Anokhi Diwali books and stories free download online pdf in Marathi

अनोखी दिवाळी

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

अनोखी दिवाळी

दरवर्षी दिवाळी जवळ आली की ऋचा आणि मयंक यांच्या आनंदाला उधाण येत असे. दिवाळीसाठी नवे कपडे खरेदी करण्यासंबंधी तसेच फटाके कोणकोणते आणायचे यासंबंधी दोघा बहिणभावामध्ये जोरदार चर्चा चालत असे. यंदा मात्र दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपली तरी दोघे बहिणभाऊ अगदी गप्पगप्प होते. आई आणि बाबा यांनासुद्धा ऋचा आणि मयंक यांच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटू लागले. दोघेही मोकळे बोलत नाहीत आणि सदैव विचारमग्न दिसतात हे लक्षात आल्यावर शेवटी एक दिवस बाबांनी दोघांना जवळ बोलावून विचारलेच. "ऋचा, मयंक, दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली? कपडे कधी घ्यायचे? फटाके कोणकोणते आणायचे? यावेळी तुम्ही दोघेही काहीच बोलत नाही आहात. दरवर्षी मात्र दिवाळी जवळ आली की भंडावून सोडता. नाही का?" बाबांनी असे विचारले तरीही दोघे गप्पच. दोघे बहिणभाऊ फक्त एकमेकांकडे पाहू लागले. ऋचा यंदा सातव्या वर्गामध्ये होती तर मयंक पाचव्या इयत्तेत होता.

बाबांनी पुन्हापुन्हा विचारल्यानंतर मयंक ऋचाकडे बघून म्हणाला, "ताई, तू सांग." तेव्हा ऋचा म्हणाली, "नको, नको, तूच सांग." तेव्हा बाबा म्हणाले, "अरे, दोघेही असे काय करता? स्पष्ट बोला ना." तेव्हा मग ऋचाने बोलायला सुरुवात केली. ऋचा म्हणाली, "बाबा, आम्ही दोघांनी यावेळी दिवाळी थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करायची असे ठरवले आहे."

"वेगळ्या पद्धतीने म्हणजे?" बाबांनी विचारले.

"मयंक, तू सांगतोस का मी सांगू?" ऋचाने मयंककडे पहात त्याला विचारले.

"ताई, तूच सांग ना." मयंक म्हणाला.

तितक्यात आई तिथे आली. ती म्हणाली, "कोण काय सांगणार आहे बाबांना? आणि मी ऐकू शकते का ते?"

ऋचा आणि मयंक दोघेही एकदम आईला म्हणाले, " हो, हो, आई तूसुद्धा बैस ना."

नंतर ऋचाने सांगायला सुरुवात केली.

"बाबा, आपल्या शहरामध्ये अनाथ मुलांसाठी एक आश्रम आहे. त्याचप्रमाणे एक वृद्धाश्रमसुद्धा आहे. मागच्याच आठवड्यात आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक सरांनी शाळेतील आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून त्या अनाथाश्रमासंबंधी आणि वृद्धाश्रमासंबंधी माहिती दिली. सर म्हणाले, 'मुलांनो, या वर्षी तुम्ही नेहमीप्रमाणे दिवाळीसाठी खर्च न करता मी सांगतो तसे आपण सर्वजण करू या. उद्या आपली सहल काढू. उद्याची ही सहल अनाथाश्रमास आणि वृद्धाश्रमास भेट देण्यासाठी असेल.' त्यानुसार आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यात त्या अनाथाश्रमास आणि वृद्धाश्रमास भेट दिली. अनाथाश्रमातील मुलांसोबत आम्ही सर्वजण खूप खेळलो. बाबा, ती सर्व मुले खूपच गरीब आहेत हो. पण हुशारही आहेत. त्याचप्रमाणे, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनाही भेटून आलो. आम्ही कविता, गाणी म्हणून त्यांची खूप करमणूक केली. प्रत्येक आजीने आणि आजोबांनी आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांचे अनुभवाचे बोल आम्हाला खूप प्रेरणा देऊन गेले. बाबा, त्याठिकाणाहून बाहेर पडल्यावर पुन्हा आम्ही शाळेमध्ये गेलो. तिथे मुख्याध्यापक सरांनी आम्हास सांगितले की, "आपण सर्वजण यंदाची दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करू. दिवाळीसाठी नवे कपडे आणि फटाके घेण्याऐवजी त्या पैशांमधून अनाथाश्रमातील मुलांसाठी आणि वृद्धाश्रमातील आजी- आजोबांसाठी कपडे आणि मिठाई घेऊन त्यांना देऊ."

ऋचाचे हे बोलणे ऐकताच बाबा म्हणाले,"अरे मुलांनो, तुम्ही मागच्या आठवड्यात त्या आश्रमांना भेट देऊन आलात अन् आत्ता आम्हाला सांगता होय? आधी का नाही सांगितलं?"

"ताईनं आणि मी तुम्हाला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. कारण मुख्याध्यापक सरांनी आम्हाला सांगितलं होतं की, दिवाळी जवळ आल्यावर ज्यावेळी तुमचे आई-बाबा तुम्हाला कपड्यांविषयी आणि फटाक्यांविषयी विचारतील तेव्हाच त्यांना आपल्या ह्या योजनेविषयी सांगा." मयंक म्हणाला. शाळेची ही योजना ऐकून बाबांना खूप आनंद झालेला दिसला.

बाबांनी विचारले," बरं, मला सांगा, हे कपडे आणि मिठाई तुम्ही त्या आश्रमांमध्ये केव्हा नेऊन देणार आहात? आणि त्यासाठी शाळेत पैसे केव्हा घेऊन जाणार आहात?"

तेव्हा ऋचा म्हणाली," येत्या सोमवारी आम्ही पैसे आमच्या क्लासटीचरकडे नेऊन देणार आहोत. कारण सोमवारपर्यंत पैसे आणायला आम्हाला सांगण्यात आले आहे. सर्वांचे पैसे गोळा झाल्यावर मुख्याध्यापक सर शाळेतील इतर सरांसोबत मार्केटमध्ये जाऊन कपडे आणि मिठाई खरेदी करतील. भाऊबीजेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जमायचे आहे. तिथून आम्ही सर्वजण अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमात जाऊन आमच्या हातांनी सर्व वस्तूंचे वाटप तिथे करणार आहोत."

"ही तर फारच चांगली गोष्ट आहे. तुम्हा दोघांच्या कपड्यांसाठी आणि फटाक्यांसाठी ठेवलेले पैसे तर मी देईनच. पण मला दिवाळीसाठी मी कपडे घेणार होतो. ते पैसेही मी या चांगल्या कार्यासाठी देण्याचे आता ठरवले आहे." बाबा म्हणाले. तेव्हा आई पटकन म्हणाली," अन् मला तुम्ही दिवाळीसाठी साडी घ्यायचे कबूल केलेत. हो की नाही?"

"हो, बरोबर आहे. मी तुला दिवाळीसाठी साडी घेणारच आहे. मी कुठे नाही म्हणालो?" बाबा म्हणाले.

तेव्हा आई म्हणाली," मला आता साडी नको. मी पण ठरवले आहे की त्या साडीसाठी लागणारे पैसे ह्या चांगल्या कार्यासाठी द्यायचे म्हणून."

"अरे वा, हे तर खूपच छान झाले." बाबा म्हणाले.

"आई, बाबा तुम्ही खरंच ग्रेट आहात." मयंक आणि ऋचा एकदम म्हणाले.

"या वर्षी खऱ्या अर्थाने आपली दिवाळी ही अनोखी दिवाळी होणार आहे." आई म्हणाली आणि सर्वांनी खुशीने माना डोलावल्या.

"चला तर मग आपण सर्वजण मिळून दिवाळीसाठी किती खर्च करणार होतो त्याचा हिशोब करू आणि तेवढे पैसे उद्याच तुमच्या शाळेमध्ये नेऊन देऊ. मीही येतो तुमच्याबरोबर." बाबा म्हणाले.

"मग तर मज्जाच होईल" मयंक म्हणाला.

"अन् मीसुद्धा येणार बरं का तुमच्यासोबत." आई म्हणाली.

" मग तर खूपच मज्जा!" ऋचा म्हणाली आणि सर्वजण खळखळून हसले.

****************

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड,

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८

email: ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED