Aniketcha Nishchy books and stories free download online pdf in Marathi

अनिकेतचा निश्चय

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

अनिकेतचा निश्चय

{बालकथा}

आदित्य आणि अनिकेत एकाच शाळेत आणि एकाच वर्गात म्हणजे आठव्या वर्गात शिकत होते. दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते. पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. आदित्य अभ्यासू होता तर अनिकेतला अभ्यासाचा खूप कंटाळा होता. त्यामुळे अनिकेतचे वर्गातसुद्धा सरांच्या शिकविण्याकडे लक्ष नसायचे. नेहमी इतरांच्या खोड्या करण्यात त्याला रस असायचा. याचा परिणाम म्हणून त्याला परीक्षेत नेहमी कमी गुण मिळायचे. तो शाळेत दिलेला गृहपाठ कधीच करून आणीत नसे. त्यामुळे नेहमी त्याला गुरुजींचा ओरडा खावा लागायचा. याच्या उलट आदित्य खूप अभ्यास करायचा. परीक्षेत छान गुण मिळवायचा. शाळेतील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो भाग घ्यायचा . त्यामुळे शाळेमध्ये तो सर्व शिक्षकांचा लाडका होता. घरी असो की शाळेत असो, तो शिस्तीचा भोक्ता होता. त्यामुळे सर्वजण त्याची प्रशंसा करायचे. अनिकेत आणि आदित्य दोघेही एकाच बसने शाळेत जात असत. बसमध्ये, शाळेमध्ये आणि कॉलनीमध्ये आदित्यला खूप मित्र होते. पण अनिकेत नेहमी कुणाची न कुणाची खोडी काढायचा म्हणून तो कुणालाच आवडत नसे. त्यामुळे त्याला मित्रही फारच कमी होते.

आदित्य शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ पूर्ण करायचा आणि नंतर समोरच्या बागेमध्ये फुटबॉल खेळायला जायचा. अनिकेत मात्र घरी आल्या आल्या दप्तर भिरकावून देत असे आणि आईचा मोबाईल हातात घेऊन त्यावरील गेम खेळत बसत असे. नंतर मूड असेल तर बागेमध्ये जात असे. तिथे अनिकेत आणि आदित्य एकत्र खेळायचे. या दरम्यान अनिकेतची आई आणि आदित्यची आई या दोघी बागेत फिरायला येत असत आणि या दोघांना सोबत फिरायला घेऊन जात असत. अनिकेतची आई आदित्यच्या अभ्यासाची विचारपूस करायची. परीक्षेतील मार्कांविषयी विचारायची. त्याच्या अभ्यासाबद्दल आणि मार्कांबद्दल कळल्यावर तिथेच अनिकेतवर ओरडायची.

"आदित्य जर एवढे मार्क घेऊ शकतो तर तू का घेऊ शकत नाही? तुझे सारे लक्ष इतरांच्या खोड्या करण्यात आणि खेळण्यात असते."

आईचे हे बोलणे ऐकून अनिकेतला आईचा खूप राग येत असे. तो राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. आदित्यच्या आईने याबद्दल अनिकेतच्या आईला अनेकवार सांगितले की, "अशा गोष्टी अनिकेतला एकांतात समजावून सांगायला हव्यात. आमच्यासमोर असे बोलल्यावर त्याला राग येणे साहजिक आहे."

पण ही गोष्ट अनिकेतच्या आईच्या लक्षातच येत नसे. ते दोघे सोबत दिसले की, ती दोघांची तुलना करायला सुरुवात करायची. त्याचा परिणाम असा झाला की, अनिकेतच्या मनात आदित्यबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. खरे म्हणजे दोघे चांगले मित्र होते. जेव्हा अनिकेत एखादी वही आदित्यला मागायचा, तेव्हा आदित्य लगेच त्याला ती वही द्यायचा. दोघेही एकमेकांशी नेहमी चांगले वागायचे.

आता परीक्षा जवळ येऊ लागली. मुले मन लावून अभ्यास करू लागली. अशातच एक दिवस वर्गामध्ये मधल्या सुटीनंतर सरांनी सर्वांना गणिताची वही काढायला सांगितले. आदित्यच्या लक्षात आले की, त्याच्या दप्तरात गणिताची वही दिसत नाही. तो सरांना म्हणाला, "सर, माझी गणिताची वही दप्तरात नाही. ती कुणीतरी घेतलेली दिसतेय." तेव्हा सरांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारले. पण सर्वांनी नकार दिला. मग सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे दप्तर घेऊन जवळ बोलावले. सर्वजण आपापले दप्तर घेऊन सरांकडे जाऊ लागले. पण अनिकेत मात्र आढेवेढे घेऊ लागला. तो सरांना म्हणाला, " सर, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो." असे म्हणून तो वॉशरूमकडे जाऊ लागला. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेल्या मुलांमध्ये कुजबुज सुरु झाली. ते सरांना म्हणू लागले, "सर, चोराच्या मनात चांदणे. आदित्यची वही बहुतेक अनिकेतनेच घेतली असावी." सरांनी अनिकेतकडे बघितले तर तो खाली मान घालून वॉशरूमकडे निघाला होता.

सरांनी त्याला थांबवून विचारले, "अनिकेत, हे खरे आहे का?" सरांचा हा प्रश्न ऐकून अनिकेत थोडावेळ गप्पच राहिला. पण नंतर म्हणाला, "हो सर, त्याची वही मीच घेतली होती." असे म्हणून त्याने आपल्या दप्तरातली आदित्यची वही आदित्यला परत केली.

सर म्हणाले, "तू असे का केलेस?" तेव्हा तो म्हणाला, "सर, माझी आई आदित्यचे उदाहरण देऊन नेहमी मला रागावते. त्याच्या हुशारीचे कौतुक वारंवार माझ्याकडे करते. त्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी राग आणि द्वेष निर्माण होऊ लागला. मी मग विचार केला की, मी जर त्याची वही चोरली तर तो चांगला अभ्यास करू शकणार नाही. मग त्याला परीक्षेत मार्क कमी पडतील. मग माझी आई त्याची बढाई मारून मला रागावणार नाही."

हे ऐकल्यानंतर सरांनी अनिकेतला जवळ घेऊन प्रेमाने सांगितले, "तू जर नीट अभ्यास केलास, खोड्या कमी केल्यास तर तूही चांगले मार्क मिळवू शकशील. हो ना? "

"हो सर. माझे चुकले. मला माफ करा. आदित्य, तूसुद्धा मला माफ कर."

आदित्यने अनिकेतचा हात हातात घेऊन त्याच्याकडे पाहून स्मित केले. शाळा सुटल्यावर दोघेही सोबतच घरी गेले. सायंकाळी बागेत अनिकेत आणि आदित्य खेळत असतांना त्या दोघांच्या आया जेव्हा बागेत आल्या, तेव्हा आदित्य अनिकेतच्या आईला म्हणाला, " मावशी, आता इथून पुढे तुम्ही अनिकेतला अजिबात रागावू नका. तो खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळवणार आहे. सरांनी त्याला सर्व समजावून सांगितले."

हे ऐकताच अनिकेतच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने अनिकेतच्या डोक्यावरून हात फिरवला. अनिकेतनेसुद्धा मनाशी निश्चय केला की, "मी इथून पुढे खोड्या कमी करून चांगला अभ्यास करीन. मोबाईलवर गेम खेळणार नाही; आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन आईला खुश करीन."

नंतर ते चौघेही घराकडे परतले.

**********

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१

email : ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED