पेरजागढ- एक रहस्य.... - १२ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - १२

१२) पेरजागढ संशोधन...



नमनच्या मृत्यूनंतर मी फार प्रमाणात एकटा पडलो होतो.त्यामुळे सतत कुठे जावे? काय करावे? याचा विचार नेहमीप्रमाणे येतच होता. अशात एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती. शेतात जाताना मी एका शेपटी गळलेल्या नागाचा वध केलेला होता. त्यामुळे मला सतत नाग दिसत असायचे. कधी स्वप्नात तर कधी सत्य रूपात.कित्येकदा कुठे बाहेर जरी फिरायला पडलो तरी दर्शन व्हायचे.

या दोन-तीन दिवसाच्या सहवासात "बदला नागिन का" हा सिन चांगलाच अनुभवला. त्यामुळे घरी सगळे ओरडू लागले होते, की नको तसले उपद्रव कशाला करतो हा मुलगा. आता जीव घेतलं त्या बीचाऱ्याचा. कोप झालाय त्या नागमातेचा. आता मागे तर लागणारच आहे. उपासना कर म्हणावं नागद्वारला जाऊन. नाहीतर वंशाचा दिवा वीझायची वेळ आलीया लवकरच.पण नमनची गोष्ट आठवली. आपण तरी आपल्या शेवटच्या घटका आई-वडिलांच्या शब्दाबरोबर जगाव्या असं वाटत होतं. शेवटी तयारी केली आणि नागद्वारला निघालो.

पचमढीच्या सातपुडा पर्वतावर बसलेले एक श्रद्धास्थान.जंगल दाट असल्यामुळे आणि वन्यप्राण्यांचा बराच वावर असल्यामुळे वर्षातून फक्त काही दिवस या स्थळाची भेट घेता येते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले आणि गगनात विहार करत असल्याचे असे विलोभनीय दृष्य दृष्टीक्षेपात येते. खरं तर आधी जायला मला फार वाईट वाटले, पण निसर्गाचा तो देखावा बघून मला फार छान वाटत होते.

तिथल्या दंतकथा ऐकूण मग माझ्या लक्षात आलं की आपल्या भागात बऱ्यापैकी स्थान आहे. ज्याची आपण कधी नोंद केली नाही. आणि माझी एक आगळीवेगळी सवय म्हणजे, मी जिथे पण गेलो तिथल्या काही निसर्गाच्या चित्रफित जमा करून मी त्या लोकेशनवर डिस्क्रिप्शन मध्ये टाकत असे. आणि वर फेसबुक आणि व्हाट्सअप वर सुद्धा जिथे तिथे शेअर करत असे. त्यामुळे एक ट्रेकर म्हणून माझी जिकडेतिकडे ओळख होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोक्यात ट्यूब पेटल्यासारखं तेव्हा लक्षात आलं.आपल्या अस्तित्वाला ही अशाच काही गोष्टी कारणीभूत आहेत ज्या आपल्याला अजून शोधायच्या बाकीच आहेत.मनात जिज्ञासेने जोर बांधला, आणि नागद्वारवरून येताना एक नवी कल्पनाच घेऊन मी घरी आलो.काही वेळ आपल्या मनात असणाऱ्या कितीतरी प्रश्नाचे संग्रह केले आणि त्या संग्रहाला एकच उत्तर दिले "पेरजागढ" आणि पेरजागढ या गडाची नोंद माझ्या कानावर आली होती.

खरंतर पेरजागढ या नावाने मी त्या दिवशीपासूनच एक रिसर्च करणं चालू केलं होतं.कारण कुठे ना कुठे त्यात माझा संबंध आहे असे आढळून येत होतं.ऐतिहासिक वारसा लाभला असलेल्या त्या डोंगराला बऱ्याच प्रमाणात काही रहस्यमय गोष्टी होत्या.ज्या बाजूने आपण त्या टेकडीला आपण घेरत होतो त्याबाजुला एक वेगळीच दंतकथा आणि सृष्टी असे आपल्याला दिसून येतं.

