Kon hoti ti ---- books and stories free download online pdf in Marathi

कोण होती ती ?

तसा 'तिचा' आणि माझा सहवास उणे -पुरे पंचेवीस -तीस वर्षांचा. आमच्या सहवासातून आणि तिच्या सांगण्यातून 'ती ' थोडी फार समजली. जगण्याची चिकाटी आणि दुःख यांचं मिश्रण होती. तिला तीन भाऊ आणि एक मोठी बहीण होती. पण इतरांन पेक्षा तिचा लहानग्या 'भगवानावर' भयंकर जीव. चिंचेच्या बोटकातले, अर्धे बोटूक भगवाना साठी ठेवायची. देवळातला खडीसाखरेचा खडा असो कि पाडाचा आंबा असो. त्यात भगवानाचा हिस्सा असायचा. घरची गरिबी. भांडी, धुणं, नदी -विहिरीचं पाणी, सडा सारवण, सार तिच्या आईच्या बरोबरीनं करायची. थोरली बहीण सक्काळी दूध -काला खाल्ला कि गजगे घेऊन खेळायला पळायची. शेतात जाता -येत, म्हशी मागे फिरताना पायात काटे मोडायचे, म्हणून कोणीतरी एक खेटरांचा जोड दिला होता म्हणे. हिने काय करावं? त्यातली एक चप्पल भगवानाला दिली! का? तर त्याच्या किमान एका तरी पायात काटा मोडूनये! इतका जीव, ज्या भावाला लावला तो तिच्या शेवटच्या आजारपणातहि भेटीला आला नाही! गेली तरी आला नाही! 'भगवानाला पत्र टाकून बोलावून घ्या', म्हणत गेली!

घरच्या गरिबी आणि 'पोरीला काय करायचंय शिकून?' या भावनेतून तिला शिक्षण मिळालेच नाही. पण इकडून तिकडून काही काही शिकली. तिला लिहता वाचता येत होते. तिची स्मरण शक्ती दांडगी होती. एकदा कानावर पडलेले, ती पुन्हा पुन्हा आठवून म्हणत असे. 'ईश्वर मती मज द्यावी ...',' कैलास राणा .... '
आरत्या, मस्त चालीवर म्हणायची. तिचे कथन भयंकर प्रत्यंकारी असायचे. तिच्या लहानपणी गावात प्लेग कसा यायचा? मग घर सोडून शेतात- रानात राहायला कशी भीती वाटायची? एकदा वाघाने दत्ता मामाला खोपीतून, कसा ओढून नेला? वाघा - कोल्ह्य पेक्षा, साप विंचवाची कशी दहशत होती? हे ती ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे यावेत असे रंगून सांगत असे.
' अन मग तुमि काय करायचा?' कोणी तरी विचारायचे.
' मग ना? आमी देवाचा धावा करायचो, दत्ता दिगंबराया हो, पांडुरंग -पांडुरंग म्हणायचो, आस्तिक आस्तिक म्हणायचो. मग ..... मग ..... सकाळचं व्हायची! एकदम धीर यायचा!' त्या काळ रात्रीत अडकलेले श्रोते सुद्धा सुटकेचा श्वास सोडायचे.

खाण्या पेक्षा कष्ट ज्यास्त होते. तशी ती रोडच होती. लग्न झाले . दोन मुलं एक मुलगी झाली. सासुरवास होताच. पण जरा सासरी स्थिरावल्या सारखी होत होती. थोडे सुखाचे दिवस आले, असे वाटत असतानाच प्रकृती साथ देईना. कृश होत चालली होती. नणंद, जावा भावकीतले तर आता हाड्नकातड म्हणू लागले. सासूने तर 'मड 'च म्हणायला सुरवात केली! तिचे दागिने,नवी कापड आपणच वापरायला सुरवात केली.
'आत्ये, ते लाल लुगडं कोरच ऱ्हाऊद्या, गौरीच्या हळद -कुंकाला नेशिन, ' ह्यांनी ' हौशेने आणलंय.' 'अन तुला मड्याला काय करायचंय? एकदा नेसल्यान काय होतंय? पुन्हा घे कि तुज तुज बोळगतट! मी काय उरावर बांदून नाणाऱ्य का काय? अली मोठी हौशीची!' असे जिव्हारी लागणारे आणि जहरी संवाद रोजचेच झाले होते!

एका रात्री, रात्र कसली सुर्यास्था नन्तर एखादा तास झाला असेल, परसातून घरात येताना, ती कश्याला तरी अडथळुन पडली. हातातला कंदील दूर जाऊन पडला आणि विजला. मिट्ट अंधार! तिने डोळे उघडले तेव्हा वैद्य कसलेसे चाटण करून देत होते. तापाने ती फणफणली होती!
'काय झालं, ग? '
' मी पडले. फेकून दिल्या सारखी!' कशी बशी ती म्हणाली. पुन्हा ग्लानीत गेली!
मग सुरु झाले एक अघोर सत्र! कारण त्या दिवशी होती अमोश्या! पडली, ती वेळ वाईट होती म्हणे! बाहेरची बाधा झाली या बद्दल घरच्यांची खात्रीच पटली ! दहीभात कुंकू मिसळलेला उतरून टाकणे , हळद -कुंकवाची ती रिंगणे, शकुन पाहून त्या बरहुकूम उपचार करणे, लिंबाच्या झावळ्यांचा चोप (शुद्ध हरपे पर्यंत! ), मारुतीला, पिंपळाला फेऱ्या, मुंज्या चा उतारा, रमल भाकिते ........ तिच्या तोंडून ऐकताना वाटायचे, अरे, असे काय होते, त्यामुळे हि वाचली ? केवढी हि शारीरिक आणि मानसिक छळवणूक कशी सहन केली असेल?
"कस, सोसलस ग हे सार?" मी एकदा विचारलं. तर म्हणाली,
" कुठं सांगू नकोस. फार त्रास व्हायचा रे, पाठीवर वळ उठायचे! अंग ठणकायचं! जीव नकोस व्हायचा! पण सगळं सहन केलं! कोणासाठी ठाऊक आहे?"
" कोणा साठी?"
" पोटातल्या बाळा साठी! "
" म्ह्नणजे? ........ घरच्यांना ठाऊक होते?"
"नाही. पण नंतर वैद्यांनी सांगितले. "
" मग? झाली असेंलना तुझी त्या 'भुताटकीतून ' सुटका?"
" कर्म माझं! भूत पोटी आलाय,' पाडून टाक ' म्हणून घरचे मागे लागले! "
" मग?"
"मग काय? भूताटकी पेक्षा अघोरी उपाय नशिबी आले! ---------- पण माझ्या लेकरानं त्या उपायाला दाद दिली नाही! सूर्य नारायण सात घोड्याच्या रथात बसले, त्या दिवशी तो सूर्योदयाला जन्माला! रथसप्तमीला! हो मुलगाच झाला. खूप अशक्त, पण पोटात असल्यापासून दुःख पचवण्याची ताकत घेऊन आलाय! "

तिने आयुष्य भर कष्टच केले. एकत्र कुटुंब होते तेव्हाही ,आणि नवऱ्याच्या बदली पायी दुसऱ्या गावी बदली झाली तेव्हाही. कारण तो पर्यंत तिचे स्वतःचे कुटुंब विस्तारले होते. ती सवाष्ण होती, तो वर मी तिला कधी झोपलेली पहिली नाही. रात्री मी झोपेपर्यंत ती स्वयंपाक घरात झाकपाक करत असे. आणि सकाळी उठलो तेव्हा,चहा करण्यात चुलीवर गुंतलेली असे. इतके कष्ट उपसत असून हि कधी कोमेजलेली दिसली नाही. केव्हाही पहा, ती ताजी, टवटवीतच! सकाळीच स्नान, स्वच्छ नऊ वार चापून चोपून नसलेलं लुगडं, कपाळावर रसरशीत रुपया एव्हडं कुंकू. ती क्वचितच बैठकीच्या खोलीत यायची, बहुतेक तिचा वावर मागील दरानेच असे.

मुलांचे तिला खूप कौतुक होते. शेजारच्या बायकांना ती नेहमी सांगायची,
'आमच्या मधला 'माधव ' इंजिनेरींगला आहे. तो एकदा इंजिनियर झाला कि, मला तो जीप गाडीतून फिरविला, तुम्हीं बघाच !'


तेरा वर्ष थायरॉईड कॅन्सरशी लढली! पोटात आग होतेय म्हणत गेली! घश्यात आग होतेय म्हणत गेली!
दोनदा ऑपरेशन झाली! दोनदा किमो झाली! कॅन्सर जिंकला! तिचा माधव इंजिनियर झाला होता, पण ती सरकारी दवाखान्यातच गेली! तिची जीप गाडीत फिरण्याची इच्छा मात्र, 'अमर ' राहिली!

कोण होती ती?

ती माझी आई होती!! अन मीच तो ' पोटातून दुःख सहन करण्याची ताकत घेऊन आलेला ' भाग्यवान कि हतभागी!

------सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच , Bye


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED