स्वररत्न-- लता मंगेशकर Aaryaa Joshi द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वररत्न-- लता मंगेशकर


लता मंगेशकर... भारतातच नाही तर संपूर्ण जगाला हे नाव उच्चारल्यावर लतादीदींनी गायलेलं कोणतं ना कोणतं मधुर गाणं ऐकू यायला लागतं. जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असलेलं हे नाव. मराठी, हिंदी आणि अन्य ३६ भारतीय भाषेत तसेच परदेशी जगतात पार्श्वगायन करून लतादीदी यांनी आपल्या चाहत्यांचा स्वतंत्र वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना “भारतरत्न" हा सर्वोच्च किताबही बहाल केला आहे.

सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गानकोकिळेचा हा प्रवास.... आयुष्यातील कृतार्थता आणि लोकप्रियता अनुभविण्यापूर्वी लहान वयातच झालेल्या आघाताने लतादीदी यांचं आयुष्य बदलून गेलं.

आपल्या वडिलांचा सांगीतिक वारसा समृद्ध करीत आणि सांभाळीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पाचही मुलांनी कुटुंबाचे नाव उजळून टाकले आणि याचे श्रेय लतादीदी यांना जाते.


बालपण-

गोव्याच्या निसर्गसम्पन्न भूमीत श्री मंगेशीचा आशीर्वाद लाभलेल्या कुटुंबात; २८ सप्टेंबर १९२९ ला लता मंगेशकर यांचा जन्म इंदोर येथे झाला. लतादीदी यांचे आजोबा गोव्यातील मंगेशी मंदिरात देवाला अभिषेक करीत असत. लता मंगेशकर यांचे वडिल मास्टर दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आणि संगीत रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांची आई गुजराथी होती.

त्यांचे कुटुंबाचे मूळ आडनाव हर्डीकर होते पण दीनानाथ यांनी आपल्या गावाच्या मूळ आठवणीवरून आपले आडनाव “मंगेशकर” असे बदलून घेतले.

लता यांचे मूळ जन्मनाव हेमा असे होते पण कालांतराने ते भावबंधन नाटकातील पात्रावरून लतिका असे ठेवण्यात आले. लतादीदी या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या. त्यांच्यानंतर मीना,आशा, उषा आणि हृदयनाथ ही चार भावंडे. या पाचही मंगेशकर भावंडांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

संगीत रंगभूमीवर दीनानाथ यांची कारकीर्द बहरली.दीनानाथ यांच्या संगीतामुळे आणि लोकप्रियतेमुळे मंगेशकर कुटुंब समृद्धी अनुभवीत होते. लहानग्या लताने वयाच्या पाचव्या वर्षीच आपलया वडिलांकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. दीनानाथ यांनी आपल्या शिष्याला गाणे शिकविताना लता ऐकत असे. एकदा त्यांचा एक शिष्य गाताना चुकत आहे हे लक्षात आल्यावर छोट्या लताने त्याला बरोबर काय ते गाऊन दाखविले आणि त्यामुळे दीनानाथ यांना आपल्या मुलीची संगीताची जाण आणि समज लक्षात आल्यावर ते थक्क झाले.

बालपणातील कौटुंबिक धक्का-

लतादीदी १३ वर्षाच्या असताना १९४२ साली दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लहान भावंडे आणि आई यांच्यासह लता यांच्यावर झालेला हा आघात मोठा होता. या काळात नवयुग चित्रपट कंपनीचे मास्टर विनायक यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. असे असले तरी मोठी बहीण या नात्याने कुटुंबाची जबाबदारी अवघ्या तेराव्या वर्षी लतादीदी यांच्यावर आली. वडिलांकडे शिकलेले गायन ही त्यांची जमेची बाजू होती.

‘किती हसाल’ या चित्रपटासाठी लताने पहिले गाणे गायले पण ते नंतर चित्रपटातून वगळण्यात आले. त्यानंतर ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटात लताने पहिले गाणे गायले-नटली चैत्राची नवलाई...

मराठी चित्रपटात १९४३ साली लताने ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू’ .. हे पहिले हिंदी गीत गायले.. चित्रपट होता गजाभाऊ.


शास्त्रीय गायनाचे पुढील शिक्षण-

मास्टर विनायक यांची चित्रपट कंपनी मुंबईला आल्यावर मंगेशकर कुटुंबीयही मुंबईत आले.त्यानंतर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमन आली खान यांच्याकडे लताचे पुढील शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरु झाले.याकाळात लताने चित्रपटांसाठी गायन केलेच पण बहीण आशा हिच्यासह ‘बड़ी माँ’ चित्रपटात छोटी भूमिकाही केली.

१९४८ साली शशधर मुखर्जी यांच्याशी लताचा परिचय गुलाम हैदर यांनी करून दिला. परंतु लताचा आवाजाचा पोत हा पातळ असल्याने तिला नाकारले गेले होते. परंतु मजबूर चित्रपटासाठी गुलाम हैदर यांनीच लताला पार्श्वगायनाची संधी दिली आणि त्या गाण्याने लोकप्रियता मिळविली.


उर्दू कवींनी रचलेली हिंदी गीते म्हणताना लता यांचे मराठी उच्चार बदलावेत आणि उर्दू व हिंदीला न्याय दिला जावा म्हणून लतादीदी कालांतराने उर्दू भाषाही शिकल्या!


हिंदी चित्रपटातील गीतांचा बहर-

१९४९ मध्ये ‘महाल’ चित्रपटात मधुबाला यांच्यावर चित्रित झालेले आणि लता याने गायलेले प्रसिद्ध गात म्हणजे ‘आयेगा आनेवाला’....


१९५० च्या दशकात लता यांनी नौशाद, शंकर जयकिशन, अनिल विश्वास ,कल्याणजी-आनंदजी, सी. रामचंद्र, मदन मोहन, सलील चौधरी, खय्याम यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकासह काम केले आणि सुंदर सुंदर गाणी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिली.

एस. डी. बर्मन यांनी लता यांच्याकडून उत्तम गाणी गाऊन घेतली पण काही कारणाने १९६२ पर्यंत लता यांनी त्यांच्यासह काम करणे थांबविले होते.

१९५८ साली लतादीदी यांनी मधुमती या चित्रपटातील सलील चौधरी यांनी संगीत दिलेल्या “आजा रे परदेसी” चित्रपटासाठी महिला पार्श्वगायिका म्हणून पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनारकली, अलबेला, देख कबीरा रोया अहा चित्रपटातून त्यांची सांगीतिक कारकीर्द बहरू लागली.

साठच्या दशकात लता यांनी मुघल- ए-आझम या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या' हे गीत गायले. हा चित्रपट अमाप लोकप्रिय झालाच पर हे गीत विशेष करून प्रेक्षकांची मने जिंकून गेले.

“अल्ला तेरो नाम’ हे सुमधुर भजन आणि ‘प्रभु तेरो नाम’ ही दोन भजने लता यांनी गायली. अल्ला तेरो मधील आर्तता आणि भक्तिभाव रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यानंतर या ‘बीस साल बाद’ चित्रपटासाठी हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘कही दीप जलें कही दिल’... गीतासाठी लता यांनी आपला दुसरा फिल्म फेअर पुरस्कार मिळविला.

१९६२ मध्ये लतादीदी यांनी एका गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर १९६३ साल भारतीयांसाठी देशप्रेम आणि देशासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांची आठवण करून देणारे आले... १९६३ मध्ये लतादीदी ए मेरे वतन के लोगों हे गीत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर कार्यक्रमात गायल्या. ते ऐकून पंडित नेहरू हेलावून गेलेच आपण हे गीत ऐकताना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात क्षणभर अस्वस्थता नक्की येते.कवी प्रदीप यांचे शब्द, सी. रामचंद्र यांचं भिडणार संगीत आणि लतादीदी यांचा स्वर्गीय आवाज असा त्रिवेणी संगम या देशभक्तीला लाभला आहे.

सहगायकांच्या साथीने-

व्यक्तिगत गीतांच्या जोडीने लता यांची युगुलगीतेही गाजली. त्यातील एक नाव म्हणजे किशोर कुमार. किशोरदा यांच्या गायनाचा आणि व्यक्तिमत्वाचा , अभिनयाचा ठसा हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करून गेलाच पण लतादीदी यांचासह त्यांचा असलेला भावबंध आणि एकत्र गायलेली गीते हा लतादीदी यांचा ठेवा बनला आहे. गाता रहे मेरा दिल, आज फिर जिने की तमन्ना है या गीतांनी रसिकांना आनंद दिला.मन्ना डे, महेंद्र कपूर, मुकेश,मोहम्मद रफी यांच्यासह गायलेली लतादीदी यांची हळुवार आणि तरल हिंदी चित्रपट गीते; आजच्या उडत्या गीतांच्या आणि वाद्यांचा गोंगाट असलेल्या काळातही तरुण पिढीला आनंद देऊन जातात नव्हे आवर्जून ऐकली जातात. लक्ष्मीकांत- प्यारेलाल या संगीतकार जोडीच्या सह लतादीदी गायल्या आहेत आणि या तिघांच्या एकत्र काम करण्यातून उत्तमोत्तम गीते तयार झाली आहेत.

लतादीदी यांच्या जादूई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले, पण त्यामागे लतादीदी यांचे सांगीतिक परिश्रम आहेत. लहानपणापासून वडिलांकडे आणि गुरूंकडे शिकलेल्या शास्त्रीय संगीताची दैवी परंपरा त्यामागे आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.


१९७३ साली आर. डी. बर्मन यांच्या “बिती ना बिताई रैना’ या परिचय या चित्रपटातील गीतासाठी लता यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय सर्वोत्तम महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.


चित्रपटांच्या पलीकडील सांगीतिक जगात-


लातादीदी चित्रपटांसाठी गात असतानाच सत्तरच्या दशकात त्यांनी संगीताचे जाहीर कार्यक्रमही करायला सुरुवात केली. या कार्यक्रमांनाही अर्थातच अमाप लोकप्रियता मिळाली.लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल या ठिकाणी त्यांचा असा पहिला कार्यक्रम झाला.

सुरांशी नाते जडलेल्या कलाकाराला एक विशिष्ट चौकट बांधून घालू शकत नाही. लतादीदी ही याला अपवाद नाहीत. हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीने त्यांनी स्वतंत्र सांगीतिक ध्वनिफितीही आपल्या आवाजाने समृद्ध केल्या. मीराबाईची भजने, गालिबच्या गझल, मराठी कोळीगीते तसेच प्रसिद्ध मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा अभंग तुकयाचे... अशा वैविध्यपूर्ण गीतप्रकारांसाठी लतादीदी गायल्या आहेत. या ध्वनिफितीही लोकप्रिय झाल्या.


पिढयांवर सुरेल अधिराज्य-


लतादीदी गेली अनेक दशके गात आहेत. संगीतकारांच्या दोन-तीन पिढयांसाठी त्या गायल्या आहेत हे त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे वैशिष्ट्य सांगता येईल.

१९८० च्या दशकात लतादीदी ; शिव-हरी, रामलक्ष्मण, रवींद्र जैन , इलायराजा या संगीतकारांसह गायल्या आहेत. तर १९९० मध्ये नदीम-श्रवण, आनंद- मिलींद, जतीन-ललित या त्यावेळच्या तरुण संगीतकार जोड्यांसह, ए. आर. रहमान यांच्यासह ही लतादीदी चित्रपटगीते गायल्या आहेत., सोनू निगम,कुमार सानू, बाल सुब्रह्मण्यम, गुरुदास मान या त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या गायकांसह त्या गायल्या आहेत. अशी संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे आणि लताजी यांच्याकडून खूप शिकायलाही मिळाले असे या तरुण गायकांनी नोंदविले आहे.


१९४०-५० च्या दशकात गायक, वादक यांना एकत्रच गावे लागे, १९९० च्या दशकात ट्रॅक पद्धती सारखी नवी तंत्रे विकसित झाली. हे बदलही लतादीदी यांनी जवळून अनुभवले आहेत.


संगीतकाराची “गायिका”-

प्रत्येक संगीतकाराचे स्वतःचे वैशिष्ट्य असते, त्याचे प्रत्येक गाणे त्याच्यासाठी विशेष असते. अशावेळी गीतकार आणि संगीतकार यांच्या मनातील त्या त्या गीताची आणि चालीची कल्पना समजून घेऊन ते गाणे रसिकांपुढे सादर करणे ही कलाकाराची कसोटीच असते. १९४० पासून २००० पर्यंत लतादीदी ही परंपरा समर्थपणे पेलीत आहेत. त्या प्रत्येक गाण्यातून गायिका म्हणून त्यांनी स्वतःची ओळखही सांभाळली आहे.


१९९० च्या दशकात चांदनी, लमहें, झुबेदा, दिल से, हम आपके है कौन हे त्यांचे चित्रपटही विशेष गाजले. मधुबाला, मीनाकुमारी यापासून माधुरी दीक्षित पर्यंतच्या नायिकांच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्वाला साजेसा आवाज देणे हे लतादीदीच करू शकतात !

श्रद्धांजली- एक अनुभव

आपण ज्या ज्या संगीतकार किंवा गायकांसह गायलो; अशा दिवंगत गायकांना लताजी यांनी आपल्या गायनातून वाहिलेली ही श्रद्धांजली होती. सेहगल, हेमंत कुमार, किशोरदा, पंकज मलिक, गीता दत्त यांच्या आठवणी सांगत आणि त्यांची गाणी स्वतः गात ही श्रद्धांजली वाहिली गेला आहे. एक विशेष सांगीतिक अनुभव देणारा हा प्रयोग श्रोत्यांना भावला नसेल तर नवल !


मराठी चित्रपट-

हिंदी चित्रपट सृष्टीतील अढळ स्थानाच्या जोडीनेच लतादीदी यांनी मराठी चित्रपटसृष्टीही उजळून टाकली. अयोध्येचा राजा, अवघाची संसार, अमर भूपाळी पासून सुवासिनी पर्यंत तसेच झुलतो बाई रास झुला... राजसा जवळी जरा बसा... अशी ही यादी न संपणारी आहे. प्रेमा काय देऊ तुला... पासून ‘कळले तुला काही’... अफाट लोकप्रियता लाभलेली लताजी यांची मराठी गाणी अजरामर आहेत.


श्रीनिवास खळे, यशवंत देव, सुधीर फडके, श्रीधर फडके असे संगीतकार आणि पंडित भीमसेन जोशी, सुरेश वाडकर यांच्यासह गायलेली मराठी भावगीते, लोकगीते, भक्तीगीते असाही एक समृद्ध खजिना लता मंगेशकर यांनी मराठी रसिकांसाठी खुला करून दिला आहे.

आसामी, मल्याळी, मैथिली अशा विविध भारतीय भाषा लताजींच्या आवाजाने सजल्या आहेत.


अनांदघन बरसला--

पार्श्वगायिका म्हणून स्वतःला सिद्ध करीत असतानाच “आनंदघन’ असे नाव घेऊन लताजी यांनी संगीतकार म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख जगाला दिली आहे.

राम राम पावन, मराठा तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा हे तयांचे संगीतकार म्हणून गाजलेले १९६०-७० च्या दशकातील मराठी चित्रपट. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून साधी माणसं या चित्रपटातील गीतांसाठी लतादीदी यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.


निर्मिती क्षेत्रात- वादळ हा मराठी चित्रपट आणि लेकीन हा हिंदी चित्रपट यांची निर्मिती लतादीदी यांनी केली आहे.


पुरस्कार व सन्मान-


साठ -सत्तर वर्षे सलग संगीत क्षेत्रातील कंठमणी ठरलेल्या लता मंगेशकर यांचा भारत सरकारने २००१ साली सर्वोच्च “भारत रत्न” पुरस्कार देऊन गौरव केला. हा लतादीदी यांचा गौरव नसून त्या पुरस्काराचाच गौरव आहे असेही याबद्दल त्यांचे चाहते आदराने आणि प्रेमाने म्हणतात.
१९९९ साली पद्म विभूषण, १९९७ साली महाराष्ट्र भूषण, १९९९ साली नेशनल अवोर्ड,१९९३ साली फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार अशी पुरस्कार आणि सन्मानाची न संपणारी यादी आहे.
मध्ये प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली आहे.

French Legion of Honour हा फ्रान्स सरकारचा बहुमान लता मंगेशकर यांना मिळाला आहे.

२०१२ साली लता मंगेशकर यांचे नाव The Greatest Indian poll च्या यादीत समाविष्ट झाले आहे.

सत्तर वर्षात २५,००० होऊन अधिक लोकप्रिय गाणी गायलेल्या लताजी आपले व्यक्तिगत छंद जोपासून आहेत. उंची अत्तरे आणि पैलूदार हिरे यांच्या त्या विशेष चाहत्या आहेत. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आणि छायाचित्रण करणे हा लतादीदी यांचा विशेष आवडता छंद आहे.


वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाचा सर्व व्याप लहान वयातच सांभाळला आहे. आशा भोसले , उषा मंगेशकर , मीना खडीकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या पाच कलाकार बंधू- भगिनी यांचे संगीत क्षेत्राला दिलेले योगदान लक्षणीय आहे.


लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन च्या माध्यमातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारले गेले आहे. अनेक संस्थांना निधी मिळवून देण्यासाठी लता मंगेशकर यांनी संगीताचे खुले कार्यक्रम करून निधी संकलन करून दिले आहे.


आयुष्यभर अविवाहित असूनही कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे लतादीदी यांचे व्यक्तिमत्व. सुरेल गळ्याची जोड आणि वडिलांचा सांगीतिक वारसा सांभाळत लता मंगेशकर हे नाव भारताचाच नव्हे तर जगाच्या सांगीतिक इतिहासात अजरामर झाले आहे. ध्रुवता-यासारखे अढळपद आपल्या कष्टातून मिळविणा-या आणि परिवारालाही समृद्ध आयुष्य मिळवून दिलेल्या लता मंगेशकर यांचा हा जीवनप्रवास.

दूरवरून येणारी लता दीदी यांनी गायलेल्या कोणत्याही गाण्याची धून पुढील अनेक पिढ्यानपिढ्या आनंदित करीत राहील....