शोध चंद्रशेखरचा!
१२----
चंद्रशेखरला हुडकायचे म्हणजे, विकीला त्या रात्रीच्या दोन मजली इमारती पर्यंत जाऊन चौकशी करावी लागणार होती. त्यात हि एक अडचण होतीच. त्याने जेव्हा चंद्रशेखरला गेटच्या पोलला टेकून ठेवले होते, तेव्हा रात्र होती. सर्वत्र सामसूम होती! कोणाला विचारणार? फक्त घरातल्या माणसालाच विचारावे लागणार होते. त्यांच्या कडूनच काही तपास लागू शकणार होता.
तो भराभर तयार झाला. ट्रायलसाठी आणलेली गाडी सुरु केली. तो त्या घराकडे निघाला तेव्हा, गाडी पाठोपाठ एक बाईक येत होती. त्याला ती एकदोनदा मिररमध्ये दिसली सुद्धा. पण ती आपल्याला फालो करत असल्याचा त्याला संशय सुद्धा आला नाही! तो त्याच्याच विचारात होता. त्याला ती व्यक्ती कोण आहे हे कळले असते तर, त्याची दातखीळ बसली असती. ती व्यक्ती इंस्पेक्टर इरावती होती!
०००
या चंद्रशेखरची केस बहुदा आपले केस पांढरे करणार! इरावती खरेच वैतागली होती. या केस मध्ये क्षणाक्षणाला गुंतागुंत वाढत होती. त्यात भर म्हणून कि काय. तो खविस, बक्षी दुबईतून गुप्त होऊन, मुंबईत उगवला होता. आता तो सक्रियपण झाला होता! याने काल एक मुडदा पडला होता! ते ठिकाण जरी तिच्या हद्दीतले नसले तरी, बक्षीने पडलेला मुडदा म्हणजे, अतिरेक्यांशी संबंधित घटना. गुप्तमीटिंग मध्ये संभाव्य, अतिरेकी टार्गेट तिच्या एरियातील सार्वजनिक ठिकाणे होती!
इरावती घरीच होती. पण थोड्याच वेळात ती चैत्रालीची माहिती मिळवण्यासाठी निघणार होती. तिचा फोन वाजला.
"हॅलो, इरा, राकेश बोलतोय."
"हा!"
" तू दिलेल्या फोनचे लोकेशन मिळालाय!"
कोणता फोन या राकेशला लोकेट करायला सांगितलं होता बरे? करेक्ट, हा तो किडन्यापरने कॅफे रुद्राक्ष मध्ये, कॅश घेऊन येण्यासाठी वापरलेला फोन होता.
"सांग!"
"सध्याचे लोकेशन भिवंडी जवळच्या खाडीचे. पाण्यातले!"
"पुन्हा पाण्यात? म्हणजे डाटा? नो होप्स!"
"करेक्ट मॅडम!"
"या केस मध्ये सगळं मुसळ पाण्यात का जातंय?" इरावती स्वतःशीच म्हणाली. क्षणभर ती विचारात गढून गेली.
"राकेश, सिम कोणाच्या नावाने इशू झालंय? नाव पत्ता?"
राकेशने विकीचे नाव आणि पत्ता सांगितला.
कसलाही विचार न करता तिने हेल्मेट घेतले, कमरेच्या होल्डरमध्ये गन सारली. बाईकला टांग मारून, तिने ती सुरु केली. साडेतीनशे सीसीचे बाईकचे धूड बघता बघता चौखूर उधळलं!
विकीच्या फ्लॅटच्या कॉम्प्लेक्स जवळ तिने आपली बाईक पार्क केली.
"या कॉम्पलेक्स मध्ये, विकी कोणत्या नंबरच्या फ्लॅट मध्ये रहातो?" इरावतीने तंबाखूचा बार भरून बसलेल्या, निळ्या युनिफॉर्म मधल्या सेक्युरिटी गार्डला विचारले.
" बी १२. पर काय काम हाय?"
" का? तुला सांगणे गरजेचे आहे का?"
"तस नाय! पण तो आत्ताच बाहेर गेलाय!"
"किती वेळ झाला?"
"तुमी बाईक लावत व्हता, तवा तेची गाडी, गेट मधून बाहेर जात होती!"
"गाडी नंबर आणि रंग?"
"२२२५ निळा! तुमि पोलीस हैती का?"
"कशावरून?"
"तुमच्या होल्डरमधन पिस्तुलाचा दस्ता डोकावतोय!"
"हो!"
इरावती झटक्यात मागे वळली, बाईकला किक मारून, ती रेस केली. ती बाईक लावताना, एक निळी कार, गेट बाहेर डाव्या बाजूला वळताना तिने पहिली होती. हा रास्ता सात किलोमीटर पर्यंत कोठेही वळत नव्हता! चार किलोमोटरवर अपेक्षेप्रमाणे तिला, ती निळी कार दिसली! आता ती विकीला नजरेआड होऊ देणार नव्हती!
०००
विकीने खिशातला झिरो नंबरचा चष्मा डोळ्यावर लावला. गाडी साईडला पार्क करून ठेवली. त्याला हवे ते दोन मजली घर समोर दिसत होते. घराच्या कम्पाऊंडवॉलचे गेट उघडून तो आत आला. घरासमोरचे लँडस्केप छान मेंटेन्ड होते. त्याने बंगल्याची बेल वाजवली. आणि दार उघडण्याची वाट पहात असताना, त्याच्या कार शेजारी एक बाईक उभी रहात होती. हि बाईक त्याला दोन-चारदा गाडीच्या साईड मिरर मध्ये पण दिसली होती! पाठलाग? त्यावरून एक सुंदर तरुणीउतरली, डोक्यावरले हेल्मेट काढून आसपास काही तरी शोधक नजरेने पहात होती. कोण असेल? तेव्हड्यात बंगल्याचे दार उघडले. सत्तरीतील प्रश्नार्थक चेहरा समोर उभा होता.
"नमस्कार काका, मी या घराच्या मालकाला भेटू इच्छितो!"
"मीच आहे कि तो! आपण कोण ते आधी सांगा!"
"मी वासुदेव! मी एका लोकल वृत्तपत्राचा क्राईम रिपोर्टर आहे!"
"ठीक! ओळख पत्र असेलच?"
"आहे. पण आत्ता सोबत नाही. मी ज्या संदर्भात आलो आहे ते एक गंभीर प्रकरण आहे! अजून पोलिसांनाही तुमच्या घरा पर्यंत येता आलेले नाही! तुम्ही माझ्याशी बोललात तर, मला त्यांना तुमच्या पासून दूर ठेवता येईल. माझ्या ओळखी आहेत!"
म्हातारा सटपटला.
"या आत या!"
"काका मला सांगा, बाविस तारखेच्या रात्री साडेदहाच्या आसपास, तुमच्या गेटची बेल वाजली होती! आणि तुम्ही वरच्या मजल्यावरून खाली येऊन, दार उघडले होते! इतपत माहिती माझ्याकडे आहे! पुढे काय झालं?"
"बरोबर, त्या रात्री मी नेहमी प्रमाणे, कायमचूर्ण घेऊन झोपण्याच्या तयारीत होता. शिंची गेटची बेल वाजली. रोज सोबतीला असणारा, शंकर त्या दिवशी आला नव्हता. मीच मग भसा भसा लाईटीचे बटन दाबली, अन खाली येऊन पहातो तर काय?"
"तर काय?" विकीने उछुकतेने विचारले.
"समोर एक खप्पड गालाचा उंचेला माणूस खांद्यावर, कोणाला तरी घेऊन उभा होता!"
उंचीला, खप्पड गालाचा विकीच्या मेंदूने कोठेतरी नोंद घेतली.
"मग?"
"मग काही नाही! त्याचा मित्र अपघातात जखमी झालाय, म्हणून त्याने सांगितले. मला मात्र जरा विचित्र वाटले, कारण तो डॉक्टर ऐवजी तो पोलिसांना घेऊन येतो म्हणत होता! तोवर तो जखमीला घरात घ्या म्हणाला. मीच पोलिसांना बोलावतो म्हणालो तर, तो नको म्हणाला. आणि निघून गेला!"
"काका, त्याच्यात अजून काहि वैशिष्ट्य होते का? जेणे करून त्याला ओळखायला मदत होईल."
"त्याचे केस राठ आणि बारीक कापलेले होते. त्यामुळे त्याचे डोके मोरी घासायच्या ब्रश सारखे दिसत होते."
"अजून काही? नाक डोळे?"
"नाक सामान्यच होते, डोळे मात्र बारीक असावेत. हो, ते सपाट, सापाच्या डोळ्यासारखे होते!"
म्हाताऱ्या कडून अजून काही माहिती मिळणे शक्य नव्हते.
"ठीक. "
"तेव्हड पोलिसांचं बघा! नाही म्हणजे, या वयात पोलिसांची भानगड नको म्हणून!"
"काका काळजी नका करू! मी शक्य तो पोलीस लांबच ठेवीन. आहेत माझ्या तश्या ओळखी, डिपार्टमेंट मध्ये"
विकी बाहेर पडला. म्हाताऱ्याने तत्परतेने दार लावून घेतले. त्याने ते इतक्या जोरात लावले कि, तो आवाज विकीच्या डोक्यात घुमत राहिला. डोळे गच्च मिटून, तो क्षणभर एका जागी उभा राहील. त्या आवाजाने त्याला गरगरल्या सारखं झालं. त्या आवाजांचे तरंग डोक्यात सावकाश शांत होत होते. त्याने डोळे उघडले. परिसर अनोळखी का वाटतोय? आपण येथे का आलोत? कशा साठी? त्याला आठवेना! पुन्हा तेच! येतील लक्षात थोड्या वेळाने! या विस्मरणावर इलाज करणे दिवसेंदिवस गरजेचे होत चाललंय. डॉ रेड्डी म्हणाला ते खरं असावं!
त्याला समोर निळ्या रंगाची गाडी दिसत होती. ओळखीची वाटत होती. हा बरोबर, डॉ.पारेखची गाडी, २२२५ शंकाच नको. काल ब्रेक लागत नाहीत म्हणून, चाचाच्या ग्यारेजला आली होती. त्याने खिशे चाचपले, गाडीची की खिशातच होती. दार उघडून तो ड्राइविंग सीटवर बसला. सीटबेल्ट लावला. मोबाईलवर गुगल मॅप ऑन केला. रहीम ग्यारेजच डेस्टिनेशन टाकले. स्टार्टच्या बटनावर बोट प्रेस करणार, तेव्हड्यात एक पोरगी त्याच्या उघड्या विंडोजवळ आली.
"लिफ्ट चाहिये क्या?" विकीने विचारले.
"नाही! लिफ्ट कराना है!" त्याच्या खनपटीला थंडगार पिस्तूलच्या नळीचा स्पर्श झाला!
"विकी, यु आर अंडर अरेस्ट!" ती पोरगी म्हणाली. अरेस्ट? पण का? आणि हि पोरगी कोण?
०००
माणिकने आपली गाडी पीटरच्या कोल्ड स्टोरेज जवळ पार्क केली, तेव्हा पीटर कोल्ड स्टोरेजला लॉक लावत होता. गाडी थांबल्याचा आवाज झाल्याने, त्याने प्रश्नार्थक मुद्रेने त्या चिखलाच्या शितोड्यानें बरबटलेल्या गाडीकडे आपली नजर वळवली. साला, मॉर्निंग- मॉर्निंगला कोण तडमडलं?
"आबे, माणिक तू? काय को आयेला?"
माणिक गाडीतून बाहेर आला. दोन्ही हात वर करून आळस दिला. त्यामुळे अंग थोडे मोकळे झाल्या सारखे वाटले. सर्वत्र माशांचा सडका वास भरून राहिला होता. माणिक समाधानाने हसला. आता मुडदा वास मारू लागला तरी, हरकत नव्हती.
"गुड मोरणीग, पीट्टर भू!"
"साला, लफडे कि औलाद! इधर क्या करता?"
"पैले, ते स्टोरेजच दार खोल!" माणिक, पुन्हा आपल्या गाडीत घुसत म्हणाला.
पीटरने स्टोरेजचे दार उघडले. ट्र्क सहज जातायावा इतके ते दार मोठे होते. पीटरचा व्यवसायाकरता ते गरजेचे होते. उघड्या दारातून माणिकने आपली कार आत घुसवली. गाडीतून उतरून जवळची सहाफुट, लांबीची दोनचाकी हातगाडी, कारच्या मागच्या दाराजवळ आणली. तोवर तो पुरता गारठला होता. तश्या अवस्थेत त्याने चंद्रशेखरचा मुडदा त्या ट्रॉलीवर घातला आणि ती ट्रॉली भिंतीजवळच्या रॅक मागे सारून दिली! सहजा सहजी न दिसेल अशी! दारात उभा असलेला पीटर, डोळ्याची पापणीहि न हलवता, थोबाड वासून माणिककडे पहात होता!
आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये मड?
हात चोळत, गारठलेला माणिक स्टोरेजच्या गोडावून मधून बाहेर आला. आणि पीटरने दार बंद करून घेतले.
पीटरचा झोपडीत उकडलेल्या अंड्यासोबत देशीची बाटली तोंडाला लावून, माणिक डोळे मिटून विचार करत बसला .
"साला माणिक, क्या लफडा ले के आया है? मेरा गोडावून क्या कब्रस्थान है?"
"पीटर, भडकतो कशाला? हर जान कि और हर जानकारी कि किंमत होती है, बॉस! ये बॉडी आपल्याला पैशे घेऊन येणार!"
"बॉडी से पैसा? कैसा? और ये बॉडी है किस्का?"
"ये बॉडी, चंद्रशेखर का है!"
"क्या? वो टीव्हीवाला, घाटमे एकक्सिडेंट हुयेला? अबे साले, बॉडी ये पैसा नै, 'पुलिस' लायेगा! ताबडतोब तेरा बॉडी ले के, यहांसे निकल नेका! क्या?" पीटर वैतागून बोलला. माणिक उत्तर देत नाही म्हणून पीटरने त्याच्याकडे पहिले. रात्रभराच्या शीणवट्याने आणि पोटातल्या दारूने माणिकचे डोळे मिटले होते. माणिक कैक तास जागा राहून काम करू शकत असे, तसेच तो कैक तास झोपून राहू शकत असे! हि त्याची सवय पीटरला नवीन नव्हती! आता काय? हा कुंभकर्ण जागा होई पर्यंत, पीटरला वाट पहाणे भाग होते. पण एका गोष्टीची पीटरला खात्री होती, पैसा असल्या शिवाय माणिक यात हात घालणार नव्हता! जे असेल ते असो. आपण मात्र, त्या मुडद्याचे दोन हजार, पर डे, लॉजिंग चार्जेस माणिक कडून वसूल करायचे. जमले तर ज्यास्तीच! हे त्याने मनाशीच पक्के करून टाकले.
पीटरचा मोबाईल वाजला. सिंडिकेटच्या मेम्बरचा फोन होता.
"बोल!" मोबाईल कानाला लावत पीटर म्हणाला. नंतर पाच मिनिटे तो फक्त एकात होता. पाच मिनिटांनी त्याची हालत 'पतली' झाली होती! बक्षी मुंबईत आला होता. आणि 'चंद्रशेखर' नावाच्या माणसाला हुडकत होता!
माणिकने आणलेला मुडदा पण 'चंद्रशेखरचा' होता. बक्षीचा आणि माणिकचा 'चंद्रशेखर' एकच असला तर?
******