Sunayna books and stories free download online pdf in Marathi

सुनयना

सुनयना

“सुनयना आज इन नजारोको तुम देखो
और मै तुम्हे देखते हुए देखु “
येसुदास गात होता अगदी तन्मयतेने
ऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीत
ते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले.
हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .
काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होते
झाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .
समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .
तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला.
संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी होती.
त्याने आपल्या नेहेमीच्या माणसाकडे आपली ओर्डेर दिली आणि साहित्य येईपर्यंत तो दुकानाच्या कौंटरपाशी इकडे तिकडे पाहत थांबला होता .
अनेक लोक येत जात होते, साहित्य घेत होते, काही बोलणी चालली होती .
त्याचाही टाईमपास छान होत होता .
नाहीतरी रूम वर जाऊन काय करणार होता तो एकटाच ?
काही वेळाने त्याचे साहित्य त्याला मिळाले .
कार्ड पेमेंट झाल्यावर तो पिशव्या उचलणार तोच त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या
हातातील साहित्य खाली पडल्याचे त्याला दिसले .
खाली वाकुन त्याने ते उचलायला सुरवात करताच अचानक दोन गोरे गोरे हात ते गोळा करताना त्याने पाहिले .
चमकुन वर पाहताच त्याला ती दिसली .
गोरापान रंग ,रेखीव चेहेरेपट्टी ,गुलाबी गाल ,सरळ नाक आणि नाकात
चमकणारी चमकी ..
तिच्या हातात तिचे साहित्य दिल्यावर ती उठुन उभी राहिली व तिने ते सर्व साहित्य सोबत असलेल्या मुलाकडे दिले .
ती उभी राहिल्यावर त्याला दिसले तिच्या अंगात लाल स्लीवलेस कुडता आणि निळी जीन्स होती .केस छान लहरणारे आणि रेशमी सुळसुळीत होते .
उंची भरपूर आणि बांधा खरोखर “अटकर”होता .
उभी राहिल्या वर तिने त्याच्याकडे नजर टाकली .
आता मात्र तो खरोखर चकित झाला कारण तिचे डोळे ..
मोठे मोठे ,दाट पापण्या असणारे आणि काजळ रेघ ओढलेले तिचे तपकिरी रंगाचे डोळे खरोखर खुपच “सुरेख “होते .
एकाच व्यक्तीला इतके सौंदर्य उधळून वाटणाऱ्या परमेश्वराची त्याला अगदी कमाल वाटली !!
ती त्याच्याशी एक शब्द पण बोलली नाही अथवा हसली नाही .
त्याच्या मनात आले चालायचेच ..इतकी सुंदर मुलगी का बरे कोणाची दखल घेईल ?तिच्या बरोबर असलेला बहुधा तिचा भाऊ असावा .
तो मात्र अजिंक्यला धन्यवाद म्हणाला आणि दोघेजण दुकानाबाहेर पडले .
एका तंद्रीतच अजिंक्यने आपले सामान घेतले आणि तोही बाहेर पडला .
त्या रात्रभर त्याला झोप नीट लागलीच नाही .
कारण नसताना तीच सारखी डोळ्यासमोर येत होती .
ती त्याच्यासोबत हसली नव्हती किंवा बोलली पण नव्हती .
मात्र तिच्या डोळ्यांनी त्याला चांगलीच “भुरळ “घातली होती.
तिचे नाव काय असेल ते असो आपण मात्र तिला “सुनयना “म्हणायचे असे त्याने पक्के ठरवुन टाकले .
नंतर मात्र काही दिवस तसे काहीच खास घडले नाही .
मित्राला हे सांगावे असे अजिंक्यला वाटले ,पण मग त्यानेच चुप बसायचे ठरवले. हो.. आत्तापर्यंत फक्त एकदा तर दिसली होती ती ..काय सांगण्यासारखे होते त्यात ?
एके दिवशी दुपारी लंच ब्रेक पुर्वी फाईली आवरताना सहज त्याची नजर रस्त्यावर गेली आणि अचानक ती पुन्हा त्याला दिसली .
सोबत दोन चार मुली होत्या.
पांढरा स्कर्ट आणि गुलाबी ब्लाउज घातलेल्या तिला त्याने चटकन ओळखले
.आज तिने केस पांढर्या रिबन मध्ये बांधले होते सोबत असणार्या मुलीनी पण साधारण तसाच पोशाख घातला होता .
बहुतेक कोणत्या तरी शाळेचा युनिफोर्म असावा .
त्या सर्व जणी एकमेकीसोबत बोलत एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून रस्ता क्रॉस करण्यासाठी उभ्या होत्या .
त्याने चटकन फाईली ठेवल्या आणि ऑफिस बाहेर पडला.
त्याचे ऑफिस चौथ्या मजल्यावर होते .
वेळ जाऊ नये म्हणुन तो पटकन लिफ्ट मध्ये शिरला .
लिफ्ट खाली येताच बाहेर पडून तो रस्त्यावर आला
त्याला “सुनयना “ला पहायचे होते ..
पण हाय रे किस्मत!!
त्या सर्व जणी रस्ता ओलांडून खुप दूरवर गेल्या होत्या .
परत आठ दहा दिवस त्याला ऑफिस कामासाठी पुण्याला जावे लागले या काळात तो तीला थोडे फार विसरून गेला .
कामाच्या ओघात नवे नवे विषय समोर येत राहिले ,तिचा विषय डोक्यात आला नव्हता .
जवळ जवळ पंधरा दिवसांनी तो मुंबईत परत आला .
त्या दिवशी रविवार होता, सकाळी निवांत उठून घरापासून थोडे दूर एका हॉटेल मध्ये तो मित्रांसोबत नाश्ता करायला गेला .
मस्त गरम गरम डोसा आणि कॉफी झाल्यावर ते सर्व बाहेरच सिगारेट ओढत उभे राहिले .गप्पा चालुच होत्या इकडच्या तिकडच्या ..
आजुबाजुला बरीच गजबज होती .शेजारी पाजारी वेगवेगळी दुकाने होती .
रविवार असल्याने लोकांची खरेदी चालु होती .समोरच मोठे भाजी मार्केट होते .
तिथेही लोक पिशव्या घेऊन भाजीसाठी शिरत होते.
आणि अचानक त्याला “ती” दिसली .
पिवळा पंजाबी सुट घातलेली ती पिशव्या घेऊन एका बाई सोबत मार्केट मध्ये शिरत होती .तिला पाहताच हातातली सिगारेट विझवून तो मित्रांना म्हणाला ”आलो रे मी जरा बाजारात जाऊन येतो “
मित्र हसायला लागले
“काय रे तुझ्या सारख्या ब्रम्ह्चार्याचे बाजारात काय काम ?
कुठल्या भाजीचे काय नाव हे पण तुला अजून नीटसे माहित नाही.
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तो झपझप समोरच्या मार्केट कडे निघाला .
आज तिला बघायची संधी त्याला अजिबात सोडायची नव्हती .
मार्केटच्या गेट मधुन आत शिरताच डाव्या बाजूला त्याला ती दिसली .
सोबत बहुधा तिची आई असावी .दोघी मिळून पालेभाजी घेत होत्या .
ती पिशव्या घेऊन उभी होती. आई पालेभाज्या पारखून घेत होती .
सकाळच्या उन्हात त्याची ती “सुनयना” खुप तेजस्वी दिसत होती .
पिवळा पंजाबी ड्रेस चमकत होता .आज तिने केसांची एक वेणी घालून पुढे घेतली होती .कपाळाला कुंकु आणि हातात पिवळ्या बांगड्या पण होत्या .
तिच्या एकंदर दिसण्यावरून तिला टापटीप राहण्याची आवड आहे असे वाटत होते .भाजी कडे तिचे फारसे लक्ष नव्हते .ती थोडी इकडे तिकडे पाहत होती असे वाटत होते .अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली .
त्याला वाटले ती त्याच्याकडे पाहुन हसेल पण तिने त्याची “दखल” पण घेतली नाही .
आईने दिलेल्या भाज्या तिने पिशवीत भरल्या आणि त्या दोघी पुढे निघाल्या .बाजारात तिचा एक हात कायम आईच्या हातात होता .
तिची आई सोबत असताना असा पाठलाग करणे बरे नव्हते त्यामुळे तो त्यांच्या पासुन बर्याच अंतरावर राहुन त्यांना न्याहाळत राहिला .
पुढे एक दोन ठिकाणी भाजी घेतल्यावर बाजाराच्या कोपर्यावर त्या फळाच्या दुकानात आल्या .तिथे मात्र ती काही फळे हातात घेऊन आईला हे घे, ते घे असे सुचवत होती .फळांची खरेदी झाल्यावर ती आईला काहीतरी म्हणाली तसे तिच्या आईने दोन शहाळी विकत घेतली .
तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि नारळ पाणी प्यायला तिच्या हातात दिले .ती खुप खुश दिसत होती .
आणि अगदी चवीने पाणी पीत होती ,तिचे पाणी पिऊन झाल्यावर आईने एक शहाळे प्यायले .
या अवधीत ती फक्त इकडे तिकडे पहात होती .
मग मात्र दोन दोन पिशव्या उचलून दोघी मार्केट बाहेर पडल्या .त्या कोणत्या दिशेला जातात हे पाहायला तोही बाहेर पडला .
पण समोरच एका रिक्षाला हात करून दोघी त्यात बसुन निघुन गेल्या .
त्याने मग फुटपाथ ओलांडून आपली मोटारसायकल घेतली आणि रूम वर परत आला .आज तिला पाहुन तो अगदी वेडा झाला होता !!
विशेषतःतिचे डोळे त्याला फारच मोहात पाडत होते .
आता एकदा संधी साधुन नक्की तिची ओळख करून घ्यायची हे त्याने पक्के ठरवले .
नंतर पाच सहा दिवस काहीच घडले नाही .
मग मात्र एकदा संध्याकाळी एका मैत्रिणी सोबत ती त्याला दिसली
तो पण त्यांच्या मागे काही अंतर ठेवून चालु लागला .
त्या दोघी एका कॉफी शॉप मध्ये शिरल्या .
आज तिने निळा कुर्ता आणि काळा टाईट स्कर्ट घातला होता
केसाला काळी पिन लावून अर्धवट बांधले होते
हातात पांढरी पर्स होती .
त्यांच्या जवळचे टेबल त्याने पकडले .
आता ती त्याच्या अगदी समोर होती .तिच्या डोळ्यातील काजळाची रेघ ,
आणि तिने लावलेली गुलाबी लिपस्टिक पण त्याच्या नजरेत येत होती .
तिच्या एकंदर पोशाखवरून आणि “गेटअप” वरून ती खुप श्रीमंत घरातली लाडकी लेक असावी हे मात्र त्याच्या लक्षात आले होते .
ती आणि मैत्रीण दोघींनी बटाटेवडा आणि कॉफी मागवली होती .
त्याने पण स्वतासाठी तेच ऑर्डेर केले ,
आणि त्यांचे लक्ष जाणार नाहीत इतपत त्यांच्यावर नजर ठेवून राहिला .
खाण्याचे येईपर्यंत त्या एकमेकांशी अगदी तल्लीन होऊन बोलत होत्या .
हॉटेलच्या गोंगाटात फार स्पष्ट बोलणे ऐकु येत नव्हते .
पण एखाद्या कार्यक्रमाची तयारी चालली असावी असे वाटत होते .कारण ती पण अगदी उत्साहाने हातवारे करीत काहीतरी बोलत होती .
आज तिच्या कडे अगदी पाहत रहावेसे वाटत होते .
विशेषतःतिचे सुंदर तपकिरी काजळ रेष ओढलेले डोळे ..
थोड्या वेळात दोघांच्या ऑर्डर्स आल्या .
तिच्या मैत्रिणीने बटाटेवड्याची बशी तिच्यासमोर सरकवली आणि तिच्या हातात चमचे दिले .तिने खायला सुरवात केल्यावर मैत्रीण पण खाऊ लागली .
त्याने पण तिच्याकडे चोरटे कटाक्ष टाकत खाणे सुरु केले .
बरेच वेळा त्याची तिची नजरानजर झाली पण तिने त्याला अजिबात ओळख दिली नाही .
एकंदरीत तुसडा स्वभाव होता वाटत होता तिचा .
त्याला समजले ती आपल्याकडे दुर्लक्ष करते आहे .
नंतर कॉफी आल्यावर मैत्रिणीने आधी तिच्या हातात कप दिला आणि मगच स्वतःघेतला .
त्याच्या मनात आले हिच्या जवळची माणसे हिची फारच काळजी घेतात
नशीबवान आहे अगदी ..!!
आज मात्र हिची ओळख करून घ्यायचीच असे पक्के ठरवले होते .
पण कॉफी संपताच अचानक त्यांच्या ओळखीची तीन चार माणसे हॉटेल मध्ये आली आणि बघता बघता सर्वजण एकत्र हॉटेल मधुन बिल देऊन बाहेर पडले सुद्धा आणि मग अजिंक्यच्या मनातले मनातच राहिले .
असु दे किती पण शिष्ट...

हिच्याशी बोलायचेच पुढील वेळी असे त्याने पक्के ठरवले
भेटेल की पुन्हा कधी ..तरी जातेय कुठे .
गेला महिनाभर तो सतत रस्त्यावर ,हॉटेल मध्ये ,दुकानात सगळीकडे बारीक नजर ठेवुन होता ,पण त्याची लाडकी “सुनयना “ कुठ्ठे कुठ्ठे दिसली नाही .
नेहेमी कुठे न कुठे भेटणारी ही “परी “अचानक कुठे गायब झाली बरे ?
अजुन पंधरा दिवस उलटले तरी तिचा काहीच पत्ता अजिंक्यला लागला नाही .
त्याचे मन अस्वस्थ झाले .
ती हा भाग सोडुन तर गेली नसेल न .?
पण नुसतेच तर्क करीत बसण्यावाचून तो काहीच करू शकत नव्हता.
असाच एके रविवारी त्याला त्याचा जुना मित्र दीपक गाठ पडला .
दीपक एक समाजसेवक होता .आपली नोकरी सांभाळून सामाजिक घडामोडीत कायम अग्रेसर असणारा .
“अरे यार दीपक आहेस कुठे तु ?किती दिवस झाले लेका पत्ताच नाही तुझा .आणि फोन पण बंद होता ..”
“हो रे अजिंक्य अरे हिमाचल प्रदेश मध्ये दुर्गम ठिकाणी शाळा काढायची आहे त्याच्या सर्वे साठी गेलो होतो .जवळ जवळ दहा दिवस तिथेच होतो .
कालच परत आलो ,आता ते शाळेचे काम हातात घ्यायचे आहे पुढील महिन्या पासुन “दीपक बोलला .
अजिंक्यला त्याचे कौतुक वाटले ,खरेच नोकरी सांभाळून फारच भागदौड करीत असतो हा .
“चल संध्याकाळी मस्तपैकी पिक्चर टाकु..रात्री जेवायला पण जाऊ .
खुप दिवसात आपल्या गप्पा पण नाही झाल्या मनसोक्त “

छे रे आज कुठले जमतय
संध्याकाळी अंध शाळेच्या मुलांचा एक कार्यक्रम आहे त्याची व्यवस्था आहे माझ्याकडे ...असे कर तुच चल माझ्यासोबत कार्यक्रमाला” दीपक म्हणाला .
“बरे राहु दे पुन्हा कधी तरी करू आपण प्लान ,पण मला नको बाबा त्या कार्यक्रमाचा आग्रह करू ..उगाचच बोअर होईन मी" अजिंक्य म्हणाला
त्यावर दीपक म्हणाला ,”अरे येऊन तरी बघ खुप छान कार्यक्रम बसला आहे .कलाकार तर “एकसे एक” आहेत मजा येईल तुला “
“खरे सांगु दीपक मला ती अंध मुले वगैरे पाहिली न अगदी कसेतरी होते .
त्याचे ते खोबणीच्या आतले डोळे ,ती काठी हातात धरून जगायची धडपड ..
नको वाटते रे तसे पाहायला “
“वेडा आहेस की काय अजिंक्य ?
अरे अंध मुले सगळीच काही खाचा झालेल्या डोळ्याची नसतात .
ते फक्त अपघाताच्या केसमध्ये डोळे गेले असतील तरच असते .
इतर वेळा अंध व्यक्ती आपल्या सारख्याच डोळ्याची असते .
फक्त त्यांच्या डोळ्यात “ज्योती” नसल्याने ते पाहु शकत नसतात .
आणि तु बघ तरी ही मुले आणि मुली इतकी स्मार्ट असतात की, तुझ्याजवळून एखादी अंध व्यक्ती जात असेल तर तुला समजणार पण नाही .
नवीन युगात ती सर्व पण स्मार्ट आणि टापटीप राहतात.
आपल्या अंधपणाचे ‘भांडवल “केलेले त्यांना अजिबात आवडत नाही .
खुप “हुरहुन्नरी” आणि “कलाकार” असतात ही मुले !
देवाने जेव्हा त्यांची दृष्टी काढुन घेतलेली असते तेव्हाच त्यांना एक सिक्स्थ सेन्स दिलेला असतो .
ती त्यांच्या कडे एक खुप मोठी “देणगी “असते .
आपल्या सारख्या कोणत्याही इतर माणसा पेक्षाही मुले खुपच “उजवी असतात “
आणि त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे असे वैगुण्य असुन सुद्धा हि सगळी मुले कायम “आनंदी” आणि “आशावादी”असतात .
त्यांच्याकडे पाहिले की अरे स्वतःची लाज वाटते .
आपल्याकडे सर्व असुन सुद्धा आपण बारीक सारीक गोष्टीत तक्रारी करीत असतो .”
त्याचे इतके सगळे विस्तृत बोलणे ऐकल्यावर अजिंक्यला पण त्यात खरेच
तथ्य वाटले ..व त्याने त्या कार्यक्रमाला जायचं ठरवले
“ बर बाबा तु म्हणतोस तर मी नक्की येईन कोणते नाट्यगृह म्हणालास ?
अजिंक्य ने विचारले
“कलादालन नाव आहे त्याचे इथेच पुढे गांधी रोड वर आहे.
तिथे आहे हा कार्यक्रम बरोबर पाच वाजता मी वाट पाहतो तुझी
आलास की मला रिंग कर तुझी बसायची व्यवस्था करतो “
असे बोलुन दीपक तिथून निघुन गेला .
अजिंक्य दुपारी जेऊन रूम वर परतला आणि त्याला गाढ झोप लागली .
अचानक जाग आली आणि त्याने घड्याळ पाहिले तर चक्क साडेपाच वाजले होते .
ओह शीट !!...मी पण काय इतका वेळ झोपलो असेन
असे म्हणत त्याने चटकन तोंड धुऊन कपडे बदलले आणि मोटरसायकल ला
किक मारून तो बाहेर पडला .
कलादालन पाशी पोचायला त्याला साडेसहा वाजले .
मोटरसायकल पार्क करून तो दरवाज्यापाशी आला तोच दीपक आतुन बाहेर आला .”काय यार अजिंक्य खुपउशीर केलास ..
अजिंक्य थोडा ओशाळला आणि दिलगिरीचे हसला
ठीक आहे कार्यक्रम थोड्या वेळा पुर्वी सुरु झालाय .
निनाद याला चार नंबर लाईनीत बसव रे असे त्याने त्याच्या आणखी एका मित्राला सांगितले
आणि त्याच्या बरोबर अजिंक्य आत गेला .
कार्यक्रम खरोखर छान होता .जसे दीपक ने सांगितले होते तशी मुले मुली एकदम स्मार्ट होती .एक दोन गाणी नाच झाल्यावर एक छोटी एकांकिका झाली आणि मध्यंतर झाले .
मुलांचा उत्साह आणि आनंद पाहण्या सारखा होता.
शिवाय मुलांचे पालक पण त्यांच्या पाल्यांचे कौतुक पाहायला आले होते
त्यामुळे भरपूर गर्दी होती .
अजिंक्य हॉल बाहेर निघाला तेव्हा त्याला एक बाई दिसली .
उंची साडी नेसलेल्या त्या बाई सोबत आणखीन पण बायका होत्या
तिला पाहताच त्याला आठवले ..अरे ही तर “सुनयना “ची आई दिसतेय
म्हणजे सुनयना पण नक्की असणार तिच्या सोबत .
सर्व महिला वर्ग चहाच्या स्टालकडे निघाला होता .
अजिंक्य पण त्या दिशेने जाऊ लागला तोपर्यंत दीपक ने त्याला अडवले
“ये रे अजिंक्य मस्त चहा घेऊया ,आता मी आहे थोडा रिकामा उरलेला कार्यक्रम सोबतच पाहुया “.
चहा पिता पिता गप्पा करण्याच्या गडबडीत त्या बायका पण आत कार्यक्रमाच्या दुसर्या भागा करिता निघुन गेल्या.
अजिंक्यने विचार केला ठीक आहे कार्यक्रम संपल्यावर सर्व परत दिसतीलच मग शोधुया आपल्या “सुनयना “ला .
दुसरा भाग सुरु झाल्यावर दीपक अजिंक्यला म्हणाला “आता एक छोटे नाटुकले आहे त्यानंतर पाहुणे चार शब्द बोलतील मग एक सर्वांगसुंदर भरतनाट्यम चा “अविष्कार” आहे ..तु पाहशील तर चकित होशील .
तिघीचौघी इतक्या सुंदर पर्फोर्म करतात ना की शंका पण येत नाही या अंध असतील अशी ..”
दीपकला शाळेतल्या मुलामुलींची खडानखडा माहिती होती .
त्याच्या या बोलण्यावर अजिंक्यने स्मित केले .
ठरल्या प्रमाणे सर्व झाल्यावर “भरतनाट्यम” ची घोषणा झाली
आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
या कार्यक्रमाची “लोकप्रियता” खुपच दिसत होती .
पडदा उघडला आणि नृत्य सुरु झाले .
चार सुरेख मुली आणि मध्यात एक खुप देखणी मुलगी नृत्य करीत होत्या .
सर्वजणी अगदी “पारंगत” होत्या नृत्यात
तालबद्ध आणिकौशल्यपूर्ण नृत्य होते त्यांचे .
त्यातल्या त्यात मोरपंखी पेहेराव केलेली मधली मुलगी खुपच देखणी होती आणि तिच्या हालचाली खुप मोहक होत्या .
काजळाचा भरपूर “मेकअप” केलेले तिचे मोठे मोठे डोळे नजर खिळवुन ठेवत होते .
आणि अचानक अजिंक्यला जाणवले की अरे आपण हीला कुठेतरी पाहिले आहे .
त्याने दीपकला विचारले त्या मुलीविषयी ..
“अरे ती मधली मुलगी न ..
ती रेवती साने आहे अंधशाळेतील सर्वात हुशार ,सुंदर आणि गुणी मुलगी “
आता मात्र चकित व्हायची पाळी अजिंक्यची होती
कारण ती अंध मुलगी म्हणजे त्याची “सुनयना “होती ....
आता समजत होता त्याला तिच्या सगळ्या वागण्याचा अर्थ .आणि त्याने तिच्याविषयी करून घेतलेला गैरसमज
आणि मग तो एकदम “सुन्न “होऊन गेला !!


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED