Bhet Tuzi Mazi books and stories free download online pdf in Marathi

भेट तुझी माझी !

आज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे. आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे. त्या काळी प्रेम करणं महापातक होत. आणि घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा 'सुखी' संसार थाटायचा नव्हता. तिनें तिच्या घरच्याना राजी केले. पण मीच कमी पडलो! आम्ही शेवटचं भेटलो, तेव्हा 'जमेलसे वाटत नाही' असे मी सांगितले, तेव्हा जाम अपसेट होऊन, डोळे पुसत निघून गेली होती. माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती. मी काय करायचे ठरवले आहे, हे तिला सांगणार होतो! त्यांनतर दिसलीच नाही! ती आज भेटतेय! तीस वर्षांनी! त्या वेळी आजच्या सारखे मोबाईल असते तर ----------- ooo

ठरल्याप्रमाणे मी तिची एका हॉटेलच्या लॉन वर वाट पहात होतो. 'कोठे असतेस ?', 'नवरा काय करतो?', 'मुलं काय?', 'आणि किती?'हे विचारणार होतो. ' माझी आठवण होते का?', 'तू माझे म्हणणे न ऐकताच का निघून गेलीस?' हे पण आज विचारणार होतो. अजून काय काय विचारायचे या विचारात असताना, ती समोरून अली! ती होती तशीच होती. उंच, शिडशिडीत, चालण्यात तोच डौल! फक्त थोडीशी पोक्त वाटत होती इतकेच. आज हि ती पांढऱ्या ड्रेस मध्ये मोहक दिसत होती. तो ड्रेस खूप महागडा असावा असे दिसत होते. ठेवणीतला?
पहिल्यांदा जेव्हा, ती पांढरा ड्रेस घालून भेटायला अली होती, तेव्हा वाऱ्याने तिच्या दोन्ही खांद्यावरून फुलपाखराच्या पंखा सारखी, ओढणी उडत होती!
" तुला पांढरा रंग खूप खुलून दिसतो! दुरून तू मस्त फुलपाखरा सारखी दिसत होतीस! "
" सुऱ्या, चावटपणा पुरे! "
"चावटपणा नाही. तू जर, आज हातात वीणा घेऊन कमळात बसलीस तर, तर मी तुझी 'सरस्वती' म्हणून पूजा करीन!"मी म्हणालो, तेव्हा ती कमालीची गोड लाजली होती! असो.
" कशी आहेस?"ती जवळ आल्यावर मी विचारले
" मी न मस्त आहे! तू कसा आहेस?"
"ठीकंय!"
"तू न बिलकुल बदलला नाहीस! होता तसाच आहेस! गप्प गप्प रहाणार! पण मला कधी त्याचा त्रास झाला नाही! कारण तुझे डोळे सगळं सांगत असत! आणि आजही सांगताहेत कि तू कसा आहेस?"
"कसा आहे?"
"तसाच! कुठेतरी आतून दुखावलेला! शुल्लक गोष्ट मनात ठेऊन, स्वतःला त्रास करून घेतोयस, हे मला आज हि जाणवतंय!"
हे मात्र खरे आहे. मी अंतर्मुख आहे. मला चटकन व्यक्त होता येत नाही. माझा भावना मी समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहचवू शकत नाही! आज माझ्या लग्नाला अठ्ठावीस वर्ष झालीत. अजूनही बायको म्हणते ' तुमचं काही काळात नाही! सारखे मनात कुढत रहाता! मेल, एकदा मोकळं बोलून टाका! '
" आग, तस काही नाही! बर ते जाऊदे! तुझा नवरा ?"
" भला माणूस आहे! प्रचंड प्रेमळ आणि संशयी! ओव्हर पझेसिव्ह! तरी तो मला आवडतो. इगोइस्टीक! यशस्वी बिझिनेस मॅन! एक पाय भारतात तर दुसरा जगाच्या पाठीवर कोठे हि!"
" बापरे! अन मग तू?"
" मी त्याच्या बरोबरच! गरिबीच्या पहिल्या पायरी पासून ते आजच्या श्रीमंती पर्यंत, त्याने मला सोबतच ठेवले आहे! मला तो सोडून कोठेच जात नाही!"
बराच वेळ ती 'आपण' कसे सुखात,आणि आनंदात आहोत हे सांगत होती. आणि मी, माझी बाजू मांडण्यासाठी संधी शोधात होतो! पण तिला थोपवून माझे म्हणणे सांगणे मला जमेना. मग मी तो प्रयत्नच सोडून दिला. फक्त ऐकत राहिलो!
आता हि तीनदा जग पालथं घालून आलेली. आपण तिच्या मानाने सामान्य. मग तिला 'ते ' द्यावे का नको? या संभ्रमात मी होतो. तिच्या नजरेतून ते सुटले नाही!
" तूला काही तरी बोलायचे आहे का?"
" हो, पण तस विशेष काही नाही! तुला 'ते' देऊ का नको ..... "मी अडथळो.
" काय? दे ना! माझं गिफ्ट असेल! हो ना? "
" हो, ... " मी हळूच, तिचे आवडते 'फाईव्ह स्टार'चे चॉकलेट दिले .
मला तेव्हा नौकरी नव्हती. कसे बसे पैसे जमा करून मी तिला 'फाईव्ह स्टार'चे चॉकलेट देत असे. तिला ते खूप आवडायचे.
क्षणभर तिचे डोळे ओले झाल्या सारखे वाटले! लगेच म्हणाली,
"खरं सांगू खूप दिवसांनी मन भरून आल्या सारखं झालं! ते दिवस आठवले. बरे झाले तू आज भेटलास. मी उद्या यु.के. ला जातीय! माहित नाही कधी येईन! भारतात आले कि तुला कळवीन!"
" मला काही बोलायचं ...... "
" आता मी निघते. इतकावेळ आपण बोललोच कि! आणि तुला काय बोलायचं ते पुन्हा बोलू! बाय!"आणि आली तशी, ती भुर्रकन निघून गेली.!

मी हताश पणे ती गेली त्या दिशेला पहात राहिलो! आतून रितेपण भरून आले. स्वतःहाची पुन्हा चीड आली! आज हि तिला काहीच सांगू शकलो नाही! पण झाले ते बरेच झाले. आता 'मी तुझ्याशी लग्न का करू शकलो नाही' याची करणे तिला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता! त्याची तिला गरजच नव्हती! आणि लग्न झाले नाही ते हि चांगलेच म्हणावे लागेल! हि सुख माझ्या कुवती बाहेरची होती!मी ती देवू शकलो नसतो! माझ्या साठी आज ती सुखात आहे हि खूप समाधानाची बाब आहे! जे झाले ते उत्तम!

तिने जाताना माझ्या साठी एक छोटेखानी बॉक्स टेबलवर ठेवला होता. तो मी उघडला. त्यात दोन गोष्टी होत्या. दोन छोटे 'किसमी'ची चॉकलेट आणि एक चौकोनी कागदाची घडी! आम्ही जेव्हा, जेव्हा भेटायचो, तेव्हा तेव्हा ती दोन किसमी ची चॉकलेट आणायची. एक आपण खायची आणि एक मला द्यायची,मग आमचे बोलणे सुरु व्हायचे!

एक 'किसमी ' मी तोंडात टाकले आणि हलक्या हाताने मी कागदाची घडी उघडली. 'माझी आठवण येते का?' हेच तुला विचारायचे आहे, हे मला माहित आहे! तेव्हा माझे नकळत्या वयातले प्रेम होते. हे हि मला उमगल आहे. पण आजही माझे तुझ्यावर प्रेम आहे! पण कळते प्रेम! वय, पैसा, वासना, भावना आणि नाती यांच्याही पलीकडचे! आणि हो तुझ्या प्रश्नाचे उत्तर --जे विसरलेले असतात त्यांना आठवावं लागत!तुला नाही!

उरलेले चॉकलेट तोंडात टोकून सावकाश चघळत मी घराकडे निघालो. माझ्या मनातलं जाणून घेणाऱ्या दोनच व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या एक हि आणि दुसरी माझी आई!


---सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED