Amitabh books and stories free download online pdf in Marathi

अमिताभ.... चित्र पट-एका बहुआयामी कलाकाराचा - अमिताभ.... चित्र पट- एका बहुआय


हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे- तारकांच्या यादीत अढळपद प्राप्त केलेले , हिंदी चित्रपटाचे “शहेनशहा” म्हणून आपल्या कर्तृत्वाने तळपणारे, “अँग्री यंग मॅन” ची आपली प्रतिमा गाजवत हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाव.... अर्थातच अमिताभ.... अमिताभ हरिवंशराय (श्रीवास्तव) बच्चन....


हिंदू अवधी कायस्थ कुटुंबात ,अलाहाबाद येथे ११ ऑक्टोबर १९४२ या दिवशी अमिताभ यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल प्रख्यात हिंदी कवी श्री. हरिवंशराय बच्चन. अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन या शीख कुटुंबातील असून सामजिक कार्यातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. हरिवंशराय यांचा “मधुशाला” हा हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवितासंग्रह असून हिंदी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कविमनाचे वडील आणि सामाजिक जाणीव असलेली आई यांचा सहवास अमिताभ यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला लाभला नसेल तर नवल....


अमिताभ यांचे मूळ नाव इन्कलाब असे ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी सुरु असलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्यिक वडिलांनी त्यांचे असे समयोचित नाव ठेवले खरे, पण नंतर प्रख्यात हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सूचनेनुसार ते “अमिताभ”असे बदलण्यात आले. मूळ आडनाव श्रीवास्तव असे असूनही त्यांचे वडील हरिवंशराय यांनी आपल्या लेखनासाठी “बच्चन” असे उपनाव घेतल्याने पुढे श्रीवास्तव ऐवजी तेच अधिक प्रसिद्ध झाले. सुविद्य आई- वडिलांचे अमिताभ हे पहिले अपत्य. अमिताभ यांना अजिताभ नावाचे लहान बंधू आहेत.


प्राथमिक शिक्षण-


हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अमिताभ यांचे शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज येथे निवासी राहून झाले. त्यानंतर त्यांनी किरोरीमल महाविद्यालयातून दिल्ली विद्यापीठाची कला शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर कोलकाता येथे त्यांनी काही काळ काम केले पण त्यांनतर मात्र वेगळ्या वाटेने प्रवास करण्याची दिशा त्यांनी ठरविली आणि चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी ते मुंबईत आले.


अमिताभ यांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीवर आई तेजी बच्चन यांच्या विचारांचा प्रभाव आहे. तेजी यांना रंगभूमी आणि अनुषंगिक विषयात रुची असल्याने हे वैचारिक संस्कार अमिताभ यांच्यावर झाले असावेत.


चित्रपट सृष्टीत पदार्पण-


अमिताभ यांनी १९६९ साली मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात प्रथम संवादक म्हणून काम केले आहे. त्यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांच्या “सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात अमिताभ यांनी आपली पहिली भूमिका केली. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही पण अमिताभ यांनी मात्र चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले.... आणि पुढील यशाचा प्रवास सुरु झाला...


राजेश खन्ना आणि अमिताभ यांचा गाजलेला चित्रपट “आनंद” १९७१ मध्ये प्रदर्शित झाला. आपल्या डॉकटरच्या भूमिकेत अमिताभ यांनी जीव ओतला आहे आणि उत्कृष्ट सहायक कलाकार असा पुरस्कारही या चित्रपटाने त्यांना मिळवून दिला. आपल्या रुग्णाला मृत्यू सामोरा येत असतानाही त्याचा उत्तम मित्र बनून त्याची जगण्याची लढाई अर्थपूर्ण करणारा; अमिताभ यांनी साकारलेला डॉकटर आणि राजेश खन्ना यांचा सहजसुंदर अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान ठरले.

त्यानंतर अमिताभ यांची भूमिकेची नकारात्मक छटा असणारा “परवाना” हा चित्रपट प्रदर्शित झाला. एक आतुर प्रियकर ते एक खुनी असा या भूमिकेचा प्रवास अमिताभ यांनी या चित्रपटात केला आहे. या पाठोपाठ रेशमा और शेरा, गुडडी, बॉम्बे टू गोवा हे चित्रपट आले. गुडडी या चित्रपटात अमिताभ यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. या काळात गुडडी चित्रपटाची नायिका असलेल्या जया भादुरी यांच्याशी त्यांचा भावबंध जुळला.

चित्रपट क्षेत्रात फारसे उत्तम यश अद्याप हाती आलेले नसल्याने अमिताभ यांचा चित्रपट सृष्टीत स्थिरावण्यासाठी संघर्ष चालूच राहिला.... कारण त्यांची भूमिका असलेल्या बारा चित्रपटांपैकी केवळ आनंद आणि बॉम्बे टू गोवा हे दोनच चित्रपट अमिताभ यांना यश देऊ शकले, अन्य चित्रपट यशस्वी होऊ शकले नाहीत.

कारकीर्दीच्या या विशिष्ट टप्प्यावर चाचपडत असतानाच १९७३-७४ साल अमिताभ यांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारं ठरलं. सलीम-जावेद ही जोडी “जंजीर’ या चित्रपटाची पटकथा लिहिण्यात गुंतलेली असतानाच एका तरुण - तडफदार नायकाच्या शोधत होती जो “अँग्री यंग मॅन” ची प्रतिमा पडद्यावर साकारू शकेल. चित्रपट सृष्टीत हळुवार प्रेमी नायक म्हणून प्रस्थापित असलेला चेहरा त्याना अपेक्षित नव्हता... त्यामुळे त्यांचा शोध सुरु असतानाच त्यांनी अमिताभ यांची निवड केली जी सार्थ ठरली ! प्रकाश मेहरा यांना सलीम जावेद यांनी खात्री पटवून दिली की अमिताभ हे या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी योग्य आहेत. गुन्ह्याभोवती फिरणारी हिंसक पटकथा असलेला हा चित्रपट युगुलप्रधान चित्रपटांच्या काळातही सरस ठरला आणि अमिताभ यांची “अँग्री यंग मॅन” ही नवी ओळख हिंदी चित्रपट सृष्टीला झाली !

“जंजीर” च्या अभूतपूर्व यशानंतर १९७५ साली सलीम जावेद यांचीच पटकथा संवाद असलेले दीवार आणि शोले हे चित्रपट झळकले. शोलेच्या यशाने हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व विक्रम मोडलेच, सहस्त्रकातील लक्षणीय चित्रपट म्हणून शोले या चित्रपटाची विशेष ओळख जगभरात आहे. या चित्रपटाच्या यशाच्या जोडीनेच अमिताभ यांच्या यशाचा आलेखही चढत गेला. त्रिशूल, काला पत्थर यासारखे चित्रपटही अमिताभ यांनी यशस्वी केले. १९७० साली समाजात विविध समस्यांनी त्रासलेल्या युवक वर्गाचे प्रतिनिधीत्व असलेल्या चित्रपटाच्या कथेतून “अँग्री यंग मॅन” ही ओळख अमिताभ यांनी सार्थ केली असे तत्कालीन वृत्तपत्रांनीही नोंदविलेले दिसते.

१९७३ साली जया भादुरी यांच्याशी अमिताभ यांचा विवाह झाला. या दोघांच्याही प्रमुख भूमिका असलेला “अभिमान” हा चित्रपट त्यानंतर लगेच प्रदर्शित झाला आणि त्यानेही मोठ्या प्रमाणावर यश मिळविले. !

जंजीर आणि हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलेला “नमक हराम’ या दोन चित्रपटांनी अमिताभ यांच्या अभिनयावर फिल्म फेअर पुरस्कारांची मोहोर उमटवली.

यशाचा आलेख उंचावत असतानाच अमिताभ यांनी कुंवारा बाप, दोस्त अशा चित्रपटातून पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली.


अभिनयाचा सुवर्णकाळ -

१९७५ ते १९८६ हा अमिताभ यांच्या चित्रपट कारकीर्दीचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. ‘चुपके चुपके’ सारखा हलकाफुलका आणि विनोदी मनोरंजन करणारा चित्रपट, ‘कभी कभी’ हा यश चोप्रा दिगदर्शित चित्रपट, अमिताभ यांची दुहेरी भूमिका असलेला ‘अदालत’ हा चित्रपट असे विविध चित्रपट अमिताभ यांच्यातील कलाकाराची ओळख करून देतात. कभी कभी चित्रपटातील भावुक हळवा कविमनाचा तरुण प्रियकर अमिताभ यांनी साकारला. ‘जंजीर’ मधील अँग्री यंग मॅन ची प्रतिमा पुसून हळव्या प्रियकराची भूमिका अमिताभ या चित्रपटात अक्षरशः जगले आहेत ! १९७७ साली आलेल्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट नायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. प्रकाश मेहरा, यश चोप्रा, मनमोहन देसाई यासारख्या दिग्दर्शक मंडळींच्या तालिमीत अमिताभ यांची कारकीर्द समृद्ध झाली. १९७८ साली अमिताभ यांचे मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन,कसमें वादे,गंगा की सोगन्द आणि बेशरम असे सहा चित्रपट झळकले. मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल या दोन चित्रपटांनी अमिताभ यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट नायकाचे नामांकनही मिळवून दिले.

१९७९ साली आलेल्या सुहाग चित्रपटांनी त्यावर्षी सर्वाधिक आर्थिक नफा मिळविला. मिस्टर नटवरलाल या चित्रपटात अमिताभ यांनी आपल्या गायकीचा परिचयही रसिकांना करून दिला. फिल्मफेअर पुरस्काराचे उत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचे नामांकनही अमिताभ यांना या चित्रपटामुळे मिळाले.

शान, सिलसिला, नसीब, लावरीस, राम बलराम, कालिया, याराना या चित्रपटांनी अमिताभ यांच्या यशात भर घातली.

१९८० च्या आसपास नमक हलाल आणि सत्ते पे सत्ता या चित्रपटांनी अमिताभ यांच्यातील “विनोदी अभिनेत्याचे” कौशल्यही चित्रपटसृष्टीसमोर आणले. कुली, अंधा कानून, शराबी या चित्रपटांनाही घवघवीत यश मिळाले.


अपघाताला सामोरे जाताना-

‘कुली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान अमिताभ यांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. या चित्रपटातील सर्व हिंसक दृश्यात बदली कलाकार न वापरता अमिताभ यांनी स्वतःच ही सर्व दृश्ये अभिनीत केली आहेत. मारामारीच्या दृश्याच्या चित्रीकरणात उडी मारताना टेबलाचा कोपरा अमिताभ यांच्या पोटात घुसला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तातडीने उपचार केल्यानंतरही अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून अमिताभ परत आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारकीर्दीच्या आलेखात ही घटना अमिताभ यांच्या आयुष्यात लक्षणीय ठरली आहे जिचा मोठा परिमाण अमिताभ यांच्यावर प्रेम करणा-या रसिकांच्या मनावरही झाला.

अमिताभ यांच्यावर या अपघाताचा शारीरिक आणि मानसिक आघातही झाला. काही काळ नकारात्मक अशी निराशा अमिताभ यांनी अनुभवली आणि चित्रपट सृष्टीचा निरोप घेण्याचा विचारही त्यांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. त्यांच्या असंख्य चाहत्यांना आणि हिंदी चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का होता !


या घटनेमुळे अमिताभ यांच्या चित्रपट कारकीर्दीला आणि आयुष्याला निराळं वळण मिळालं. चित्रपट संन्यास घेऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

अमिताभ यांचे वडिल हरिवंशराय आणि पंडित नेहरू यांचा विशेष परिचय होता. तेजी बच्चन आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही विशेष स्नेह होता. चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आपले मित्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पाठिंबा देण्याच्या हेतूने अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश केला असे म्हटले जाते. १९८४ साली अलाहाबाद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अमिताभ यांनी निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत बहुगुणा यांच्या विरोधात अमिताभ हे बहुमताने निवडून आले. तथापि राजकारण हे आपले क्षेत्र नव्हे असे म्हणत त्यांनी १९८७ साली राजकारणाचा निरोप घेतला. बोफोर्स तोफा प्रकरणाच्या चौकशीत अमिताभ यांच्यावरही आरोप करण्यात आले होते.


पुन्हा चित्रपटात-

१९८७ साली आपली मूळ आवड असलेल्या चित्रपटात “शहेनशहा” हे आपले नाव सार्थ करीत अमिताभ यांनी पुन्हा प्रवेश केला आणि हा चित्रपट यशस्वी झाला. असे असले तरी चित्रपट बारीत अमिताभ यांचे पुढील चित्रपट में आझाद हूँ.. , तुफान हे चमक दाखवू शकले नाहीत. अयशस्वी चित्रपटांची मालिका सुरु झालेली असतानाच १९९० सालच्या “अग्नीपथ” चित्रपटांनी मात्र अमिताभ यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला. माफिया जगतावर आधारित या चित्रपटाने सिनेरसिकांची मने जिंकली. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या “खुदा गवाह” चित्रपटानंतर मात्र अमिताभ हे पाच वर्ष चित्रपट जगतापासून लांब राहिले!


निर्मिती क्षेत्रात पाऊल-

अमिताभ यांनी १९९६ साली अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे ABCL ची स्थापना केली. चित्रपट निर्मिती, सीडी, केसेट यांची निर्मिती , सोहळ्यांचे व्यवस्थापन अशी कामे या संस्थेतर्फे केली गेली. १९९६ मध्ये या संस्थेने “तेरे मेरे सपने” या चित्रपटाची निर्मिती केली, या चित्रपटाला जेमतेम यशच मिळाले.


ABCL ही संस्था मात्र अमिताभ यांना यश देऊ शकली नाही. कायदेशीर बाबींच्या विळख्यात सापडून अमिताभ यांना पैसे उभारणीसाठी प्रसंगी स्वतःचे राहते घरही गहाण ठेवून पैसे उभे करावे लागले. या काळात त्यांचे मित्र अमर सिंह यांनी त्यांना केलेल्या मदतीमुळे काही काळ अमिताभ यांनी समाजवादी पक्षाचेही काम केले.

नव्वदच्या दशकात आलेल्या सूर्यवंशम, बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटांनी अमिताभ यांना मदतीचा हात दिला पण लाल बादशहा सारखे चित्रपट मात्र अयशस्वी ठरले.


अभिनय आणि व्यावसायिक जगतातील चढउतार अमिताभ यांनी या काळात अनुभवले आहेत.


२००० साल मात्र अमिताभ यांच्यासाठी वयानुरूप प्रगल्भ भूमिका घेऊन आले. मोह्ब्ब्ते या चित्रपटासाठी अमिताभ यांना उत्कृष्ट सहाययक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बागबान, कभी खुशी कभी गम या चित्रपटातही त्यांचा अभिनय खुललेला दिसून येतो.

या टप्प्यात अंध मुलीच्या शिक्षकाची भूमिका असलेला अमिताभ यांचा २००५ साली आलेला ‘ब्लॅक’ चित्रपट विशेष लक्षणीय आहे. रसिक आणि चित्रपट समीक्षक यांच्याकडून गौरव झालेली अमिताभ यांची ही भूमिका आणि त्यामुळे त्यांना मिळालेले पुरस्कार हा त्यांच्या कारकीर्दीचा महत्वाचा घटक आहे. चिनी कम हा अमिताभ यांच्या उतार वयातील एक हलकीफुलकी आणि निराळ्या धाटणीची भूमिका असलेला चित्रपट असो किंवा सरकार सारखा राजकीय डावपेचांवर आधारित असलेल्या नेत्याचे आयुष्य असो, “पा” सारखा थेट हृदयाला हात घालणारा विषय असो; अमिताभ यांनी या वैविध्यपूर्ण भूमिकांना वेळोवेळी न्याय दिला आहेच हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतेच.

मोहनलाल यांच्यासह केलेला मल्याळी चित्रपट, पिकू हा चित्रपट हे पाहिल्यावर अमिताभ यांच्या अभिनयाचा रसिकांच्या मनावर उमटलेला ठसा आजही कायम आहे याची साक्ष देतो. २०१६ साली आलेल्या पिंक या चित्रपटातील अमिताभ यांची वकिलाची भूमिका समीक्षक तेच वृत्तपत्रीय बातम्यांना आकर्षित करणारी ठरली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ठग ऑफ हिंदुस्तान” चित्रपटातही अमिताभ यांनी भूमिका आहे.

ट्विटर ने नोंदविल्याप्रमाणे अमिताभ यांच्या चित्रपट कारकीर्दीचे हे ४९ वे वर्ष आहे. अमिताभ यांच्यावर प्रेम करीत असलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांकडून पुढील वर्षी या कारकीर्दीची सुवर्ण महोत्सवी नोंद घेतली जाईलच.


गायक अमिताभ-

अभिनयाच्या जोडीनेच अमिताभ यांनी आपल्या चित्रपटात गाणीही गायली आहेत. गाणं असं म्हटलं की त्यात सुरेलता आलीच. पण अशी सुरेल गायकी अमिताभ यांच्या गाण्यातून अनुभवाला येत नसली तरीही त्यांचा गाण्यांचा स्वतंत्र श्रोतृवर्ग आहे. ही गाणे चित्रपटाच्या यशात भर घालतात आणि अमिताभ यांची एक वेगळी ओळखही जगाला करून देतात. उदाहरण द्यायचं झालंच तर सिलसिला चित्रपटातील “रंग बरसे” या त्यांनी गायलेल्या गीताने प्रसिद्धीची परिमाणे ओलांडली आहेत. लावारिस चित्रपटातील वेगवेगळ्या विनोदी पोशाखात सामोरे येत गायलेले “मेरे अंगने में” हे गाणं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ताल धरायला आणि नाचायला भाग पाडतच! नीला आस्मा सारखं हळुवार गीत असो किंवा ‘होली खेले रघुवीरा’.. सारखं उत्सवी ठेका धरायला लावणारं गाणं असो... अमिताभ यांनी प्रत्येक गाण्याच्या छटेला न्याय दिलेला आहे.

छोट्या पड्यावरचा करोडपती-

२००० साली आलेले Who Wants to Be a Millionaire? या ब्रिटिश दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमाचे भारतीय रूपांतर म्हणजे “कौन बनेगा करोडपती”. हातातली कामे बाजूला ठेवून अक्षरशः रसिकांनी या कार्यक्रमाला उचलून धरले आणि याचे कारण म्हणजे अर्थातच अमिताभ यांचे या कार्यक्रमाला लाभलेले सूत्रसंचालन आणि निवेदन. अमिताभ यांचा आवाज,प्रेक्षकांना आणि सहभागी स्पर्धकांना आपलेसे करण्याची हातोटी, कार्यक्रमाची उत्सुकता आणि रंजकता लीलया सांभाळणे, मनमोकळा संवाद ही सर्व अमिताभ यांची बलस्थाने यामुळे या कार्यक्रमाने कमी काळातच लोकप्रियता मिळविली. अमिताभ यांना भेटण्याचा प्रेक्षकांचा आनंद असो किंवा दूरभाषवर ऐकू आलेला अमितजींचा बुलंद आवाज असो, प्रेक्षक आणि श्रोते हरखून जात, प्रसंगी आनंदाने रडतही असत. पण या सर्व भावनांचा अमितजी यांनी पुरेपूर प्रामाणिक प्रतिसाद दिला आहे, ज्यातून त्यांच्यातील “माणूसपण” आणि आपलेपणा जपला जातो.

सोनी टीव्हीची २००९ साली आलेली बिग बॉस ही मालिकाही अमिताभ यांच्या सूत्रसंचालन आणि निवेदनाच्या सजली आहे, लोकप्रिय झाली आहे.


बुलंद आणि गहिरा आवाजा- निसर्गदत्त देणगी-

आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला अमिताभ हे आकाशवाणीवर आवाजाची चाचणी द्यायला गेले होते, पण त्यात त्यांची निवड झाली नाही!!! अपयश ही यशाची पहिली पायरी असते या न्यायाने त्यांच्या याच आवाजाची मोहिनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भुवन शोम, लगान, परिणीता, जोधा अकबर , रावण या चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीतासारखा अमिताभ यांचा निवेदकाचा आवाज रुंजी घालत राहतो, खिळवून ठेवतो. आपल्या वडिलांच्या काही निवडक कविता अमिताभ सादर करतात तेंव्हा त्यांच्या या दैवी देणगीचा प्रत्यय पुरेपूर अनुभवाला येतोच.


सामाजिक कार्य-

अभिनयाच्या जोडीनेच अमिताभ यांनी जबाबदार नागरिक या नात्याने सामाजिक कार्यातही योगदान दिले आहे. गरजू शेतकरी वर्गाला मदत असो, पोलिओ औषधाचा प्रसार असो, हरिवंशराय बच्चन ट्रस्टच्या माध्यमातून घराघरात सौर ऊर्जा पोचविणे असो.... अमिताभ यांची समाजाप्रती आस्था दिसून येते.

अन्य-

Just dial सारख्या व्यावसायिक संस्थांच्या मध्ये अमिताभ यांचा आर्थिक सहभाग आहे. विविध व्यावसायिक जाहिरातींमध्येही अमिताभ यांच्या भूमिका असतात.


अमिताभ यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याचा मोह लेखक, छायाचित्रकार यांनाही आवरलेला नाही. त्यातून निर्मिती झालेली ही काही पुस्तके-


Amitabh Bachchan: the Legend (१९९९),
To be or not to be: Amitabh Bachchan(२००४)
AB: The Legend (A Photographer's Tribute)(२००६)
अमिताभ बच्चन एक जीवित किवदंती- (२००६)]
Amitabh: The Making of a Superstar(२००६)
Looking for the Big B: Bollywood, Bachchan and Me(२००७)
Bachchanalia (२००९)

Soul Curry for you and me – An Empowering Philosophy That Can Enrich Your Life हे अमिताभ यांनी २००० साली स्वतः लिहिलेले पुस्तक आहे.

व्यक्ती म्हणून छंद जोपासताना-

अमिताभ हे सर्वाना अभिनेता म्हणून माहिती आहेतच. पण प्रत्येक माणसाला स्वतःच्या काही खास आवडी-निवडी असतात. तसंच अमिताभ यांच्या छंदात ब्लॉग लेखन हे महत्वाचे आहे. त्यांच्या लेखनाला भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

आपल्या वडिलांच्या कविता आपल्या दमदार आवाजात ते विविध कार्यक्रमातून आवर्जून सादर करीत असतात. क्रिकेट हा त्यांचा विशेष आवडीचा खेळ आहे. स्वतः अभिनेते असले तरी दिलीप कुमार आणि वहिदा रहमान यांचे ते चाहते आहेत. मोकळ्या वेळात बातम्या पाहणे आणि क्रीडा वाहिनी पाहणे अमिताभ यांना आवडते असे ते नोंदवतात.


दरवर्षी अमिताभ यांच्या वाढदिवसाला त्यांचे चाहते शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी गर्दी करतात. घराबाहेर जमलेल्या तुडुंब चाहत्यांचा स्नेह अनुभवायला अमिताभ स्वतः उपस्थित राहून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करतात.


हा “चित्र” पट न संपणारा आहे.... पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता नंदा, सून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि नातवंडे, धाकटे बंधू अजिताभ असा अमिताभ यांचा समृद्ध परिवार आहे. अभिनेत्री रेखा यांच्याशी असलेला भावबंध हा सर्वश्रुत असलेला अमिताभ यांच्या आयुष्यातील हळवा कोपरा...


केवळ भारतीय हिंदी चित्रपटच नव्हे तर विविध भारतीय भाषातील चित्रपट असोत, परदेशातील चित्रपट जगत असो, सहा फूट उंचीमुळे सुरुवातीला अभिनेता म्हणून नाकारला गेलेला एक सच्चा अभिनेता.... त्याचा हा प्रवास.... हा पट मोठा आहे.... तो इथेच संपत नाही.... कारण अमिताभ नावाचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजविणार आहे..

डॉ. आर्या जोशी


लेखनासाठी वापरलेले संदर्भ- पुस्तके, संकेतस्थळे इ.


१. Amitabh Bachchan: Reflections on a Star Image-Susmita Dasgupta

२. Amitabh The Making of a Superstar- Susmita Dasgupta


3. The Amitabh Bachchan Handbook - Everything you need to know about Amitabh Bachchan- Emily Smith


४. https://www.imdb.com/name/nm0000821/


५. . https://timesofindia.indiatimes.com/topic/Amitabh-Bachchan

६. . https://en.wikipedia.org/wiki/Amitabh_Bachchan


७. . https://www.biography.com/people/amitabh-bachchan-20950371


८.https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/photo-features/throwback-when-arjun-kapoor-got-bored-at-uncle-sanjay-kapoors-wedding/photostory/64519611.cms

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED