Sayko books and stories free download online pdf in Marathi

सायको!

जेव्हा जेव्हा संध्याकाळी सवड मिळेल तेव्हा मी येथे येवून बसतो. आमच्या गावा पासून साधारण दीड -दोन किलोमीटर वर हे एक रेल्वे स्टेशन आहे. पूर्व -पश्चिम पसरलेला 'फलाट', संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नाहुन निघतो, दृष्य रोजचेच असले तरी, ते रोजच मला विलोभनीय वाटते. काय म्हणता वर्दळ? अहो, खेड्याचे 'ठेसन' आहे. कसली आलीय वर्दळ? औषधा सारखी सकाळ -दुपार -संध्याकाळ, एक एक रेल्वे शिट्टी मारून जाते. त्या सुमारास चार दोन रेल्वे कर्मचारी, एक स्टेशनमास्तर, एखाद-दुसरं प्यासिंजर इतकंच. बाकी इतर वेळेला निवांत कारभार! सायडिंगची एखादी मालगाडी, चार गांजलेल्या व्यागिनी, दूरवर स्लिपरच्या वर्षानुवर्ष पडलेली फळकुट, दगडाच्या गिट्टया (मेटल ) ,बाजूलाच दगडी चिरे ,काही न घडवलेले मोठाले दगड. हे कुठल्याही स्टेशनवर दिसणार नेहमीच दृश्य आमच्या पण स्टेशनवर आहे. हे सार सुस्त, पेंगत असल्या सारखं पडलंय! नाही म्हणायला संध्याकाळच्या साडे सातच्या गाडीला चार दोन भिकारी मात्र, रात्री मोकळ्या फलाटावर पथारी ठोकायला येतात, बेवारशी कुत्र्यांना तेव्हडीच सोबत!

स्टेशनच्या मावळतीच्या टोकाकडल्या, शेवटच्या सिमेंटच्या बाकड्या वरली धूळ मी हातातल्या पेपर ने झटकली आणि बूड टेकवले. मी नेहमीच येथे बसतो. समोरचे चकाकणारे दोन रूळ क्षितिजावर एकमेकांना मिळतात ते इथून स्पष्ट दिसत. त्यांच्या मिलन बिंदूवर मावळणारे 'सूर्य बिंब '!, भिवया सारखे दोन निळसर डोंगराच्या रेषा! नजर हटत नाही. 'ती'ला खूप आवडायचे येथे बसणे! माझा हात आपल्या हातात घट्ट धरून ती मावळणाऱ्या सूर्या कडे पहात बसायची.!
"ते पाहिलंस का? लाल आणि पिवळा रंग कसा छान सुटा -सुटा दिसतोय. तू न याच एक पेंटिंग कर आपण फ्रेम करून आपल्या बैठकीत लावूत. "
" हु "
"बघ, तो लाल रंग पिवळ्यात मिसळून केशरी होतोय ,मघाचे चमकदार निळे आकाश आता काळवंडू लागलाय!"
असेच बरेच बोलायची. माझे लक्ष तिच्या बोलण्याकडे नसायचेच. मी तिच्या ओठाच्या लयबद्ध हालचाली कडे पाहत राहायचो! तीच माझ्यासाठी अमुल्य गोष्ट होती.!
आत्ताही तशीच संध्याकाळ आहे. तसेच चमकदार निरभ्र निळसर आकाश आहे, आज हि हवेत तोच आलाप आहे, मंद झुळकेची लयबद्ध आवर्तन तशीच आहेत, तसाच नभातला तो केशरी रंग काळवंडलेल्या निळाईत मिसळणार आहे, मग ना उजेड ना अंधार अशी स्थिती येईल, हळू हळू अंधाराचे घट फुटू लागतील, किर्र अंधार दाटत जाईल. सगळं तसाच आहे फक्त 'ती' सोबत नाही.! जाऊ द्या. नाही आपल्या नशिबी दुसरं काय?

मी बाकड्यावर मांडी घालून बसलो. पायाची घडी घातली आणि पेपरची घडी उघडली. त्याच त्या बातम्या, बलात्कार, जाळपोळ, खून,दरोडे. नेहमीचेच. पण गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय! चार मुडदे पडलेत.! हो, या रेल्वेस्टेशनच्या परिसरात.! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय! का?माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत. पैशा साठी म्हणाव तर, मरणारे फकाट, भिकारी होते! दुश्मनी? पण भिकाऱ्याशी कोण दुश्मनी आणि का करणार? सायको? माहित नाही. एक गोष्ट चमत्कारिक आहे, रुपयाच नाणं मात्र प्रत्येक मुडद्या जवळ सापडलंय! अर्थात तो एक योगायोग असेल, कारण भिकाऱ्या जवळ नाणं असणारच कि. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय? ज्या गावाला आपल्याला जायच नाही त्या गावचा रस्ता कशाला विचारायचा?

तेव्हड्यात गाडीची कर्कश्य शिट्टी वाजली. मी दचकलोच. काय भयानक आवाज आहे हो! नेहमीच असून हि मी दचकलो. चला हि गाडी गेली की घरी जावे झालं. आज साडेसातची गाडी तास भर लेट झालीय, आजच्या दिवसातली शेवटची गाडी. आता सकाळपर्यंत निवांत. रेल्वेच्या समोरच्या लेडीज कंपार्टमेंट मधून दोघे भिकारी उतरले तर, मागच्या डब्ब्यातून एकजण उतरतोय. आता काय? स्टेशन बाहेरच्या 'देशी' मधून बाटल्या आणतील आणि सगळे मिळून 'पार्टी ' करतील, आणि मोबाईलवर चावट क्लिप पहातील! हो, त्यातल्या दोघांकडे आहेत मोबाईल! मी एकदा पाहिलंय त्यांच्या कडे. जाऊ द्या. हे त्यांचं नेहमीचंच आहे. आपल्याला काय करायचंय? काही का करेनात. आपण आपलं निघावं झालं.

मी स्टेशनला वळसा घालून त्या झाडा खाली आलो. 'तो' मागल्या डब्ब्यातून उतरून या झाड खाली बसलेला मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पहिले होते, आणि त्याच बरोबर जवळच पडलेले ते 'मेटल ' करण्यासाठी आणलेले दगड पण! झाड मागच्या खांबावरील दिव्याच्या उजेडात तो परिसर बऱ्या पैकी उजळला होतो. मी त्याच्या जवळ गेलो. खिशातला रुपयाचा बंदा त्याचा पुढ्यात टाकला! नमागता मिळालेला त्याचा आयुष्यातला हा पहिलाच रुपया असावा!
" याच पैश्या तू त्या दिवशी -----" मी काय बोलतोय या कडे दुर्लक्ष करून तो ,पुढ्यातला रुपया खरा आहे का नाही, हे ते नाणं डोळ्या जवळ घेऊन तो पहात होता. तो रुपया न्याहाळत असताना मी तो शेजारचा दगडी चिरा दोन्ही हातानी उचलला, चांगला माझ्या डोक्या पर्यंत आणि -----------------!!! उद्याच्या वृत्तपत्रासाठी ठळक हेडलाईन तयार झाली होती ! " आणखी एक खून ! पोलीस काय करत आहेत ?"
०००

पण का ? --------------------------------------------------------------------------------------------------------------
सांगतो .
त्यादिवशी अशीच गाडी लेट होती, दोन तास. ऑफिसाची काम उरकून मी परतलो होतो. खरे तर दुपारीच येणार होतो, पण बायकोच्या सिझरिंग साठी आमच्या सोसायटी तुन (शिक्षक सोसायटी हो )कर्ज काढले होते, त्याचा चेक मिळायला उशीर झाला. म्हणून हि शेवटची गाडी धरली. मोठे काम झाले होते. उशीर झाल्याची रुखरुख होतीच, पण काम झाल्याचे समाधान पण होते. दिवस भाराची दगदग झाली होती, अंग आमंबल होत म्हणून, स्टेशन बाहेरच्या टपरीवाल्या कडे चहा घेतला, एक सिगारेट पण घेतली. तशी मी ओढत नाही पण आज जरा मुड आला होता. मला चहा देऊन तो टपरीवाला टपरी बंद करून निघून गेला. मी हातातला तो चहाचा कागदी कप फेकून दिला आणि सिगारेट पेटवली. पैशाचे काम तर झाले. चारदोन दिवसात चेक वठला कि दवाखान्यात पैसे भरून टाकावेत म्हणजे काळजी नाही. अशा काहीश्या विचारात होतो, तोच कोणी तरी अचानक समोर आले.
"साहेब गरिबाला काय तर द्या!" लाचार तोंडाचा हा भिकारी मी अनेकदा या प्लॅटफॉर्मवर पहिला होता. अनेकदा त्याला रुपया-दोन रुपये दिलेही होते.
"अरे या वेळी? आज काही नाही बाबा"
" असं कस? नाही म्हणू नका!"
काय लोचट आहे. मी मनात म्हणालो.
" काय त द्या जी, लै भुका लागल्यात बाग!"
काही तरी दिल्या वाचून आपली सुटका नाही, हे माझ्या लक्षात आले. मी खिशातून पाकीट काढले. काय होतय हे कळायच्या आत त्याने पाकिटावर झडप घातली! मी सटपटलो. असे काही होईल अपेक्षितच नव्हते! मुख्य म्हणजे त्या पाकिटात तो चेक पण होता! मी त्याला भिडणार तोच, दोघा चौघांनी मला मागून धरले! तेही भिकारीच होते! स्वतःच्या असाह्यतेची चीडअली.
"अरे सगळे पैसे घ्या पण तो चेक ----" माझ्या तोंडात घाणेरड्या कपड्याचा बोळा कोणी तरी कोंबला. पाठीत जोराचा दणका बसला. बहुदा लाकडी दंडुका असावा. तेव्हड्यात डोक्यात काहीतरी लागले. लाथा, बुक्क्या आणि काय काय, सहनशक्ती संपली तशी माझी शुद्ध हरवली !


चार दिवसांनी शुद्ध आलो. आठवडयांनी हॉस्पिटल मधून सुटका झाली. तोवर माझे विश्व् उद्धस्त झाले होते! मी वेळेवर आलो नाही. बायको बेचैन झाली. बी पी वाढला. चक्कर येऊन पलंगाच्या कोपऱ्यावर पडली! सोबत? कोठून आणणार सोबत? मी हिच्याशी लग्न केले तेव्हा 'तू आम्हाला मेलास ' म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्याशी सम्बन्ध तोडून टाकले होते! आणि हिच्या घरचे ---- कोणीच नाही. हि अनाथ पोर! लग्न झाल्या पासून मीच हिचा बाप, माय, भाऊ, बहिण, नवरा ----सगळच होतो! दवाखान्यात नेई पर्यंत उशीर झाला होता म्हणे. काय करणार? खेड्यात रहाणाऱ्यालोकांना दवाखाने पाच पाच किलोमीटर लांब असतात. शिवाय वाहनाची सोय नसते. गेली,पोटातल्या बाळा सगट! या जगान हिला खूप छळून काढलं. हि जगायला पण भीत होती! आत्महत्या करायला निघाली होती! मी तिला वाचवली. जगण्याची उम्मेद आणि हेतू दिला! पण जायची ती गेलीच! आमचे लग्न झालावर सुद्धा , झोपताना माझा हात हातात घट्ट धरून झोपायची! इतकी भित्री! कशी गेली असेल मरणाला सामोरी! तेव्हाच मी प्रतिज्ञा केलीय मिळेल तो भिकारी मी नष्ट करीन! याला तुम्ही 'बदला ' म्हणा, नाही तर मला 'सायको ' म्हणा!

सु र कुलकर्णी --आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच Bye.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED