फास ! suresh kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फास !

श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता. 'मानसी इंडस्ट्री'चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री. वय फक्त सत्तावीस! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा, अशी त्याच्या मित्रात, त्याची ओळख होती. कॉफी संपत अली होती, तोच कोठेतरी मोबाईलची रिंग झाली. तिचाच फोन असणार! नक्कीच! कारण तिच्या अस्पष्ट आवाजातले बोलणे त्याला ऐकू येत होते. बहुदा ती गॅलरीत किंवा किचन मधून बोलत असावी. शब्द उमगत नव्हते, पण टोन कळत होता. कोणास तरी ती लाडे-लाडे बोलत होती. श्री च्या कपाळावर आठ्या पडल्या.
"मनु" त्याने जरा वरच्या पट्टीतच हाक मारली.
आपल्या ओल्या केसांना टॉवेल गुंडाळत मानसी बेडरूम मधून बाहेर आली. नुकतीच तिने शॉवर घेतला असावा. छान टवटवीत दिसत होती. साध्या कॉटनच्या साडीत सुद्धा, ती सुंदर व सात्विक दिसत होती. अन का नाही दिसणार? हेवा वाटावा अशी पाचफुट आठ इंच उंची, सत्यनारायणाच्या प्रसादाला भाजलेल्या रव्या सारखा गव्हाळ रंग आणि नितळ कांती, उंचीत भर घालणारी सडसडीत अंगकाठी, निरागस बदामी आकाराचा चेहरा, रेखीव नाक, बोलके डोळे, पातळ गुलाबी ओठ, आणि भुरळ घालणारी फिगर!
या -या रूपावर भाळून तर आपण हिच्याशी लग्न केले.
"का रे, मला आवाज दिलासा का तू? अजून कॉफी हवी का, तुला?" मानसीने विचारले. मानसीच्या आवाज फारसा गोड नसला तरी 'सेक्सी' होता.
" ते कॉफीचं राहू दे. कोणाचा फोन होता ग आत्ता?"
"काय? फोन? कधी?" मानसीने विचारले. तिच्या डोळ्यात फक्त, आश्चर्य काठो काठ भरले होते.
"अग, तू आत्ता बोलत होतीस ना?"
" मी? नाही रे! मी तर नुकताच बाथ घेऊन आलीयय! "
"मला खोट बोलू नकोस! हल्ली तुला सारखे कोणाचे तरी फोन येत असतात! मला खात्री आहे, तुझे कोठे तरी 'अफियर'आहे! त्याचेच तुला फोन येतात! वेळी अवेळी!"
" स्टॉप इट!, श्री. तुला हजारदा सांगितलंय, हा तुझा भ्रम आहे!"मानसी खूप बेचैन झाली. श्री बरेचदा असाच रिऍक्ट होतो हल्ली!
"मी आता गप्प बसणार नाही! तुला आणि 'त्याला' चांगला धडा शिकवीन!"तो भयानक भडकला.
"ओके. ओके, श्री तू आधी शांत हो! आपण थोड्या वेळाने सविस्तर बोलू. प्लिज कुल डाऊन! अरे, इतका एक्साईट नको रे होऊस, बाबा! मला तुझी न भीती आणि काळजी वाटायला लागते रे! प्लिज शांत होना?" मानसी काकुळती येऊन म्हणाली.
" तू मला फसवते आहेस आणि-- आणि मी कसा शांत होऊ ?" तणतणत श्री बेडरूम मध्ये गेला आणि धाडकन दार लावून घेतले.
हताश नजरेने ती बंद दाराकडे बघत राहिली. श्री ची केस आता सायकिऍट्रिसच्या हाती देण्याची वेळ अली आहे. कसलं खूळ डोक्यात घेतलंय कोणास ठाऊक? काहीही असो उपाय तर करायलाच हवा. नसता वेडा होईल.
००
डॉ. काळे, नामवंत मानोसोपचार तज्ञ्. यांच्या क्लिनिक मध्ये श्री आणि मानसी, डॉ. काळेंच्या समोर, त्यांच्या कन्सल्टेशन रूम मध्ये बसले होते.
"डॉ. हे माझे पती श्रीकांत." मानसीने श्री ची ओळख करून दिली.
"श्री, तुम्ही सांगता का मी सांगू? का तुम्हास एकांतात डॉक्टरांशी बोलायचे आहे?" मानसीने डॉक्टर देखत श्री ला विचारले.
"हे पहा मॅडम, कोणीहि सांगा, पण सांगताना तुम्ही दोघेही येथेच असावेत, म्हणजे 'माझ्या अपरोक्ष यांनी भलतेच सांगितले' अशा संशयाला वाव नको, असे मला वाटते. " डॉक्टर काळेनी आपल्या भारदस्त आवाजात सुचवले.
"तूच सांग." श्री हळूच म्हणाला.
" ओके. डॉ., याना,मला कोणाचे तरी फोन येतात, असे वाटते, फोन वर मी बोलल्याचा हि भास होतो, आपण घरात नसताना 'तो' घरी येतो, असे याना वाटते, आपल्यावर कोणीतरी सारखी नजर ठेऊन आहे असे वाटते, 'तो ' माझा प्रियकर आहे असे वाटते, 'तो ' मला यांच्या पासून हिरावून, नाही तर हिसकावून घेणार याची त्यांना खात्री आहे! इतकेच काय तो यांचा खून करून माझे हरण करणार आहे असा यांचा कयास आहे!"
" वाटते,वाटते, काय? ते सगळं खरं आहे डॉक्टर! हिचा तो जुना प्रियकर आहे! हिचे आणि त्याचे अनैतिक संबंध आहेत! हि व तो मिळून माझा खून करणार आहेत! मी आता पोलिसात जाऊन सगळं सांगणार आहे आणि पोलीस प्रोटेक्शन घेणार आहे!" श्री रागाने ओरडला.
"श्रीकांत! असे ओरडू नका! हे क्लिनिक आहे! शांत व्हा! " डॉ काळेंच्या आवाजात जरब होती.
"मॅडम, तुम्ही जरा बाहेर बसा. मला सरांशी एकांतात बोलायचे आहे. "
मानसी रूम बाहेर गेली. तोवर श्रीने स्वतःस सावरले.
" तर, श्रीकांत तुम्ही काही तरी सांगत होतात. सांगा आता. "
" डॉक्टर हीचा खरेच एक प्रियकर आहे! मला फक्त भास नाही होत!"
"ठीक. श्रीकांत, आपण टू द पॉईंट येवू. मला प्रामाणिक पणे सांगा. तुम्हाला 'त्या 'प्रियकराची कितपत माहिती आहे? तुम्ही कधी त्याला प्रत्यक्ष पहिले आहे काय? त्याचे नावं काय आहे? तो काळा आहे कि गोरा? त्याची उंची किती आहे? तो काय करतो? आणि त्याहून महत्वाचे तुमच्या लग्नाला पाच वर्षे झालीत , आत्ताच 'तो ' कसा उपटला? आधीच का नाही आला? "
क्षणभर रूम मध्ये सन्नाटा पसरला .
" आज याची उत्तरे माझ्या कडे नाहीत.! पण संशय मात्र नक्कीच आहे.! आणि एक दिवस याची उत्तरे पण माझ्या कडे असतील!" श्री खालच्या आवाजात म्हणाला.
" द्याटस स्पिरिट! श्रीकांत तुम्ही स्वतःशी खूप प्रामाणिक आहेत. आपण खरच असा कोणी 'प्रियकर ' आहे का याची खात्री करून घेऊ. माझा एक मित्र डिटेक्टिव्ह एजन्सी चालवतो. तो हे काम करील. अर्थात तुमची परवानगी असेल तरच. त्यात काही तथ्य आढळून आले तर, तुम्ही म्हणता तसे पोलीस प्रोटेक्शन घेऊ. स्वरक्षण करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तोवर आपण ट्रीटमेंट सुरु करू! त्यामुळे तुम्हास मानसिक बळ मिळेल, आत्मविश्वास वाढेल, फॅक्ट्ररीत खूप ट्रेस येतो, तो हि कमी होईल, मन शांत होईल, आणि समजा काही भ्रम असेल तर तोहि कमी होईल! आपण सारे सुरळीत करू. पण हे सारे तुमच्या सहकार्यावर अवलूंबून आहे. विश्वास ठेवा मी कायम तुमच्या सोबत आहे! कधीही थोडी जरी बेचैनी वाटली तरी सरळ फोन करा! श्रीकांत, आत्ता आपण जे बोललोय ते तुमच्या माझ्यात राहील.! त्यातले मी मॅडमशी काही शेअर करणार नाही! तुम्ही हि काही सांगण्याची गरज नाही! मला आता मॅडम शी बोलायचे आहे. त्यांची पण बाजू ऐकावी लागेल! तेव्हा प्लिज त्यांना आत पाठवा आणि तुम्ही बाहेर रिलॅक्स व्हा."
डॉक्टर काळेंच्या आश्वासक सल्ल्याने श्री ला खूप बरे वाटले. तो केबिन बाहेर पडला.
मानसी केबिन मध्ये अली. डॉक्टर काळे काही विचारात गाढले होते. मानसीची चाहूल लागताच त्यांनी तिला बसायला सांगितले.
"या मॅडम, बसा. मी श्रीकांतान्शी सविस्तर बोललो. त्यांची 'केस' खूप ऍडव्हान्स स्टेजला गेलीय! "
"म्हणजे ?" मानसीने घाबरून विचारले.
" अहो, त्यांचा 'भ्रम ' खात्रीच्या उंबरठ्यावर आहे! केव्हाही 'खात्रीत' परावर्तित होईल! मग त्यांचे मन त्या 'प्रियकराचे' स्वतंत्र अस्तित्व तयार करील. त्यातून लवकर सुटका होणे अवघड असत!"
"बापरे! अहो, आता मी काय करू? केव्हाची त्याला विनवतेय येथे येण्यासाठी! कसाबसा मित्रांना सांगून आज इथपर्यंत आणलाय!" मानसी रडवेल्या स्वरात म्हणाली. आतून तुटत असल्या सारखी.
"मॅडम, अश्या हताश नका होऊ. आणि धीर पण नका सोडू! आपण सर्वतो परी प्रयत्न करू! नक्की यश येईल. त्या साठी त्यांना संमोहित करून त्यांच्या अंतर्मनाला सूचना द्याव्या लागतील, कि 'असा कोणी प्रियकर अस्तित्वात नाही '. किती सिटिंग्स घ्याव्या लागतील हे त्यांच्या सहकार्यावर अवलुबुन आहे. तोवर त्यांना खूप जपावे लागेल. आहार, विहारा, बरोबरच मनाची पण काळजी घ्यावी लागेल. एक्साईट होतील असे काही करू नका. मी काही औषधे देतोय ती वेळेवर द्या. विशेषतः रात्रीचा डोस महत्वाचा आहे. तो मात्र चुकवू नका. शिवाय एक ऑडिओ ट्यून या पेनड्राइव्ह मध्ये देतो, झोपताना हि योगनिद्रेची ट्यून त्यांच्या हेडफोन लावून ठेवा. अतिशय शांत आणि शीतल ट्यून आहे, त्यात मी काही पॉसिटीव्ह सजेशन्स पण घातलेत. आराम वाटेल. काही दिवस फॅक्टरी पासून जमल्यास दूर ठेवा, तेव्हडाच ट्रेस कमी होईल. आणि हो काळजी करू नका! काही कमी ज्यास्त वाटले तर सरळ मला फोन करा."
डॉक्टर काळेंच्या शब्दांनी मानसीला धीर आला.
मानसी आणि श्री काळेंच्या क्लिनिक मधून बाहेर पडले. डॉ. काळेंशी बोलून दोघांना पण बरे वाटत असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते.
००
दर महिन्याच्या सीटिंग मध्ये श्री स्टेबल होत होता. थोडी थोडी प्रगती होतेय असे वाटत असतानाच, एके दिवशी श्री ने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली!
मानसीवर आभाळ कोसळले.!
००
जगाच्या पाठीवर दूर कोठेतरी आलिशान व्हिला मध्ये डॉ.काळे आणि मानसी एकत्र होते! टेरेसवर उंच मानेच्या ग्लासात, त्याहून उंची ड्रिंक घेत डॉ. काळे रिलॅक्सेड मूड मध्ये, आपल्याच नशिबाचा हेवा करत बसले होते! मानसी सारखी 'सेक्सी डॉल' आणि करोडोची संपत्ती त्यांना मिळाली होती! मग का करू नये नशिबाचा हेवा! शेवटी डोकं कुणाचं? लोक चहा, कॉफी, दारूत विष घालून खून करतात, अन मी? योगनिद्रेत निगेटिव्ह सजेशन मिसळून सुसाईड करवली! ज्ञान कधीच वाया जात नाही! पण क्रेडिट गोज टु मानसी! हा सगळा प्लॅन तिचाच! समोर मानसीचा पेग भरून ठेवला होता. एव्हाना ती जॉईन व्हायला हवी होती? पण काय करतेय मानसी? त्यांनी कानोसा घेतला. ती मोबाईलवर कोणालातरी, या विकेंडला भेटीचे प्रॉमिस करत होती! फोन पूर्ण करून मानसी कळेना जॉईन झाली.
" कोणाचा फोन होता?" काळेंनी मानसीला विचारले.
" फोन? कुणाचा फोन? फोन तर या येथेच, तुझ्या समोरच तर पडलाय! " आपला पेग उचलत मानसी कमालीच्या आश्चर्याने म्हणाली!
डॉ. काळे वेड्या सारखे समोर पडलेल्या तिच्या फोन कडे बघत राहिले! म्हणजे पुढचा फास आपल्याच गळ्या भोवती तर नाही? श्री सारखा!

--सु र कुलकर्णी -- आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच . Bye.