महती शक्तीपिठांची भाग १६ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महती शक्तीपिठांची भाग १६

महती शक्तीपिठांची भाग १६

ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ही देवी उदयास आली आणि तिने दुर्गेचा अवतार घेतला असे उल्लेख पुराणात आढळतात व त्यावरून तिला ब्रह्मस्वरूपिणी म्हणूनही ओळखले जाते.
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक असे साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी.
देवीचे स्थान मनाला भावते.
तसेच गडावरील १०८ कुंड, प्राचीन मंदिरे, उत्सव, मलखांब, अनेक संतांचा व सरदाराच्या दान वृत्तीच्या अनेक आख्यायिका आहेत .
सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली.
गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे .
मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक व पुराणे ऐकवत असत म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून ते पुराणे ऐकत असल्याचेही म्हटले जाते..
येथेच त्यांनी दुर्गासप्तशती हा ग्रंथ लिहिला ज्यात तेरा अध्याय आणि सात हजार श्लोक आहेत .
देवीच्या आशीर्वादाने ते दीर्घायू झाले .
तसेच पराशर ऋषींनी पारेगावातून देवीच्या नजरेसमोर बारा वर्षे तपश्चर्या केल्याची अख्यायिका आहे.
ज्ञानेश्वरीतही ज्ञानेश्वरांनी गडाचा उल्लेख केला आहे.
तर मच्छिंद्रनाथांचे येथे काही काळ वास्तव होते,यावरून सप्तशृंगी देवीच्या भक्ती अन् शक्तीचा अंदाज येतो.
सप्तशृंगी गडाला पौराणिक अन् धार्मिक महत्त्व आहे तेवढेच प्राचीन अन् ऐतिहासिक संदर्भही आहेत.
उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध आला होता.
संत गाडगे महाराज समाज प्रबोधनासाठी गडावर थांबल्याचे ज्येष्ठ मंडळी सांगतात.
देवीचे भक्त संत दाजिबा महाराज यांचेही गडावर वास्तव्य होते त्यांची समाधी गडावर आहे.
गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळअष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरीहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव साजरे केले जातात.
यात चतुर्दशीच्या रात्री गडाच्या शिखरावर मानकऱ्यांकडून ध्वज लावला जातो.
ही प्रथा पाचशे वर्ष जुनी आहे
हा सोहळा पाहण्यासारखा असतो.
तसेच त्या वेळेस गडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
गडावरून दक्षिणेस दिसणारे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालय नावाचे कुंड गडाचे सौंदर्य वाढविताना दिसते. गिरिजातीर्थ किंवा शिवतीर्थ नावाने ओळखले जाते.
त्याजवळच एक हेमाडपंथी मंदिर आहे.
त्याला सिद्धेश्वर महादेव मंदिर असेही म्हटले जाते.
सप्तशृंगगडाचे निसर्गसौंदर्य अफाट आहे..

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे भिक्षुकी करणारे १७-१८ वर्षांचे युवक बाळंभट्टदादा देवधर निफाड तालुक्यातील कोठूरे गावचे होते .
एकदा निजामाच्या मल्लांशी लढण्यासाठी पेशव्यांचे मल्ल असमर्थ ठरल्याने हे आव्हान बाळभट्टांनी स्वीकारले व भक्तीशक्ती प्रतिक होण्यासाठी सप्तशृंगीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली.
यावेळी कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभट्टदादांना वर दिला की प्रत्यक्ष मारुतीराय त्यांना दर्शन देऊन कुस्तीचे डाव शिकवतील.
त्याप्रमाणे साक्षात बजरंगबलींनी त्यांना दृष्टांत दिला व एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले.
बाळंभट्टदादांची ही विद्या पुढे मलखांब म्हणून प्रसिद्धीस आली.

.

महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात.

२) श्री रेणुकामाता (माहूरगड)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय.

श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते.

महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.
माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सिंहाद्री पर्वतावर हे स्थान आहे.

पैनगंगा नदीने वेढलेला हा परिसर निसर्गरम्य आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते
या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत.

हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.

हे एक महान तिर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते.

रेणुका देवीचे मंदिर शहरापासुन सुमारे २.४१५ की .मी. अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे.

देवगिरीच्या यादवांच्या राजाने देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले .

दरवर्षी दसर्याच्या दिवशी रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.

एका आख्यायिकेनुसार..

सूर्यवंशातल्या रेणु राजाने अपत्य प्राप्तीसाठी कन्याकामेष्टी यज्ञ केला.

त्या वेळी यज्ञकुंडातून प्रगट झालेली कन्या हीच रेणुका होय.

माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला होता असे मानतात .

तिचे नाव रेणु असे ठेवण्यात आले.

रेणुकेने स्वयंवरात जमदग्नींची निवड केली.

शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले.

त्यांना रुमण्वान, सुषेण, वसुमान, विश्वावसु आणि परशुराम अशी पाच पुत्ररत्ने झाली.

जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत.

सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती.

देवेंद्राने ती ऋषींना भेट दिली होती.

राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला.

त्याने जमदग्नी ऋषींकडे कामधेनू मागितली.
ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही.

तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, ही संधी साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला.

आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली.

नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला.

परशुरामाने वडलांचा हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली व क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.

सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात जमदग्नी ऋषींचा मृत्यू झाला.

जमदग्नी ऋषींचा देह चितेवर ठेवण्यात आला.

तेव्हा रेणुकासुद्धा सती जाण्यास तयार झाली.

पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले.

तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले.

या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले.

यावेळी माता रेणुका सती गेली.

या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.
रानोमाळ भटकत अखेर परशुराम माहूरगडावर आला.

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली.

एकदा तो दु:खी होऊन शोक करत असताना आकाशवाणी झाली.

“तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. “

परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले, तेव्हा रेणुका चितेमधून वर येत होती.

मातेचा छातीपर्यंतचा भाग ज्वाळांमधून वर आला होता.

तेवढेच परशुरामाला दिसले.

रेणुका परशुरामास म्हणाली, ‘बाळा, तू मनावर संयम ठेवला नाहीस.

मी चितेतून पूर्णरूपाने येणार होते.

आता या अर्धवट स्वरूपातच माझा येथे कायमचा निवास राहणार आहे.

अशा प्रकारे रेणुका माता माहूरला स्थिरावल्याची आख्यायिका सांगितली जाते.

त्यावेळी रेणुकामातेचे परशुरामाला या डोंगरावर दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले.

शेजारच्या आंध्रप्रदेशात ऊर म्हणजे गाव ते मा ..ऊर आणि पुढे माहूर झाले..!!

तांदळा रूपातल्या देवीच्या मुखाचीच माहूरला पूजा होते.

तीन-चार मैलांवर दत्तप्रभूंच्या पादुका व शिवलिंग आहे.

त्यापुढे अनसूयेचे शिखर आहे.

मंदिराच्या डावीकडे किल्ला आहे.

मूळझरा किंवा मोलझरी नावाने ओळखली जाणारी जागा तसेच शेजारचे “रेणुकातीर्थ “म्हणजे “मातृतीर्थ” ज्या तीर्थक्षेत्रास मोवाळे म्हणूनही ओळखतात.

रेणुकेची मूळपीठावर स्थापना करून परशुरामाने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे सहस्रार्जुनास नामोहरम केले.

रेणुका मंदिराच्या दक्षिणेस परशुरामाचे देवालय आहे.

रेणुका देवी मंदिराच्या मुख्य द्वारातून आत गेल्यावर यज्ञकुंड लागते.

द्वारावर मोठा नगारखाना आहे.

मंदिराजवळच महालक्ष्मी व तुळजापूरवासिनी भवानीचे मंदिर आहे.
पिंपळाखाली जमदग्नी ऋषींचे शिवलिंग आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्र पौर्णिमा, आषाढी-श्रावणी पौर्णिमा, आश्विन-कार्तिकी पौर्णिमा, दत्तजयंती, पौष वद्य एकादशी, चंद्र-सूर्य ग्रहण या दिवसात येथे मोठी यात्रा भरते.

शिवाय सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची मूर्ती आहेत.खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ,पांडवतीर्थ,औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ,रामतीर्थ इ.आहेत.

देवी महात्‍म्‍यात नवरात्राचे अनन्‍य साधारण महत्‍व आहे. हा नवरात्र उत्‍सव म्‍हणजेच आदीशक्‍तीच्‍या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंग्रामाचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्‍ट राक्षसां सोबत घनघोर युध्‍द करुन,आपला पराक्रम दाखविला तोच हा कालखंड.

महिषासूर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्‍द करुन त्‍याचा वध केला,तो हा कालखंड.

अश्विन शुध्‍द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली.

असा हा कालखंड...

हयाच कालखंडास "शारदीय नवरात्र" असेही म्‍हणतात.शारदीय नवरात्रोत्‍सव रेणुकेच्‍या गडावर अतिशय शुचिर्भूत वातावरणात, नि:सिम श्रध्‍देने साजरा केला जातो.


क्रमशः