मी एक अर्धवटराव - 25 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 25

२५) मी एक अर्धवटराव!
ती एक सायंकाळ! आमच्या जीवनातील एक मोठ्ठा विनोद जन्माला घालणारी, बायकोने बहाल केलेल्या 'अर्धवटराव!' या पदवीतला सत्यांश पटवाणारी, सिद्ध करणारी. त्या सायंकाळी आम्हाला एका नातेवाईककडे एका समारंभासाठी जायचे होते. ते ठिकाण माझ्या घरापासून बरेच दूर होते. मला दुचाकीवरून जायचा कंटाळा आला आणि हिचीही इच्छा आरामात टॅक्सीने जाऊ अशीच होती. चार वाजता निघायचे होते. बायकोला सजायला, नटायला खूप वेळ लागतो म्हणून हिने तीन वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली. पावणेचार वाजता ही म्हणाली,
"अहो, मी तयार आहे बरे का?"
"होय. आजकाल तू तब्येतीने चांगलीच तयार झाली आहेस..."
"मस्करी करू नका. गाडी बुक केली का?"
"होय. तेच करतोय..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी उचलला. 'अंबर टॅक्सी' असे पुटपुटत मी भ्रमणध्वनी चालू केला. एक-एक नाव 'अँम्बुलन्स... हां अंबर...' असे शोधत मी तो क्रमांक दाबला. तसा तिकडून आवाज आला,
"बोला. कुठे पाठवू? केव्हा पाठवू?" तशा स्वराने मी दचकत पत्ता सांगितला आणि म्हणालो,
"पंधरा मिनिटात पाठवा."
"पंधरा मिनिटे? बघतो. पाठवतो..." असे म्हणत तिकडून फोन बंद झाला.
"का हो, येतीय ना?" बायकोने विचारले
"हो ग. परंतु थोडसे विचित्र वाटले ग कारण जसा त्यांचा क्रमांक आपल्याकडे सेव्ह आहे तसाच माझा क्रमांक, माझे नाव आणि पत्ताही त्यांच्याकडे आहे. नेहमी ह्या कोणत्याही गोष्टी न विचारता फक्त किती वेळात पाठवू असेच विचारतात. आत्ता या साऱ्या बाबी तर विचारल्या पण म्हणाला की, पंधरा मिनिटात कसे शक्य आहे?"
"पाठवतो म्हणाले ना, झाले तर. काही अडचण असेल. नेहमीचा माणूस नसेल..."
"अग, प्रश्न माणसाचा नाही. सारी माहिती आणि कारभार संगणकावर चालत असतो..."
"जाऊ द्या. काहीही असेल पण गाडी पाठवतो म्हणाले ना?"
"हो तर म्हणालाय. बघू..." म्हणत मीही तयार होऊन सोफ्यावर बसलो. उगीचच काळजी लागली होती की, अजूनपर्यंत गाडीचा क्रमांक, ड्रायव्हरचे नाव, त्याचा संपर्क क्रमांक कसा आला नाही. मात्र तशा अवस्थेतही मला काही महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला...
नेहमीप्रमाणे मी देवदर्शनासाठी एका गावी निघालो होतो. महामंडळाचा तीन दिवसांचा पास काढला होता. मी इच्छित स्थानकावर पोहोचलो. गाडीची वाट बघत होतो. खूप वेळ झाला तरी गाडी येत नव्हती. मी सारखा घड्याळाकडे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे आणि गर्दीकडे बघत असताना माझा भ्रमणध्वनी वाजला. मी खिशातून काढला. त्यावरील नाव पाहात असताना मी मनात म्हणालो, 'आला बायकोचा फोन. घरातून निघून पुरता तासही झाला नाही तर आला चौकशीबाईंचा फोन..' फोनवर म्हणालो,
"हं बोल..."
"कुठे आहात?" प्रश्नपत्रिकेतला ठराविक प्रश्न
"कुठे म्हणजे रेल्वेस्थानकावर..."
"काय? अहो, अर्धवटराव, तुम्हाला बसने जायचे आहे. तसा तीन दिवसांचा पास आहे..."
"माय गॉड! अग, मी बसस्थानकावर न जाता चक्क रेल्वेस्थानकावर आलोय ग. इथे आल्यापासून सारखे काही तरी चुकल्यासारखे वाटतेय बघ. लक्षातच आले नाही. थांब लगेच बसस्थानकावर जातो..." असे म्हणत मी फोन बंद केला. धावतच बाहेर आलो. ऑटोने पटकन बसस्थानक गाठले. आणि निघण्याच्या तयारीत असलेली बस पकडून मार्गस्थ झालो... तो प्रसंग आठवून मी हसत असताना बायकोने विचारले,
"अहो, असे हसताय काय? काय पण सोंग. बघा. आपली टॅक्सी कुठपर्यंत आली ती पहा बघा. पुन्हा उशीर झाला तर ती मंडळी शिमगा करतील."
"होय. बघावेच लागेल..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी हातात घेत असताना त्यावर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. मी उचलला. तसा तिकडून आवाज आला,
"साहेब, मी ड्रायव्हर बोलतोय. तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी या चौकातून उजवीकडे वळलोय."
"बरोबर. थोडे पुढे आल्यावर 'एक मोठ्ठं अपार्टमेंट' लागेल. त्याच्या बाजूलाच आम्ही राहतो. त्या मोठ्या इमारतीजवळ थांबा. आम्ही आलोच..."असे म्हणत मी फोन बंद करून म्हणालो,
"अग, चल लवकर. गाडी आलीय..."
काही क्षणातच आम्ही त्या मोठ्या इमारतीजवळ पोहोचलो पण गाडी कुठे दिसत नव्हती. एक अँम्बुलन्स मात्र उभी होती.
"कुणाकडे आलीय हो अँम्बुलन्स?" हिने विचारले. काहीच उत्तर न देता मी इकडेतिकडे बघत भ्रमणध्वनी काढला आणि शेवटचा फोन ज्या क्रमांकावरून आला होता त्यावर फोन केला. पलिकडून फोन वाजत असताना माझे लक्ष अँम्बुलन्सला टेकून उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेले तो खिशात वाजणारा फोन काढत असल्याचे माझ्या लक्षात आले. फोन उचलून तो म्हणाला,
"हां साहेब..." ते ऐकत मी माझा फोन बंद करीत त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो,
"त.. तुम्ही.. म्हणजे अँम्बुलन्स कशी काय..."
"कशी म्हणजे? तुम्ही बोलावले नि मी अँम्बुलन्स घेऊन आलो..."
"अहो, पण मी तर टॅक्सी बोलावली होती. मायगॉड! सॉरी! सॉरी! काय झाले, मला गाडी हवी होती पण कसे आहे, भ्रमणध्वनीवर हे बघा ना, 'अँम्बुलन्स आणि त्यानंतर अंबर' अशी नावे सेव्ह केलेली आहेत हो. त्यामुळे चुकून अंबर टॅक्सीला फोन लागायच्या ऐवजी अँम्बुलन्सला फोन लागला हो.।माफ करा, वाटल्यास मी दंड भरतो..." असे म्हणत मी बायकोकडे पाहिले. तिचा तो नेहमीचा जळजळीत कटाक्ष मला रागारागाने 'व्वा! अर्धवट, व्वा! अँम्बुलन्समध्ये नेणार होता का? तेवढीच हौस राहिली वाटते. पुढच्या वेळी तर काय आपण शववाहिनीतून प्रवासाला जाऊया...' मी काही न बोलता ड्रायव्हरला शंभर रुपये दिले....
अशाच अनेकानेक प्रसंगांना सामोरे जात, गोड-कडू-तिखट-आंबट अनुभवांची मजा घेत, हसत-खेळत, रुसवे-फुगवे, सुख-दुःख, उन्हाळे-पावसाळे अनुभवत, पचवत मी ऐंशीव्या वर्षात आणि बायकोने पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण केले असले तरीही मी होतो तसाच आहे... कायमचा शिक्का आनंदाने मिरवत... मी एक अर्धवटराव!
@ नागेश सू. शेवाळकर