डाक्टरकी-भागमभाग - भागमभाग Kshama Govardhaneshelar द्वारा आरोग्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

डाक्टरकी-भागमभाग - भागमभाग

#डाक्टरकी १५©डॉ क्षमा शेलार

          भागमभाग

        शिकाऊ डॉक्टर म्हणुन काम करत होते त्यावेळची ही गोष्ट. एक दिवस मोठीच गंमत झाली. चक्क मला स्वप्न पडत होतं की,मी अगदी वेळेवर सरांच्या क्लिनीकला पोहोचले आणि कुठलीही धावपळ,गडबड,धडपड न होता मी सर्व पेशंट्स तपासले आणि सरांची एरवी विकत मिळणारी शाबासकी चक्क फुकट मिळवली.
       वाचकांनो! अहो इतकं लक्षपूर्वक का वाचताय? स्वप्न होतं ते.
       त्यादिवशी जी पळापळ व्हायची ती झालीच. तसं पाहिलं तर धावपळ डॉक्टरांच्या पाचवीलाच पुजलेली असते.त्यात शिकाऊ डॉक्टर म्हटल्यावर धार बोथट झालेल्या तलवारी घेऊन लढायला निघालेल्या सैनिकासारखी आमची अवस्था असते . त्यामूळे रोजच्या धावपळीत टेन्शनचाही मोठा रोल असतो . नंतर ते सगळं अंगवळणी पडत जातं हा भाग अलाहिदा . 
         हं ! तर काय सांगत होते !
त्या दिवशी  जी पळापळ व्हायची ती झालीच.नेहमीची बस हुकली आणि कशीबशी धावतपळत सरांच्या clinic मध्ये घाईगडबडीत , दरवाजापाशी ठेचकाळतच पोहोचले.
पर्समध्ये कोंबलेली वही ,कायम हरवण्यासाठीच असणारा रुमाल ,कुठलीतरी चावी या सगळ्या वस्तुंची पर्सबाहेर डोकावण्याची क्रिया , सरांचा माझ्याकडे "या वेंधळ्या पोरीचं कसं काय व्हायचं "असा कटाक्ष ,  इतर कलिग्जचं फिदीफिदी हसणं वगैरे सगळं नेहमीप्रमाणे यथासांग पार पडलं.
     आणि हे सगळं सावरायचं सोडुन अचानक मला त्याची खूप खूप आठवण आली.सर क्लिनिक कलिग्ज काहीच दिसेनासं झालं.त्याच्याशिवाय माझं कसं होईल ? हाच विचार सर्वस्व व्यापून राहीला.कारण - 
वर सांगितलेल्या सर्व क्रियांमधे एक गोष्ट मिसिंग होती आणि ती म्हणजे..लागलेल्या 
ठेचेनंतर चष्मा नाकावर येणं..
हो तोच ,तोच माझा सखा ,सतत सोबत करणारा माझा अनमोल चष्मा घाईमधे घरीच ...(नाही कदाचित रिक्षात ?..शेजारच्या काकुंकडे??..दुकानात्..???) जाऊ दे.कुठेतरी विसरले होते.पण कमाल आहे माझ्या हे लक्षात कसं आलं नाही...तरी आई म्हणत होती..'

असा डोक्यात सगळं फास्ट फॉरवर्ड सुरु  असतांनाच सरांनी 
    "या !!' 
   म्हणत मला वर्तमानात आणलं .तेव्हा माझ्या लक्षात आलं की गेली पाच मिनिटे मी क्लिनिकच्या दरवाजातच ऊभी होते.परत एकदा स्वत:ला शिव्या मोजत मी क्लिनिक मधे ख-या अर्थाने entry केली.
  सर मला तोफेच्या तोंडी किंवा हत्तीच्या पायी नक्कीच देतील असं वाटत होतं पण सर मोठ्या  धावपळीत दिसले.
एक तासासाठी क्लिनिक ची जबाबदारी माझ्यावर टाकुन सर आणि इतर स्टुडंट्स इमर्जन्सीसाठी हॉस्पिटलला गेले . चष्म्याअभावी वेळ तसा फार अवघड गेला नाही.काही रुटीन पेशंट्स  झाले आणि आता थोड्यावेळाने  सर येतील व माझी एकाकी झुंज संपेल अशी 'घटिका' समीप आली.
तेवढ्यात बाहेर खूप गलका ऐकायला आला..
           क्लिनीकच्या बाहेर कष्टकरी नवराबायको, एक तान्हं बाळ आणि साधारण अडीच वर्षांची मुलगी असं कुटुंब उभं होतं .
           तो नवरा बायकोला भरपूर शिव्या मोजत होता.ती बिचारी रडत होती आणि आवश्यक तिथे इरसाल प्रत्यूत्तरही करत होती.त्यांचं सहा महिन्यांचं बाळ तपासायला आणलं होतं .मी त्या गर्जा नवरोबाला बाहेर पाठवलं आणि शांतपणे त्या बाईला विचारलं,
   "हं! काय झालं बाळाला ?"
बाळाची आई डोळे (आणि नाक ) पुसत बोलू लागली ,
   "अवो म्याडम आता काय सांगू तुमाला? माझं नशीबच आसं फुटकं..ह्यं बेवडं पदरी पडलय आन् सासूबी अशी वायफाट..रोज कुत्र्यावानी कामाला पळाया लागातं.बरं नाय पळावा तं खानार काय ? सरकारनी आमच्याकडं लक्ष द्यावा येवढंच माझं म्हननं हाय "
    "बरं बरं ते बघु हं आपण .तुम्ही आता शांत व्हा आणि काय झालं ते नीट सांगा म्हणजे लवकरात लवकर आपल्याला आैषध देता येईल "
    "त्याचं म्हंजे आसं झालं ..." 
बाई काही चटकन मुद्द्यावर येईना.अशा आणीबाणीच्या क्षणीही अडीच मिनिटाच्या प्रस्तावनेनंतर मला थोडक्यात असं कळालं की, ती आणि तिचा नवरा शेतात कामाला गेले होते .सासुजवळ मुलं सांभाळायला दिली.थोड्याच वेळात सासुने तिला जोरात आवाज देऊन बोलावलं .दर चार शब्दांआड एक शिवी अशी शब्दमालिका गुंफत सासुने तिला सांगितलं की,बाळाच्या लघवीच्या जागेतून रक्त येतंय.शिव्यांचा उत्तररंग मी तिच्या नवर्याला बाहेर हाकलेपर्यंत चालला होता.
     एकूलता एक, सतरा देवांकडे पळापळ करून नवसाने झालेला मुलगा आजारी पाडल्याबद्दल जेमतेम वीस वर्षाच्या आपल्या बायकोला झाप झाप झापत होता.सर येईपर्यंत बाळाचे पिताश्री काय शांततेत वाट बघतील असे वाटेना.मी बाळाला टेबलवर घेतलं खरं पण त्यावेळी confidence नसल्यामुळे पुढे काय उपचार करावे या विचाराने माझी जरा घाबरगुंडीच उडाली होती. जर माझ्याकडून घाईत काही चूक झाली असती ना तर बाळाच्या बापाचा multipurpose विळा माझ्या मानेवर चालायला मात्र घाई नक्कीच झाली असती.
बरं ते रक्त मला रक्तासारखंही वाटेना.सो माझं observation 'चष्मा नसल्यामुळे' या सदराखाली टाकून पूर्ण करणार तेवढ्यात सर आले.( हुश्श !! वाचली माझी मान)
     सरांनी फटाफट पेशंट चेक केलं आणि गडगडाटी हसले आणि त्यांनी आतापर्यंत आईच्या पदराआड भेदरून उभ्या असलेल्या त्या बाळाच्या दुर्लक्षित ,नाकात बोट घातलेल्या मोठ्या बहिणीला पुढे बोलावले.
    आम्हा कुणालाच काही अर्थबोध होईना.सर तिला म्हणाले ,
     "बेटा! तुझे हात बघु बरं"
तिने ओठापर्यंत आलेली पिवळी रेघ फुर्रकन वर ओढत आपले दोन्ही हात पुढे केले. तिचे हात लाल लाल .तेव्हा कुठे मज पामरास कळाले की,
       _ज्या प्रसंगात तिच्या आईने शिव्या खाल्ल्या ...
       _माझी घाबरगुंडी उडाली...
       _सगळ्या घरादाराची भागमभाग झाली...
त्या महानाट्याची सूत्रधार...
बाळाची ताई ....
तिनेच ;बाळाला नेलपेंट लावलं होतं....
  .     पण चुकीच्या ठिकाणी...

© डॉ. क्षमा संजय शेलार