Shock books and stories free download online pdf in Marathi

शॉक !

साला वैताग आहे! आज पुन्हा निर्मलेने कडकड केली! आमच्या लग्नाला आता या चोवीस मेला,पाच वर्ष होतील. अजूनहि तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही. तशी ती भांडकुदळ नाही, पण भडक माथ्याची मात्र आहे. कधी कधी फारच लावून धरते, लहान मुलांसारखं! हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत, इतकंच काय ती विनाकारण पण भडकते! पण मला त्याचे खरे कारण माहित आहे!
माझी आई! आई माझ्या सोबत रहाते, ते तिला नको आहे! आता मला सांगा , या उतार वयात तिने कोठे जावे आणि का? डोळे, कान आदू झालेत, चकरा येतात, बी. पी., डायबिटीज सारखे जन्माचे सोबती आहेत! येथे शहरात डॉक्टर, दवाखाना हाकेच्या अंतरावर आहेत. मी निर्मलला परोपरीने सांगून पहिले. पण समजून घेत नाही.
"तू त्यांना नंदू भावजी कडे कायमचे पाठून दे! ते थोरले आहेत हि त्यांचीच जवाबदारी आहे. "
" आग, नंदू खेड्यात रहातो तेथे दवाखान्याची सोया नाही, तिला येथेच राहूदे, काही बिघडत नाही! "
"हे बघ, नसेल तर वृद्धाश्रमात ठेव म्हातारीला! इथे माझ्या उरावर नको! हीच दुखणं भाण करायला मी लग्न केलं नाहीय!" फाडकन बेडरूमचे दार लावून आत बसली. हि गोष्ट काल रात्रीची. आज सकाळी ऑफिसला निघताना घुश्यातच होती, बोलली नाही!

आमचे अरेंज्ड मॅरेज. मुलगी पाहून झाल्यावर, एक दोन भेटीत तिचा स्वभाव पूर्णपणे कळला नाही. एक दोन वेळेस 'आमची निमी जरा लाडात वाढली आहे, त्यामुळे थोडी हट्टी आहे.' असे सासरे म्हणाले होते. 'अरे लग्न झाल्यावर सारे ठीक होईल. संसाराची गोडी लागली कि होईल राग कमी. अन तू आहेस कि शांत स्वभावाचा घे थोडस सांभाळून.' मावशीने अनुभवाचा सल्ला दिला होता. तेव्हा तो, मलाही पटला होता. पण आता जड जातंय.

निर्मला मला पहाता क्षणी आवडली होती. ती खरेच खूप सुरेख आहे. मस्त पाच -साडेपाच फूट उंची, सडपातळ बांधा, चेहऱ्यात निरागस गोडवा, नैसर्गिक कोरीव अन रेखीव भुवया, पातळ तरी रसरशीत चैतन्यमय ओठ, आणि --आणि डोळ्याचे दोन चमकदार डोह! नव्या कोऱ्याकिर्रिंग काचेच्या गोट्या सारखे चमकदार डोळ्याची बुबळं! माझी विकेट तेथच पडली! हे सार कसल्याही प्रसाधना शिवाय! तिला म्हणे मेकअपची 'थेर' आवडत नाहीत.

खरच, मी भाग्यवान आहे निर्मला सारखी मला बायको मिळाली. आज घरी जाताना काजुकतली न्यावी लागेल! हाच तिच्या रागावरचा 'तोडगा' आहे. कशीही वागली तरी, आय लव्ह हर! मावशी म्हणते तसे येईल समज, होईल शांत अन समजदार. तिला अजून थोडा वेळ द्यायला हवा.
००००
'गणू' माझा नवरा! एकदम भुक्कड! बावळट ध्यान! आय हेट हिम! उखाण्यात सुद्धा 'गणपतराव ' म्हणताना, ना आज, म्हणजे, लग्ना नन्तर पाच वर्षांनी सुद्धा अंगावर काटा येतो! अजून तो त्याच्या आईचा 'गणूच' आहे! खरेतर हे ध्यान मला मुळीच आवडलं नव्हतं! या पेक्षा तो मास्तर ज्यास्त मॅनली वाटला होता! भारदस्त ,सहाफुटी उंची, रुंद खांदे, घनदाट कुरळे केस, कमावलेले शरीर, करारी नजर! धाकात ठेवणारी! खर्जातला हुकमी आवाज! मर्दानी काम होत सार! मलाच काय, कोणालाही त्याच्या सानिध्यात सुरक्षित वाटलं असत! कुठल्याशा शाळेत तो क्रीडा शिक्षक होता. असेना. त्याचा मास्तरकीचा कमी पगार मला चालला असता!
पण ---- आई बाबाना ह्या गणूबाच ठिकाण आवडलं. कारण त्याच सोशल स्टेटस -बँकेत ऑफिसर! लहान वयात ऑफिसर तर रिटायरमेंट पर्यंत जनरल मॅनेजर नक्कीच होईल! शिवाय तगडा पगार! तो हि सतत वाढत जाणारा! काय काडी लावायचीय त्या तगड्या पगाराला! माणूस नको का 'तगडा '?पीळपिळीत लोम्बते गाल, डुबरी ढेरी, अन बापरे! लग्नाच्या आधीच भारदस्त टकलाची तयारी सुरु झालीय! विरळ केसांच्या ढगातून 'चांदोबा' डोकावतोय!
"आई मला असलं ध्यान नकोय! '
" निमे आता काही खोड काढू नकोस. मुलाचे रूप नाही तर, कर्तृत्व (पगार!) पहावे! कलेक्टर पेक्षा ज्यास्त पगार आहे! "
"तरी पण ----"
"मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक! माझे अनुभवाचे बोल आहेत! राज्य करशील!" त्या नन्तर जे आईने सांगितले ते मला पटले! त्याच मार्गावरून मी आजवर चालत आहे. खरे सांगू खऱ्या अर्थाने राज्य करीत आहे! येत -जात त्याच्या दिसण्या वरून, टकलावरून टोमणे मारत असते. घरात कायम 'टेन्शन ' कसे राहील याची काळजी घेते! कमी ज्यास्तीला 'सासू 'चा आधार आहेच! तो लगेच माघार घेऊन गोंडा घोळतो! त्याच्या सगळ्या बँक खात्याना, डिपॉझिटला माझे नाव जॉईंट केले आहे! शिवाय मोजक्या पैशाशिवाय सगळा पगार हाती घेते! त्याचा स्वभाव थोडा लंपट आहे, थोडी ढील दिली कि काहीही करायला स्वारी तयार असते! या पाच वर्षात चार ठळक दागिने, दोन एक लाख रोकड, आईकडे जमा आहेत कि! खरच मी किती भाग्यवान आहे! असा गोंडा घोळणारा, धाकात रहाणार, दोन गोड शब्दा साठी मरमर काम करून पैसे कमावणारा, हरकाम्या, पाळीव गुलाम 'नवरा', बावळट अन कार्टून हवाच ! म्हणूच मी 'राज्य ' करतेय आणि गणू राज्य देतोय! फक्त आधन-मधनं 'शॉक ' द्यावा लागतो! अन आज मी, तो देणार आहे!
०००
संध्याकाळी सात साडेसातला दारावरची बेल वाजली, गणूच्या आईने दार उघडले. गणू सोफ्यावर विसावला.
"गण्या ,बायकोला जरा समजावं! घराकडे थोडं लक्ष दे म्हणावं! आत्ता तू येण्यापूर्वी कुठं बाजारात भटकून आलीयय! सारखी मेली ती खरेदी!" आल्याआल्या आईने बायको विरुद्ध कटकट सुरु केली होती. गणू वैतागला, पण सय्यमाने 'बरे मी सांगतो' म्हणून आईस गप्प केले. ती रागारागा मन्दिरात निघून गेली. आता ती काही नऊ-साडेनऊ पर्यंत येणार नाही. समोरचे दार लावून गणू बेड रूम कडे गेला. निमा पलंगाच्या कोपऱ्यावर बसून मारक्या म्हशी सारखी गणू कडे पहात होती.
"झाल्या का माझ्या कागाळ्या एकून! हे म्हातारीचं नेहमीचंच आहे! सदा माझ्या कागाळ्या, शेजाऱ्या -पाजाऱ्या कडे तर करतेच, पण भिकाऱ्याला सुद्धा 'आज सुनेने काही केले नाही बाबा ,जा पुढल्या घरी ' म्हणते! कंटाळे बाई या थेरडीला!.... "
"स्टॉप इट! निमे सदा आईला 'म्हातारी', 'थेरडी' नकोना म्हणत जाऊ!,नाही ऐकवत मला!"
"म्हणूनच तर म्हणते,ठेव तिकडे खेड्यात मोठ्या भावजवळ! नाहीतर वृद्धाश्रमात! काही बिघडत नाही! एकदाची कटकट तरी संपेल! खाल्ला घास अंगी लागत नाही! लग्न झाल्यापासून सुख म्हंणून लागलं नाही ! इतर बायकांचे संसार पहिले कि आग पडते पोटात! "
" बस्स झाले निर्मले! आई येथेच, माझ्या जवळ रहाणार! वडिलांच्या माघारी अपार कष्ट करून तिने आम्हा भावंडाना शिकवले, लहानाचे मोठे केलेय---- हे घर ---- माझी नौकरी -- तिच्याच त्यागावर उभं आहे! तू बिलकुल समजून घेत नाहीस! हवे तर तूच जा तुझ्या माहेरी! पण मी काही या वयात आईला अंतर देणार नाही!" गणू खरोखरच भडकला होता .
"नकोच देऊस अंतर म्हातारीला! बस जावून तिच्या पदराखाली! तुला बायकोची गरज काय? मीच जाते तुला कायमची सोडून! पण लक्षात ठेव, मी रडूबाई सारखी बापाकडे जाणार नाही! तुम्हा माय लेकाना अद्दल घडवून जाणार!"तिचा हा रुद्रावतार पाहून गणू सुन्न झाला.
निर्मीलेने आपले पाजरुन ठेवलेले हत्यार काढले. हीच वेळ होती गणूबाला ' शॉक 'देण्याची! ती तरातरा किचनमध्ये गेली. दुपारी आणून ठेवलेला रॉकेल चा कॅन तिने बिनधास्त पणे अंगावर ओतून घेतला! हे असलं नाटक केल्या शिवाय हा गण्या धाकात रहायचा नाही!
रॉकेलचा वास घरभर पसरला. गणू भानावर आला. तो खूप घाबरला होता. काय होती याची त्याला कल्पना आली होती!
" आग निमे, हा काय वेडे पण आहे? "तो ओरडला.
"बस आता माईला कवटाळून! मी जाते कायमची तुला सोडून! मग कळेल बायकोची किंमत!" कसला घाबरलाय गण्या! बसतोय शॉक! अजून थोडं वोल्टेज वाढवला पाहिजे! निमाने जवळची काडे पेटी उघडली!
" थांब निमे! माझी शपत आहे तुला!" तो किचनच्या दारातून घाबऱ्या आवाजात ओरडला.
अजून थोडं नाटक रंगवू या! काय? 'माहेरी जा' म्हणतोस होय! निमेने काडी पेटवली! काही होत नाही! मी काही हि पेटती काडी अंगावर टाकून थोडीच घेणार आहे?! आणि समजा काही झालेच तर! समोर गणू आहेच कि! तो सहज वाचवेल मला!
पण ------- काडी ओढतानाच वास्तू तथास्तु म्हणाली होती! निमाने काडी पेटवली तेव्हा ती तिच्या आवेशाने तुटली होती!आणि तुटण्या पूर्वी ती पेटलीही होती!पेटता तुकडा साडीवर पडला! भडका उडाला! सिंथेटिक साडी क्षणात वितळून कातडीशी एकरूप झाली होती! गणू धावला तोवर ती सर्वांगाने पेटली होती! गणूने तिला तशीच कवेत घेतले! आग विझवण्या साठी!
" मेले! मेले! मला वाचवरे! मला जगायचंय! "
" निमे घाबरू नकोस मी आहे!" गणू म्हणार होता. पण तोही पेटला होता!
घरातून धूर झपाट्याने बाहेर झेपावत होता. लोक बाहेरून दार वाजवत होते. अग्निशामक दलाच्या गाड्या घंटा बडवत आल्या. पण व्हायचा तो उशीर झालाच होता! स्त्री -पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेले दोन कोळशाचे देह बाहेरआले, तेव्हा पहाणाऱ्याच्या काळजाचे पाणी होत होते !
ooo
कोपरे गुढग्यात टेकून, ओंजळीत आपला गोबर चेहरा घेऊन छोटा राजू, दाराच्या पायरीवर बसला होता.
" काय रे राजू, काय करतोयस?"
"काय नाय "
" घरी कोणी नाही का? आजी ,काका?"
" छ्या "
" आजी कोठेय?"
"पोलीस गाडीत बसून गेली!"
'का?"
" शोभा अँटीन काय तर पोलिसांना सांगितलं, अन ते आजीला घेऊन गेले !"
" कोण शोभा अँटी?"
" मम्मीची फ्रेंड आहे! "
" अन काका?"
" तो पण गेला, टीव्ही अन फ्रीझ घेऊन!"
"तुला?"
" नाय नेलं! नको म्हणाला!"
" तू काय करतोस ?"
" पपा मम्मीची वाट बघतोय."
"का?"
" पप्पा प्लेन आणणारय, रिमोट असलेले, अन मम्मी चोकोबार !"
कोणाचे प्रेम , कोणाचा द्वेष , कोणाचा हेकटपणा माहित नाही! पण या पिलाच बालपण करपून गेलं त्याच काय?

--- सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED