फूल फुलले हीच फुलाची अंतिम कथा
फुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे
फूल विचारते,"फळा, तू कुठे आहेस?"
फळ उत्तरते," मी तुझ्या हृदयातच आहे"!!!
वाचल्याक्षणी मनावर मोहिनी घालणारे हे शब्द नव्हे काव्य आहे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर यांचे!
(ठाकूर हे त्यांचे मूळ आडनाव पण ब्रिटिशांनी तो उच्चार टागोर असा बदलला आणि पुढे तेच प्रचलित झाले)
रवींद्रनाथ म्हटलं की आधी समोर येतं शांतिनिकेतन आणि बंगाली चित्रपटांमधून ऐकलेलं आणि हिंदी चित्रपटगीतातही वापरलं गेलेलं रविंद्र संगीत!
हे पुस्तक म्हणजेही एक चित्र- पटच आहे! रवींद्रनाथांच्या सौंदर्यपूर्ण,कलासक्त आणि स्वतःच्या विचाराने प्रेरित झालेल्या आयुष्याचा!
लेखिका आशा साठे आपल्याला या पुस्तकांत रवींद्रनाथांच्या बरोबरीने आयुष्याचा अनुभव देतात,तशी संधी देतात!
रवींद्रनाथ यांचा परिसस्पर्श कविता,कथा,कादंबरी,नाटक,निबंध अशा सर्वच साहित्य प्रकारांना लाभला आहे! त्या सर्वातून त्यांची "शुभबुद्धी" ठायी ठायी दिसून येते.त्यांचं कार्य ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर ती रवींद्रनाथांची जीवनसाधनाच आहे!
या पुस्तकात काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार! कारण ते तुम्ही वाचावं आणि अनुभवावं असं मला वाटतं म्हणून हा खटाटोप!
वृष्टी पडे टापुर टुपूर म्हणत जीवनगाणे गाणारे रवींद्रनाथ शाळेतल्या आयुष्याशी समाधानी नव्हतेच.खुला मोकळा निसर्ग त्यांना बालपणापासूनच खुणावू लागला. वडिलांच्या सान्निध्यात तीन महिने निसर्गसंपन्न प्रदेशात राहिल्याने त्यांच्या बालमनावर निसर्गाने हळुवार फुंकर घातली.दवाने भरलेल्या गवताचा वास,नारळीच्या झावळीतून येणारी उन्हे किंवा त्यांच्या पद्मा नावाच्या बोटीवरचा जलनिवास यांनी ते अधिक समृद्ध होत गेले!
भर तारूण्यात लाभलेला तरूण परिचित मित्र- मैत्रिणींचा सहवास त्यांना तारूण्याकडे आणि सोंदर्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देऊन जातो!आयुष्यभर केलेले वेगवेगळे प्रवास रवींद्रनाथांचे व्यक्तीमत्व बहरून आणि भारून टाकण्यात मोलाचे सहप्रवासी ठरले आहेत.
रवींद्रनाथांचा मानुषेर धर्म हा त्यांच्या सर्वच साहित्याचा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यातील पुरुषपात्रे ही wishfull thinking मधून निर्माण झाली आहेत तर तर त्यांनी चितारलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखांमधे महिलेचा आत्मसन्मान दिसून येतो. अशावेळी मग ही पात्र फक्त पात्रं उरत नाहीत!!!
कुटुंबातील जबाबदारी अंगावर पडल्यानंतरही आपली खानदानी जमीनदारी सांभाळणारे कविमनाचे रवींद्रनाथ आपल्याला पुस्तकात पुढच्या पानांवर भेटायला येतात. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेले कार्य म्हणजे ब्रह्मचर्याश्रम विद्यालय! बालमन हे निसर्गाशी एकरूप होऊनच फुलते फळते या विचारातूनच शांतिनिकेतनची संकल्पना गुरुदेवांनी मूर्त रूपात मांडली! अशा मुक्त वातावरणात मुलांच्या शरीर -मन -बुद्धीचे पोषण करणारे शिक्षकच त्यांना हवे होते आणि ते तसे मिळालेही!!
शांतिनिकेतनाची सुरुवात ,त्यामागचा विचार आणि तेथील सर्व वर्णन वाचकांनी स्वतःहून वाचण्याचा निर्मळ आनंद नक्की घ्यावा!
विश्वभारती विद्यापीठ,ग्रामीण जनतेच्या उन्नतीसाठीचे श्रीनिकेतन,गीतांजलीची निर्मिती आणि नोबेल पुरस्कार,राष्ट्रगीताची रचना हा सर्व जीवनप्रवास आपण लेखिकेचं बोट धरूनच पुढे पुढे करत राहतो आणि एक आंतरिक शांतता अनुभवायला लागतो नकळतच!
देशकारण आणि राष्ट्रकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतआणि त्या एकमेकांना पूरक आहेत असे म्हणणारे गुरुदेव आपल्याला राष्टीय अस्मितेची जाणीव करून देतात! त्यांची चित्रकला सौंदर्य लेऊनच येते आणि हे सौंदर्य म्हणजे सत्य!! असेही त्यांचा कुंचला रेखून जाताना आपण अनुभवतो!
जगदीशचंद्र बसू,शरदचंद्र चट्टोपाध्याय,अरविंद घोष,महात्मा गांधी यांच्या आणि रवींद्रनाथांच्या नात्याबद्दलही हे पुस्तक भाष्य करते.
कविता आणि रवींद्रनाथ हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही! फिरे चले माटिर टाने.. पदर पसरून तुझ्या मुखाकडे पाहत असलेल्या मातीकडे तू परत फिर असं सांगणारी गुरुदेवांची कविता म्हणजे त्यांचं रोजचं "जगणंच" होती! जगाची कविता लिहीणारा एक Master Poet आहे हे त्यांचे विचार त्यांची आध्यात्मिक साधनाही सूचित करतात!
मानव धर्म,देशकारण,शिक्षण,ग्रामीण विकास,नातेसंबंध,चित्रकला अशा जीवनाच्या विविधांगाला स्पर्श करणारे,निसर्गपुत्र रवींद्रनाथ! त्यांना जवळून भेटायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर शुभबुद्धीने आपणही या प्रवासात जरूर सामील व्हा!!!
डाॅ.आर्या जोशी
पुस्तकाचे नाव- शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ
लेखिका- आशा साठे
सकाळ प्रकाशन