पुष्कर गोलू आणि घुबड Aaryaa Joshi द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुष्कर गोलू आणि घुबड

पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची.
बाबाबरोबर पहाटे झर्‍यावह जाणं,रात्रीच्या अंधारात घराच्या अंगणातून बाहेर पडून घुबडांचे आवाज ऐकणं! मे महिन्याच्या शेवटी पावसाळ्याच्या आधी काजव्यांनी चमचमणारी झाडं डोळे भरुन पाहणं असं खूप खूप काही...
आई खूप सारा वेगवेगळा खाऊ सोबत नेत असे.जंगलात फारसं काही मिळत नसे आणि काही हवं असेल तर बाबा जीपने जवळच्या गावात जातील तेव्हा कुणा बरोबरतरी पिशव्या भरून पाठवत असत. अगदी फोनसुद्धा तिथे लागायचा नाही.त्यामुळे पुष्करला दोन्ही आजोबा आजींची आठवण आली तरी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप वाट पहावी लागे.मात्र तरीही तो जंगलात खुश असे.
यावर्षी बाबा जिथे होते तिथे त्यांची नुकतीच बदली झाली होती. बाबांची घरातली कामं करायला आणि स्वयंपाक करायला जंगलात राहणारी चिंधी नावाची आजी रोज येत असे. तिचा नातू गोलू तिच्याबरोबर एके दिवशी आला.पुष्करच्याच वयाचा. पुष्कर पाचवीत होता त्यामुळे तोही पाचवीतच असेल असं पुष्करला वाटलं. पण इथेच खरी गंमत होती.तो त्या जंगल परिसरातील वन निवासी असल्याने शाळेत जात नव्हता.. त्या मुलांना शाळा म्हणजे काय हे माहितीच नव्हतं!
चिंधी आजीला आईची भाषा बोलता येईना.बाबाची कामं ती खाणाखुणांनीच करीत असे.आणि आता गोलूसारखा सवंगडी मिळाला तरी भाषा कुठे येत होती त्यांना एकमेकांची???
मग पुष्कर आणि गोलूही खाणाखुणांनी बोलू लागले.
दोन दिवसानंतर चिंधीआजीशी जरा ओळख झाल्यावर आईने बाबाला विचारलं आणि बाबाच्या परवानगीने पुष्करला गोलूबरोबर जंगल उनाडायची परवानगी मिळवली.
चिंधीआजीने आपल्या गोंडी भाषेत गोलूला समजावलं आणि छानसं हसून पुष्करच्या गालावर हात फिरवून आपल्या कानांपाशी बोटं मोडली.आता गोलू आणि पुष्कर जंगल वाचायला बाहेर पडले.
गोलूला हे जंगलाचं अख्खं पुस्तक पाठ होतं.झाड आणि झाड, पक्षी आणि पक्षी त्याला ओळखू येत असत.झरे,निर्झर अगदी उन्हाळ्यातही कसे झुळूझुळू वाहतात हे पाहून पुष्करला आश्चर्यच वाटलं.
प्राण्यांची जंछलात पडलेली विष्ठा, पिसं, प्राण्यांच्या पावलांचे जंगलवाटांवर उमटलेले ठसे असं सगळं सगळं गोलू पुष्करला दाखवत होता.
चारेक दिवसांनी पुष्करने आईकडे तिचा मोबाईल मागितला... गेम खेळण्यासाठी नाही... जंगलात पाहिलेल्या गोष्टी टिपण्यासाठी. नोंदवून ठेवण्यासाठी.आईनेही  तो काळजीपूर्वक वापरायला सांगून त्याला दिला आणि तो फोन पाहून गोलूही हरखून गेला.
गोलू आणि पुष्कर रोज भटकायचे. गोलू जंगलातला मेवा पुष्करला खायला देई.कशाचीतरी गोडूस रसाची पान,करवंद,जमिनीखालचे उकरलेले कंद, फुलांच्या देठातील चोखलेला गोड रस असं सगळं पुष्कर खायला शिकला.नवनवीन बिस्कीटं,चाॅकलेटं असं आता पुष्करही गोलूला द्यायला लागला.
पुष्करला आणि गोलूला खाणाखुणांनी बोलता यायला लागलच पण आता पंधरा दिवसाच्या ओळखीत गोलू मराठीचे पाच सहा शब्द आणि पुष्कर गोंडीमधले तीन चार शब्द बोलायला शिकले!!
गोलूने पुष्करला जंगल दाखवलं तसंच पुष्करनेही गोलूला आपली बरोबर आणलेली पुस्तकं दाखवली, खेळ खेळायला शिकवले.त्या दोघांची छान गट्टीच जमली.
एकीकडे पुष्कर आणि गोलू यांनी एके दिवशी चक्क दिवसा झाडीच्या ढोलीत बसलेलं घुबडाचं पिलू पाहिलं. दिवसाढवळ्या दिसलेलं घुबडाचं चक्क गोंडस पिलू पाहून पुष्करने त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडीओ काढले. घुबड आईला आणि पिलूला कोणतीही चाहूल लागणार नाही आणि त्रासही होणार नाही याची काळजी गोलूने घेतली.
घरी परतल्यावर बाबाला पुष्करने नेहमीप्रमाणे दिवसभराचा वृतान्त सांगितला जेवताना आणि फोटोही दाखवले.
हे घुबड????? अरे हे कुठे दिसलं??? चल आत्ता लगेच जाऊया... दाखव मला...
पुष्करला कळेना की बाबा इतका का घाई करतो आहे?????
बाबाने जीप काढली आणि पुष्करला घेऊन तो निघाला. अंधारात पुष्करला रस्ता दाखवताना थोडा प्रश्न पडला पण बाबाला त्याने खाणाखुणा सांगत रस्ता सुचवला.बाबालाही कौतुक वाटलं!! बाबाने मनोमन गोलूलाही शाबासकी दिली.
बाबाने त्या घुबडाचा आवाज ऐकला आणि बाबाचे डोळे लकाकले!!!
कोणत्यातरी आनंदातच बाबा परतला आणि त्याने पुष्करला पातीवर थाप मारून दोन हात उंच करून टाळी दिली!!
दुसर्‍या दिवशी गोलू येईपर्यंत बाबा घरीच थांबला. वनाधिकारी साहेब आपल्याशी काय बोलणार या कल्पनेने गोलू भांबावलाच पण पुष्करने त्याला विश्वास दिला.
गोलूच्या खाणाखुणा पुष्करला नीट समजायला लागल्या होत्या.बाबाचे त्या घुबडाच्या पिलाबद्दलचे सर्व प्रश्न पुष्करने गोलूला विचारले आणि गोलूची उत्तरे पुष्करने बाबाला समजावून सांगितली. चिंधीआजीपण मधे काही काही सांगत राहिली.आईने हे सर्व दृश्यही चित्रित केलं... कौतुकाने आणि गंमतीने.
संध्याकाळी बाबाच्या टीममधले अजून चार काका घरी आले. पक्ष्यांचे आवाज रेकाॅर्ड करायला यंत्र, पक्ष्यांचे फोटो काढणारा विशेषज्ञ अशी ती मंडळी होती. चिंधी आजीचा मुलगा म्हश्या म्हणजे गोलूचा बाबा आज गोलूला घेऊन आला संध्याकाळीपण.
हे सगळे गोलू आणि पुष्करसह निघाले त्या घुबडाच्या पिलूला शोधायला.
रात्रभर शोधमोहीम झाली. पुष्कर हे जंगल असं रात्री पहिल्यांदाच अनुभवीत होता. या घुबडाच इतकं काय काय कौतुक का चाललय हे मात्र त्याला आणि गोलूला कळेना. कधीतरी मध्यरात्री जीपमधेच दोघे लुडकले.
दोन तीन दिवसांनी आईची आवराआवरी सुरु झाली.गोलू आणि त्याचं हे जंगल सोडायला पुष्करला जीवावर आलं होतं. पण बाबाने खुशखबर दिली की गोलूपण काही दिवस त्याच्याबरोबर पुण्याला येणार आहे!!! पण फक्त काही दिवसच!!
पुण्याला आल्याआल्या पुष्करने इंटरनेट सुरु केलं.गोलूला शेजारी बसवलं आणि तहानभूक विसरून तो त्या घूबडाबद्दल शोधू लागला माहिती!!!
अरेच्चा!!! वनखाते आणि एकूणच महाराष्टातील पक्षी अभ्यासक गेली दहा वर्ष ज्या घुबडाच्या प्रजातीला शोधत होते त्या प्रजातीचं पिलू या दुक्कलीला सहजी दिसलं होतं. ही प्रजाती नामशेष होण्याची भीती अभ्यासक आणि संशोधकांना वाटत असतानाच या दोघांनी आपल्या जंगल भटकंतीत हा आशेचा किरण नकळतच शोधला होता....
आपला आनंद गोलूला कसा सांगावा या आनंदात पुष्करने त्याला घट्ट मिठी मारली. नव्या जगात भेदरलेला गोलू मात्र या मिठीने सुखावला...
बाबाही पाठोपाठ पुण्याला आला.वनखात्याचा अहवाल तयार झाला.त्यामधे पुष्कर आणि गोलूच्या नावाची आवर्जून दखल घेतली गेली होती.
बाबाने आणि काही पक्षी अभ्यासक संस्थांनी एकत्रपणे एक पत्रकार परिषद घेतली. बाबाने शिकवल्याप्रमाणे गोलू आणि पुष्कर यांनी आधी घुबडाच्या पिलाचे दर्शन कसे झाले! त्याची गोष्ट सांगितली.त्यानतर बाबाने या प्रजातीविषयी माहिती सांगितली आणि तिच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी वनविभाग काय करेल तेही नोंदवले.
सर्वांसह झालेल्या सत्काराने गोलू आणि पुष्करर मात्र गोंधळूनच गेले. पूष्करच्या शाळेतही गोलू आला आणि तिथेही छोटी फिल्म बाबाने दाखवली.
होता होता गोलूची परत जायची वेळ आली.बाबाच त्याला घेऊन जाणार होता.
पुष्करच्या आईने गोलू आणि पुष्करच्या फोटोसह त्या घुबडाच्या पिलूच्या फोटोचं कोलाज केलं आणि एक फ्रेम गोलूला भेट दिली. दिवाळीच्या सुट्टीत शेवटचा पेपर झाला की लग्गेच येतो तुझ्याकडे असं म्हणत पुष्करने गोलूचा निरोप घेतला.
दिवाळीच्या सुट्टीत ते दोघे जाणीवपूर्वक जंगल फिरणार आहेत आणि नवं काही शोधणार आहेत...
आपण पण जाऊया का दोघांबरोबर जंछल फिरायला आणि रोज  नवं दिसणार जंगल पुस्तक वाचायला,..