Eka sashachi Gosht books and stories free download online pdf in Marathi

एका सशाची गोष्ट

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

एका सशाची गोष्ट

बालमित्रांनो, आनंदपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात गंगूबाई नावाची एक अत्यंत गरीब स्त्री राहत होती. रोज सकाळी उठून रानामध्ये जाऊन गवत किंवा लाकडे गोळा करायची आणि तो गवताचा भारा किंवा ती लाकडाची मोळी गावामध्ये आणून विकायची असा तिचा दिनक्रम होता.

एक दिवस काय झाले, नेहमीप्रमाणे गंगूबाई सकाळी उठून रानामध्ये गेली. ती एके ठिकाणी गवत गोळा करीत असतांना तिथे कसा कोण जाणे एक छोटासा ससा आला आणि गंगूबाईच्या भोवतीभोवती फिरू लागला. कापसासारखे मऊ मऊ होते त्याचे अंग. पांढरा शुभ्र होता त्याचा रंग. त्याचे लुकलुकणारे डोळे पाहून गंगूबाईस खूपच गंमत वाटली. एरव्ही ससा हा प्राणी भित्रा आणि माणसांना पाहून दूर पळणारा. पण हा तिथेच घुटमळणारा ससा पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने सर्व गवत एकत्र केले आणि गवताचा भारा बांधला. नंतर त्या भाऱ्यावर त्या सशाला बसविले आणि घराचा रस्ता धरला.

घरी आल्यानंतर गंगूबाईने त्या भाऱ्यामधील कोवळे कोवळे गवत सशापुढे टाकले आणि त्याला मोठ्या टोपल्याखाली झाकून ठेवले. नंतर गंगूबाई गवत विकण्यासाठी बाजारात गेली. त्या दिवशी तिला पूर्वीच्या मानाने जास्त पैसे मिळाले. तिला आश्चर्य वाटले. गंगूबाई घरी आली. तिने टोपल्याखालून सशाला बाहेर काढले. त्याला खूप गोंजारले. "या सशाला घरी आणल्यामुळेच आज मला जास्त पैसे मिळाले" असे ती मनाशी म्हणाली. सशापुढे कोवळे कोवळे गवत टाकून ती स्वतःही जेवण करायला बसली.

अशाप्रकारे ससा घरात आणल्यापासून तिला दररोज जास्त जास्त पैसे मिळू लागले. त्यामुळे गंगूबाई खुश राहू लागली. एक दिवस गंगूबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठली व रानात जायला निघाली, तर तिला कुणीतरी बोलावते आहे असा भास झाला. तिने लक्ष देऊन ऐकले तेव्हा तिच्या लक्षात आले की, आवाज टोपल्याखालून येत होता. तिने टोपले उघडून पाहिले. तर तो ससा चक्क माणसाप्रमाणे बोलत होता. तो म्हणत होता, "गंगूबाई, तुझ्या घरी मी बरेच दिवस मुक्काम ठोकला. आता मी जातो. रानामध्ये माझे सवंगडी माझी वाट पाहत असतील." असे म्हणून त्याने आपल्यासमोरील गवतातील एक हिरवी काडी तोंडात धरून पुन्हा बाहेर टाकली. तर काय आश्चर्य! ती गवताची काडी सोन्याची झाली. ती सोन्याची काडी गंगूबाईला देऊन ससा म्हणाला, " मी आता जातो. ही काडी तुझ्या कामाला येईल. सांभाळून ठेव. तसेच जेव्हा तुला काही काम पडेल किंवा माझी आठवण येईल, तेव्हा ही सोन्याची काडी हवेमध्ये पाच वेळा फिरवून पुढीलप्रमाणे माझे स्मरण कर. म्हणजे मी तुला भेटायला येईल.

ससा रे ससा, दिसतो कसा

पिंजून ठेवलेला कापूस जसा

हिरवी काडी गवताची

झाली आता सोन्याची

कुठे आहे स्वारी आमची

लुकलुकणाऱ्या डोळ्यांची

असे म्हणून तो ससा अदृश्य झाला. गंगूबाईस खूप वाईट वाटले. त्या दिवशी ती खूप रडली. रानातही गेली नाही. घरीच बसून राहिली. तिला अजिबात करमेना. पुढे एक दोन दिवस ती कामावर गेलीच नाही. पण नुसते घरी बसून पोट कसे भरणार, असा विचार करून गंगूबाई शेवटी रानात जाऊ लागली. मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर सशाच्या आठवणीने कासावीस होऊ लागली. रानामध्ये गेल्यावरही तिला ज्या ठिकाणी ससा दिसला होता, तिथे तिची नजर भिरभिरू लागली. आता तरी दिसेल, मग तरी दिसेल, असे तिला वाटत असे. दरम्यान, गंगूबाई सशाने दिलेल्या सोन्याच्या काडीविषयी पूर्णपणे विसरून गेली होती. तसेच त्याचे स्मरण करण्यासाठी काय म्हणायचे तेही विसरून गेली. अन् एक दिवस अचानक तिला त्या काडीची आठवण झाली. तिने घरात त्या काडीची शोधाशोध सुरु केल्यावर एकदाची ती काडी सापडली; आणि काडी सापडल्यावर सशाला बोलावण्यासाठी काय करायचे तेही आठवले.

गंगूबाईला सशाशी काही काम नव्हते. पण त्याला एकदा पहावे एव्हढीच इच्छा होती. म्हणून गंगूबाईने ती काडी हवेमध्ये पाच वेळा फिरविली आणि गंगूबाई म्हणू लागली,

ससा रे ससा, दिसतो कसा

पिंजून ठेवलेला कापूस जसा

हिरवी काडी गवताची

झाली आता सोन्याची

कुठे आहे स्वारी आमची

लुकलुकणाऱ्या डोळ्यांची

एव्हढे म्हटल्याबरोबर, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ससा तिथे हजर झाला. ससा म्हणाला, " का केलीस माझी आठवण? काही काम आहे का?" तेव्हा गंगूबाई म्हणाली, " तुला कधी पाहीन असं झालं होतं म्हणून केली तुझी आठवण. बाकी काही नाही." ससा म्हणाला, "ठीक आहे. पण आज तू मला बोलावले नसते तरी मी आज आलोच असतो. कारण आज मी तुला एक आनंदाची बातमी सांगणार आहे." "कोणती बरं?" गंगूबाईने विचारले.

"तुला तुझा मुलगा गेनू आठवतो का?" सशाने विचारले.

"हो, त्याचे काय?" गंगूबाई म्हणाली.

"तू त्याला लाडाने पिंटू म्हणायची. सतरा- अठरा वर्षांपूर्वी तो जेव्हा दोन- तीन वर्षांचा होता, तेव्हा त्याला कडेवर घेऊन तू एक दिवस नेहमीप्रमाणे रानात गेली होतीस, आणि तू लाकडे आणि गवत गोळा करण्यात मग्न असतांना तो खेळत खेळत तुझ्यापासून दूर गेला. तू त्याला खूप शोधले असशील पण तो सापडला नाही. बरोबर?" ससा म्हणाला.

"हो, बरोबर आहे. तेव्हा नेमकेच छोट्याशा आजाराने त्याचे वडील वारले अन् आमचा आधारच गेला. त्यामुळे सर्व दु:ख बाजूला ठेवून मी कामावर जाऊ लागले. पिंटूला कुठे ठेवणार? म्हणून त्यालाही सोबत नेऊ लागले अन् एक दिवस हे असे घडले. तो मला सोडून गेला. मी खूप दु:खी झाले. पण पोटासाठी पुन्हा रानात जाऊ लागले. पण हे सर्व तुला कसे माहित?" गंगूबाई म्हणाली. तेव्हा ससा म्हणाला, "तो पिंटू मीच आहे अन् तुझ्यासमोर उभा आहे. तू फक्त तुझ्या जवळची ती सोन्याची काडी दहा वेळेस हवेत फिरव अन् मग गंमत बघ." सशाने सांगितल्याप्रमाणे गंगूबाईने केले अन् काय आश्चर्य, तिच्यासमोरच सशाचे रुपांतर एका विशीतील देखण्या तरुणात झाले. गंगूबाईला तर आकाशच ठेंगणे झाले. तिला खूप आनंद झाला. तिचा हरवलेला मुलगा तिला मिळाला होता. पण तिला हे कोडे उलगडेना. ती म्हणाली, "पण हे सारे कसे झाले? आणि पूर्वीच तू मला हे का सांगितले नाही?" "सांगतो, सारे सांगतो. मी तुला पूर्वी हे सांगितले नाही कारण मला परत जाणे भाग होते आणि मनुष्याच्या रूपामध्ये येण्यासाठी एका साधुबाबाच्या म्हणण्यानुसार काही काळ थांबावे लागणार होते. आज मात्र मी सर्व सांगणार आहे. मी तेव्हा दोन- तीन वर्षांचा होतो. तू कामात असतांना कसा कोण जाणे मी हळू हळू चालत खूप दूर गेलो; आणि तू दिसेनास म्हणून खूप रडू लागलो. तेव्हा माझे रडणे ऐकून एक माणूस तिथे आला. त्याने मला उचलून जवळ घेतले आणि पिण्यासाठी पाणी दिले. मी शांत झाल्यावर तो मला घेऊन तिथून बाहेर पडला. मी तुझ्या आठवणीने रडत होतो. पण त्याने लक्ष दिले नाही. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानेच माझा सांभाळ केला. मी जसजसा मोठा होऊ लागलो, तसतसे मला समजू लागले की तो एक जादूगार होता. तो लोकांसमोर जादूचे प्रयोग करायचा. मला कधीकधी तो प्रयोगादरम्यान ससा करायचा. त्याला त्याबद्दल पैसे मिळायचे. पण मला त्याचा खूप राग यायचा. मी त्याला म्हणायचो, "माझ्या आईचा शोध घेऊन मला तिच्याकडे घेऊन चल." पण तो ऐकत नसे.एक दिवस मी त्याच्याशी या कारणावरून खूप भांडलो. त्या दिवशी त्याने मला ससा केले अन् म्हणाला, ' बैस आता रडत. आता तुला मी ससाच ठेवणार.' त्यानंतर एके दिवशी मी त्याची नजर चुकवून तिथून पळालो. तेव्हा मला एका साधूबाबांनी बघितले. ते अंतर्ज्ञानी होते. त्यांनी मला जवळ घेतले आणि म्हणाले, 'बेटा, काळजी करू नकोस. आज तुझ्या आईची भेट होईल. पण तू सशाच्या रुपातच भेटशील. तुला मनुष्यरुपात येण्यासाठी थोडा काळ वाट पहावी लागेल. एका विशिष्ट नक्षत्रावर तू तुझ्या मूळ रुपात पुन्हा येशील. केव्हा ते तुला मी योग्य वेळी सांगेन.' त्यानुसार पहिल्यांदा तुझ्या गवताच्या भाऱ्यावर बसून मी इथे आलो; आणि आज मला त्या साधुबाबांनी तुझ्याकडे माझे खरे रूप दाखवण्यासाठी पुन्हा पाठवले.

ही सगळी हकीकत ऐकून गंगूबाई भावनावश झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती पिंटूचे पटापट मुके घेऊ लागली.

गंगूबाईचा भावनावेग ओसरल्यावर पिंटू तिला म्हणाला, "तू माझी खूप खूप छान आई आहेस. मी तुला खूप सुखात ठेवीन. आता तू फक्त आराम करायचा." असे म्हणून पिंटू तिच्या कुशीत शिरला.

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी,

गादिया विहार रोड,

शहानूरवाडी,

औरंगाबाद ४३१००९

मोबाइल: ८८८८९२५४८८

इमेल : ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED