शोध चंद्रशेखरचा! - 17 suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शोध चंद्रशेखरचा! - 17

शोध चंद्रशेखरचा!

१७---

इरावती पोलिसस्टेशनच्या जवळ आली तेव्हा, तिला एक कार वऱ्हांड्यात उभी रहात असलेली दिसली. आणि त्यातून कोणीतरी उतरत होते. दारे उघडत असताना कारवाल्याला, इरावती साईड मिरर मध्ये दिसली असावी. कारच्या उघड्या खिडकीतून, कोणीतरी फायरिंग केली. इरावतीने बाईक फेकून, जमिनीवर लोटांगण घेतले. त्या दरम्यान तिने होल्डरमधून गन हाती घेतली होती. कारच्या दाराच्या खाली दिसणाऱ्या पायावर तिने फायर केला. उतरणारा माणूस पटकन पुन्हा गाडीत घुसला आणि वेगात गाडी निघून गेली! धूळ झटकत इरावती उभी राहील. तोवर शकील, शिंदेकाका, आणि आशा पोलीस स्टेशन मधून धावत बाहेर आले.

"कसला आवाज होता, मॅडम?" आशाने निरागसपणे विचारले.

"अरे देवा! तो बुलेट फायरिंगचा आवाज होता! मॅडम तुम्ही ठीक आहेत ना?" अनुभवी शिंदेकाकानि विचारले. इरावती जेथे कार थांबली होती तेथे आली. खाली वाकून खात्री करून घेतली. तेथे रक्ताचे डाग होते. तिच्या फायरिंगने अचूक निशाणा साधला होता! लंगडा सैनिक घेऊन, ती मंडळी लढणे शक्य नव्हते, म्हणून पोबारा केला होता! आपल्याला थोडा जरी उशीर झाला असता तर? या विचारा सरशी इरावती शहारली! विकी येथे सेफ नव्हता. आणि विकीपेक्षा हा पोलीस स्टेशनवर हल्ला होता! पोलीस स्टेशनवर हल्ला? म्हणजे हे प्रकरण आपल्याला वाटते तितके सोपे नाही!

इरावतीने जोग साहेबाना फोन लावला.

०००

"हॅल्लो, पीटर बोलता! बक्षी का कॉन्टक्ट नम्बर मंगता! नंबर व्हाट्स अप कर दे!" इतके बोलून, पीटरने फोन कट केला. तो हि आपल्याला असलेल्या 'जानकारीची' किंमत वसूल करणार होता!

माणिक गाडी घेऊन सर्व्हिसिंग आणि टाकी फुल करून घ्यायला गेला होता. पैशे वसूल करायचे, अन संबुल्या करायचा, असा शिपलं बेत त्याने आखला होता! कस्तुरी बॉडी पहिल्या शिवाय पैसे देणार नाही, हे त्याला माहित होते! कारण आधी कोणीतरी तिला चंद्रशेखरला किडन्याप केल्याचा फोन केला होता म्हणे. तेव्हा तिची निराशा झाली होती. टीव्हीत त्याने बातमी पहिली होती.

०००

इरावतीने फोनवर जोग साहेबाना, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग झाल्याची कल्पना दिली. धावत जाऊन विकीला सेलबाहेर काढले. पोलीस व्हॅन मध्ये कोंबले, त्याचे हात जवळच्या लोखंडी रॉडला हातकडीने लॉक करून टाकले. स्वतःच ड्राइव्हिंग सीटवर बसली आणि कोणाला काही कळायच्या आत, धुराळा उडवत, व्हॅन पोलीस स्टेशनच्या गेट बाहेर पडली सुद्धा! बसल्या बसल्या विकी विचार करत होता. नेमकं काय होतंय? असं अचानक आपल्याला कुठं घेऊन जातीय हि बया? मघाशी फटाक्या सारखा, काही तरी आवाज त्याने ऐकला होता. फायरनिगचा असावा असा त्याला वाटले होते. काहीतरी गंभीर घडतंय. फक्त आपल्याला कळत नाही.

इरावतीची व्हॅन चालवताना चौफेर लक्ष होते. आपला पाठलाग होत नाही याची तिने आधी खात्री करून घेतली. आणि मगच, तिने त्या कच्या रस्त्याला गाडी वळवली! गाडी चालवताना तिने मोबाईल ऑन केला.

