उद्धव भयवाळ
औरंगाबाद
फुगेवाला मुलगा
बालमित्रांनो, एक होता विजू. अगदी तुमच्याच वयाचा. गावातील जि.प.च्या शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत होता. विजूचे आई वडील खूप गरीब होते. विजूच्या वडिलांकडे एक जुनी शिलाई मशीन होती. अनेक वर्षांपासून ते आपल्या छोट्याशा घरातच पुढच्या खोलीमध्ये त्या मशीनवर लोकांचे कपडे शिवून देत आणि उदरनिर्वाह करीत. विजूची आईसुद्धा चार घरची कामे करून संसाराला हातभार लावीत होती. विजूने खूप अभ्यास करावा, खूप शिकावे, मोठे व्हावे आणि आपल्याला म्हातारपणी सुख द्यावे असे त्या दोघांनाही वाटत असे. परंतु विजूला असे काहीच वाटत नसे. त्याला खेळात जास्त रस होता. अभ्यास नकोसा वाटे. शाळेतून घरी आला की सरळ खेळायला निघून जायचा. आई किंवा वडील त्याला अभ्यास करण्याबद्दल बोलत असत तेव्हा थोडाबहुत अभ्यास तो करीत असे. त्यामुळे कसेबसे मार्क्स मिळवून तो दरवर्षी उत्तीर्ण होत असे. त्याच्या ओळखीचे काही मित्र, जे इंग्रजी शाळेत शिकत होते, त्यांचे भारी भारी कपडे पाहून तो मनात म्हणे, "मलासुद्धा असे कपडे हवेत." अन् मग तो भारी कपड्यांसाठी आईवडिलांकडे हट्ट धरून बसे. पण त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे ते त्याची अशी इच्छा पूर्ण करू शकत नसत. त्याची आई त्याला समजावून सांगत असे,
"अरे विजू, असा हट्ट धरू नये बाळ. ती श्रीमंतांची मुले आहेत. आपली अन् त्यांची बरोबरी होऊ शकेल का?"
पण आईचे हे बोलणे विजूच्या डोक्यावरून जात असे. खरे म्हणजे विजूची आई त्या श्रीमंत मुलांच्या घरी घरकामासाठी जातांना कधी कधी विजूलासुद्धा सोबत घेऊन जात असे म्हणूनच विजूची अन् त्या मुलांची मैत्री झाली होती. विशेषत: सौरभची आणि त्याची विशेष गट्टी झाली होती.
असेच एक दिवस विजूची आई दिवसभर लोकांच्या घरची धुणीभांडी करून घरी आली होती अन् घरातली कामे आवरू लागली होती. विजूचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तितक्यात विजू शाळेतून घरी आला. घरामध्ये पाय ठेवल्या ठेवल्या त्याने हातातले दप्तर असे भिरकावून दिले की, त्यातल्या वह्या अन् पुस्तके घरभर पसरली. वह्यांची अन् पुस्तकांची अवस्था तर पाहण्यासारखी होती. बरीचशी पाने निसटून आजूबाजूला पडली होती. त्याच्या आईने ते बघितले आणि तिचा राग अनावर झाला. तिने हातातल्या झाडूने विजूला मारायला सुरुवात केली. विजू कसाबसा आईचा मार चुकवत बाहेर पळून गेला.त्याला आईचा खूप राग आला होता.
विजू मनात म्हणाला, "आता मी सौरभच्या घरी जाऊन बसतो. तिथेच सौरभसोबत जेवून घेईन. सौरभची आई खूप चांगली आहे. मला आग्रह करून वाढीत असते." असा विचार करीत विजू सौरभच्या घरी जात असतांना संध्याकाळ झाली होती. रस्त्यावरचे लाईट लागले होते. सौरभच्या घरी जात असतांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागेकडे विजूचे लक्ष गेले आणि आपोआप त्याचे पाय बागेकडे वळले. अनेक मुले तिथे आपल्या पालकांसोबत आली होती. काही मुले आपापल्या मित्रांसोबत आली होती. कुणी घसरगुंडी खेळत होते तर कुणी भेळ, कुल्फी घेऊन खात होते. सौरभपेक्षा वयाने छोटा असलेला एक चुणचुणीत मुलगा मात्र फुगे विकत असलेला विजूला दिसला.
"फुगे घ्या फुगे. रंगीबेरंगी फुगे" असे ओरडत तो बागेमध्ये इकडून तिकडे फिरत होता. काही मुले त्याच्याकडून फुगे विकत घेत होती. विजू ते सर्व पाहात होता. तितक्यात एक छोटीशी मुलगी आपल्या पपांसोबत त्या फुगेवाल्या मुलाकडे आली आणि तिने दोन फुगे विकत घेतले. तिच्या पपांनी फुग्याचे पैसे त्या मुलाला दिले अन् सहज त्या मुलाला विचारले," बाळ, तुझे नाव काय?" तो म्हणाला," माझे नाव रघू."
"तू शाळेत जातोस का फक्त हे फुगेच विकतोस?" त्यांनी विचारले.
तेव्हा रघू म्हणाला," मी रोज शाळेत जातो. मी चौथ्या वर्गात आहे. फावल्या वेळेत मी हे फुगे विकून माझ्या आईला मदत करतो."
"तुझे वडील काय करतात?" त्यांनी विचारले.
" माझे वडील दोन वर्षांपूर्वीच एका आजाराने वारले" तो म्हणाला.
" अरे वा, तुझे कौतुक करायला हवे. इतक्या छोट्या वयात अभ्यासासोबतच आईलासुद्धा तू हातभार लावतोस."
बाजूलाच उभा असलेला विजू हे संभाषण ऐकत होता. का कोण जाणे, त्याला त्या फुगेवाल्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर स्वत:च्या वागण्याबद्दल अपराधी वाटू लागले. त्याने मनात विचार केला, "माझे आई वडील माझ्यासाठी एवढे कष्ट करतात. मी मात्र अभ्यास न करता उनाडक्या करीत फिरतो आणि हा इतका छोटा मुलगा स्वत:चा अभ्यास सांभाळून त्याच्या आईला आर्थिक हातभार लावतो. आता मीसुद्धा मन लावून अभ्यास करून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईन आणि आई वडिलांना आनंदी ठेवीन," हा विचार मनात येताच विजूने सौरभकडे जाण्याचा विचार सोडला आणि तो तडक स्वत:च्या घराकडे निघाला.
******
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
email : ukbhaiwal@gmail.com