Shodh Chandrashekharcha - 14 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 14

शोध चंद्रशेखरचा!

१४---

सीट बेल्ट लावून, चंद्रशेखर BMW च्या स्टियरिंगवर हात ठेवून, क्षणभर डोळे मिटून बसला. कितीतरी दिवसांनी, तो स्वःता ड्राइव्ह करणार होता. साल, त्या सुलतानाला काढून टाकला पाहिजे, कायमचा. म्हणजे गाडीतरी हाती लागेल. सत्तर -ऐन्शी -शंभरवर आज रेस करणार. फार्मुला वन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे त्याचे स्वप्न, या कंपनीच्या कामांत राहूनच गेले होते. खरं सांगायचं तर भन्नाट वेगानं कार पळवण्यात जो थरार आहे तो, साला, त्या दारूत नाही आणि त्या दुबईवालीत पण नाही! तिच्या आठवणीने त्याचे अंग शहारले. त्याने सावकाश गाडी सुरु केली. तो मेन रोडकडे निघाला. एक पांढरी स्विफ्ट त्याला साईड मिरर मध्ये ओझरती दिसली, पण त्याने फारसे लक्ष दिले नाही.

दुबईवली,काय पोरगी होती! आह्ह! तोबा तोबा! उगाच नाही आपण दुबईच्या चकरा मारत! त्याचे काय झाले कि न्यूयार्कहुन येताना तो, दोन दिवस दुबईला विंडो शॉपिंग साठी थांबला होता. छानसे हॉटेल बुक करून ठेवले होते. रात्री दहाच्या अंदाज्याला कोणीतरी दारावर दोनदा नॉक केला. हॉटेलचा पोऱ्या होता.

"सर, रूम सर्व्हिस चाहिये क्या?" हलक्या आवाजात त्याने विचारले.

तीन पेग पोटात ढकलल्याने, चंद्रशेखरचे डोके हलके झाले होते. त्याने तो पोऱ्या काय विचारतोय, या कडे लक्ष न देता, त्याने होकारार्थी मान हलवली.

पंधरा मिनिटांनी, उंटा सारखी उंच शिडशिडीत, साक्षात अप्सरा त्याच्या समोर हजर झाली!

वीस तासानंतर तो रूमच्या बाहेर आला, तेव्हा त्याच्याकडे हॉटेल पासून दुबई एअरपोर्ट पर्यंतचे, टॅक्सी भाडे देण्या इतपत दिनार शिल्लक होते! दुबई - मुंबई प्लेनचे बुकिंग आधीच केलेले होते, म्हणून बरे. तो त्या 'रूम सर्व्हिसवर' इतका खुश होता कि, त्याने सगळे शॉपिंगचे दिनार तिला देऊन टाकले! पुढील धोका लक्षात घेता, त्याने कस्तुरीला, दुबईला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचे सांगून टाकले. त्यामुळे त्याला, तिच्या डोळ्या देखत कधीही दुबई गाठता येणार होती! कस्तुरी म्हणजे वेड कोकरू! चटकन विश्वास ठेवला तिने! पण या दुबईवाली समोर कस्तुरी फिकी वाटते हे मात्र नक्की! नुस्ती आग आहे हो!!

विचाराच्या तंद्रीत, तो हायवेला कधी लागला हे कळलेच नाही. दुबईच्या रूम सर्व्हिस नंतर, त्याने कस्तुरीला मग थोडी थोडी दारू पाजण्यास सुरवात केली होती. सुरवातीला तो तिला सोबत घेऊन पीत असे, सोबत एखादी सिगारेट पण ऑफर करत असे! बघता बघता ती एकटी पण घेऊ लागली. हुश्शार मुलगी कुठलीही गोष्ट चटकन ग्रासप्प करते! कशाला काय? कधीतरी तिचा कंटाळा येणारच कि! गायत्रीचा कंटाळा आलाच होता कि! तेव्हा कस्तुरी भेटली. आता चैत्राली आहे. पण ती म्हणजे टफ चालेन्ज! बघू, नस्ता दुबईवाली खरीदी करून आणू! त्या साठी पैसे हवेत आणि पैशा साठी, हि कॉन्फरन्स गरजेची! चला स्पीड वाढवला पाहिजे. असं साठीवर थांबून उपयोगाचं नाही. त्याने अक्सेलेटरवर जोर दिला. सत्तर! शंभर! एकशे दहा! स्पीडोमीटर थरथरत सांगत होता! थोड्याच वेळात त्याला काहीतरी चुकत असल्याचे जाणवले. पण काय? ब्रेक थोडा उशिरा लागत होता! चैत्राली तर गाडी रेडी आहे म्हणाली होती! काय होतंय? आत्ता पुन्हा डोळ्यावर झापड आल्यासारखी झाली. सकाळी मस्त होतो, ब्रेकफास्ट मजेत झाला होता. लंच तर छानच होते. मग असं काय होतंय?

पहाता पहाता तो अवघड घाट सुरु झाला. कल्च सुद्धा बरोबर लागेना, गाडी कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. चढामुळे तो कसाबसा शंभरीतून सत्तरीत आला होता, तरी त्या वळणा वळणाच्या रस्त्याला, तो स्पीड भयानकच होता. त्याने जमेल तितका जोराने ब्रेकवर पाय रोवला, समोर झाड दिसत होत. काडकन काहीतरी तुटले! पायातला ब्रेक निर्जीव झाला होता! समोरचे ते वेडेवाकडे झाड, सरळ येऊन बोनेटला धडकले! त्याचे डोके वेगाने वर उचलेल्या स्टेरिंगवर आपटले. याखेपेला डोळ्यावर आलेली झापड तशीच राहिली! मध्यंतरी कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन जातंय असे वाटत असतानाच त्याची पुनः शुद्ध हरवली!

०००

माणिकला जाग आली, तेव्हा सगळं जग झोपलं होत. त्याने घड्याळात पहिले, रात्रीचे साडेअकरा वाजलेले होते. जवळच्या पलंगावर पीटर एका लयीत घोरत होता. साली, झोप आहे का काय? समदी काम खोळंबली. त्या रिपोर्टींगवाल्याला पिळायचंय! आता रातच्या कोन फोन उचलणार. मग काय करायचं? आता पूना झोपायचं. तो परत डोक्यावरून पांघरून घेऊन झोपी गेला, तो थेट सकाळी दहा वाजताच उठला. पीटरचा बिछाना रिकामा होता. गेलं जनू बेन माशे आणायला. त्याने नेहमीप्रमाणे ऑडिओ रेकॉर्डिंग ऑन केले आणि फोन लावला.

"मी माणिक! रिपोर्टींग करायचीयय! करू का?"

"बोल!"

"ते मड काय करू?"

"मी काल हि सांगितलं होत, तो तुझा प्रश्न आहे!"

"नाय, तुमि समुद्रात फेक मनाला होता!"

"मग, दे टाकून! मला नको विचारू!"

"पण त्याचे ज्यादा पैसे देणार का तुमि?"

"नाही!! पुन्हा पुन्हा तेच ते विचारू नकोस! आणि आत्तापासून तुझे माझा सबंध संपला आणि कामही!"

"असं कस, एकतर्फा काम थांबवता? आता म्या काय म्हंतो ते आइका! तेच काय हाय कि, मी तुमसनी असं कस सोडीन? पैल्या फोन पसन, आपलं बोलन म्या टेप केलंय या फोनमदी! मी मड घेऊन त्या पोलीस बाईकडे जातो! फोन अन मड, दोनी तिच्या हवाली करतो! मग जे होईल ते होईल! कस?"

समोरचा बोलत नव्हता. इचारात पडला जनू! पडणारच कि खोडाचा तसा घातलाय!

"हैती का लाइनीवर?"

"ठीक! जा पोलिसात!" आणि फोन कट झाला! आ! असं कस झालं? मायला बरूबरच हाय! टेपची धमकी पोकळ वाटली आसन! मरूदे. आपला दुसरा प्लॅन लावावा! त्याने दुसरा नंबर लावला.

"हॅलो, मी माणिक!"

"काय पाहिजे? मी तुम्हाला ओळखत नाही!" फोन कट झाला.

त्याने पुन्हा तोच नंबर लावला.

"मी माणिक! तुमि कस्तुरी मॅडमच हैत ना?"

"हो! कोण तू?"

"मी कुनी नाही! तुमि मला वाळकत नाही, पर मी वळखतो तुमाला! चंद्रशेखर सायबाच्या तुमि बायकू हैता!"

चंद्रशेखरचे नाव निघताच कस्तुरी सावध झाली.

"बरोबर!"

"तस असंन तर कामाचं सांगतो. चंद्रशेखरसायेब देवाला पावलेत!"

"देवाला पावलेत म्हणजे?"

"मंजी बोली भाषेत मरून गेले! अन त्यांची बॉडी या माणिक कड हाय!" चंद्रशेखर जिवंत असणार नाही हे अपेक्षितच होते, तरी तिला धक्का बसलाच.

"अरे कुठे आहे?"

"तेच तर! तेच काय कि, ती बॉडी समुद्रात टाकन्यासटी, मला तीन लाख रूपे मिळणार हैती! तुमि तिनलाख एक रुपया द्या अन बॉडी ताब्यात घ्या! कस?"

"मी पैसे का द्यावेत तुला?"

"शिम्पल हाय! चंद्रशेखर इतका मोट्या कंपनीचं मालक, त्यायाचा इमा बी कोटीत असणार! अन तेचे पैसेबी तुमासनीच मिळणार! पालीशीत वारस तुमीच असणार कि! है का नाय बराबर!"

"मग?"

"मग? हितच तर भानगड हाय. इमा भेटाया, बॉडी सापडावी लागती! कह्यान मेला हे कारन लागत! पीएम रिपोर्ट लागतु! अन मी बॉडी समुद्रात फेकली तर यातलं कायपन होनार नाय! तुमासनी किती लुकसानी होतीन? तुमीच ठरवा!"

हलकट माणूस! पण खरं सांगत होता! कस्तुरीने दोन महिन्याखालीच चंद्रशेखरच्या मागे लागून त्याला दोन कोटींचा विमा काढायला भाग पाडले होते! नॉमिनी अर्थात तीच होती!

"ठीक! पैसे कोठे आणि कधी घेऊन येऊ?" तिनेच विचारले.

"सांगतो कि, तवर पैस तयार ठिवा!"

माणिकने फोन बंद केला. तंबाखू मळून गालफडात सारली. अतीव समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. एकवार मुडदा सुखरूप असल्याची खात्री करून घ्यावी म्हणून तो स्टोरेजकडे गेला तर, स्टोरेजला कुलुप होते. त्याने पीटरची चौकशी केली. पीटर मासेमारी साठी समुद्रावर गेला होता आणि दुसरे दिवशी येणार होता! नेहमी स्टोरेजच्या चौकीदाराजवळ किल्ली ठेवणारा पीटर, या खेपेला किल्ली सोबत घेऊन गेला होता.इतकंच नाहीतर चौकीदारच काढून टाकला होता! बरोबरच होते कि! माणिकने स्वतःशीच मुंडी हलवली. एक मुडदा त्या कोल्ड स्टोरेज मध्ये असताना, कोण गाढव किल्ली चौकीदाराजवळ ठेवून जाईल? पीटर गाढव नव्हता.

******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED