी घेऊन गेला. माणसाची परीक्षा बाह्य रूपावरून करू नये ... हे उमगलं.

तिथेच जवळ सीमेवर माना गाव आहे. पाय-या पाय-यांचं. बायका बसल्या बसल्या लोकरीच्या घट्ट टोप्या विणतात. कोबीची शेती करतात. गोजिरववाणी गोबरी गुलाबी बाळ लक्ष वेधून घेतात. निसर्गाच्या कुशीतली ही माणसं खरंच लाघवी.अनोळखी माणसालाही आपलंसं करणारी.

पुढच्या प्रवासात आम्ही औलीला आलो. हिवाळ्यात इथे स्पर्धा चालतात बर्फ़ाच्या घट्ट थरांवर. आमही रज्जूमार्गाने पोहोचलो तिथे. देवभूमीच आहे ही त्यामुळे तिथून हिमालयातली सुदूर पर्वतरांगा दर्शन देतात. इथे मला एक आजी भेटल्या. औषधी वनस्पती तोडायला आल्या होत्या. त्यांच्या गळ्यात लाल हिरव्या बारीक मण्यांची माळ आणि पुढे मोठं पितळेचं नक्षीदार खोड होत. मी या संपूर्ण प्रवासात बायकांनी हा दागिना घातलेला पाहिला. बायका हसायच्या नुसत्याच पण कुणी काही सांगायचं नाही त्याबद्दल . या आजीबाईने माझी उत्सुकता संपवली. तिला आणि मला एकमेकीची भाषा येत नव्हती. पण तिने मला खुणांनी समजावून सांगितले की हे त्यांचे मंगळसूत्र आहे. केवळ लग्नातच घालतात त्यामुळे बाहेर दुकानात मिळत नाही हे !!!! समजुतीने

हसून आणि माझा हात हातात घेऊन आजी तिच्या वाटेने निघून गेली ...

चार धामांपैकी पैकी जोशीमठ या धर्मस्थळाचे आणि परिसरातील अन्य स्थानांचे दर्शन या वर्णनात आले आहे. स्थानमहात्म्य आणि तेथील निसर्ग हा हल्ली संकेतस्थळांवर सुद्धा सहज भेटतो. पण तिथली माणसं अनुभवायची असतील तर मात्र तिथेच जायला हवं आणि मी हे लिहायचं कारणही हेच आहे. प्रवासात आवडलेली ठिकाणं, तिथे जायचं कसं हे सहजी समजतं आता पण तो माझा हेतूच नाही. मला या प्रवासात अचानक भेटलेली , जात, धर्म, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडविणारी माणसं मला तुम्हाला भेटवायची होती. केदारनाथला झालेल्या ढगफुटीत गोविंदघाटला खुप नुकसान झालं अस वाचलं आणि भंडारी आठवले. ते सुखरूप असतील अशी प्रार्थना केली कारण नंतर काही संपर्कही होऊ शकला नाही आमचा त्यांच्याशी.

अशी ही माणसं. अशी ही ठिकाणं. आमच्या आयुष्याचा प्रवास या माणसांनी आणि तिथल्या अनुभवांनी समृद्ध केला, आमचं सहजीवन उजळून निघालं.

डॉ. आर्या जोशी

इतर रसदार पर्याय