"शकील, नेहमीच्या फार्म हाऊस वर ये! सोबत किट आण!" शकील एक निशणात मेकॅनिक होता. आत्ता आलेली शंका, तिला आधी आली असती तर, तिने शकील कडून आधीच तपास करून घेतला असता. आत्ताही बिघडले नव्हते. शकील, मशीन पहाताना विकी, बदमाशी करत तर नाही यावर लक्ष ठेवू शकणार होता. आणि तिला त्याची मदत होणार होती. तसेही विकीला केस उभीराही पर्यंत सुरक्षेत ठेवणे गरजेचेच होते. या फार्म हाऊसवर विकीला ठेवता येणार होते. तूर्तास अपघातली गाडी याच ठिकाणी ठेवण्यात आली होती. या जागेला जरी 'फार्म हाऊस' म्हणत असले तरी, ते एक जुने गेस्ट हाऊस होते.

ती झाडीत लपलेल्या त्या फार्म हाऊस पाशी पोहचली. तिने पुन्हा शकीलला फोन लावला, तो वाटेत होता. तिने विकी कडे नजर टाकली. तो डोळे झाकून, बांधलेल्या हातावर डोके ठेवून निवांत बसला होता. त्याच्या डोक्यात या इन्पेक्टर बाईच्या हातावर तुरी देऊन, कसे सटकता येईल, याचे त्रयराशीक सोडवणे चालू होते!

शकील बाईक स्टँडला लावून खाली उतरला. त्याच्या सोबत ती जडशीळ टूल्स किट होती.

दोन तास विकी आणि शकील त्या BMWची पहाणी करत होते. आणि इरावती लोडेड रिव्हॉल्वर हातात घेऊन, विकीच्या प्रत्यक्ष हालचालीवर लक्ष ठेवून होती.

"मॅडम, एअरबॅग्स जागच्या जागीच आहेत! पण त्यांचा इतर भागांशी असलेला संपर्क मात्र मुद्दाम तोडला आहे, असे दिसतंय!" विकी म्हणाला. इरावतीने शकील कडे पहिले.

"हा, बराबर है! और दुसरी बात, ब्रेक ढिला किया होगा, ऐसा लगता है, कही झटकेसे टूटा होगा. अभी तो जगेपे, नाही है!"

"अजून एक गोष्ट आहे, पेट्रोल टाकी आत्ता कोरडी ठक्क आहे. पण एक छोटासा मॅग्नेट म्यानेज करून फिव्हल टॅंक, कायम 'फुल' दिसण्याची सोय केलेली होती! स्पीड अनकंट्रोल होईल याची पूर्ण सोय करून ठेवली आहे!" म्हणजे अपुरे पेट्रोल भरले असावे. करेक्ट आणि म्हणूनच इतका भयंकर अपघात होऊनही कार पेटली नव्हती! कदाचित गाडीतील पेट्रोल संपता संपता हा अपघात झाला असावा.

इरावती विचारात पडली. म्हणजे हा अपघात घडवून आणलाय! चंद्रशेखरला अनेक छुपे दुश्मन होते. कोणीही हे करू शकत होते. कस्तुरी? पण हि दारूच्या आहारी गेलेली पोरगी. तिला, तसेही बरेच काही विनासायास मिळत होते. पण पैसा काहीही करायला लावू शकतो. आणि तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. हे काम कस्तुरीचे मुळीच नव्हते!!

तेव्हड्यात काही तरी गडबड झाली. शकीलचा हात पिरगळून, विकीने त्याला, आपल्या समोर ढाली सारखे धरले होते! विकीच्या हाती नऊ इंची लांबीचा स्क्रू ड्रायव्हर होता, आणि तो त्याने शकीलच्या मानेला लावला होता!

"मॅडम, पिस्तूल खाली टाका! आणि हात वर करा!" विकी खुनशी आवाजात म्हणाला.

इरावतील परिस्थितीची जाणीव झाली. विकीला असे आणणे धोक्याचे होते हे तिला माहित होते. पण ते त्याच्या सेफ्टी साठी गरजेचे होते. विकीला माहित नव्हते, कि बाहेर बक्षी टपून आहे.

इरावतीने पिस्तूल आपल्या पायाशी ठेवले, आणि हात वर केले.

"मॅडम, ते पिस्तूल पायाने माझ्याकडे ढकला."

इरावतीने आश्या प्रकारे ढकलले कि, ते तिच्या पासून जरी दूर होते, तरी ते विकीलाही सहजा सहजी हस्तगत करणे शक्य नव्हते!

"मॅडम, आता तुमच्या व्हॅनची चावी माझ्या कडे फेका!" येथे विकीची चूक झाली होती! इरावतीने खिशात हात घालून किल्ली, विकीने ज्या हातात स्क्रू ड्राइव्हर धरला होता, त्या बाजूला फेकली. विकीने शकीलच्या कमरेत जोराची किक मारली, शकील धडपडला. विकीने स्क्रूड्राइव्हर टाकून, व्हॅनची चावी वरचेवर झेलली. खाली वाकून पिस्तूल हस्तगत केले आणि सावरलेल्या शकील आणि इरावतीवर ते रोखून तो, व्हॅन कडे सरकू लागला.

"तुम्ही दोघेही जागचे हलू नका!" तो गरजला.

ज्या पद्धतीने विकीने रिव्हॉल्व्हर धरले होते, त्यावरून गडी या बाबतीत नवखा आहे, हे इरावतीने ओळखले.

"विकी, तू दगाबाजी केरतोयस! पुढील परिणामाची माझी जवाबदारी नाही! अजूनही ते रिव्हॉल्वर परत करून सरेंडर हो!"

तो एव्हाना व्हॅन मध्ये घुसला होता. इरावती आणि शकीलने व्हॅन कडे धाव घेतली. इरावतीने बे धडक व्हॅनचे दार उघडले. विकी हातातली कि लावून गाडी स्टार्ट करण्याच्या प्रयत्नात होता.

"गाढवा, मोटरसायकलच्या चावीने व्हॅन स्टार्ट होत नसते!" विकीच्या गचांडीला हिसका मारून तिने त्याला बाहेर खेचले. विकी बाहेर कोलमडला. साली बदमाश निघाली, व्हॅन ऐवजी बाईकची चावी आपल्या कडे फेकली होती! त्याही गडबडीत त्याने हातातल्या रिव्हाल्व्हरचा लिव्हर दाबलंच! बार फुसका निघाला! शकीलने नेमकी झेप घेऊन विकीला खाली पडले, त्याच्या हातातील पिस्तूल दूर उडाले. विकीने पूर्ण ताकतीने शकीलला दूर लोटले आणि जमेल तितक्या वेगाने, वाट मिळेल तिकडे पळू लागला. इरावतीने सावकाश आपले रिव्हॉल्वर उचले, विकीच्या मांडीच्या रोखाने गोळी झाडली. आवाजासरशी विकी पळता पळता कोसळला! शकील एखादा जादूचा प्रयोग पाहून आश्चर्यचकित व्हावे, तसा होऊन इरावतीकडे पहातच राहिला. त्याच्या मनाचा गोंधळ इरावतीच्या लक्षात आला.

"शकील, मघाशी पोलिसस्टेशन मध्ये एक गोळी या रिव्हॉल्वर मधून झाडली होती! तो चेम्बर रिकामाच होता! रिव्हॉल्व्हर जमिनीवर ठेवताना, मी रिव्हाल्व्हरचा रिकामा चेम्बर ट्रिगरसमोर घेतला होता! म्हणून विकीला गोळी झाडता आली नाही!"

शकीलने जखमी विकीला व्हॅन मध्ये टाकले. त्याचा बंदोबस्त केला. तेव्हड्यात इरावतीचा फोन वाजला. अर्जुना होती.

"बोल अर्जुना!"

"मॅडम, कस्तुरी मोठी पर्स घेऊन भिवंडीच्या दिशेने निघाली आहे! मला वाटले होते ती शॉपिंग किंवा पार्लरला जात असेल पण नाही! तिचा नेहमीचा स्पा मागेच राहिला आहे! काही तरी गडबड वाटतीय!"

"ती तिची पाठ सोडू नकोस! मी तुला जॉईन होते! ती थांबली कि लोकेशन कळावं! मी जवळच असेन!"

इरावतीने फोन बंद केला.

"काय झालं मॅडम?"

"शकील, विकीला हॉस्पिटलात घेऊन जा. तू याला एकटा सोडू नकोस. याचा जीव धोक्यात आहे! लक्षात ठेव! तू व्हॅन घेऊन जा. मी तुझी बाईक घेऊन जाते!"

व्हॅन आणि बाईक मेन रोडवर येईपर्यंत सोबत होत्या नंतर त्या विरुद्ध दिशेला निघून गेल्या.

*******