अशीही मकरसंक्रांत Aaryaa Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अशीही मकरसंक्रांत

हर्षदा आज फारच अस्वस्थ होती. तिचा मोठा भाऊ पियुषदादा सैन्यात अधिकारी होता... त्याची तिला फार आठवण येत होती.
सीमेवर नव्हता.. शांततेच्या ठिकाणी होता तो तरीही त्याला सुट्टी मिळणं तसं सध्या कठीण होतं. दादाला तिळगूळ,गुळाची पोळी,तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी किती आवडते नं!
आत्ताशी जानेवारी सुरु झाला आहे.दादाचा पत्ता आहेच.राखी पाठवतो तसं तिळगूळही पाठवूया का???
ती कल्पना हर्षदाने आईला बोलून दाखवली....
अग खरंतर एक वर्षाआड संक्रांतीला अनायासे सुट्टी मिळायची त्यामुळे यायचा तो नं.त्यामुळे मी कधी असा विचारच नव्हता केला...
आई मला वाटतय फक्त दादापुरता पाठवण्यापेक्षा सर्वांसाठीच पाठवला तर.... 
अग खुळे दोनएक हजार मंडळीतरी असतील तिथे.एवढ्यांचा तिळगूळ कसा जमेल आपल्याला दोघींना करायला????
थांब मी विचार करते.
तिला युक्ती सुचली.... तिने फेसबुकवर एक आवाहन पाठवल....
आपलं रक्षण करणार्‍या बांधवांसाठी तिळगूळ पाठविण्याची कल्पना.... तो तयारही आपणच करायचा आहे... साहित्याची जमवाजमव,तिळगूळ तयार करणं,तो पाठवणं हेही आपणच करायचं आहे.दादाचा संदर्भ या माध्यमावर कुठेही जाहीर न करता तिने आवाहन पाठवलं... सोबत जवानांचं आणि तिळगूळाचं चित्रही पाठवायला ती विसरली नाही....
तिला अर्ध्या तासात पन्नास मैत्रिणींकडून प्रतिसाद आला... व्हाॅटस् अप,टेलिग्राम सगळ्यावर संदेश गेले...त्यावरही पंचवीसएक प्रतिसाद आले.
सगळे तिच्या शहरातले होते असंही नाही.... काहीजणींनी म्हटलं होतं की आम्ही करतो आणि पाठवतो. पत्ता कळव.
तिने दादाला विचारलं आणि पत्ता कळवला.दादाने त्याच्या वरिष्ठ अधिकारी मित्राची परवानगी घेण्याचे औपचारिक सोपस्कारही पूर्ण केले.
हर्षदाच्या मैत्रिणीच्या काकांचा किराण्याचा व्यवसाय होता...त्यांनी तर शंभर किलो गूळ, तीळ हे विनामूल्य देऊ केलं...
हर्षदाच्या मित्राच्या ओळखीच्या काकांची डेअरी होती.तिथून दहा किलो तूप मिळालं..
हर्षदाने एका मंगल कार्यालयातून मोठी भांडी,शेगडी असं भाड्याने आणलं... त्या मालकाला हेतू सांगितल्यावर त्यानेही भाडं आकारलं नाही.
हर्षदाला हे कळलं की लोकांच्या मनात सैनिकांविषयी आदर जिव्हाळा आहेच, फक्त तो व्यक्त करण्यासाठी आपण त्याना योग्य माध्यम मिळवून द्यायला हवं. 
तिचा हुरूप आणखीनच वाढला...
अनेक ओळखीच्या लोकांनी तीळ आणि गुळाच्या पिशव्या आणून जमा करायला सुरुवात केली.हर्षदाच्या नातेवाईकांच्या जोडीनेच परिसरातील ओळखीचे लोक वेगवेगळ्या रूपात मदत देऊ लागले. ललवाणी काकांनी आपल्या प्रशस्त बंगल्याखालचा मोकळा हाॅल तिळगूळ तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिला...
शहा काकू, मनप्रीत कौर काकू एवढच नाही तर तन्वीरची आजीही आली तिळगूळ करायला...
हर्षदाचे काॅलेज बुडणार होतेच पण तिला त्याची फिकीर नव्हती...
पहिल्या दहा पराती भरून वड्या झाल्या... आणखी झाल्या....
ज्येष्ठ नागरीक संघ,गप्पा कट्टा कुठून कूठून लोक समजेल तसे सामील झाले...
रविवार पेठेतून होलसेलने पिशव्या,खोके आणणे दुपारच्या वेळेत वड्या त्यात भरणे,खोके बंद करणे असे उद्योग सुरु झाले.आपल्या लेकीच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद पाहून आईबाबाही हरखले...
एका तिळवण करणार्‍या हौशी काकूंनी तेवढ्या वेळात शंभर हलव्याच्या भिकबाळ्या करून त्याही अधिकारी वर्गासाठी पाठवायला पिशवीत भरल्या.काही विचारी काकू मंडळींनी लुटण्यासाठी प्लॅस्टिकच्या वस्तू घेण्यासाठी योजलेले पैसे हर्षदाला देऊ केले.
हर्षदाची मैत्रीण सानिका हे सगळं चित्रित करत होती. फेसबुकला फोटो पोस्ट होत होते...
पाहता पहाता हजार किलो तिळगूळ तयार.......
हर्षदाची झोपच उडली होती.... इतक्या कमी वेळात.....
दहा जानेवारीला बाबांनी आणि मित्रमंडळींनी ती खोकी टेम्पोतून पोस्टात नेली.तिथली प्रक्रिया पूर्ण करून स्पीड पोस्टने खोकी चौदा जानेवारीला सकाळी दादाकडे महूला पोचलीसुद्धा होती......
काही लहान मुलांनी ऊत्साहाने शुभेच्छापत्रही केलेली होती  ती ही पोचली... दादाचा आनंद त्याला शब्दात व्यक्त करता येत नव्हता....
त्या दिवशी विशेष परवानगी घेऊन हर्षदा आणि चार मैत्रिणी काळ्या साड्या नेसून पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल काॅलेजला जाऊन प्रत्यक्ष तिळगूळ देऊनही आल्या...
सानिकाने यूट्यूबला सुंदर व्हिडिओ अपलोड केला.माध्यमांनीही दखल घेतली. हर्षदा आर्म फोर्समधून आली ती थेट एका वाहिनीवर बाईट द्यायलाच गेली....
अशी संक्रांत यापूर्वी कधीच झाली नव्हती..... सर्वांना आनंद समाधान देणारी. सकारात्मक विचारांची आनंदाचं वाण लुटणारी संक्रांत....
महिन्याच्या शेवटी हर्षदासाठी अमेझाॅनवरून पार्सल आलं.दादाच्या मित्रांनी तिच्यासाठी सुंदर ड्रेस पाठवला होता आणि दादाने नवा कोरा मोबाईल......