उद्धव भयवाळ
औरंगाबाद
एका चोरीची गोष्ट
सहज म्हणून खेडकरांच्या घरी मी गेलो आणि ते घरी भेटले असे सहसा कधी होत नसे. ते कुठेतरी बाहेर गेलेले असत. विशेषत: रविवारी तर स्वारी दिवसभर बाहेरच असायची. म्हणून आज रविवार असल्यामुळे खेडकर घरातून बाहेर पडले तर दिवसभर भेटणार नाहीत, या विचाराने मी जरा लवकरच त्यांच्याकडे गेलो. दार उघडेच होते. दारातूनच मी आवाज दिला, "आहेत का खेडकर?"
या माझ्या प्रश्नानंतर नेहमीप्रमाणे वहिनी स्वयंपाकघरातून समोरच्या कमऱ्यात येऊन 'ते आत्ताच बाहेर गेलेत' असे उत्तर देतील अशी माझी अपेक्षा होती. पण काही क्षण वाट पाहूनही कुणीच समोर आले नाही तेव्हा मी पुन्हा एकवार हाक मारली. घरामध्ये कुणीच नाही याबद्दल माझी खात्री झाली. त्या दरम्यान माझी नजर सहज त्या खोलीतील सामानावरून फिरली. पाहतो तर काय, वाटेमध्ये ट्रंका, सुटकेसेस वगैरे उघड्या पडल्या होत्या. त्यातील कपडे आजूबाजूस अस्ताव्यस्त पडले होते. शेल्फवरील पुस्तके आणि वर्तमानपत्रे खाली पसरली होती. तो सर्व प्रकार पाहिल्यानंतर रविवारचा मुहूर्त पाहून खेडकर घर बदलीत असावेत असा मी अंदाज बांधला. त्याला कारणही तसेच होते. या शहरातील सात वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी आतापर्यंत चार घरे बदलली होती. त्यांच्या ऑफिसमधील इतर लोक तर त्यांना खेडकर ऐवजी गमतीने मांजरखेडकर म्हणायचे. इतकी त्यांना घर बदलण्याची सवय होती!
घरामध्ये असा पसारा पांगवून खेडकर पतीपत्नी कुठे गायब झाले असावेत याबद्दल मी मनातल्या मनात अंदाज बांधू लागलो. इतक्यात माझे लक्ष मी ज्या दारात उभा होतो त्या दाराच्या कडीपाशी गेले. कोयंड्यामध्ये कुलूप पक्के लावलेले होते. मात्र कडी तुटून बाजूला होती; आणि दार उघडे होते. यावरून हा चोरीचा प्रकार होता याविषयी माझी पक्की खात्री झाली.
मी ताबडतोब खेडकरांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना बोलावून खेडकरांच्या घरातील ते दृश्य दाखविले. तोपर्यंत कुणीही तिकडे लक्ष दिले नव्हते. खेडकरांच्या घरात चोरी झाली होती याविषयी सर्वांचे एकमत झाले. काल रात्रीच्या पावसाचा आणि अंधाराचा चोरांनी फायदा घेतला होता.
खेडकर कुठे आहेत याविषयी मी चौकशी केली तेव्हा असे कळले की, खेडकर काल रात्री सहकुटुंब जवळच्या गावी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ते दोन दिवसांनी परत येणार होते. खेडकरांच्या शेजारचे नाडकर्णी, सावंत वगैरे लोकांशी मी चर्चा केली. घरातले काय, काय चोरीला गेले असावे याविषयी कुणालाच काहीच अंदाज बांधता येईना.
शेजारच्या रमाबाई मालतीबाईंच्या कानामध्ये कुजबुजत होत्या, हा खेडकर म्हणजे एक नंबरचा चतूर माणूस. सगळे पैसे बँकेत आणि दागिने बँकेच्या लॉकरमध्ये आहेत त्यांचे. घरात फुटकी कवडीदेखील सापडली नसेल बिचाऱ्या चोराला.
पळीभर तेलापासून ते पातेलेभर पिठापर्यंत खेडकरांच्या बायकोकडून उसने म्हणून नेणाऱ्या व कधीही परत न करणाऱ्या पार्वतीबाई सत्यभामाबाईंना सांगत होत्या, भलताच कंजूष हा खेडकर. कधी कुणाला कपभर चहादेखील पाजणार नाही. त्याची चोरी झाली हे छानच झालं.
ठमाकाकूंनी तर आपला पेढ्यांचा नवस सर्वजणींसमोर बोलून दाखवला. त्या म्हणाल्या, 'चोरीची माहिती पूर्णपणे कळल्यानंतर जितकी जास्त चोरी झाली असेल, तितक्या जास्तीच्या प्रमाणात मी मारुतीरायापुढे पेढे ठेवीन.'
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी लागेल असे जेव्हा मी म्हटलो, तेव्हा सर्व शेजारी काढता पाय घेऊ लागले. चोरी झाली हे कळताच त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते. पण आता पोलिसाचे नाव काढल्यावर सर्वांचे चेहरे उतरले.
" अहो, या पोलिसांच्या लफड्यात कशाला पडता? फिर्याद द्यायला गेलो की, आपल्यालाच ते चोर ठरवतात, नाहीतर चोराला शोधून आणण्यासाठी पिटाळतात." सावंत मला सांगत होते.
नाडकर्ण्यांचे दु:ख दुसरेच होते. पोलीसठाण्यात तक्रार दिल्यावर यदाकदाचित चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेच तर खेडकरांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळतील अन् मग त्यांची चोरी झाल्याबद्दलच्या आपल्या आनंदावर विरजण पडेल असे त्यांचे मत होते.
खेडकरांच्या संगतीत राहणारे, त्यांच्या सोबत फिरणारे, त्यांच्याकडून उसणे पैसे, उसन्या वस्तू घेणारे हे सर्व लोक. त्यांच्या अशा प्रतिक्रिया ऐकून मला अचंबा वाटला.
मी सर्वांना प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून कुणालाही सोबत न घेता सरळ पोलीसस्टेशनवर गेलो आणि खेडकरांकडील चोरीची तक्रार नोंदवली. खेडकर परगावी गेल्याचे त्यांना मी सांगितले. पोलिसांनीही तक्रार ऐकून घेण्यात उत्सुकता दाखवून मला आश्चर्याचा धक्का दिला. ताबडतोब तिथल्या फौजदाराने दोन शिपायांना सोबत घेऊन खेडकरांच्या घराची आतून बाहेरून पाहणी केली. नंतर पंचनामा केला.
वायरलेसने जिल्ह्याच्या कंट्रोलरूमला चोरीची माहिती देऊन श्वानपथक व हस्तमुद्रा तज्ञ बोलावले. दोन तासातच श्वानपथक आणि हस्तमुद्रा तज्ञ तिथे येऊन दाखल झाले.
हस्तमुद्रा तज्ञ (Fingerprint Expert} हे गृहस्थ म्हणजे वयाने म्हातारे, स्वभावाने चिडखोर होते आणि दोन-दोन मिनिटांनी तपकीर ओढून नाकातून विचित्र आवाज काढीत होते. खेडकरांच्या घरातील प्रत्येक वस्तूवरील चोरांच्या बोटांचे ठसे शोधतांना ते माझी मदत घेत होते. त्यामुळे त्यांच्या बसल्याजागी शिंकरण्याचे माझ्या अंगावर कारंजे उडत होते. बाकी मला त्यांच्यापासून काही त्रास नव्हता.
चोराच्या बोटांचे ठसे तपासण्यात दोन तास घालवून झाल्यावर हे महाशय म्हणाले, 'मला उगीचच हेलपाटा झाला. एकही वस्तूवर बोटांचे ठसे नाहीत. कमाल आहे.' असे बोलून ते माझ्याकडे एखाद्या मारक्या म्हशीसारखे पाहू लागले आणि नाकातून विचित्र आवाज काढून शिंकरू लागले. त्यांच्या या वागण्याला मी तर एवढा वैतागलो की, क्षणभर वाटले, आपल्याच बोटांचे ठसे देऊन टाकावे म्हणजे तरी स्वारी शांत होईल.
दरम्यान तिकडे चोराचा माग घेण्यासाठी दोन पोलीस आणि त्यांचा हुशार कुत्रा गेला होता. ती मंडळी एका माणसाला पकडून घेऊन आली. तो माणूस म्हणजे त्या गावातील अत्यंत सज्जन, पापभीरू म्हणून ओळखले जाणारे सरकारी प्रशालेचे म्हातारे हेडमास्तर साठे. सारा गाव त्यांना ओळखत होता. पोलिसांच्या कुत्र्याने आज त्यांना चोर ठरवले होते. साठे सरांचा चेहरा अत्यंत म्लान झाला होता. ते त्या शिपायांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्यांचे ऐकतो कोण? पोलिसांच्या तावडीत साठे सरांना पाहून मात्र माझ्यासह सर्वांचीच मती गुंग झाली. काहीतरी चुकले आहे असे सारखे मला वाटू लागले.
इतका वेळ खेडकरांच्या दारापाशी आरामखुर्चीवर विचारमग्न बसलेल्या फौजदारापाशी ते शिपाई साठेमास्तरांना घेऊन आले. साठेमास्तरांना पाहून फौजदारही बुचकळ्यात पडले. त्यांचा व साठे मास्तरांचा चांगला परिचय होता. काहीतरी गल्लत झाली आहे असे त्या फौजदारांनाही वाटू लागले. त्यांनी बाजूच्या खुर्चीवर साठेमास्तरांना बसवून हे कसे काय झाले म्हणून विचारले. इतका वेळ पोलिसी पहाऱ्यात भर रस्त्यातून आल्यामुळे साठेमास्तरांना फारच अपमानित झाल्यासारखे वाटत होते. त्यांनी हकीकत सांगण्यास सुरुवात केली. ती हकीकत अशी—
रोजच्या प्रमाणे साठे सर आजही पहाटे अंधारातच गावाबाहेर फिरायला गेले. फिरून परत येत असतांना उजाडले होते. परत येतांना रस्त्यात एक कोट पडलेला त्यांनी पाहिला. क्षणभर तो कोट त्यांनी उचलला आणि परत तिथेच टाकून दिला. रात्री काहीवेळ पाऊस झाला होता. त्यामुळे तो कोट काहीसा ओला लागत होता असे साठे सरांनी सांगितले. कसा कोण जाणे, पोलिसांचा कुत्रा त्या कोटापासून निघाला तो थेट साठे मास्तरांच्या घरीच आला आणि मास्तरांच्या भोवती चकरा मारू लागला.
यापुढची हकीकत फौजदारसाहेबांनी पूर्ण केली. ती अशी---
रात्री चोरांनी पळता पळता तो कोट रस्त्यात फेकून दिला. पण नंतर त्या कोटावर पाऊस पडल्यामुळे चोरांच्या हाताच्या स्पर्शाच्या खुणा पाण्यामुळे मिटून गेल्या. सकाळी साठे सरांनी कोट हातात घेऊन पाहिला आणि टाकून दिला. त्यांच्या हस्तस्पर्शावरून माग काढीत पोलिसांचा कुत्रा साठे मास्तरांच्या घरी आला आणि त्यांना चोर ठरवून मोकळा झाला.
फौजदारसाहेबांची तर्कमीमांसा ऐकल्यानंतर आणि साठे सर निर्दोष आहेत हे समजल्यानंतर सर्वांनाच हायसे वाटले. यानंतर फौजदारांनी साठे सरांना घरी जाण्याची परवानगी दिली आणि त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मग साठे सर घरी निघून गेले.
दरम्यान कुणीतरी खेडकरांना निरोप पाठवल्यामुळे खेडकरही तिथे येऊन दाखल झाले. सर्व परिस्थिती खेडकरांच्या लक्षात आली. त्यांनी सर्व घर तपासले. केवढ्याची चोरी झाली हे ऐकण्यासाठी सर्वांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. पण एका कोटाशिवाय आपले काहीही चोरीला गेलेले नाही हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडताच त्यांचे सारे शेजारी हिरमुसल्या चेहऱ्याने आपापल्या घरात गडप झाले.
*****
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com