अगदी रामायणातलं सांगावं तर त्यांच्या चौदा वर्षांच्या वनवासात दहा वर्षाचा वनवास त्यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या दरम्यान असलेल्या जंगलात घालवला. त्यामुळे डोंगराच्या काही प्राचीन गुफामध्ये त्यांचे अस्तित्व आहे.वर महाभारतामध्ये पांडवांना जेव्हा वनवासाची पाळी आली होती. त्यांचाही वास् या डोंगर भागावर होता. ज्यात "पाच पांडव गुफा "म्हणून एक प्रसिद्ध स्थळ आहे.ज्यात दगडामधे कोरलेल्या पाच गुहेची प्रचिती आपणास बघायला मीळते.हे झालं लोकांच्या मते असलेल्या काही श्रद्धेची स्थळे. नागभीडच्या शिव टेंपलला भोसलेकालीन एक प्राचीन विहीर आहे जी आज पडक्या अवस्थेत आहे. पाच पांडव गुहेपासून काही अंतरावर शिकारदेव म्हणून एकाश्म स्मारक आहेत.

त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूस "आंबाई निंबाई" म्हणून एक स्थळ आहे. जिथे शिवशंकराची प्रचिती आणि न संपलेले सत्व थोड्याफार प्रमाणात दिसून येते. त्या ठिकाणावरुन समोर एक मुक्ताईचे मंदिर आहे.एक स्त्री असून सुद्धा तिने राणी लक्ष्मीबाई सारखे युद्ध खेळले आहे.तिथले लोक याची ग्वाही देतात. आणि त्याच परिसरात हल्ली वाटरफॉल असल्यामुळे लाखो लोक त्याचा आनंद मिळवण्यासाठी येतात. सामोरी गेल्यावर मुक्ताईचं लढाई केलेलं मैदान आणि काही तिच्या पाऊलांची चिन्ह दिसून पडतात.

तिथून सामोरे गेल्यावर सारंगड येथे घोळपाक नावाची गुहा आहे.ज्यात गोंडा महादेव अशी एक गुफा आढळते.ज्यात सदोदित एक पट्टेदार वाघ त्याचं रक्षण केल्यासारखं तिथे नेहमी बसून असतो.तिथून समोर गेल्यावर आत जंगलात एक धबधबा आढळतो. सतत पडत असणारी त्याची धारा यामुळे त्याला "सातधारा" असे नाव पडले आहे.त्याचा सहज आस्वाद घेता येत नाही कारण कितीतरी आत असलेला हा धबधबा वन्यप्राण्यांच्या वावरात असतो.

काही अंतरावर एक पुरातन महादेव आढळतो आणि लोकं त्याला कोलाम देव म्हणून संबोधतात जो काही अंतरावर जंगलाच्या आत आहे.

आणि सगळ्यापासून वेगळं असतं ते पेरजागढ.जे घोडाझरी तलावात जाऊन समाप्त होते. या पेरजागडाची एक आगळी गंमत आहे. सगळ्या डोंगररांगांमधून पेरजागढ हे सगळ्यात उंच स्थान आहे.जे फक्त दगडांच्या रचनेवर आहे.या डोंगराचा काही भाग इतका उंच आहे की समोरचा संपूर्ण परिसर आपल्याला बघता येतो.

मी जेव्हा पहिल्यांदा पेरजागडावर गेलो होतो, तेव्हा ती एक चावटगिरी आणि फक्त एक उत्सुकता होती. त्याला कारणही अगदी तसंच होतं. कारण एक तर ते विलुप्त होणार होतं. आणि दुसरं म्हणजे मला नवीन स्थान बघायची तेवढीच आवड होती.नवनवीन गोष्टी करणं आधीपासूनचा हा माझा एक नावाजलेला छंद होता.

आत्ताच सांगितले ki खूप काही स्थळ मी बघितले होते.त्यामुळे सत्वाबद्दल बरेचसे तथ्य माझ्याकडे होते. इतरात कधी आमची गप्पागोष्टीची बैठक बसली की स्थळांच्या गप्पात अव्वल नंबर हा माझाच असायचा. त्यामुळे कुठे काय बघायचे आहे?किंवा कुठे काय बघण्यालायक आहे?हे मला लोक आवर्जून विचारायचे. आणि मी पण त्यांना एकदम सांगायचो देखील.

पेरजागडावरून उतरताना ज्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. खरंतर आजीआजोबांनी बालपणी सांगितलेल्या कथेसारखं वाटत होतं. पण त्याची इतकी मोठी कलाकृती नव्हती. जे मी डोळ्यांनी बघितली होती.प्रत्येक वेळेला मला ते जंगल एक वेगळं रूप धारण केल्याचा अवतार दिसायचं.

पायथ्याशी दुसऱ्या कोपऱ्यात एक दगड बॅलन्स होऊन उभा होता.एका छोट्याशा दगडाच्या आधारावर तो उभा होता.पण इतके वादळ येऊन सुद्धा आजपर्यंत कधी तो पडला नव्हता. त्या डोंगराच्या माथ्यावरून बघावं तर घनदाट जंगलांची छानशी कल्पना सुचवायची. नभात प्रवास करणाऱ्या त्या मेघांचा प्रवास त्यांच्या सावलीने आपल्या दृष्टीक्षेपात यायचा. चित्र विचित्र आकृती मध्ये काहीतरी दडलंय असं वाटायचं.

हिरवळीच्या हिरवाईत गड शोभून असायचं. इतकं कष्ट करत जेव्हा आपण गड चढून येतो तेव्हा कुठलाही त्रास किंवा कुठलीही विवंचना मनात येत नाही.एक प्रकारची माया ममता त्या गडाविषयी जागृत होते.ज्यामुळे आपल्या मनात असलेला कल्पनांचा उंचवठा तयार होण्याची चिन्ह आपल्याला दिसून येतात.प्रत्येक स्थळाला ही एक नैसर्गिक देय असते तेव्हा मला कळले.

ज्यांच्या नावाने ते गड ओळखलं जात होतं.त्या सात बहिणींचं पायथ्याशी एक मंदिर होतं. शिळे मध्ये त्यांची स्मृती अशी उदभवतांना आपल्याला दिसत असते. खरंतर दगडांची रचना आणि त्यांची ठेवण ही एक प्रेक्षणीय गोष्ट मला त्यावेळेस कळली. कारण दगडांची घळई ही पाण्यामुळे होते. पण इथे प्रत्येक छोट्या छोट्या दगडांवर एक मोठा दगड बसलेला होता आणि अशाप्रकारे ते गड बसलेलं होतं की कुणीतरी हाताने ती दगडे बसवलीयत.

मंदिराच्या खालच्या बाजूला एक वाघोबा म्हणून शीला स्थापित केली आहे आणि खरे सांगायचं ठरलं तर जिथे ती शीला स्थापित आहे तिथून खोल दरी चा भाग चालू होतो.आपली पायवाट पण तिथून वळते त्या दरीत पाणी असल्या कारणाने ओलावा कायम असतो. मधेच एखादा माकड या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना दिसतो. तर रानडुकरे पायथ्याशी हैदोस करत असताना दिसतात.

आणि अस्वलाच्या सतत असलेल्या तिथल्या वास्तव्याने दऱ्या खोऱ्याची कुठलीही कमी नाही त्या गडावर.त्यामुळे सतत वाघ तिथे वावरत असतो. पायथ्याशी जलकुंभ म्हणून एक पाण्याचे स्त्रोत आहे. त्या जलकुंभांची पण एक आगळीवेगळी गंमत आहे. तिथलं पाणी कधीच आटत नाही. काही हुशार माणसांनी लय प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी की पाणी कुठून येते म्हणून, पण त्यांना काहीच शोध लागला नाही.पाण्याचा जितका साठा आपल्या डोळ्यासमोर असतो तो तितकाच असतो.इतर कोणत्याही ऋतूत त्याला कोणताच फरक पडत नाही.

आणि जेव्हा परतीची वेळ येते. तेव्हा परत त्या घनदाट जंगलाला पार करून आपल्याला परत यावं लागतं.जंगलातून एक किंवा दोन किलोमीटर बाहेर आल्यावर एक वेगळाच नजराना आपल्याला दिसून येतो."जो रडे तो चढे आणि हसे त्याचं खसे."ही म्हण मी त्याच गावातून अनेकांच्या तोंडून ऐकली होती. मला त्या वेळेस त्याबद्दल काहीच कळलं नव्हतं.पण त्याबद्दल माझी जिज्ञासा अधिकाधिक तीव्र होत होती.

रितूची आणि माझी भेट हा सगळ्या प्रकरणानंतर तिथेच झाली होती.त्यामुळे ते गड मला अधिकाधिक आवडायला लागलं होतं. तसं इतक्यात वाढलेल्या रुचीमुळे अंगावर असलेला मृत्यूपणाचा भाव फार कमी प्रमाणात आलेला होता.यामुळे मी कोणत्यातरी कामात व्यस्त आहे असं घरच्यांना नेहमी वाटू लागायचं.अलीकडे युट्युब वर आणि गुगल वर मी याविषयी बरंच संशोधन करू लागलो होतो.तिथे असणारे दगड शिलालेखाच्या कामास येऊ लागतात व फार जुनाट असे एकाष्मा स्मारक त्या जंगलात आढळतात. हे मला माहीत झाले त्यात "राकसनुमा" नावाचं अत्यंत प्राचीन स्मारक खरच बघण्यालायक होतं.त्यामुळे बरंच काही दैवत्व आणि रहस्य डोंगरदऱ्यात लपून बसले आहे.याची मला जाणीव झाली, आणि दिवसेंदिवस मी त्यावर शोध करू लागलो.

ब्रिटिशकालीन काळात ब्रिटिशांच्या हातून घडवलेला घोडाझरी तलाव आजही पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे.आणि जेव्हा मी एक शोधक नजर त्यावर टाकली तेव्हा एक अजून आश्चर्य वाटलं.इतर लोक म्हणतात की घोडाझरी तलावाला एका घोड्याच स्वरूप आहे.पण त्याला ड्रोनने बघितल्यावर मला असे कधीच वाटले नाही. याउलट ते मला एखाद्या ड्रॅगन सारखे दिसत होते. मी त्या संपूर्ण भागाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू लागलो ज्यामध्ये मला बरच काही मिळू लागलं.

निसर्गाची बनावट आजपर्यंत कोणी समजू शकलं नाही पण ज्या घोडाझरीला ड्रॅगनचा मी रूप दिला होता.तो वर बघून हवेत आकाशात उडण्याचा प्रयत्न करतोय आणि बाजूला दहा ते पंधरा किलोमीटर डोंगराच्या पायथ्याशी "कसरला" नावाचे एक गाव आहे. तिथल्या तलावाची कलाकृती पण विचित्र आहे. एक छोटासा प्राणी आकाशात संचार करू बघत आहे आणि हा ड्रॅगन त्याला पटकावणार अशा पद्धतीचे ते विलक्षण दृश्य वाटते. समोर परत एकदा गडावर लक्ष गेली. मागे एकदा टीव्हीवर न्यूज पोर्टल मध्ये एक वाद वाढला "राम रावण सच या झुठ" त्यांचं इथे काहीच वास्तव्य नाही पण श्रीलंकेत खरंच रावणाच राज्य होतं की नाही, म्हणून भारतातील काही कॅमेरामेन आणि न्युज रिपोर्टर लोक तिथे गेले होते. तेव्हा त्यांनी बऱ्याच प्रमाणात असे काही तथ्य दाखवले होते ते एक माझ्या लक्षात आलं होतं.

एक डोंगर दरी दाखवण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या डोंगराला हनुमानाचे नाव देण्यात आले होते.आश्चर्य वाटण्याचे एकच कारण होतं, ते म्हणजे ते डोंगर. जेव्हापण डोळ्याच्या आडव्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा खरंच हनुमानाचे एक विलोभनीय दृश्य दिसतं.बघणाऱ्याला खरंच अशी विलक्षण प्रचिती येते की त्या डोंगराच्या ऐवजी हनुमान तिथे लेटला आहे.

त्याच प्रकारे मी पेरजागढ बाबतीत दृष्टी स्थिरावली तर एक नवल मला तिथेही जाणवले.पेरजागढ म्हणजे सात बहिणींचा गड त्या डोंगराच्या माथेरानपासून सगळ्यात उंच आहे. समोर पसरलेल्या डोंगररांगेत दरी बनलेली आहे, आणि समोर ते डोंगर घोडाझरीला येउन नामशेष होते.पण आडव्या दृष्टिकोनातून जर बहीण-भावांच्या त्या डोंगरांना बघितले तर एखादी बाई तिथे झोपलेली आहे असं दिसून येते.आकाशाला बघत असलेला तिचा चेहरा, खाई असल्यामुळे माने जवळचा अरुंद भाग आणि समोर भावाचा डोंगर चालू झाल्यामुळे एखाद्या स्त्रीच्या वक्षस्थळा प्रमाणे ते डोंगर दिसते. परत समोर जेव्हा कमरेचा भाग लागतो तेव्हा ते डोंगर अरुंद होते. पायाचा भाग म्हणजे डोंगर कमी-कमी होत घोडाझरी तलावात नामशेष होतो.

ड्रोन च्या मदतीने व मॅपच्या मदतीने मी बऱ्याच काही अद्वितीय चित्रांची अनुभूती घेतली. कुठे प्राचीन काळात असणारे त्रिशुळ आढळले. कुठे शंख दिसून आले. तर कुठे कुठे भयानक वाटणारी मनुष्याची कलाकृती पण तयार आहे. प्रत्येक वेळेस मला कोड्यात टाकणारे प्रश्न वाटायचे.

तिथे प्रत्येक देवस्थान दहा ते वीस किलोमीटरच्या दरम्यान होते. पण प्रत्येक देवस्थानाची एक वेगळी माहिती एक वेगळा संदर्भ असायचा.वर प्राण्यांची भीती असायची. त्यामुळे सहसा कोणी जंगलात जायची हिम्मत करत नाही.कारण प्रत्येक वेळेस कुणाचा तरी जीव गेल्याची वार्ता कानावर येते. वाघाने हल्ला केला म्हणून त्याचे चार-पाच फोटो व्हाट्सअप वर जमा होतातच आणि जंगल घनदाट असल्यामुळे वनसमितीने त्याचे संरक्षण सुद्धा अगदी डोळ्यासमोर असल्यासारखे करत होते.एक होतं. तिथल्या लोककथेचा खेळ मात्र बरंच विचित्र वाटत होता.कारण आतापर्यंत सांगितलेलं म्हणजे निसर्गाने स्वतः दाखवलेला सौंदर्य होता. नुसतं इतक्यात आपण रस्त्यावर येणे माझ्यासाठी उचित नव्हतं. कारण निसर्ग स्वतःला कलेकलेने घडवत असतो, आणि हे सगळं कदाचित योगायोगही होऊ शकतो. त्यामुळे मी ट्रेकिंगचा प्रयत्न केला.