mahanti shaktipinthachi - 15 books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग १५

महती शक्तीपिठांची भाग १५

आदीशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात प्रमुख देवींची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत..
तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते.
साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे.
ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते.
ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत.
अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी.
सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून ते अर्धपीठ समजले जाते .
या सर्वांची माहिती खाली दिली आहे

वणी (सप्तशृंगी) माहूर (देवी रेणुकामाता) श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी) कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी)

१) वणी (सप्तशृंगी)

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे वणीची सप्तश्रृंगी होय.
सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकारस्वरूप समजण्यात येते.
मधमाशांचे पोळे काढताना कोणाला तरी या देवळाचा शोध लागला .
शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत.
त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे ठिकाण सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे.
देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे.
नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे,पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.
देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ५०० पायऱ्या आहेत.
चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे.
हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत,यानंतर २०१८ पासून रज्जूमार्गाचा वापर सुरू झाला आहे.
सप्तशृंगी हे देवीचे मूळ पीठ मानले जाते.
सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे.
देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे.
या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे.
सप्तशृंगी हा किल्ला नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते.
आदीशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते.
ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे.
येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.
या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
देवीचे गडावरील मंदिर दुमजली असून देवी दुसर्‍या मजल्यावर आहे.
८ फूट उंचीच्या या मूर्तीला अठरा हात आहेत आणि त्यात विविध शस्त्रे आहेत तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत..
त्रिशूल, सुदर्शन, शंख, धनुष्यबाण, वज्र, घंटा, अग्नी ज्वाला, दंड, अक्षमाळा, कमंडलू, सूर्यकिरणे, तलवार, ढाल, परशु, पानपत्र, कणीस, कमळ, पाश इत्यादी तिच्या हातात आहेत.
ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे.
श्री भगवतीची मूर्ती ८ फुट उंचीची असल्याने देवीला ११ वार साडी व चोळीला ३ खण लागतात.
डोक्यावर मुकूट ,कानात कर्णफुले, नाकात नथ,गळ्यात मंगळसुञ, पुतळ्यांचे गंठण,कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज अंगावर घालण्यात येतात.
दंडकारण्यात वनवासात असताना राम-सीता या देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते.

पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले.
महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला.
त्याला पुनः जागृत करण्यासाठी हनुमानाने दंडकारण्याचा एक भाग असलेल्या याच गडावर येऊन संजीवनी वनस्पती नेली असाही समज आहे.
आणखी एक समज म्हणजे ज्या वेळी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत नेला त्या वेळी द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय असा रामायणात या गडाचा उल्लेख आहे.
दुर्मिळ औषधी वनस्पतींचा हा डोंगर खजिना मानला जातो .
नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात या गडाविषयी वर्णन आहे.
दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळते की कोणी तरी तपश्चर्या करत आहे .
ते कोण आहे हे बघण्याकरिता ते दत्तगुरु यांना पाठवतात .
दत्तगुरु एका मच्छिंद्रनाथांना घेऊन महादेवाकडे येतात आणि महादेव व दत्तगुरु त्याला म्हणतात की तुझी इच्छा आदीशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्या'' ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते.
निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस येथे उपासना केली होती.
शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो.

पौराणिक कथेनुसार
तुला कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता.
त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते.
त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला.
त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली.
ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले.
या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता.
देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे.
दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.
महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर युद्ध करून दमलेली दुर्गा या गडावर विश्रांतीसाठी आली असा समज आहे.
देवीने ठार केलेल्या महिषासूराचे मस्तक म्हणजे रेड्याचे मुख ,मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याच्या पायाशीच दगडात कोरले गेलेले आहे.
देवीची पूजा..
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते.
सहा वाजता काकड आरती होते.
आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते.
या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालुन पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो.
पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो.
बारा वाजता महानैवेद्य आरती होते.
त्यानंतर पानाचा विडा मुखी दिला जातो.
सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात.
देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे.
तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते,पण नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष गर्दी होते .
यामध्ये भारतभरातून आलेले भाविक असतात.
सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो,सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही असते.
पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात.
हा मान त्यांचा असतो.
या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो.
गडावरील इतर ठिकाणे कालीकुंड,सूर्यकुंड,जलगुंफा, शिवतीर्थ,शितकडा,गणपती मंदिर,गुरुदेव आश्रम ही आहेत .
या शक्तीपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय.
असे माहात्म्य सप्तशृंगीचे पुराणकाळापासून सांगीतले जाते.
या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता येतो.
साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली.
उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते.
या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED