ठाकुरवाडी स्टेशन आणि त्याचा व तिचा निसर्ग Aaryaa Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ठाकुरवाडी स्टेशन आणि त्याचा व तिचा निसर्ग

गाडी वळली.गाडी म्हणजे झुकझुकगाडी.
निसर्गाच्या अनेक छटा दाखवल्या तिने.पुणं सोडलं.पिंपरी चिंचवड तळेगाव करीत गाडी पुढे आली.कानातल्या अडकवलेल्या इयरफोन्सवर मस्त गाणी ऐकत ती दंग झाली होती.जगाचं भानच नव्हतं उरलेलं तिला.
चहा वडापाव कुरकुरे चिक्की असं काहीबाही येत होतं.पण तिचं त्यात लक्षच नव्हतं.समोरचा हळुवार निसर्ग पाहण्यात ती अक्षरशः गुंग झाली होती. तिचा सखा,तिचा निसर्ग,त्याच्यापलीकडे कुणी असू शकतं याचं तिला भानच नव्हतं.
उच्चशिक्षित.परदेशात जाऊन पोस्ट डाॅक्टरेट करून आलेली.एकुलती एक.मित्र मैत्रिणींच्या गदारोळातही लाडकी.पण तिला फक्त आणि फक्त निसर्गच आवडायचा.
गाडीतल्या गर्दीचं फारसं घेणंदेणं नव्हतं तिला. आरामदायी थंडगार डब्यातली खिडकीची जागा आरक्षित असल्याने ती आणि तिचा निसर्ग यांच्याआड कुणी नव्हतं.
ठाकुरवाडीच्या स्टेशनवर गाडीची गती जरा कमी झाली.निसर्ग पाहण्यात हरवून गेलेल्या तिला निसर्गाच्या कुशीतली माणसंही वाचायला आवडायची. त्यामुळे आत्ताही तिने तेच केलं तिच्या नकळत!! डोंगराच्या मध्यात दरीच्या अगदी कोपर्‍यावर मध्यभागी सपाट स्वच्छ केलेल्या जागी ठाकरांची पालं होती.लहानगी खेळत होती.बायाबापडे काहीबाही कामं करत होते. थंडीतल्या गारव्यात पण किंचीत सूर्यप्रकाशाच्या काहीशा उबेत काही ठाकरं दगडांवर बसली होती.हे सगळं तिने काही क्षणातच टिपलं आणि तेवढ्यात गाडी गती घेत असतानाच थंडगार डब्याचं काचेचं तावदान ढकलत तो आत आला! तिचं लक्षं नव्हतं अर्थातच पण एकदम दोन मोठ्या सॅक समोरच्या जागेवर ठेवल्या गेल्या आणि ती भानावर आली! तिने नकळत कानातले इयरफोन काढले आणि ती जरा सावरून बसली अंमळ!
त्याच्याकडे पाहून कळत होतं की हा महाशय चालत्या गाडीतच चढला आहे!!!!
तो स्थिरावेपर्यंत टीटी आले आणि हसून त्यांनी हस्तांदोलन केलं. त्याने मोबाईलवर आपलं तिकीट दाखवलं तसं टीटी म्हणाले काय मित्रा अरे!!!गाडी चुकेल पण गेले वर्षभर तू न चुकता शनिवारी येणार आणि रविवारी जाणार!! तेही आरक्षण करूनच!किती पेशंट यावेळी?
तो उत्तरला" सुदैवाने दोन छोट्यांना किरकोळ आजार आणि एक महिला गरोदर आहे पाच महिन्यांची तिची तपासणी! त्या ठाकराला सांगितलय मी की लोणावळा किंवा खंडाळ्याच्या शासकीय रुग्णालयात नेऊन आण एकदा तिला,बाकी तिची औषधं मी नेली होतीच.तसंही या निसर्गकन्या भलत्याच काटक!!
आता तिची उत्सुकता ताणली गेली. त्याने सॅकमधून एक चाॅकलेट काढलं आणि तोंडात टाकलं आणि मान टेकवून जरा निवांत होणार तोच त्याला लक्षात आलं की ती निरखून त्याच्याकडे पाहत होती. चक्क तिचा निसर्ग विसरून!!! तिच्या कमालीच्या बोलक्या चेहर्‍याचे भाव त्याला कळले आणि तो स्वतःहूनच म्हणाला तिला! हाय मी अर्चिस.डाॅ.अर्चिस सहस्रबुद्धे. एम.डी.गायनॅक. सध्या लीलावतीला आहे.!!! गेले वर्षभर ठरवून ठाकुरवाडी आणि रस्त्याची कामं करणार्‍या मंडळींना भेटायला येतो. लागतील तशी औषधं घेऊन येतो. मुलांसाठी खाऊ,खेळणी असंही जमेल तसं.अधूनमधून कारने आईबाबा पण येतात!ते ही डाॅक्टर आहेत.
मी ट्रेकरही आहे. त्याच नादात एकदा पायी आम्ही इथून जात असताना संध्याकाळी एका आजीला झोळीत घालून ही ठाकरं धावत खंडाळ्याला नेत होती.ते पाहून आम्हीही मदतीला धावलो. म्हातारीला साप चावला होता. प्रयत्न केला पण नाही वाचली!त्यानंतर ठरवलं इथे येऊन जमेल ती आणि तशी मदत करायची.नाहीतर डाॅक्टर होऊन उपयोग काय?
तिला रहावलंच नाही. पण शब्दही फुटेनात... त्याला समजलं.... गाडी हळूहळू निसर्गाची कूस सोडून सिमेंटच्या शहरात शिरायला लागली होती.आजूबाजूच्या लोकल ट्रेन्स,मुंबइची घामट गर्दी हे त्या थंडगार डब्यातही जाणवत होतं.
तो बोलत राहिला.चाॅकलेटची देवाणघेवाण झाली. मी निसर्गवेडा आहे. मित्रांच्यात रमणारा,एकुलता एक,श्रीमंत डाॅक्टर पण कष्टाळू आईवडिलांचा एकुलता एक.वरळी सीफेसवर आजोबांचं घर.ते पाडून नवीन झालेल्या टोलेजंग अपार्टमेंटमधे राहणारा!! पण निसर्ग माझं सर्वस्व आहे! या एका घटनेने जाणवलं की निसर्ग जर माझा आहे,माझं अस्तित्व इथे मला सापडतं तर इथे राहणारी ही निसर्गाची लेकरंही माझीच आहेत! त्यांच्या सुखात आपणही सुख शोधणं आणि दुःखावर फुंकर घालणं हे माझं काम आहे कारण आम्हाला जोडणारा एकच दुवा हा इथला निसर्ग!!! गाडीतून जाताना रेल्वेतून जाताना खुणावणारा घाट माझाच,श्रीवर्धन मनरंजन माझेच,रेल्वे रूळही माझेच. मंकी हीलच्या चिमुकल्या स्टेशनचा गार्ड आणि वानर कंपनीही माझीच.माझ्या निसर्गाच्या कुशीतली!!!
जमेल तितके दिवस येत राहीन.माझा आनंद आणि अस्तित्व शोधत राहीन!! अच्छा दादर येईलच आता!
ती निःशब्द,स्तब्ध! दादरला तो उतरला.खिडकीतून तिने त्याला रेल्वेचा पूल चढताना पाहिलं.....
ती छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरली!!!
विचारात बुडलेली मग्न अशी टॅक्सीत बसली आणि वाळकेश्वरच्या बंगल्यापर्यंत पोचली. माळ्याने दार उघडलं तोच आई बाहेर आली, अग मोतीराम आला होता घ्यायला.काल ठरलं नव्हतं का तसंच तुझं बाबांशी? ती एक नाही की दोन नाही!!
रात्र कशी संपली ते तिलाही कळलं नाही.अजूनही समोर रेल्वेचा डबा, समोर भरभूरन बोलणारा तो आणि अवतीभवतीची गिरीशिखरं आणि दर्‍या!!!
सोमवारी नाश्ता करून बाहेर पडली! बाराच्या सुमारास बाई लीलावतीच्या दारात हजर!!!....
आता गेले चार महिने तीही जाते त्याच्यासोबत पंधरा दिवसातून एकदा! अधूनमधून दोघांपैकी कुणाचेतरी मित्रमैत्रीण असतात सोबत!
जाताना तीच रेल्वे छत्रपती टर्मिनसवर ती पकडते.तो दादरला चढतो. कधी आरक्षण ती करते तर कधी तो. शनिवारी जाऊन रविवारी परत.
त्या गर्भवती ताईला आता सुदृढ मुलगा झाला आहे खंडाळ्याच्या इस्पितळात.अर्चिस होताच त्यावेळी! आता सर्व मंडळी मुंबईतून जाऊन पिलूचं बारसं करणार आहेत!
आणि हे सर्व पाहत आहेत रोज रुळावरून येणार्‍या जाणार्‍या झुकझुकगाडी!!!

आर्या जोशी