मेघमल्हार आणि मारूबिहाग Aaryaa Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मेघमल्हार आणि मारूबिहाग



शीर्षक-मेघमल्हार आणि मारूबिहाग...
पहाटेची वेळ होती. मंदिराच्या गाभार्‍यात भाट भूपाळी गात होता. अहिर भैरवचे सूर उगवतीला काहीसे करूण तर काहीसे प्रसन्न करीत होते.
राजवाड्यातल्या समया केव्हाच विझू विझू झाल्या होत्या.
रात्रभरीच्या सुखाने ती उमलली होती. शीतल चांदण्यांच्या मंदशा आल्हादाने न्हाहून गेली होती. तो परवाच आला होता  शेजारच्या राज्याच्या सीमेवर युद्ध जिंकून. त्याच्या स्फुरण पावणार्‍या बाहूंनी शत्रूला नेस्तनाबूत केलं होतं. त्याच्या धमन्यात सळसळणार्‍या रक्तानेच त्याला प्रेरणा दिली होती जिंकण्याची. आपल्या राज्याच्या सुखासाठी झटणारा तो उमदा राजा आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी,त्याने स्वयंवरात पण जिंकून आणलेली त्याची राजकन्या नवपत्नी.
नव्या नवलाईच्या आणि तृप्त प्रजेच्या आकंठ सुखात ते दंग होते. तिच्या मोहनवीणा वादनाचे अलवार सूर त्याच्या कानी पडत. हास्यविनोदात आणि सारीपाटात दोघेही रमून जात. तिच्या कलासक्त आरस्पानी सौंदर्याची आणि त्याच्या निधड्या पौरूषाची  युती म्हणजेच त्यांचं अलौकिक प्रेम.
एके रात्री मोठ्या महाराजांनी त्याला बोलावून घेतलं आणि पलीकडच्या राज्यातून दूताने आणलेली बातमी सांगितली. ती ऐकताच त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.कानशीलं तापली. बाहू स्फुरण पावू लागले. पलीकडच्या राज्यातला राजा प्रजेची काळजी घेण्याऐवजी आपल्याच प्रजेतील महिलांवर अत्याचार करू लागला होता. त्याच्या पौरूषत्वाची भूक शमविण्यासाठी नाजूक कळ्याही खुडू लागला होता. त्यांचे पती आणि पिता,बंधू नाईलाजाने आणि उघड्या पण थंड डोळ्यांनी हे केवळ पाहत होते.....

महालात प्रिया त्याची वाट पाहत होती. पण आता तिच्या बाहूपाशात रमणार्‍या  त्याच्या बाहूंना  ओढ लागली होती आपल्या अबला भगिनींना क्रूर राजाच्या अत्याचारी बाहुंच्या विळख्यातून सोडविण्याची!
तीही शहाणी होती. आपल्या पतीची आकांक्षा तिने मनानेच जाणली. आरतीचं ताट घेऊन प्रसन्न मुखाने तिने त्याच्या भाळी मंगलतिलक लावला आणि त्याला प्रेमाने आलिंगन देऊन निरोप दिला.
घोड्यांच्या टापांनी आणि खिंकाळ्यांनी राजप्रासाद आणि परिसर दूमदूमून गेला......
तो गेला आणि हिच्या रात्री सुन्या झाल्या. पिंजर्‍यातली मैनाही जणू मूक झाली होती. समईच्या अत्तरी सुगंधातील तेलाच्या ज्योतीही फरफरायच्या आणि शांतावायच्या!!!
तिची मोहनवीणाच तिची साथीदार. राजप्रासादातल्या प्रसन्न कृष्णमूर्तीसमोर बसून ती वादन करीत राही. पतीच्या विरहातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करी. गळ्यात गच्च सुगंधी रंगीत फुलांची माला ल्यायलेला कृष्णसखाही तिच्या वादनाने आनंदून जाई. त्यालाही जणू मोह होई आपल्या हातातल्या पाव्याला ओठावर घेऊन तिच्यावर फुंकर घालण्याचा! पण मनमोहनही जाणत होता सारं. यावेळी बासरीची धून छेडायची नसून शंभर अपराध भरलेल्या शिशुपालाचं मस्तक धडावेगळं करण्यासाठी हाती सुदर्शन चक्र धारण करण्याची ही वेळ आहे हे तो पक्कं जाणून होता!
 
त्याचवेळी याने शत्रूराज्यात मुसंडी मारली. आपल्या सैन्याच्या जोडीनेच शत्रूराज्यातील पुरुषांच्या सामर्थ्यालाही त्याने हाक दिली.पुरुषच काय तर महिलाही आपला घुंगट सोडून शिरस्त्राण घालून सजल्या! याच्या केवळ तिथे जाण्यानेच शत्रूराज्यातील त्रस्त प्रजेला बळ मिळालं आणि सार्‍यांनी मिळून राजाविरूद्ध उठाव केला!!
आपल्या रंगमहालात एकावेळी अनेक युवतींना भोवती घेऊन राजा विलासात रमला होता. मदिरेने त्याला सुस्त केलं होतं.अशावेळी राजाचा सेनापतीही राजासारखाच मद्यधुंद असल्याने गाफिल राहिला आणि  याने तीच वेळ साधली.
आपल्या पाठिंब्याने शत्रू राजाच्या प्रजेलाच  त्याने अन्यायाविरुद्ध बंड करायला शिकवले. 
राजमहालावर चाल करुन आलेला तो आणि त्याचे सैन्य!!! हाहाकार उडाला! राजाच्या मंत्र्यांनी चातुर्य दाखवून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवलं आणि धुंद अवस्थेतील लोळत असलेल्या सेनापती शिवायच सैन्य समोरच्या सैन्यावर आणि आपल्याच प्रजेवर तुटून पडलं. रणधुमाळीला जोर चढला होता. शत्रूराजाचे सैन्य तुलनेने बलाढ्य होते. त्यामुळे तलवारींच्या पात्याच्या खणखणाटाने आणि घोड्यांच्या टापांनी परिसर गजबजून गेला. बलाढ्य सेनेचा शिताफीने पराभव करत उमदा राजा राजवाड्यात शिरला आणि त्याने आक्रंदत असलेल्या माता भगिनींची सुटका केली. त्यांच्या रडण्याच्या आवाजानेही परिसर करूण भासत होता. शौर्याने विकृतीवर मात केली होती. पराक्रमाने माता भगिनींची अस्मिता सांभाळली होती.... 
प्रजेतील एका जाणत्या आणि विद्याविभूषित  नवयुवकाला प्रजेचा कारभार काही काळ सोपवून आणि माता भगिनींच्या अब्रूवर मायेची शाल पांघरून तो आपल्या राज्यात परत आला. 
ती वाटच पाहत होती. चौघडे वाजले. दुंदुभी निनादल्या. पतीच्या आणि सैन्याच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ती सजली.
राजवाड्याच्या दारी तिने त्याचं स्वागत केलं.आपल्या परराज्यातील भगिनींना वाचविल्याबद्दल त्याच्या प्रजेतील सर्वच महिला हाती पंचारती घेऊन सज्ज झाल्या होत्या आपल्या सैन्याचे कौतुक करण्यासाठी!
हास्यविनोदात भोजने आटपली. दरबारात मानकर्‍यांचे मान करण्यात आले. धारातीर्थी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सहाय्यही पोचवलं गेलं कृतज्ञतापूर्वक!
आता महालात अत्तरी सुवासाच्या तेलातल्या समया उजळू लागल्या.
तिची मोहनवीणा छेडली गेली. त्याने महालात प्रवेश केला. तिचं लावण्य पुन्हा अनुभवून तो सुखावला.
कठोर कर्तव्याच्या कृतार्थतेतून तो आता हळव्या प्रेमाच्या उत्सुकतेत प्रवेशला होता. 
प्रासादातल्या मंदिरातल्या कृष्णाच्या हातातूनही सुदर्शन खाली विसावलं होतं. तोही मंद समयांच्या स्निग्ध उजेडात ओठावर पावा ठेऊन विचार करीत होता.... कोणती धून आळवू आता?
मेगघमल्हारचा  पराक्रमी रौद्र रस की प्रेमीजनांना आल्हादविणारा मारू बिहाग....
डाॅ.आर्या जोशी