बक्षीस Uddhav Bhaiwal द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बक्षीस

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

बक्षीस

मालनबाई दिवसभर लोकांच्या घरची धुणीभांडी करून थोड्या वेळेपूर्वीच घरी आल्या होत्या अन् घरातले आवरू लागल्या होत्या. तितक्यात त्यांचा मुलगा सुरेश शाळेतून घरी आला आणि आईच्या जवळ जाऊन आईला म्हणाला, "आई, एक आनंदाची बातमी सांगणार आहे मी तुला आज."

"अरे वा! कुठली बातमी? शाळेत काही विशेष घडलंय का आज?" मालनबाईंनी सुरेशला जवळ घेऊन विचारले.

" हो, तसं विशेषच आहे. पुढच्या पंधरवड्यात आमच्या शाळेत एक निबंध स्पर्धा होणार आहे. निबंधासाठी विषयाचं बंधन नाही. पण स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस मिळणार आहे. पन्नास ओळींपर्यंत निबंध घरून लिहून न्यायचा आहे." सुरेश म्हणाला.

" अरे, वा. छानच." मालनबाई म्हणाल्या.

" आई, मीसुद्धा निबंध स्पर्धेसाठी माझं नाव नोंदवलं आहे; आणि मी "आई" या विषयावर निबंध लिहायचं ठरवलं आहे." सुरेश सांगू लागला.

"दोन वर्षांपूर्वी बाबांना कुठलासा आजार झाला अन् त्यातच ते देवाघरी गेले. त्यांच्या माघारी तू लोकांच्या घरची कामे करून घर चालवू लागलीस. माझ्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून तू जास्तीची कामे करू लागलीस. हे सारं मी बघत आलो आहे आई. त्यामुळेच मी हा विषय निवडला. आपल्या मुलाच्या भल्यासाठी आई किती राबते, हे मी निबंधामध्ये अशा पद्धतीने लिहिणार आहे की तो निबंध पहिल्या क्रमांकाचा ठरला पाहिजे. म्हणजे मला बक्षीस मिळेल आणि आपला आर्थिक भार थोडा हलका होईल."

सुरेशचे हे बोलणे ऐकून मालनबाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी त्याला पोटाशी घट्ट धरले.

सुरेश सातव्या वर्गात होता. पण चुणचुणीत होता. नेहमी मन लावून अभ्यास करायचा. त्यामुळे दरवर्षी चांगल्या मार्कांनी पास व्हायचा.

अचानक एकेदिवशी सुरेशच्या आईची तब्येत बिघडली. तिने कामावर जाणे बंद केले. सुरेशसुद्धा चार पाच दिवस शाळेत गेला नाही. त्याने ओळखीच्या डॉक्टर काकांकडे आईला नेले. औषधोपचार सुरु केले. आईच्या आजारात त्याने आईची खूप शुश्रूषा केली. पण या सगळ्या गडबडीत तोंडावर येऊन ठेपलेल्या निबंध स्पर्धेची तो मन लावून तयारी करू शकला नाही. घरापासून जवळच असलेल्या बागेमध्ये एक दिवस सुरेश विचारमग्न होऊन बसलेला असतांना एक गृहस्थ आले आणि त्यांनी त्याला विचारले, " छोट्या दोस्ता, काय झाले? तू असा त्रस्त का दिसतोस?" हे गृहस्थ सुरेशला अधूनमधून बागेत फिरतांना दिसायचे.

त्यामुळे सुरेश मन मोकळे करून त्यांना सांगू लागला," काका, मला शाळेतील स्पर्धेसाठी 'आई' या विषयावर निबंध लिहायचा आहे. पण माझ्या आईच्या आजारपणामुळे त्याकडे माझं पूर्ण दुर्लक्ष झालं. खरं म्हणजे निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवून मी माझ्या आईचा भार हलका करायचं ठरवलेलं होतं. पण आता ते शक्य होईलसं दिसत नाही. मी उत्तम निबंध लिहू शकेल की नाही आणि माझ्या निबंधाला बक्षीस मिळेल की नाही याची शंका मला वाटत आहे."

"एवढंच ना. मी लिहून देतो तुला छानसा निबंध. तू त्या निबंधाखाली तुझं नाव टाकून शाळेत देऊन टाक. मग तर झालं!" ते गृहस्थ म्हणाले.

" काका, मला माहित आहे की, मला पैशांची खूप गरज आहे. पण तुम्ही लिहिलेल्या निबंधाखाली माझे नाव टाकून तो मी स्पर्धेसाठी द्यावा आणि त्यावर बक्षीस मिळवावे, हे माझ्या मनाला कधीच पटणार नाही. माझ्या आईने मला सत्य आणि प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर चालायला शिकविले आहे. हे माझ्या आईचे संस्कार मी कधीच वाया जाऊ देणार नाही." सुरेश त्यांना म्हणाला.

सुरेशचे हे बोलणे ऐकून ते गृहस्थ तिथून निघून गेले.

आई आजारी असल्यामुळे तिच्याजवळ बसूनच सुरेशने आपला निबंध पूर्ण केला आणि दुसऱ्या एका वर्गमित्रासोबत तो निबंध शाळेत पाठवून दिला. आईची प्रकृती ठीक झाल्यानंतर सुरेश पुन्हा शाळेत जाऊ लागला. त्या दरम्यान तो निबंध स्पर्धेविषयी पूर्णत: विसरून गेला होता.

एके दिवशी या निबंध स्पर्धेचा निकाल लागला आणि शाळेच्या बोर्डावर विजेत्यांची यादी लागली. त्यात पहिल्या क्रमांकावर स्वत:चे नाव पाहून सुरेशला खूप आनंद झाला. "आई" या विषयावरील त्याच्या निबंधाला पहिले बक्षीस मिळाले होते.

आपले बक्षीस घेण्यासाठी तो जेव्हा स्टेजवर गेला, तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. कारण व्यासपीठावर इतरांसोबत ते गृहस्थसुद्धा बसलेले होते, जे त्याला एके दिवशी बागेमध्ये भेटले होते.

" काका, तुम्ही इथे?" त्याने आश्चर्याने विचारले.

" होय. मी या निबंध स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक आहे. आम्ही सर्व परीक्षकांनी एकमताने "आई" या तुझ्या निबंधास पहिले बक्षीस दिले आहे. त्या दिवशी जर माझ्या म्हणण्याला होकार देऊन तू माझा निबंध स्वत:चे नाव टाकून स्पर्धेसाठी पाठवला असता तर तुला कधीच हे बक्षीस मिळाले नसते. आज तुला मिळालेले बक्षीस म्हणजे तुझ्या प्रामाणिकपणाचा आणि तुझ्यावर तुझ्या आईने केलेल्या संस्काराचा हा गौरव आहे."

हे ऐकताच सुरेश त्यांच्या पाया पडला.

अत्यंत आनंदाने घरी येऊन त्याने ही बातमी आईला सांगितली तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली," शाबास बेटा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. चुकीच्या मार्गाने यश मिळविण्याचा तू कधीही प्रयत्न करू नकोस आणि सत्य आणि प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नकोस." असे म्हणून मालनबाईंनी त्याला जवळ घेतले आणि त्या सुरेशच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागल्या.

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१

email : ukbhaiwal@gmail.com