बलात्कार Sonal Sunanda Shreedhar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बलात्कार

.
तुम्हीच सुचवा कथा वाचून कि, कथेला शिर्षक काय देऊ? Comments box मध्ये.
ही कथा एका खेड्यागावात शिकणार्‍या शाली नावाच्या मुलीची आहे. यामध्ये घरातील आणि शेजारीपाजारी असणाऱ्या आपल्या वाटणार्‍या लोकांची नजर न् त्याची किळसवाणी वागणूक........ 







शाली शाळेतून घरी आली. अन् आईला पाणावलेल्या डोळ्यांना पुसत पुसत 
काय असतंय बाईच्या शरीरात? शरीरासारख शरीर असतयं ना व आये., 
मंग माणसं काहून अस वंगाळ बघत्यात?
नाक डोळे पुसत हुंदके देत ती आईला विचारत होती. 
कसल्या घाणेरड्या नजरेन बघत व्होता त्यो आये. 
आई जवळ आली, पाठीत धपाटा देत तिच्यावर ओरडली, शाले मुस्काटात दोन वाजवीन, लोक किळसवाणेच असत्यात.
 पण तुला कुठं समजतं सांगितलेलं? 
वढणी घे, वढणी घे सांगून आयक्ती व्हंय तू? 
आपलाचं सिक्का खोटा त्यात लोकांयल नाव ठेवण्यात फायदा नाय.
 आये म्या घेतेय वढणी रोज पण आंग झाकल्यालच असतयं ना व मह, आंगभर कापड, झाकुणमाकुन वढणी बी असती.
 तरी चुक महींच? शालेss, मह्याशी मोठ्या आवाजात बोलतीय व्हय? शालीच रडणं वाढलं पण आय सांगती ते खरंच हाय. 
म्या आयीकलं असतं तीच तर अस कोणी मह्याकड पायल नसतं. स्वतःला दोष देत व्हरांड्यातल्या बाजेवर टेकली. 
मनात किळस भरली होती, ती 'नजर' टोचत होती. आये यक इचारू काय? आईला जरा सौम्य आवाजात आवाज देत शाली आईच्या प्रतिउत्तराची वाट पाहत होती. 
तितक्यात आई आली, शालीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला मायेनं जवळ घेत, काय इचारायचं व्हंत? इचार..... शाली चाचरत चाचरत, आये लोकायच्या घरी पण आयेबहिणी असत्यात नव्हं मंग तरीपण त्ये दुसर्‍यायच्या आयाबहिणीला काय म्हूण वंगाळ नजरेनं पाहत्यातं?? आईला आता या प्रश्नाचं उत्तर काय द्याव हे च कळेना. काम पडल्यात मह, आवरून घेते तुहा बा येईल दमून! दिवसभर काम करतयं भूक लागली असल त्यास्नी म्हणत आई भाकरी थापत थापत विचारात होती की शालीच्या प्रश्नाच उत्तर काय देऊ?
तीच्या सोबत घडलेला प्रसंग जसाच्या तसा डोळ्यामोहरं उभा राहिला होता. ती न्हाऊन मोरीतून मागच्या खोलीत कापडं बदलत होती. तीचाचं मावस मामा माग माग आला. घरात कोणी न्हाई हे ठावं होत त्यास्नी! खोलीत तसा आंधार व्होताचं, देवळीतला दिवा पण बंद झाला वार्‍यानं मामा मागून कधी आला काय कळलं न्हाय! मागून कमरेला विळखा मारला. हात छातीवर गेला त्याचा मी गोंधळून गेले. कसं सावरू? काय करू? कस वाचवू? विचार पण बंद झाले. मामा, सोड ना! आईचा भाऊ हाय ना तू! तुह्या लेकी सारखी  हाय रं मी.... सोड ना! विनवण्या करत होते तेवढ्यात तोंड दाबलं. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे लचके तोडत व्हता आंगाचे. आंगावरचे व्हते नव्हते कापडं काढून त्याच पोट न्हाय भरलं. आयुष्याचा खेळ झाला व्हता मह्या. मामा व्होता त्यो, आयेsss, शालीन आवाज दिला. अग कुठं हरवली? भाकरची राख झाली. आई डोळे पुसत भानावर आली.


यावर एक कविता सुचली आहे.
खालीलप्रमाणे
===============================
सजा मला का? 
===================
कर्म त्याच खोटं होतं
सजा माझ्या नावी का??

मी तर मरण अनुभवल
पुन्हा नरक माझ्या ठायी का??

कुस्करून फेकल मला
तडफडले मी अग्नीत....

वासना त्याची अमाणूस
तिरस्कार माझा का?? 
-------------------------------------
सोनल सुनंदा श्रीधर 
===================================




टिप:- कथा काल्पनिक असली तरी वास्तविक आयुष्यात असेच अनुभव मी ऐकलेले आहेत. अनेकदा आपल्याला सुरक्षित वाटणार्‍या जागेतच आपण असुरक्षित असतो. 


कथा वाचून नक्की कळवा. कथेविषयी काही suggest करायचे असल्यास स्वागत आहे! आपण मला instagram वर ही follow करू शकता @marathi_short_poetry या I'd वर. 
तसे पाहता मी कविता लिहिते पण काही दिवसांपासून कथा लिहायला ही सुरूवात केली आहे. आपला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी आशा आहे. 
धन्यवाद.